पुरोगामी/लिबरल म्हणजे तरी काय?
(दोन दिवसांच्या अॅब्स्टेन्शननंतर पुन्हा - नवीन नावाने - प्रवेश)
सध्या मिपावर विविध धाग्यांच्या निमित्ताने 'पुरोगामी असणे' हा विषय चर्चिला जात आहे. पुरोगामी लोकांनी व्यक्त केलेल्या मतांबाबत काही सदस्यांच्या भावना तीव्र होऊन त्यांनी त्यांचा धिक्कार करणार्या सह्या निर्माण केल्या. ज्यांनी या सह्या आपल्या प्रतिसादात वापरल्या ते प्रतिगामी आहेत का? तर नाही त्यांच्यातल्याच अनेकांनी 'स्त्रियांचे कपडे' टाइप अनेक धाग्यांवर पुरोगामी म्हणता येतील अशा स्वरूपाची मते व्यक्त केली आहेत. त्यामुळे माझ्या मनात जे वैचारिक मंथन झाले त्याचे हे प्रकटन आहे. (मंथनाचे थोडे कारण 'माझी मते अशी का?' याबाबत अन्य सदस्याकडून झालेली विचारणा हेही होते)
पुरोगामी म्हणजे काळानुरूप पुढे जाणारी विचारसरणी अशी ढोबळ व्याख्या केली तरी काळानुरूप पुढे* अशी निश्चित दिशा विचारसरणीला असते का? म्हणजे २५ वर्षामागे अशी विचारसरणी समाजात होती. सध्या अशी आहे म्हणजे आणखी २५ वर्षांनी अशी असणार असे सांगता येते का? तर तसे काही नसते. मग पुरोगामी (पुढे जाणारी) विचारसरणी कशाला म्हणतात/म्हणावे?
जनरलाइज्ड बोलायचे तर आधुनिक ज्ञान उपलब्ध होण्यापूर्वीच्या निकषांवर आधारलेले मत (समाजनियम) योग्य आहे की अयोग्य आहे याचा पुनर्विचार करून लिबरल निकषांवर अजूनही योग्यच असलेले मत स्वीकारणे अयोग्य असलेले मत/ नियम धिक्कारणे. समजा मला ब्राह्मणांनी मांसाहार करायला हरकत नाही असे सांगायचे आहे तर मी म्हणतो, 'मनुस्मृतीत ब्राह्मणांनी मांस खाल्लेच पाहिजे/खायला हरकत नाही असे अमुक तमुक श्लोकात लिहिले आहे.' असे सांगणे हे जुनाट विचारसरणीचे म्हणता येईल कारण जस्टिफिकेशन म्हणून मी जुन्या ग्रंथाचा आधार देत आहे. मांसाहार करण्याने काही जीवशास्त्रीय नुकसान होत नाही असे अभ्यासांती आढळले आहे म्हणून मांसाहार चालेल असे सांगत नाही.
मी वर लिबरल निकष हा आणखी एक शब्द वापरला आहे. लिबरल म्हणजे तरी काय. माझ्यापुरती याची व्याख्या सर्वांना मनःपूत वागण्याची समान मुभा इथून सुरुवात करून समाज हा समाज म्हणून अस्तित्वात रहावा इतपतच बंधने प्रत्येकाच्या वागणुकीवर आणावीत अशी विचारसरणी.
मी लिबरल/पुरोगामी विचारसरणीचा आहे याचा अर्थ या 'फर्स्ट प्रिन्सिपल' पासून सुरुवात करून प्रत्येक नियमाचा विचार करतो. एखादा नियम करताना तो समाज अस्तित्वात रहावा यासाठी अत्यावश्यक आहे का हा प्रश्न सर्वात आधी विचारतो. आणि तो नियम नसता काही लोक जे वागतात ते इतरांना त्रासदायक असते काय? घातले जाणारे कुंपण जितके मोठे ठेवता येईल तितके ठेवणे हा माझ्या विचारसरणीचा उद्देश असतो.
हे झाले नव्याने केल्या जाणार्या नियमाबाबत. पण आपण आज नव्याने समाज उभारत नाही आहोत. समाज आधीच अस्तित्वात आहे. आणि कुंपणे भरपूर प्रमाणात घालून झालेली आहेत. तेव्हा शक्य तेथे/आवश्यक तेथे ढुशा मारून कुंपण मोठे करण्याचा प्रयत्न ही देखील माझी पुरोगामित्वाची व्याख्या. प्राथमिक निकष पुन्हा तोच. समाज धोक्यात येईल का?
आता मी अस्तित्वात असलेल्या प्रत्येक नियमाविषयी असा विचार करतो का? तर नाही जेव्हा एखादा नियम चर्चेत येतो तेव्हाच मी असा विचार करून माझे मत ठरवतो. समलैंगिकतेचा प्रश्न असाच अचानक समोर आला. त्यावर माझे काहीही मत नव्हते. तो समोर आल्यावर (एका सदस्याकडून खरडीतून विचारणा झाल्यावर) मी त्याच्यावर वरील निकषानुसार विचार केला. आणि समलैंगिक असण्याने समाजाचे अस्तित्व धोक्यात येत नसल्याने त्यावर असलेले कायद्याचे बंधन जाणे योग्य अशा निष्कर्षाप्रत मी आलो.
'त्या' सहीत लिहिलेले समलैंगिकांचे उदात्तीकरण हा भाग तत्कालिक रागात लिहिला गेला असावा असे वाटते. कारण 'यापुढे समलैंगिक होणे हे प्रत्येकाचे ध्येय असायला हवे' असे लिबरल लोकांचे म्हणणे नव्हते.
पुन्हा समाज धोक्यात येणे याची व्याख्या निश्चित नाही. माझी व्याख्या फार मोकळी आहे. समाज करून राहण्याने माणसाचे जीवन एकटे राहण्यापेक्षा सुखी होते. तेवढ्याच प्रमाणात समाज अस्तित्वात राहिला तरी पुरे अशी माझी व्याख्या.
हे माझे मुक्त चिंतन आहे. मिपाच्या सदस्यांच्या प्रतिसादांतून त्यांच्या मतांच्या आधारे याच्या पुढची चर्चा करण्याचा प्रस्ताव.
----------------
*कॉस्मॉलॉजी (विश्वरचनाशास्त्र?) या भौतिक शास्त्राच्या शाखेत 'अॅरो ऑफ टाईम' अशी संकल्पना आहे. म्हणजे काळाला एक निश्चित अशी आधी-नंतर फरक असलेली दिशा असते. दोन स्थितींमध्ये विशिष्ट स्थिती दुसर्या स्थितीच्या आधीची असे नक्की म्हणता येते (लहानपण आधी - वार्धक्य नंतर). आणि ही आधी-नंतर ची रिलेशनशिप नेहमीच तशी असते. ती (आपण ज्या विश्वात राहतो त्या विश्वात) कधीही उलट होत नाही.
वाचन
27575
प्रतिक्रिया
0