मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझा जलप्रवास!

चतुरंग · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
"नाना, उद्यापासून ह्यालाही घेऊन जाल का पोहायला?" मला नानांच्यापुढे उभे करत आईने विचारले. "हो गं त्यात काय, दे उद्या सकाळी ७ वाजता पाठवून. काढतो ह्यालाही सगळ्या पोरांबरोबर पोहायला!" नाना माझ्याकडे पाहत तोंडभर हसत म्हणाले. नाना आणि इन्ना कुलकर्णी म्हणजे मिरजेच्या माझ्या आजोळच्या वाड्यातलं एक जगमित्र कुटुंब होतं. माझ्या आई, मामा, मावशींच्या पिढीला तर नानांनी पोहायला शिकवलं होतंच आणि आता ते त्यापुढच्या पिढीला म्हणजे आम्हा मावस, आत्ते-मामे भावंडांनाही पोहायला शिकवत होते. मी ८-१० वर्षांचाच असेन त्यावेळी. दुसर्‍या दिवशी पोहायला जायचे आहे ह्या कल्पनेने झोपताना अंगाला कंप सुटला होता, घाबरुन नव्हे पण अतिउत्सुकतेनं. विचार करता करता कधी झोपलो ते समजलं नाही. सकाळी गच्चीवर सोनेरी उन्हं आली आणि मला जाग आली. परसदारच्या बागेत थंड हवेतले पक्षी बघत, राखुंडीने दात घासून, चुळा भरून त्या झाडांच्या बुंध्यांपर्यंत लांबचलांब उडवून मी स्वयंपाकघरात दूध प्यायला आलो. दूध पिऊन मी आणि मामेभाऊ राजापुरी पंचात आतले कपडे गुंडाळून आणि काथ्या बांधलेले, झाळलेले डालडाचे डबे घेऊन निघालो. दिंडी दरवाजातून बाहेर आलो तर वाड्याच्या दाराबाहेर बरीच जत्रा होती. धोतर आणि बंडी अशा वेषातल्या नानांचा, "चला रे पोरांनो!" असा पुकारा झाला आणि आमची वानरसेना उड्या मारत निघाली. जाताना आसपासच्या वाड्यांमधून डोकावत "ए आशक्या निघालोय रे! चल ये की लेका पटकन." " ए ते बाब्या आलं का बघ रे जरा? काल म्हणत होतं सगळ्यात फुडं निघनार म्हणून!" "पम्या लेका, दहा दिवस झाले अजून बिंडा सोडत नाहीस! पो की लेका सुट्टा! घाबरतंय तिच्यायला!" अशी मुक्ताफळांची आतषबाजी सुरु होती. मिरजेला मैदानातल्या दत्तमंदिरामागल्या बोळातून बाहेर पडून किंचित डावीकडे वळलं आणि थोडं पुढं गेलं की खाडिलकर गल्ली लागते, ती डावीकडे ठेवून जरा गावाबाहेरचा रस्ता घेतला की दोनेक फर्लांगातच मोठ्ठीच्यामोठी विहीर लागते (माझी स्मृती दगा देत नसेल तर हीच ती फर्मानकट्ट्याची विहीर). ताशीव दगडात बांधलेली, चिंचेच्या झाडांनी वेढलेली भलीदांडगी विहीर जवळ आली. आसपास सगळीकडे चिंचेच्या पानांचा सडा पडला होता. विहिरीतून घुमणारा पोरांचा आरडाओरडा कानावर येत होता. आम्ही सगळे काठावर पोचलो. मी रहाटाच्या खांबाला धरुन हळूच आत डोकावून बघितलं. झाडांच्या सावल्यामुळे हिरवंगार दिसणारं पाणी डुचमळत होतं, पोरं आत कल्ला करत होती. विहिरीच्या भिंतीतून आलेली पिंपळाची हिरवीगार तरतरीत रोपटी वेगळीच दिसत होती. निसटलेल्या एखाद्या चिर्‍याच्या खाचेत केलेलं घरटं लक्ष वेधून घेत होतं. काठावरुन सर्पिलाकार निघालेल्या ताशीव पायर्‍या थेट पाण्यात दिसेनाशा झाल्या होत्या. मला जरा दडपल्यासारखं झालं. आमच्यातली सराईत पोरं कपडे काढून धडाधडा पायर्‍या उतरली सुद्धा. जरा भीड चेपलेली पण नवखी पोरं कपडे काढून पाठीला बिंडा, डबा असं काहीतरी बांधायला नानासमोर उभी होती. मी डोळे मोठे करुन सगळं बघत होतो. अजून कपडे काढायला धीर होत नव्हता. मला तसा उभा बघून नाना म्हणाले " काय रे, घाबरलायस होय? अरे मी आहे की, चल चल काढ कपडे आणि हा डबा बांध." डबा बांधून उघड्यानं पायर्‍या उतरताना सर्वांग शहारत होतं. जसजसा मी पाण्याजवळ जात होतो तसतसा माझा धीर होईना! खालून पाचव्या पायरीवर भिंतीला टेकून मी उभा राहिलो. पाण्यात बेडकासारखी सटासट पोहोणारी पिल्लावळ बघून गंमत वाटत होती पण भीतीही कमी होत नव्हती. मागे ओढ घेणार्‍या मला नानांनी धरुन खाली नेलं आणी पाण्यात ढकललं! आयायऽऽआयाय असं ओरडत मी धप्पकन पाण्यात पडलो, दोनेक गटांगळ्या खाल्यावर त्वेषानं हातपाय झाडायला सुरुवात केली नाहीतर आपण बुडणार असं वाटत होतं पण लगेच लक्षात आलं की आपण तरंगतो आहोत, पाठीच्या डब्याने मला तरंगवून धरलं होतं. मी काठाकडे पाहिलं नाना तिथेच पोहत सगळीकडे लक्ष ठेवत होते. मी झपाट्याने हात मारत खडकावर आलो. जरावेळ बसून परत हळूच पाण्यात डुबकी मारली मग भिंतीच्या कडेकडेने पोहत होतो. नाना मला हात कसे मारायचे हे सांगत होते त्याप्रमाणे मी करत होतो. एवढ्यात मोटेवरुन एकाने पाण्यात धाडकन उडी मारली. हवेतून येणारा तो मुलगा बघून मी आश्चर्याने थक्क झालो होतो! एव्हाना माझी पाण्याची भीती तर गेलीच होती हे नक्की. पुढल्या ३-४ दिवसात डब्याविनाही मी तरंगू लागलो आणि विहिरीला काठाकाठाने चक्कर मारण्यापर्यंत माझी प्रगती झाली. त्यानंतर एके दिवशी कोणीतरी मला पाठीमागून पाण्यात दाबलं. मी थेट तळात ढकलला गेलो. ओरडायला तोंड उघडलं तर नाकातोंडात पाणी गेलं. डोळे उघडले तर सगळीकडे हिरवागार रंग दिसत होता आणि वरती विहिरीच्या तोंडातून येणारा प्रकाश. एक क्षण घाबरलो पण मग मला मजाच वाटू लागली. श्वास रोखून खोलवर बुडी घेण्याचे तंत्र मी तातडीने शिकलो. मग मात्र मी स्वतःहून पाण्यात खोलवर जाऊन तिथून वरती बघणे हा खेळच सुरु केला! *************************************************************** त्यानंतर काही वर्षांनी पोहोण्याचा वेगळा आनंद मला अहमदनगरला मिळाला. सिद्धीबागेजवळ चांगला भलामोठ्ठा जलतरण तलाव बांधून नगरपालिकेनं एक फारच चांगलं काम केलं होतं. माझ्या आईला पोहोण्याची फार आवड त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारी ३-४ च्या सुमारास मी, बहीण आणि आई असे तीघे पोहायला जात असू. बाबा क्वचितच यायचे. आई चांगलीच पोहायची. पोहोताना मधे तोंडात पाणी न जाउ देता योग्य वेळी श्वास कसा घ्यायचा हे तिनेच मला शिकवले. विहिरीसारख्या तळ पायाला न लागणार्‍या ठिकाणी पोहायला शिकल्यामुळे ३ फूट, ४ फूट, ६ फूट, ८ फूट अशा क्रमाने उतरत्या होत जाणार्‍या तलावात पोहोणे हा एक मनोरंजक अनुभव होता. फळीवरुन पाण्यात सुरेख सूर मारणारे लोक बघून मला हेवा वाटे, तसा सूर मला कधी मारता येईल? असंही वाटून जाई. एक दिवस धीर करुन मी फ़ळीवर गेलो. माझ्यापुढच्या माणसाने मारलेला सूर बघून मीही तसाच मारला आणी काय झाले कोणास ठाऊक पाण्यावर आडवा पडलो पोटावर! जाम मार बसला. सगळं पोट लालेलाल झालं होतं, हुळहुळंत होतं. लागल्यापेक्षा सूर जमला नाही ह्याचं मला जास्त दु:ख झालं होतं. त्यादिवशी मी पुढे पोहलोच नाही. दुसया दिवशी मी पुन्हा सूर मारायला गेलो. ह्यावेळी मात्र मी बर्‍यापैकी उंच उडी मारुन हात आणि डोके पाण्यात घातले आणि सूर बराचसा जमला, मला फ़ार आनंद झाला. मग एका आठवड्यात मी चांगला सूर मारू लागलो. एकदिवस मी निश्चय केला की १० फूट खोलीपाशी तलाव एका दमात ओलांडायचा. एका बाजूने निघालो की पोहत. अर्धे अंतर सहज पार केले. मग थोडा पुढे गेलो. शेवटचे ६ एक फूट राहिले असतील नसतील, माझा दम तुटला! कडेला धरायला गेलो तर शेवाळलेल्या भिंतीवरुन हात सटकले. गटांगळ्या खाताना एकदा डोके वर निघाल्याबरोब्बर मी खच्चून ओरडलो! माझे ओरडणे ऐकून पलीकडेच पोहोणारे एक काका झपाट्याने जवळ आले, त्यांना मी मिठीच मारली, त्यांनी माझी चड्डी पकडून मला कडेला खेचले. जाम घाबरलो होतो.पण तरीही पोहायलाच नको असे मला कधी वाटले नाही हे आश्चर्य! ते काका बाबांच्या ओळखीचे होते त्यांनीच मला फ्रीस्टाईल, ब्रेस्टस्ट्रोक, बॅकस्ट्रोक शिकवले आणि मग माझा मीच बटरफ्लाय शिकलो. तो उन्हाळा संपता संपता ५० मीटर लांब तलाव एका दमात पोहोता येईल अशी प्रगती झाली. पोहून परत येताना हातपाय इतके थकलेले असायचे की घरापर्यंतचं पंधरा मिनिटांचं अंतरही कधीच संपणार नाही असं वाटायचं. घरी आल्या आल्या हापूस आंब्यांवर ताव मारणे हे व्हायचेच, त्याशिवाय पाऊलही टाकायचे नाही असे वाटत असे. ते दिवस फारच मजेचे होते. *************************************************************** त्यानंतर मी बर्‍याचदा गणपतीपुळ्याच्या, हरिहरेश्वरच्या समुद्रातही पोहलो. अंगावर फुटणार्‍या खारट लाटा, परतीच्या ओढीबरोबर पायाखालून सरसरत निसटून जाणारी रेती असा अवर्णनीय आनंद अनुभवला. समुद्रस्नान हे अतिशय उत्साहदायी असते हा माझा आजवरचा अनुभव आहे. शरीराचा आणि मनाचा सगळा शीण घालवून टाकण्याचे एक जबरदस्त सामर्थ्य त्यात असते. पण त्याला पोहोणे म्हणणं मला जरा अवघड जातं. अर्थात पट्टीचे पोहोणारे आणि खाडी वगैरे ओलांडून जाणार्‍या जलतरण पटूंची बातच वेगळी! मला पोहोण्याचा मनसोक्त आनंद पुन्हा बरेच वर्षांनी मिळाला तो सांगलीला कॄष्णामाईच्या सान्निध्यात. माझ्या अभियांत्रिकी नंतरचं एक वर्ष मी सांगलीत राहिलो होतो त्यावेळी सकाळी सकाळी सायकलवर टांग टाकून गणपती मंदिरामागच्या घाटावर पोहायला जायचो. डावीकडे आयर्विन पूल दिसत असे. बायका धुणी धुवत असायच्या. पोरं पोहत असायची. कपडे काढून, नीट गुंडाळून चपलांवर गठ्ठा करुन एखाद्या दगडाखाली ठेवायचे म्हणजे वार्‍याने उडायला नको. नदीला नमस्कार करायचा आणि मोठ्ठा श्वास छातीत भरुन घेऊन पाण्यात घुसायचे. एकसारख्या वेगाने हात मारत पाणी कापत अख्खी नदी ओलांडून मी पलीकडे जाई! पलीकडे गेल्यावर नदीकाठची ओली रेती अंगाला खसखसून घासून अंग धुवे आणि जरा दम निघाला की नदीला वरच्या अंगाला चालत जाई मग तिथून परतीच्या प्रवासाला सुरुवात. एकदाचा अलीकडल्या काठावर आलो की जरा दम टाकायचा मग कपडे बदलून गणपतीचं दर्शन घेऊन परत खोलीवर यायचो. इतकी भूक लागलेली असे की बर्‍याचदा दूधवाल्यानं दाराशी ठेवलेली अर्धा लीटरची पिशवी तापवायचाही दम निघायचा नाही, तशीच दातांनी फोडून एका दमात गटकवायचो! मग जवळच एसटी स्टँड बाहेरच्या पोहेवाल्याकडे जाऊन गरमागरम पोहे हाणायचे आणि पुढल्या कामाला सुरुवात! आहाहा काय दिवस होते ते! फारच मस्त. *************************************************************** ऐन पावसाळ्यात एकदा कॄष्णेचा महापूर बघायला आम्ही नरसोबाच्या वाडीला गेलो होतो. नेहेमीचा देवळाचा घाट बुडून गेला होता, देऊळही अख्खं पाण्यात बुडालं होतं फक्त कळस दिसत होता. तांबडंलाल, गढूळ, खळाळणारं पाणी घेऊन कॄष्णा रोरावत होती! जागोजाग भोवरे फिरत होते. दोन मोठी झाडं आणि एक म्हैस वाहून चालली होती. ते दृश्य पाहून मी भयचकित झालो होतो. एरवी ज्या शांत नदीत आपण पाय धुवून दर्शन घ्यायला यायचो ती हीच का असा प्रश्न मला पडला होता. त्या महापुरात लोक नदीला नारळाच्या माळा अर्पण करत होते आणि काही पट्टीची पोहणारी पोरे सटासट त्या पाण्यात सूर मारुन भोवरे चुकवत त्या नारळाच्या माळा पकडून आणत होती! त्यांचं मला कौतुक वाटलं. इतकं पट्टीचं पोहणं मला कधीच जमलं नाही. त्यानंतर मी मुळा-मुठेला आलेला पूरही बघितला, संभाजीपुलाला पाणी लागत आलं होत. पण त्यातही तो कॄष्णेच्या पुराचा रौद्रभीषणपणा नव्हता. अर्थात दोन्ही तटाला सिमेंटची बंदी घातलेली गावातून वाहणारी नदी तशी केविलवाणीच दिसते म्हणा. कर्वेरस्त्यावरच्या गरवारे शाळेमागल्या टिळक तलावात मी पोहलो आहे. स.प. कॉलेजचा तलावही छान आहे. तिथल्या दोनेक स्पर्धातही मी भाग घेतलेला मला आठवतोय. माझी जेमतेम एक फेरी संपत असतानाच उलट येऊन दुसरी फेरी संपवत आणलेले पट्टीचे पोहोणारे स्पर्धक बघून मी गार झालो होतो! त्यानंतर लक्षात आले की अतिशय खडतर प्रशिक्षणाशिवाय स्पर्धा म्हणजे काही खरे नाही. मग तो नाद मी सोडून दिला पण आनंदासाठी, व्यायाम म्हणून मी अजूनही पोहतो. गेले तीनचार उन्हाळे इथे अमेरिकेच्या अटलांटिक किनार्‍यावर पोहोण्याची संधी मी घेतली. पण इथलं पाणी मरणाचं थंडगार असतं! ऐन उन्हाळ्यातही बाहेरचे तपमान ३५ डिग्री सें. असतानाही पाणी जेमतेम १२-१३ डिग्री सें असते त्यामुळे पाऊल टाकायचा धीर होत नाही पण मनाचा हिय्या करुन एकदा का आत शिरलात की मग विचारायची सोय नाही! बाहेर यावंसंच वाटत नाही वेगळीच मजा! माझ्या मुलालाही ते जाम आवडतं समुद्रस्नानाचा आनंद तोही घेतो माझ्या बरोबर. मुलामुलींना पोहायला हे आलंच पाहिजे. झाडावर चढणे, पोहोणे आणि सायकल चालवता येणे हे रोटी, कपडा, मकान प्रमाणेच जीवनावश्यक गरजात मोडते असे माझे मत आहे! हल्ली मुलांना पोहायला काय काय सुविधा उपलब्ध असतात हे बघितलं तर त्यांचा हेवा वाटतो. वेगवेगळ्या डिझाईनचे रबरी टायर्स काय, गॉगल्स काय, स्वीमिंग सूट काय, डोक्याला कॅप काय सगळा सरंजाम करुन मुलं पाण्यात उतरतात तेव्हा रंगीबेरंगी मासोळ्यांसारखी दिसतात. बघायला मजा येते. मी ही तलावत उतरुन पोहोण्याचे चार हात मारुन अगदीच सराव जायला नको ह्याची काळजी घेत असतो पण विहिरीतली, नदीतली ती मजा येत नाही, ती वेगळीच! *************************************************************** आता नदीत-विहिरीत पोहायला जायची सुरसुरी आली तरी गप्प बसावं लागतं. चारपाच वर्षाखाली इन्ना गेल्याचं समजलं. थकलेले नानाही मग त्यांच्या मुलाकडे रहायला गेलेत असं कळलं. माझंही चार-पाच वर्षात मिरजेला जाणं झालं नाहीये. फर्मानकट्ट्याच्या विहिरीत आता कदाचित पुढची पिढी सूर आणि मुटके मारत असेल आणि असेच कोणी नाना नव्या मुलांना पोहायला शिकवत असतील. तिथून सुरु झालेला माझा जलप्रवास अजूनही सुरु आहे आणि माझ्या मुलाला पोहायला शिकवून तो पुढे चालू ठेवीन अशी आशा मी बाळगून आहे. चतुरंग

वाचन 9586 प्रतिक्रिया 0