मर्यादा
रौद्र तांडवे अंगे घुसळीत
चंद्रमोहीत श्वासा सोडीत
युगायुगांचे जीवन पेरीत
सांभाळली मर्यादा
कोटी कोटी मस्त्य थवे
एक दुजांचे जीवन नवे
मनुजही घेती थोडे बरवे
सांभाळूनी मर्यादा
नद्या मुखींचा गाळ गळोरा
त्यामधूनी ये विश्व आकारा
खाडी बनली मस्त्य धुमारा
सांभाळूनी मर्यादा
खोल तळाशी भुतल क्रंदन
ज्वालांचेही रसमय नर्तन
सागर अद्भुत खेळ चिरंतन
सांभाळूनी मर्यादा
जसा होतसे मानव सक्षम
सागर भासू लागे धनसम
कसे लुटू दोनच कर मम
यंत्रे वाढवू मर्यादा
अगडबंबशी जाल रोवीली
मस्त्यथव्यांची रास खेचली
कोटी तृणागत मृत फ़ेकली
उधळण अमर्याद
खाडीप्रत जाती मस्त्यथवे
धारून अंतरी बीज नवे
विषमयी गटारे तेथ मिळे
हत्याकांड अमर्याद
सागर जीवन जलकोष्टक
केले मानवे विस्कळीत
विषवल्ली वाढेल अंदाधूंद
तोडून साऱ्या मर्यादा.
वाचन
2035
प्रतिक्रिया
0