मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

परत एकदा १८९७

विकास · · काथ्याकूट
पुण्यात स्वाईन फ्लूचा पहीला बळी पडला आणि सरकारला खडबडून जाग आली. ११० स्वाईन फ्लूचे रुग्ण आहेत, त्यात ११ शाळांमधले ७० विद्यार्थी आहेत. आता अजून शाळा, क्लासेस वगैरे बंद ठेवणे अजूनच वाढले आहे. मात्र सरकारला जाग येण्यासाठी इतका वेळ लागावा हे दुर्दैव. पण जाग आल्यामुळे सरकारने जो कायदा/नियम तात्काळ लागू (activate) केला आहे तो वाचून आश्चर्य वाटले. "संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा १८९७" असे त्याचे नाव आहे. तत्कालीन प्लेगच्या साथीमुळे हा कायदा तयार केला गेला होता आणि याच कायद्याचा वापर रँडच्या आज्ञेने कसाही केला गेला होता. परीणामी २२ जून १८९७ ला रँडचा "गोंद्या आला रे" झाला. हा सगळा इतिहास आपल्याला माहीत आहेच आणि आशा आहे की सरकारला पण माहीत आहे. म.टा. मधे दिलेल्या माहीतीप्रमाणे: पुण्यात प्लेगची साथ पसरल्यानंतर १८९७ चा कायदा लागू झाला होता. त्यानंतर कित्येक दशकानंतर तो आता अमलात आला आहे. त्यानुसार एखादी व्यक्ती संशयित पेशंट आढळल्यास त्याची इच्छा असो वा नसो, त्याला सरकारी हॉस्पिटलात भरती केले जाते. (इ-सकाळ मधे ही बातमी दिसलीच नाही...) १८९७ ते २००९ या काळात हा कायदा वापरावा लागला नाही याचा अर्थ साथी आल्याच नाहीत असा नाही. पण त्या (साथी)आणि रोगग्रस्त रुग्णांना वेगळ्या पद्धतीने हाताळण्यात आले असणार. आज कसलाही विचार न करता, त्या कायद्यात कसलीही सुधारणा न करता, तंत्रिक दृष्ट्या एखाद्या पोलीसाला वाटले की संशयीत स्वाईन फ्लू रूग्ण आहे तर त्याला हे हक्क मिळाले आहेत की तुम्हाला हॉस्पिटलमधे दाखल करू शकेल असे... स्वातंतत्र्योत्तर अनेक कायदे केले गेले अनेकदा घटना बदलल्या गेल्या तरी देखील असले कायदे तसेच्या तसे विचार न करता वापरले जातात ह्याचा नक्कीच खेद वाटला.

वाचन 15415 प्रतिक्रिया 0