मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग १)
हिंदीतील प्रख्यात कवी कै. हरिवंशराय बच्चन ह्यांची 'मधुशाला' हे खूपच प्रसिध्द असे खंडकाव्य आहे. मूळ काव्यात १३५ आणि परिशिष्ठात ४ अशा एकूण १३९ रुबाया आहेत.
ह्या सुंदर काव्याने अनेकांना भुरळ घातली आहे. स्वतः अमिताभने ह्याचे वाचनही केलेले आहे. जयदेव ह्यांच्यासारख्या ताकदीच्या संगीतकाराने संगीतबध्द केलेले हे काव्य मन्ना डे सारख्या मनस्वी गायकाने स्वरबध्द केलेले आहे ह्यापरता गौरव तो कोणता!
अशा ह्या काव्यामागची प्रेरणा काय असेल ही मोठी विचार करण्यासारखी गोष्ट वाटते.
सकृतदर्शनी साकीचे आणि त्या मदिरेचे, कोडकौतुक गाणारा मदिरासक्त माणूस असे भासणारे काव्य जेव्हा एकेक रुबाई पुढे सरकते, किंबहुना वाचकाला खेचून नेते, त्यावेळी त्यातले वेगवेगळे अर्थ उलगडत जातात आणि आपण चकित होतो!
हरिवंशराय ह्यांचे हिंदी भाषेवरील आणि काव्यप्रकारावरील प्रभुत्व तर वादातीत आहेच पण त्यांच्यातला तत्वज्ञ त्याहीपेक्षा मोठा आहे असे नि:संशय वाटते. संपूर्ण जीवनविषयक तत्वज्ञानच त्यांनी 'मधुशाले'तून ज्या प्रकारे रसिकांना सुपूर्त केले आहे ते केवळ लाजवाब!
प्रथमपत्नी श्यामा हिच्या निधनामुळे आलेल्या खिन्नमनस्कतेतून हे काव्य निर्मिण्याची प्रेरणा मिळाली असावी असे मानण्यास वाव आहे. अतीव दु:खाने वैराग्याच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रतिभावान आणि हळव्या माणसाच्या मनात जीवनाकडे बघण्याचा जो एक सर्वतः अलिप्त आणि तात्विक दृष्टिकोन येईल तो ह्या काव्यात जाणवतोच पण त्याच वेळी आपल्याला आलेल्या अनुभवांचे सार जगाला देण्याची त्याची बांधिलकीही जाणवल्याशिवाय रहात नाही हे विशेष आणि तेच बच्चन यांचे मोठेपण आहे असे मला वाटते.
(मागे मि.पा.वरच धनंजय यांनी मधुशाला - अर्थ आणि संदर्भ अशी एक छान चर्चा घडवून आणली होती. त्याचवेळी ह्या मधुशालेने माझ्या मनात घर केले!)
मि.पा.वरील रसिकांसाठी मी संपूर्ण मधुशालेचा भावानुवाद सादर करीत आहे. तो गोड मानून घ्यावा ही विनंती.
प्रथमतः हे नम्रपणे नमूद करु इच्छितो की मी उर्दू/फार्सी चा अजिबात जाणकार नाही हिंदीही थोडेबहुत माहीत आहे. त्याबळावर एवढे मोठे धाडस करावे की नाही हा मनाचा हिय्या होत नव्हता, पण मराठीत ही रचना का नाही? ती मराठीत असली पाहिजे, ह्या प्रेमापोटी हे धाडस करतो आहे!
अर्थातच ह्यातील जे काही मनाला भावेल त्याचे सर्व श्रेय कै. हरिवंशराय यांचेच आहे आणि जे काही टाकावू वाटेल तो माझा अज्ञ प्रयत्न आहे!
(टीप - संपूर्ण अनुवादात बालकवींच्या 'श्रावणमासी हर्ष मानसी' ह्या कवितेची चाल पकडण्याचा प्रयत्न आहे कारण मला ती चाल मूळ काव्याला चपखल वाटली. मात्रांच्या ओढाताणीत न अडकता काव्याची गेयता कशी टिकून राहील ह्याकडे मी जास्त लक्ष देण्याचा यत्न ठेवला आहे. त्यामुळे चाणाक्ष वाचकांनी कृपया 'मात्रांचे वळसे' देऊ नयेत ;)) प्रत्येक आठवड्यात कमितकमी पाच रुबाया ह्याप्रमाणे करण्याचे ठरवले आहे बघूया कसे काय जमते ते. )
------------------------------------------
मधुशालेत काही ठराविक शब्द पुनःपुन्हा येतात त्यांचे अर्थ -
साकी = मद्य देणारा
साकीबाला = मद्य देणारी
हाला, मदिरा = मद्य, दारु
मधुशाला = मद्यालय, मदिरालय
------------------------------------------
पहिल्या पाच रुबायात स्वतः कवी साकी आहे. आणि तो मदिरेचे आणि रसिकांचेही गुण गातो आहे.
मधुशाला
मृदु भावों के अंगूरों की आज बना लाया हाला,
प्रियतम, अपने ही हाथों से आज पिलाऊँगा प्याला,
पहले भोग लगा लूँ तेरा फिर प्रसाद जग पाएगा,
सबसे पहले तेरा स्वागत करती मेरी मधुशाला।।१।
प्यास तुझे तो, विश्व तपाकर पूर्ण निकालूँगा हाला,
एक पाँव से साकी बनकर नाचूँगा लेकर प्याला,
जीवन की मधुता तो तेरे ऊपर कब का वार चुका,
आज निछावर कर दूँगा मैं तुझ पर जग की मधुशाला।।२।
प्रियतम, तू मेरी हाला है, मैं तेरा प्यासा प्याला,
अपने को मुझमें भरकर तू बनता है पीनेवाला,
मैं तुझको छक छलका करता, मस्त मुझे पी तू होता,
एक दूसरे की हम दोनों आज परस्पर मधुशाला।।३।
भावुकता अंगूर लता से खींच कल्पना की हाला,
कवि साकी बनकर आया है भरकर कविता का प्याला,
कभी न कण-भर खाली होगा लाख पिएँ, दो लाख पिएँ!
पाठकगण हैं पीनेवाले, पुस्तक मेरी मधुशाला।।४।
मधुर भावनाओं की सुमधुर नित्य बनाता हूँ हाला,
भरता हूँ इस मधु से अपने अंतर का प्यासा प्याला,
उठा कल्पना के हाथों से स्वयं उसे पी जाता हूँ,
अपने ही में हूँ मैं साकी, पीनेवाला, मधुशाला।।५।
--------------------------------------
भावानुवाद -
मधुशाला
कोमल द्राक्षरसे मी भरतो, हा घ्या काव्यमयी प्याला,
प्रियजन म्हणुनी देतो तुम्हा, स्वीकारावा हा प्याला,
जगता तरि हा देइन नंतर, प्रथम तुम्हा हा भेटविला,
रसिक स्वागते तुमच्या सादर, करतो मी ही मधुशाला ||१||
असेल ती जर आस तुम्हां तर, त्रिभुवन फिरुनी भरि प्याला,
नर्तन मी ही करिन तुम्हांस्तव, घेउन हाती तो प्याला,
मधुर जीवना कधिच त्यागिले, देण्या रस हा तुम्हाला,
आज अर्पितो रसिकांस्तव तरि, ही जगताची मधुशाला ||२||
तुम्हिच वारुणी माझ्यास्तव जणु, मी तो आसुसला प्याला,
भरुनि तुम्हां ह्या प्याल्यामधुनी, तुम्हीच रस हा प्राशियला,
देता हिंदोळे परि तुजला, धुंद बनविशी जगताला,
तू माझा अन आज मी तुझा, हीच आपुली मधुशाला ||३||
भावबंधनी द्राक्षवल्लरी, खेचुनि 'कल्पक' वारुणिला,
भरुन आणिला काव्यचषक हा काव्यस्वरुपी मद्याला,
अक्षय हा तरि काव्यचषक जो सहज जिंकितो लाखाला,
काव्यरसिक हे भरुन पावती, पुस्तक माझे मधुशाला ||४||
मधुर भावना नित्य अशा ह्या बनविति सुमधुर मदिरेला,
शांतवितो मग तृषार्त जीवा भरुनि या अंतरिचा प्याला,
उचलुनि प्याला कल्पक हाती, प्राशुन घेतो मीच मला,
मीच वसे तरि माझ्यामधुनी, आज पिण्या ही मधुशाला ||५||
चतुरंग
वाचन
14320
प्रतिक्रिया
0