मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खरी कमाई....

भानस · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
अतिशय साध्या साध्या गोष्टी किती सुख देऊन जातात. अनेकदा त्या करणाऱ्याला त्याचा गंधही नसतो. तो आपला नेहमीच्या रहाटगाडग्यात अगदी नकळत ते करून जात असतो. पण ते दुसरे मन मात्र हा चांगुलपणा टिपत असते. आणि कुठेतरी त्या मनातही या अनपेक्षित मदतीच्या ओघाचा जन्म होतो. त्यातल्या निखळ सुखाची त्याला एकदा का गोडी कळली की आपसूक तोही त्या साखळीचा हिस्सा होऊन जातो. मी याबाबतीत खूपच भाग्यवान. अनेक मित्र-मैत्रिणी, ओळखीचे, अनोळखीही माझ्या जीवनात अनेकप्रकारे बंध निर्माण करून गेलेत. ही ’ खरी कमाई ’. सहजी केलेली निरपेक्ष गुंतवणूक. या हाताचे त्या हातालाही न कळेल इतक्या निस्वार्थपणे दुसऱ्यासाठी आवर्जून केलेला मदतीचा खटाटोप. मी विसाव्या वर्षीच नोकरीला लागले. कॉमर्सचा शेवटचा पेपर टाकून घरी आले तर कॉल लेटर वाट पाहत होते. दुसऱ्याच दिवशी जॉईन झाले. पाहता पाहता मैत्रिणी-मित्रांचा गोतावळा वाढला. एक मैत्रीण .... खरे तर अगदी जवळची म्हणावी तश्यांत मोडणारी नसली तरी वर्तुळातली. घरी तीन मुले जरा टिपीकल नवरेशाही गाजवणारा नवरा. पहाटे चारापासून ही उठलेली. तरी कामे संपत नसत. आठला नवरा व ती खाली उतरत ऑफिसला जाण्यासाठी. दोन मिनिटे उशीर झाला तरी नवरा थांबत नसे. सरळ स्कूटरला लाथ मारून चालता होई. मग तो संपूर्ण दिवस ही अतिशय उदास असे. मुलेही नवऱ्याने चढवून ठेवलेली होती. या सगळ्या रोजच्या मानसिक ताणतणावातूनही ही माझी थोडीशी लांबच असलेली सखी गुरवारी माझा उपास असतो म्हणून न चुकता मला आवडणारी कच्च्या केळीची भाजी घेऊन येत असे. हा परिपाठ मी किंवा ती रजेवर असलो तरच चुकला असेल. आजही मी जेव्हां जेव्हां ती भाजी करते त्या प्रत्येकवेळी गलबलून येते. इतक्या सातत्याने कोणा तिसऱ्यासाठी प्रेमाने व आवर्जून असे करणे सहज सोपे नसते. त्यासाठी तितकी आपुलकी मनात असावी लागते. ऑफिसमध्ये डबे पोचवणारे काही जण होते. बहुतांशी त्यांचे बांधलेले गिऱ्हाईक असायचे. एखादे दिवशी आपण डबा आणलेला नसला तर त्यांच्याकडे हमखास आपल्यासाठी डबा मिळेलच अशी मुळीच गॅरंटी नाही. असेच एक नेहमी येणारे. आमच्या सेक्शन मध्ये एकाला रोजचा त्यांचा डबा येई. एकदा असाच माझा उपवास होता. मला सकाळी वेळच मिळाला नव्हता काहीही करायला. सुदैवाने त्यांच्याकडे चक्क त्यादिवशी खिचडीचा एक डबा उरला होता. तो त्यांनी मला दिला. पुढे मी नोकरी सोडेस्तोवर हे गृहस्थ न चुकता गुरवारी माझ्या सेक्शनमध्ये डोकावत..... दारातूनच डबा उंचावून विचारत... हवा का? माझा डबा ( जर मी आणलेला असेल ) मी दाखवला की हसून पुढे जात. सारे दोन क्षणांचे संभाषण. पण न चुकता होणारे. अनेकवेळा लागोपाठ सहा महिनेही मी त्यांच्याकडून एकदाही डबा घेतलेला नाही तरीही हे सहृदयी गृहस्थ मला विचारल्याशिवाय पुढे जात नसत. खरे तर कोण लागत होते मी त्यांची? पण मी उपाशी राहू नये म्हणून अव्याहत केलेली विचारणा. एका मित्राची आई डोंबिवलीवरून ट्रेनच्या इतक्या मरणाच्या गर्दीतूनही बाटलीभरून टोमॅटोसार पाठवायची. मित्र ओरडायचा, म्हणायचा, " आमच्या म्हातारीवर काय जादू केली आहेस कोण जाणे. न चुकता दर महिन्याकाठी सार देते तुझ्यासाठी, वर दमही देते. माझ्या लेकीला नीट पोचव. खबरदार गर्दीचे निमित्त करून इथेच टाकून गेलास तर." आज ही प्रेमळ माय या जगात नाहीये पण तिचा माझ्या चेहऱ्यावरून फिरलेला हात आणि त्या टोमॅटोच्या साराची चव हृदयात घर करून गेलीये. अजून एका मित्राचे वडील.... खरे तर आमचा फोनवरच संवाद जास्त. रोजचे न चुकता होणारे संभाषण. अर्थात संभाषणात सगळा वेळ मित्रच. पण त्याच्या बाबांशी एक वेगळेच बंध जुळले. प्रचंड माया करायचे माझ्यावर. दोनतीन दिवस त्यांच्याशी बोलणे नाही झाले तर चौथ्या दिवशी फोन येई. " का गो बाय विसरीलस का? अगो अजून मी जिवंत आहे. जीव लावून बसली आहेस माय. म्हाताऱ्याशी दिसाकाठी चार शब्द बोलत जा." दोन किंवा तीनच वेळा प्रत्यक्ष भेटले असेन मी त्यांना. पण पोत्याने माया केली त्यांनी माझ्यावर. नागपूरला गेले होते कॅरम टुर्नामेंटसाठी. आल्यावर फोन केला, माझा आवाज ऐकताच म्हणाले, " आलं का नागपूर? अग कधीपासून वाट पाहत होतो तुझी. आता जीव थंडावला बघ." हे ऐकले आणि भरून पावले. दिसामाजी न मोजता येईल इतक्या लोकांशी आपण बोलतो. रोजची कामे, त्यानिमित्ते होणारे संवाद. आमचे ऑफिस म्हणजे तर लोकांचा अखंड राबता. डीलर्स, वकील, अकाँटंट नुसता सावळा गोंधळ. मला डोमिसाईल घ्यायचे होते. बांद्रा कोर्टात जावे लागणार होते. अतिशय निकडीने हवे असल्याने मी व नवरा गेलो. तिथे पोचताच चारी बाजूने हल्ला बोल केल्यासारखे अनेक काळेकोटवाले आमच्यावर तुटून पडले. आता कोणाला काम सोपवावे हा विचार मनात सुरू असतानाच अचानक हाक आली, " जोशी मॅडम, तुम्ही इथे काय काम काढलेत? " वळून पाहिले तर माझ्या सेक्शनला नेमाने येणारे एक वकील होते. " मॅडम आजवर एकदाही तुमची सेवा करू दिली नाहीत निदान आता तरी सांगा कशाला आलात इथे? गरीबाला एकदा तरी मदत करू देत. " संध्याकाळी साडेचार वाजता डोमीसाईल आमच्या हातात होते. वर माझेच आभार मानत होते. भर पावसाळ्याचे दिवस होते. संततधार लागली होती अगदी, मरे मरत मरत धावत होती. कशीबशी ठाण्याला उतरले. सुदैव जोरावर होते. समोरच एक रिक्षावाला येऊन थांबला, " मॅडम रिक्षा? " मला तर अगदी देवच सापडल्यासारखे झालेले. निघालो. ए के जोशीला रिक्शाने राइट घेतला आणि जरा मिनिटभर अंतर गेले असेल एक जवळपास पूर्णच भिजलेले आजी-आजोबा रिक्शाला हात करताना दिसले. रिक्षा स्टेशनवरूनच भरून येत असल्याने थांबतच नव्हत्या. दोघेही हैराण झालेले. रिक्षावाल्याला थांबवून त्यांना रिक्शात घेतले. कुठे जायचे विचारता कळले की माझ्या घराजवळच राहतात. अर्धा तास झाला रिक्षा शोधत होते. त्यांना घरी सोडून मी पुढे निघाले. ही घटना मी विसरूनही गेले. एक दिवस सकाळी ऑफिसला निघाले तर आजोबा गल्लीत दिसले. मला पाहून प्रफुल्लित चेहऱ्याने पुढे आले, " सापडलीस एकदाची. अग आमची सौ रोज सकाळी मला पिटाळते. विचार कशाला ते? अग, तुला शोधायला. अंधुकसा अंदाज होता तू इथे कुठेतरी राहतेस. मग काय गेले चार दिवस सकाळी आठपासून मी रोज घुटमळतोय इथे. हे घे, खास तुझ्यासाठी आणलीत वेचून ही देवाघरची फुले. " असे म्हणून ओंजळभर प्राजक्ताची टपोरी फुले माझ्या हातावर ठेवली. त्या फुलांचा दरवळ आजही तितकाच ताजा आहे. हल्लीच मायदेशी आलेले असताना खोपट-ठाण्याहून एस्टीने नाशिकला आईकडे निघालेले. गाडी सुटतानाच उन्हे कलली होती. इगतपुरीला इतके भयंकर धुक्याचे लोट येऊ लागले की अर्ध्या फुटावरचेही दिसेना. ' मानस ' हॉटेल तर संपूर्ण नामशेष झालेले. एस्टीत आम्ही फक्त आठ माणसे. मी एकटीच व एक मुसलमान जोडपे होते, ती दुसरी बाई बाकी सगळे सडेफटिंग. नेमकी एस्टी फेल झाली. काहीतरी मेकॅनिकल फॉल्टच झाला होता. घरचे लग्न असल्याने माझ्या पर्समध्ये दागिने व बरेच पैसेही होते. ड्रायव्हर व कंडक्टर आत्ता गाडी दुरुस्त करून घेऊन येतो म्हणून गेले ते गायबच झाले. इगतपुरीला प्रचंड धुक्यात रात्रीचे साडेनऊ वाजता आम्ही आठ माणसे घाबरून एकमेकांकडे संशयाने पाहत कसेबसे तग धरून बसलो होतो. भीतीने इतके घेरलो होतो की जरासा आवाज झाला तरी दचकत होतो. तेवढ्यात समोरून एक पोऱ्या चहाची किटली व ग्लूकोजची बिस्किटे घेऊन आला. ड्रायव्हरने आम्हा सगळ्यांसाठी गरम गरम चहा व निरोप धाडला होता. अमृततुल्य चहा होता तो. त्या चहामागच्या आपुलकीने आम्हा आठ माणसांना आपलेसे करून टाकले. भीतीची जागा गप्पांनी घेतली. नकळत धीर दिला-घेतला गेला. रात्रीचे १२ वाजता शिंगाडा तलावाशी मला बाबांच्या हाती सोपवूनच ड्रायव्हर कंडक्टर स्टँडवर गेले. अशी अनेक माणसे आपल्या जीवनाचा हिस्सा बनून जातात. अडीअडचणीला मदतीचे हात पुढे करतात. पाहू गेले तर काही असामान्य मदत त्यांनी केलेली नसते. पण त्याक्षणी ते आपली नड भागवतात. आपुलकीचे बंध बांधले जातात. कधी ते तात्कालिक असतात. तर कधी काळ व अंतराचे बंधनही त्यांच्या प्रेमात खंड पडू देत नाही. अशा सहृदयी मनांची इतकी प्रचंड संख्या आहे की लिहिताना माझे हात थकून जातील. त्यांच्या स्मरणातही मी नसेन पण माझ्यासाठी ते सगळे मौल्यवान आहेत. या साऱ्यांनी माझ्यावर केलेल्या निःस्वार्थ प्रेमामुळेच मीही हा वसा पुढे चालवण्यास प्रवृत्त झाले व प्रयत्नपूर्वक, आवर्जून तो कसा वाढेल याचा शोध घेत राहते. तुम्हालाही असे असंख्य अनपेक्षित चांगले अनुभव आले असतील आणि मला खात्री आहे या आपुलकीच्या-निर्व्याज प्रेमाच्या साखळीच्या नवनवीन कड्या तुम्हीही गुंफत असालच.:)

वाचन 4967 प्रतिक्रिया 0