मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

असा अनुभव यावा म्हणूनच का?

वेदश्री · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
"हॅलो, गावात गडबड आहे. लवकर नीघ घरी जायला.." आईचा फोन आला तेव्हा हातातले काम अर्धे झाले होते. ते पुरते आवरेतो जवळपास ऑफिसातल्या सर्वांनाच असे तातडीचे निरोप आले होते. अशा गोष्टी काय रोजच्याच झाल्या आहेत असे वाटून मी नेहमीप्रमाणे ऑफिसातले काम आटपून माझ्या अ‍ॅक्टीव्हावरून घरी जायला निघाले. रस्त्यावर नेहमी यावेळेला ट्रॅफिक खूपच असतो पण आज तोबा ट्रॅफिक तर होतेच पण मुख्य म्हणजे ते जबरदस्त तुंबलेले होते. जवळपास अर्धा-पाऊण तास काहीच हालचाल झाली नाही मग पोलिसांची गाडी आली आणि काहितरी सारवासारव होऊन ट्रॅफिक वाहते केले गेले. पुढच्या गाड्या जसजशा पुढेपुढे गेल्या तशी मीही त्यांच्या मागून मार्गक्रमण करत पुढे गेले. फोडलेली बस आणि त्याशेजारी खाऊ की गिळू अशा अवतारात असलेल्या संतप्त लोकांचा घोळका प्रत्यक्ष बघण्याचा माझ्या आयुष्यातला पहिलाच प्रसंग... मनात चर्र झालं माझ्या अगदी. अजिबात वेळ न दवडता गाडी पुढे दामटली मी. उण्यापुर्‍या नेहमीच्या एका तासाच्या प्रवासाला तब्बल पावणेतीन तास लागले. रस्त्यात असेच संतप्त जमाव अनेक ठिकाणी बघायचे नशिबी आल्याने मी मनातून जाम टरकले होते. माझ्या परिसरात माझी गाडी प्रवेशताच 'घर जवळ आलंय..' असे वाटून नेहमीचा वाटणारा आगळा आराम वाटला नाही कारण सगळीकडे मिट्ट काळोख होता. डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही इतका काळोख. इथेही असेल का एखादा संतप्त जमाव.. हीच धडधड होती मनात. नको नको तेच विचार मनात यायला लागले माझ्या. गाडीच्या आणि मग मोबाईलच्या उजेडात घरात सुखरूप जाऊन पोहोचले पण हृदयाची धडधड मात्र कायम होती. थंडी आणि भीतीने थरथरत अनाशा पोटीच झोपायच्या आधी मोबाईलच्या उजेडात डायरीत इतकेच लिहिले .. "अख्खा दिवस ऑफिसमध्ये राबल्यावर थकून घरी परतताना असा अनुभव येण्यासाठीच का मी पाळते सगळे कायदे आणि भरते सगळे कर?"

वाचन 21128 प्रतिक्रिया 0