मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विंग-कमांडरांचा बहुरंगी बहुढंगी वग - नाडीभविष्याचा चमत्कार अर्थात् 'शिळ्या कढीला ऊत` - भाग २

प्रकाश घाटपांडे · · काथ्याकूट
भाग १ वरुन पुढे चालु शुद्ध बिनडोकपणा या नाडी-पट्ट्या व्यक्तिश: एकेका जातकासाठी नावानिशी बनवलेल्या असतात असे सांगणे म्हणजे शुद्ध लुच्चेगिरी आहे. कां ते पहा. जर पट्टयांवर व्यक्तीचे नाव, वडिलांचे नाव, जन्मकुंडली हे सर्व कोरलेले असेल तर तशा ३६०० पट्ट्या फक्त ३६०० गि हाइकांनाच पुरतील. जिथे रोजची १०-१५ गि-हाइके येत आहेत तिथे एवढ्या पट्ट्या एका वर्षातच संपून जातील. मग ही केंद्रे इतकी वर्षे चालली आहेत कशी? त्याच त्याच पट्ट्या वारंवार वापरल्याशिवाय ती चाललेली नाहीत हे उघड आहे, आणि तसे करायचे तर पट्टी वाचत श् असल्याचे ढोंग करण्यावाचून काय पर्याय आहे? ते ढोंग उघडकीस येऊ नये एवढ्यासाठीच तर कूट लिपीची योजना. झाकली मूठ सव्वा लाखाची! आणखी एक मुद्दा मांडतो. पृष्ठ १९३ वर ओक म्हणतात की नाडीभविष्याचा आवाका मानवी विचारांच्या कुवतीपलीकडे जाणारा आहे. (आम्ही म्हणतो की, असेलही कदाचित् ) पण एखाद्या नाडीकेंद्राच्या खोलीत जास्तीत जास्त किती बंडले मावू शकतील याचा अंदाज करणे हे तर मानवी कुवतीच्या पलीकडचे नाही ना ? हा प्रश्न विचारायचे कारण असे की, याच पानावर ओक म्हणतात की रोज कमीत कमी २०० लोक, असे २००० वर्षांच्या कित्येक शतके आधी(पासून घडत असावे) असा त्यांचा अंदाज आहे. पृष्ठ ८४ वर त्यांनी ८-१० हजार वर्षांच्या प्राचीनतेचा अंदाज दिला आहे. आता हे आकडे घेऊन जर कुणी हिशोब करायला बसला तर बंडलांची संख्या कित्येक कोटींच्या घरात जाईल, आणि पट्ट्यांची संख्या अब्जांच्या घरात जाईल. एवढया पट्ट्या खरोखरीच पूर्वी कुणी लिहिल्या असतील का, एकेका केंद्राच्या एवढयाशा जागेत एवढया पट्ट्या मावलेल्या असतील का, त्यांचे सॉर्टिंग कसे झाले असेल, आयत्या वेळी हवे ते बंडल कसे सापडत असेल, अशा शंका डोळस श्रद्धाळू? माणूस सुद्धा घेईल. यावर ओकांचे म्हणणे असे असावे की पट्टयांची संख्या अशी अफाट नसतेच मुळी, मोजकीच असते! पृष्ठ १२१ वर ते म्हणतात 'या पट्ट्यातील मजकूर दर वेळी बदलत असल्याने .... पट्ट्या संख्येने कमी वाटल्या तरी यापुढेही असंख्य वर्षे मानवतेला मार्गदशन होत राहील यात शंका नाही.' ओकांचे हे विधान त्यांच्या बिनधास्त व बिनडोकपणाचे द्योतक आहे. पट्टयांची संख्येने कमी वाटल्या म्हणजे काय ? कशाच्या मानाने कमी वाटल्या ? गि-हाईकांच्या संख्येच्या मानाने कमी वाटल्या असे त्यांना म्हणावयाचे आहे काय? म्हणजेच ३६०० ही आम्ही वर काढलेली बेसीक संख्याच बरोबर आहे असेच त्यांना म्हणावयाचे आहे ना. पट्टीवरचा कोरलेला मजकून कोण बदलतो, कसा बदलतो, कधी बदलतो याचा काहीही खुलासा ते करीत नाहीत! ठीक आहे ते नसतील करत तर आम्ही करतो :- गि-हाईकांला नाडीपट्टी वाचून दाखवायचे सोंग करीत असलेला स्वामी वास्तविक स्वत:च्या मनाशी जुळविलेला मजकूर घडाघडा ''वाचत`` असतो! एक गि-हाईक गेल्यावर दुसऱ्या गि-हाईकापुढे पुन्हा तीच पट्टी पण मजकूर वेगळा असे करून वाचण्याचे सोंग जरी त्याने केले तरी हे अजब नाटक कूट लिपी या प्रकारामुळे उघडकीस येणे शक्य नसते. हे सत्य खुद्द ओकांनीच सांगितले आहे म्हणून बरे झाले. ''पट्टीवरचा मजकूर बदलतो`` याचा खरा अर्थ हा असा आहे. या विंग कमांडरांची कमांड फक्त त्यांच्या कल्पनावारूच्या विंगवर आहे पण बुद्धी नाडीकेंद्राकडे गहाण पडली आहे हे मात्र यावरून स्वच्छ दिसते. अं. नि. स.चे एक प्रमुख कार्यकर्ते श्री. ओंकार पाटील यांनी स्वत: चेन्नईच्या आसपासच्या नाडीकेंद्रांना भेटी देऊन तिथल्या कार्यपद्धतीचा अनुभव घेतला आहे व तो किर्लोस्कर मासिकाच्या दिवाळी (१९९६) अंकात प्रसिद्ध केला आहे तसेच अं.नि.स.ने प्रकाशित केलेल्या प्राचीन ज्योतिषाचे तीन तेरा या यातही त्याचा समावेश केला आहे. त्यांचा तो लेख मुळातूनच वाचला पाहिजे. नाडी-पट्टी शोधून काढण्याच्या बहाण्याने पृच्छकाला अक्षरश: शेकडो प्रश्न विचारून त्याच्याकडून सर्व माहिती काढून घ्यायची आणि नंतर नाडी-पट्टी वाचण्याचा देखावा करीत तीच माहिती त्याला ऐकवायची असा प्रकार इथे चालतो. ओंकार पाटलांच्याकडून त्यांची जन्म-वेळ अशीच त्या नाडीवाचकाने त्यांच्याकडून काढून घेतली आणि तिच्यावरून तामिळी पद्धतीची कुंडली बनवून त्यांना दिली पण भासवले मात्र असे की ती कुंडली पट्टीतच लिहिलेली होती. ( १७०० वर्षापूर्वीच्या ज्योतिषाला विसाव्या शतकातल्या कुंडल्या कशा बनवता आल्या हा तांत्रिक प्रश्न ओकांना व त्यांच्या साथीदारांना जिथे समजणेच शक्य नाही तिथे त्यातली लबाडी कुठून कळणार ? ) श्री. पाटील यांना या कुंडलीत काही गम्य नव्हते. खरा चमत्कार तरी कोणता? नाडीपट्टीवर कूट लिपीत खरोखरी काय लिहिलेले असते हे निदान मराठी माणसाला कळणे शक्य नसते, नाडी-वाचक म्हणेल ती पूर्वदिशा अशी तिथे स्थिती असते. या संदर्भात आम्ही प्रस्तुत पुस्तकातील पृष्ठ १२ वरील ओकांच्या पत्रातील ओळी उद्धृत करतो: 'आपण पुरवतो ती माहिती तुमचे ताडपत्र हुडकायला मदत करण्यासाठी आहे. तीच माहिती हजारो वर्षापूर्र्वी कूटलिपीत तेही तामीळसारख्या सुदूर प्रदेशातील भाषेत कोरलेली कशी हाच तर चमत्काराचा पाया आहे.' पण हा पायाभूत चमत्कार खरोखरीच घडला आहे की नाही हे ठरवायचे कुणी आणि कशाच्या आधारे ? तामिळी भाषा जाणणा यांच्या साक्षी दोन्ही बाजूकडून काढल्या गेल्या, पण त्या अगदी टोकाच्या विरोधी आहेत. मग यातून मार्ग काय ? ओकांनी ज्या तामीळ-जाणकारांकडून पृष्ठ ४ वरील माहिती मिळवली ते लोक कूट लिपीची मूळाक्षरे आणि कोणत्याही एका अक्षराची बाराखडी तामिळ लिपीत रूपांतरित करू शकतील तर तामीळ अक्षरांचे देवनागरीत रूपांतर कुणीही संस्कृत जाणणारा तामीळ माणूस करू शकेल. अशा रितीने कूट लिपीतील नावांची शहानिशा मराठी माणूस करू शकेल. आम्ही तर असे म्हणतो की ओकांना जर एवढी तळमळ लागली असेल तर त्यांनी त्या कूट लिपीची मूळाक्षरे आणि एका अक्षराची बाराखडी त्यांच्या स्वामींच्या मदतीने देवनागरी लिपीत रूपांतरित करून प्रसिद्ध करावी. संस्कृत जाणणा या दाक्षिणात्य लोकांना देवनागरी लिपी चांगली ठाऊक असते. त्या कूटलिपीतल्या सांकेतिक चिन्हांशी आणि शब्दांच्या सांकेतिक अर्थाशी आम्हाला काही कर्तव्य नाही, ओकांनीच ज्या पट्टीत जातकाची नांवे कोरलेली नाहीत त्या बद्दल माझी नाडी भविष्याची मते लागू नाहीत असे पृ.१३९ वर सांगितले आहे म्हणून आम्ही फक्त नावांची शहानिशा करू इच्छितो, आणि ती करण्याचा एवढा एकच मार्ग आम्हाला दिसतो. कूटलिपी हेच जर त्या अगस्त्य नाडी-केंद्राच्या चालकांचे ट्रेड-सीक्रेट असेल तर ते तिची गुरुकिल्ली ओकांच्यासुद्धा हाती लागू देणार नाहीत. जर तसे नसेल तरच ओक ती किल्ली मिळवू शकतील. आमच्यासारख्यांना ही गोष्ट अशक्य आहे हे आम्ही कबूल करतो. नाडीकेंद्रात कुणी जास्त चौकसपणा करीत असल्याचा संशय जरी आला तरी काय होते ते श्रीकांत शहांनी व ओंकार पाटलांनी अनुभवले आहे.( महर्षींचा अपमान केला म्हणून केंद्रातून डच्चू मिळाला नाही हे नशीब! ) आम्ही ओकांना अशी विनंती करतो की ही गुरुकिल्ली त्यांनी मिळवून प्रसिद्ध करावी. तसे केल्याशिवाय 'चमत्कार की धूळफेक ?' या कोड्याचा उलगडा त्यांना व्हायचा नाही. नाडी-पट्टी वाचणारा काय कुठेही बोट ठेवून म्हणेल की हे पहा इथे तुमचे नाव! आमच्या हातात त्या लिपीची मूळाक्षरे असली तरच आम्ही आमची खात्री करून घेऊ शकू. एरवी आम्ही त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा ? अंगठयाच्या ठशाचा उपयोग नाडीची बंडले शोधण्यात कसा होतो हेही सिक्रिट गुलदस्त्यात! पोलीस खात्याच्या अंगुलीमुद्रा तज्ज्ञांच्या मते अंगठयाचा प्रत्येक व्यक्तिचा ठसा हा 'युनिक` असतो. त्या ठशाचे पॅरामिटर्स पुन्हा कधीही रिपीट होत नाही. तसे नसते तर अंगुलीमुद्राशास्त्र केव्हाच मोडीत निघाले असते. ओकांचा हेतू तरी काय ? श्री. ओकांच्या कल्पना-रंजनावरून कुणाला असे वाटेल की मोठमोठ्या महर्षींच्या मार्गदर्शनाखाली आश्रमातील शिष्यांचे तांडेच्या तांडे ताडांच्या झावळ्यावर भाकिते कोरून काढण्यातच आपले ज्ञानार्जनाचे तरुण वय वाया घालवीत होते. अब्जावधि पट्ट्या त्यांनी कोरून लिहिल्या असल्या पाहिजेत. असे जर खरोखरीच घडले असेल तर आम्ही म्हणू धन्य ते महर्षी आणि धन्य ते शिष्यगण! आगामी शेकडो पिढ्यांचे कल्याण ( ! ) साधण्यासाठीच त्यांनी आपले आयुष्य वेचले, आणि आजही ओकांच्यासारखे झपाटलेले नाडी-ऎडिक्ट आपली सरकारी नौकरी संभाळून नाडी भविष्याचा म्हणजे पर्यायाने नाडी-केंद्रांच्या धंद्याचा प्रचार 'लोकांच्या कल्याणासाठी' करीत आहेत. आम्हाला पडलेला प्रश्न एवढाच आहे की, आपल्याला आधीच ठाऊक असलेल्या गोष्टी ताडपट्टीत लिहिलेल्या आहेत एवढे कळल्यामुळे कुणाचे व काय कल्याण होते ? खुद्द ओकांनाच हा संभ्रम पडला आहे हे विशेष! ( पहा: पृष्ठ ८ पॅरा २). नाडीकेंद्राचा अनुभव घेतलेल्या अनेकांना आम्ही विचारले की तिथे गेल्यामुळे तुमचा प्रत्यक्ष असा काय फायदा झाला? काही उत्तर मिळाले नाही. म्हणजे मग हा सगळा उपद्व्याप श्री. ओक कुणासाठी व कशासाठी करीत आहेत हा प्रश्न पडतो. ते नाडी-केंद्रांचे एजंट आहेत असे कुणी म्हणू नये यासाठी पृष्ठ ७९ वर त्यांनी जो निर्वाळा दिला आहे त्यावर समजा आपण विश्वास ठेवला, तरी मूळ प्रश्न शिल्लकच रहातो. आम्हाला असे वाटते की प्रसिद्धीची हाव आणि एक सनसनाटीचा आनंद मिळवणे एवढ्यासाठीच ते हा खटाटोप करीत असावेत. त्यात त्यांचा स्वार्थ नाही! ओकांच्या धडाकेबाज प्रचारामुळे मराठी माणसे अधिक प्रमाणात नाडीभविष्य पहायला जाऊ लागली असे त्यानीच म्हटले आहे, त्यामुळे तिथल्या स्वामीलोकांचे कल्याण नक्कीच झाले असेल. 'होई ना का बापडे, आपले काय जाते ? परिहार-विधी करण्यासाठी मराठी माणसांचे लाखो रुपये खर्च पडले असतील. पडेनात का जाईनात, आपले चार चव्वल थोडेच खर्च होताहेत ?' बहुतेक तटस्थ लोक असाच विचार करीत असावेत, पण अं. नि. स. ला हे पटत नाही. तिच्यावर खार खाणा-यांनी निदान एवढा तरी विचार करावा की तिच्या प्रचार-कार्यामुळे सर्वसामान्यांचे काही नुकसान तर होत नाही ना, - जसे ओकांच्या प्रचारामुळे ते होत आहे. श्री. ओकांना सध्या एकाच गोष्टीचा निदिध्यास लागला आहे तो म्हणजे : डॉ. दाभोळकर व डॉ. नारळीकर यांनी आपल्या समवेत १०-१२ मित्रमंडळी घेऊन स्वत: नाडी-केंद्रात जाऊन आपल्या आई-वडिलांची नावे, मुलांची नावे, नाडीवाचकाच्या तोंडून ऐकण्याचा आनंद घ्यावा. पट्टीवरच्या कूटलिपीत खरोखरीच नावे आली आहेत की नाहीत ते त्यांना नाही कळले तरी हरकत नाही, त्यांनी नाडीवाल्या स्वामीवर खुशाल डोळे मिटून विश्वास ठेवावा! शिवाय, ओक तिथे त्यांच्या मदतीला उपस्थित असतीलच ना! डॉ. नारळीकरांच्या सारखा थोर खगोलशास्त्रज्ञ व अं.नि.स.चे डॉ. दाभोळकर एका पोरसवदा स्वामीपुढे नम्रपणे बसले आहेत, त्याच्या प्रश्नांच्या सरबत्तीला उत्तरे देत आहेत, हे विलोभनीय दृश्य पहायला ओक आतुर झाले आहेत. असे घडेपर्यंत त्यांना सुखाची झोप लागणार नाही. ओंकार पाटील यांनी जो काय अनुभव घेतला तो ओकांच्या मते खरा नाही किंवा पुरेसा नाही. तो पूर्वग्रह-दूषित आहे. प्रत्येकाने मारुतीच्या बेंबीत ( किंवा आणखी कुठे ) बोट घालून स्वत: अनुभव घेतला पाहिजे असा त्यांचा आणि त्यांचे प्राचार्य मित्र श्री. गळतगे यांचा वैज्ञानिकश् आग्रह आहे! अं.नि.स.ला तसे करण्याची गरज वाटत नाही. थोडक्यात, १. नाडीपट्ट्यांतला मजकूर १६-१७ शतकांहून जास्त जुना नाही. २. कृत-त्रेता-द्वापार युगातल्या महर्षींचा प्रस्तुत नाडी-ज्योतिषाशी व पट्ट्यातल्या मजकुराशी काही संबंध नाही. कलीयुगात त्रिकालज्ञानी महर्षी झाले नाहीत. ३. प्रस्तुत नाडी-भविष्ये सामान्य ज्योतिषांनी लिहिलेली आहेत. ४. नाडीपट्ट्या व्यक्तिश: कुणासाठी लिहिलेल्या नव्हत्या म्हणून त्यात कुणाची नावे असणे शक्य नाही. ५. अंगठयाचा ठसा हा केवळ देखावा आहे. ६. कूटलिपीची मूळाक्षरे व बाराखडी देवनागरी लिपीत उपलब्ध झाली तर आमच्या निष्कर्षांना पुष्टी मिळेल इतकेच. वास्तविक, आमचे निष्कर्ष आम्ही स्वतंत्र प्रमाणांच्या मदतीने आधीच काढले आहेत. त्यासाठी तांबारमला भेट देण्याची आम्हाला गरज पडली नाही. नाडीभविष्याला प्रायमा फेसी केसच नाही असे आम्ही का म्हणतो ते वरील मुद्यावरून कळेल. समाप्त

वाचन 19057 प्रतिक्रिया 0