मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोलंबी-बटाटा मसाला

बेसनलाडू · · पाककृती
गणपाशेठ, प्रभो, पांथस्थ,दिपालीताई इ. पासून प्रेरणा घेऊन आपणही आपली एखादी पाककृती लिहावी, असा विचार मनात आला. माझे स्वयंपाकाचे प्रयोग खरे तर केवळ निरीक्षणातून आणि स्वतःच्या चवीसाठी केलेल्या उचापतींमधून चालू झाले. लहानपणी आई-आजीने कधी कशाला हात लावू दिला नाही (आणि त्याबरोबरच अनेकदा 'आयतं गिळायला पाहिजे' वगैरे मुक्ताफळांचे सत्कारही केले), त्यामुळे स्वयंपाकघरात उभे राहून त्या काय करत आहेत, याकडे लक्ष देणे; पाककृतींची पुस्तके वाचणे वगैरेपर्यंत उड्या मारल्या जायच्या. अमेरिकेत आल्यावर मात्र आपल्या मनाप्रमाणे प्रयोग करायचे स्वातंत्र्य मिळाले नि त्याचा स्वयंपाकघरात पुरेपूर उपयोगही करून घेतला (नि उपभोगही घेतलाच ;) ) त्यातच गणपाशेठ नि प्रभोचे एकामागोमाग एक मॅरेथॉन प्रयोग पाहून अस्मादिकांनाही स्फुरण चढले. 'चांगले जेवण करता येणार्‍या अमेरिकास्थित मुलास नवरेबाजारात मिळणारा भाव' हा आणखी एक बोनस् प्वाइन्ट् तीनेक वर्षांपूर्वी कोणा दूरदर्शी सद्गृहस्थाने माझ्या हातची कोणतीशी पाककृती चाखून माझ्या प्रोफाइलमध्ये नोंदवला होता. या सगळ्याच्या पुण्यस्मरणाने आज मिसळपाववर पहिली (आणि तीच शेवटची ठरू नये, अशी प्रार्थना करून) पाककृती लिहायला घेतली आहे. कोलंबी-बटाटा मसाला: वाढणी: १-२ जणांसाठी साहित्यः
  1. १-२ जणांना हवी असेल तितकी कोलंबी साफ करून (मधला काळा दोरा काढणे वगैरे प्रकार )(मी अमेरिकेत मिळणारे मध्यम आकाराचे कुक्ड् श्रिम्प्स् चे पाकीट घेतले होते; साफ करायची वगैरे गरज पडली नाही)
  2. १ मध्यम/मोठा कांदा
  3. दम-आलू साठीचे २ बटाटे (ते नसल्यास १ मोठा बटाटा)
  4. ३/४ वाटी ओल्या नारळाचा चव/नारळाचे दूध
  5. १ टी स्पून आले-लसूण पेस्ट
  6. १ टी स्पून खसखस
  7. १ टी स्पून धने-जिरे पूड
  8. ३-४ सुक्या लाल मिरच्या
  9. १ टी स्पून लाल तिखट
  10. १ टी स्पून हळद
  11. १ टी स्पून गरम मसाला
  12. २ टी स्पून मटन मसाला/चिकन मसाला/फिश मसाला, फिश मसाला असल्यास सर्वोत्तम
  13. १ टी स्पून/चवीनुसार मीठ
  14. २-३ आमसुले(कोकम)
  15. १-१.५ टेबलस्पून तेल
  16. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती:
  1. प्रथम अर्धा कांदा उभा पातळ चिरून घ्या. उरलेल्या अर्ध्याचे उभे-आडवे हवे त्या आकाराचे तुकडे करून घ्या नि ते मिक्सरमध्ये टाका.
  2. ३/४ वाटी ओल्या नारळाचा चव/नारळाचे दूध, १ टी स्पून आले-लसूण पेस्ट, १ टी स्पून खसखस मिक्सरमध्ये टाकून कांद्यासह चांगले वाटून/लिक्विफाय करून घ्या.
  3. कढईत १-१.५ टेबलस्पून तेल तापत ठेवा.चांगले गरम झाल्यावर प्रथम सुक्या लाल मिरच्या थोड्या परतून घ्या; पातळ उभा चिरलेला कांदा रंग बदलेतोवर (गुलाबीसर होईतोवर) मंद/मध्यम आचेवर परतून घ्या.
  4. बटाट्याच्या साधारण मोठ्या फोडी करून घ्या. दम-आलू साठीचे चिटळुंग बटाटे असल्यास एका बटाट्याच्या ४-६ फोडी या प्रमाणे फोडी करून घ्या. त्या कढईत टाका, धने-जिरे पूड टाका नि साधारण २ मिनिटे परतून घ्या.
  5. वरील क्र. २ मधील मिश्रण कढईत घालून सगळे एकत्र ढवळून घ्या. गरज भासल्यास अर्धी वाटी पाणी घाला.
  6. मिश्रणात आता कोलंबी घाला. तिखट, हळद, गरम मसाला, फिश मसाला/मटन मसाला/चिकन मसाला टाका. आमसुले टाका. मिश्रण चांगले ढवळा आणि झाकून शिजवत ठेवा.
  7. मधून मधून ढवळत रहा. बटाटे कितपत शिजलेत याचा अंदाज घ्या. समाधानकारकरित्या शिजल्यावर चवीपुरते मीठ घालून शेवटची उकळी काढा.
  8. गॅसवरून उतरवून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरा. गरमागरम पोळ्यांबरोबर किंवा ब्रेडबरोबर हादडा.
Image removed. टिपा:
  1. आमसुलांऐवजी टोमॅटो वापरूनही थोडी आंबट चव आणता येईल. त्यासाठी टोमॅटोच्या मध्यम फोडी करून त्या उभ्या चिरलेल्या कांद्यासोबत परतून घ्याव्यात.
  2. प्लेटमध्ये दिसणारा स्टीलच्या वाटीतला पदार्थ म्हणजे तिक्षे पोहे. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी (तो मी केलेला नाही; दिवाळीच्या फराळाचा आयटम् आहे जो भारतातून आयात केला गेला आहे. )

वाचन 9204 प्रतिक्रिया 0