मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चिंतातुराणां न सौख्यं, न मज्जा.

दत्ता काळे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
दिवसभराचं पाट्या टाकणं झालं आणि मी ऑफिस बंद करत होतो. तेवढ्यात फोन वाजला. "दत्ता. . मी मंदार. तू ऑफिसमध्येच आहे कां ?" मी म्हणालो " हे काय बंद करून निघतोच आहे. कां रे ?" तुझ्याकडे तासभर वेळ आहे कां ? हो आहे. कुठे जायचंय कां ? हो. जरा गप्पा मारंत बसू. कुठे ? भोलाकडे. वडा-पाव बर्‍याच दिवसांत खाल्ला नाही. च्यायला, नुसता वडापाव ? आणि वडापाव खायला तास कशाला लागतो? मला वाटलं तू 'कवी'मध्ये बसायचं म्हणतोयस. लेका . . . श्रावण चालू आहे. नेहमी पिणार्‍यांना श्रावण. मला नाही. तरीसुध्दा नको. तू भोलाकडे ये. मी निघतोय लगेच. मी भोला वडेवाला कडे पोहोचलो. वडापावच्या गाडीभोवती गर्दीमध्ये तोंडाला रुमाल बांधलेला मंदार मला दिसला. मी त्याच्या खांद्याला हात लावून आल्याची दखल दिली, आणि बाजूला जाऊन थांबलो. थोड्याचवेळात मंदार दोन्हीही हातात वडापावच्या डिश घेऊन, गर्दीतून बाहेर आला. कुणाच्यातरी हिसडण्याने त्याच्या तोंडावरचा रुमाल जरा सरकला आणि एक नाकपुडी दिसायला लागली. त्या व्यक्तीकडे अत्यंत घृणास्पद बघत रुमालातल्या रुमालातच त्याने शिवी हासडली. बोलतातर येत नव्हतं. पण त्याच्या डोळ्यावरून आणि फुगलेल्या नाकपुडीवरून मी अंदाज बांधला कि मंद्यानी शिवी दिली असावी. घे !, तुला अजून मिरची हवी ? नको. लेका तो रुमाल काढ कि. हसत.. हो हो म्हणत ..त्याने रुमाल काढला. वडा पाव खाता खाता आमच्या गप्पा सुरू झाल्या. बायको, पोरंबाळं, ऑफिस अश्या नेहमीच्याच शिळोप्याच्या गप्पा झाल्या. वडापाव संपला. मोटारसायकल्स काढून चहा कुठं घ्यायचा ह्यावर बोलणं होईतोवर आम्ही स्विकार हॉटेलजवळ आलोच होतो. मग स्विकार मध्येच चहाला थांबलो. परत गप्पा. विषय स्वाईन फ्लू. मंदारने विचारलं "अन्नातून ते विषाणू पोटात जावू शकतात कां रे ?" त्याच्या शंकेखोर स्वभावाविषयी आमचा सगळा ग्रुप चांगलाच जाणून होता. त्यावरून त्याची नेहमी चेष्टाही होत असे. मी त्याला शांतपणे म्हणालो "काही कल्पना नाही, पण ते विषाणू उकळत्या तेलातसुध्दा मरत नाहीत हे मात्र कळलंय" त्याचा कावराबावरा झालेला चेहरा पोटातल्या वडाजोडीबद्द्ल विचार करत असावा. काही न बोलता शंकायुक्त नजरेनी पहात चहा पोटात अक्षरशः ढकलून मंद्या म्हणाला " चल.. निघायचं ? " आम्ही बाहेर पडलो आणि आपापल्या वाटेला लागलो. हा मंदार देशपांडे. बी.कॉमपासून ते एम्.कॉमपर्यंत माझ्या बरोबर होता. एक नंबरचा शंकेखोर अन् चिंतामणी. कायम काही ना काही चिंतेत गढलेला. त्यातून निर्माण होणार्‍या चिडचिडीमुळे घरदारी सगळीकडे प्रसिध्द पावलेलं व्यक्तीमत्व. नोकरी - ब्यांक ऑफ महाराष्ट्र. अश्यांना बहुतेक ह्याच ब्यांकेत नोकरी लागत असावी. ब्यांकेची गिर्‍हाईकसुध्दा ह्याला गिर्‍हाईक करत असतात. बी.कॉम्.ची परीक्षा चालू असताना एका भाकड दिवशी आमचा ग्रुप "शांतेचं कार्ट चालू आहे "ला गेला. मंदारही होता. नाटकात सुधीर जोशी आणि लक्ष्या ह्या बापलेकांचा संवाद रंगात आला होता. लक्ष्याचं टायमींग दाद देण्यासारखं होतं.सगळं नाट्यगृह बेफाम हसंत होतं. मंद्यानी मला कानाशी येऊन हळूच विचारलं " उद्या इकोच्या पेपरला केन्सची थिअरी आली तर ? . . . . च्यायला वाट लागेल !" पुढचं राहिलेलं शांतेचं कार्ट आख्खं माझ्या डोक्यातून निघून गेलं आणि मी . . . केन्सची थेरी, से'ज मार्केट लॉ, इक्विलिब्रीयन, डिमांड सप्लाय . . . आठवत बसलो. च्यायला, ह्या मंद्याच्या. . स्वतःही जेवायचं नाही आणि दुसर्‍याच्याही जेवणात माती कालवायची. सहा-सात महिन्यांपूर्वी मला भेटला तेव्हाही मला विचारलं " त्या कोलायडरचं पुढे काय झालं रे ?" कुठला कोलायडर ? "अरे तो नाही कां शास्त्रज्ञानी जमिनीखाली सोडलेला? नाही कां ? पृथ्वीच्या निर्मितीचे रहस्य शोधून काढण्यासाठी सोडलेला ? "काही कल्पना नाही बुवा पुढे काय झालं ते. पण तुला आत्ता कसं आठवलं हे "? "हे नेहमीच माझ्या मनात येत अस्तं. बघ ना, हे शास्त्रज्ञ साले, स्वतःच्या अभ्यासासाठी माणसांनाही गिनीपीग बनवायला निघालेत". "अरे मंद्या, पण अजून कुठे काय हानी झालीये आणि होईल हे ही कशावरून ?" दत्त्या . . तो मोठा प्रयोग आहे शेवटी. त्याच्यातून काहीतरी विनाश हा घडणारच. म्हणतात नां -विनाशकाले विपरीत बुध्दी . असा हा स्वतःच विपरीत बुध्दी असलेला मंदार. सगळ्यात हाईट म्हणजे आम्ही "वर्‍हाड निघालंय लंडनला"ला गेलो होतो. आल्यावर त्यातले किस्से आठवून, चर्चा चाललेली होती. त्यातला विमानातला प्रसंग आमचा एक राजा नावाचा मित्र सांगत होता. त्यातलं - आई, हे बुंग वर ग्येल आन् बदकन खाली पडलं, तर गं"ह्या वाक्यावर आम्ही हसत असतानाच मंद्या म्हणाला "त्या पोराची शंका बरोबर आहे, त्याला तसं वाटलं तर काय चुकीचं आहे" ह्याच्या घरीसुध्दा त्याच्या ह्या स्वभावामुळे ख्खिल्ली उडवली जाते. एका रविवारी, सुट्टीच्या दिवशी, मी त्याच्या घरी गेलो होतो. महाराज बाहेर बसले होते. मला म्हणाला " आत जाऊ नको, बाहेर इथेच आपण जरा गप्पा मारू, मग नंतर आत जावू." म्हटलं " कां रे ? " म्हणाला " बायको पाल मारतीये " मी विचारलं " म्हंजे काय ? " अरे ! स्वैपाकखोलीत भिंतीवर पाल आहे. बायको ती मारती आहे. "मग, तू कां नाही तिला मदत करंत, खरंतर तू पाल मारायला हवीस" तेवढ्यात त्याची बायको बाहेर आली. एका हातात झाडू आणि दुसर्‍या हातात सुपल्यामध्ये मेलेली पाल. तिनं माझं शेवटचं वाक्य ऐकलेलं होतं. ती म्हणाली " अहो काळे, काय सांगायचं- म्हणे पाल अंगावर पडली तर माणूस वेडं होतं, म्हणून साहेब बाहेर येऊन बसलेत. पाल मारणं तर सोडाच साधी मदतही करायला माणूस तयार नाही" असं म्हणून पाल दूरवर फेकून त्या घरात निघून गेल्या. त्यानंतर घरात जाता जाता त्यांनी टाकलेलं वाक्य मला भारी आवडलं. त्या म्हणाल्या " ह्या असल्या पाली कितीही मारता येतील हो, पण डोक्यातली शंकेची पाल मारणं शक्य नाही".

वाचन 17083 प्रतिक्रिया 0