मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घर पहावं रंगवून!

स्वाती दिनेश · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
घरात रंगकाम काढलं की सामानाची हलवाहलवी, झाकाझाकी, धूळ, आवाज आणि नंतरची आवराआवरी.. सगळं घर ढवळून निघतं अगदी. बर्‍याच हरवलेल्या वस्तू ह्या आवराआवरीत सापडतात तर कित्येक वस्तू आपण का जमवल्यात? असा प्रश्न पडतो. पण त्या फेकून देण्याऐवजी "असू दे, लागेल केव्हा तरी, होईल कशाला तरी.. " असं म्हणून जुने पत्र्याचे, प्लास्टिकचे डबे, प्लास्टिकचे चमचे, बशा, जुने कपडे परत खोकाबंद करून अडगवायला सज्ज होतात. ह्या सगळ्याचा धसका म्हणून की काय, जर्मनीत आल्यापासून 'घर रंगवणे' आतापर्यंत इतकी वर्षे यशस्वीपणे टाळले होते, पण आता मात्र आमच्या घरातील एक खोली अगदी रंगवायला हवीच होती. टाळाटाळ करून अजिबात चालण्यासारखे नव्हते. शाळेत असताना दिलेल्या चित्रकलेच्या परीक्षांच्या वेळी काय हातात ब्रश धरला असेल तेवढा! याउप्पर रंगवण्याचा आणि माझा स्वप्ने रंगवणे सोडून गेल्या कित्येक वर्षात संबंध आलेला नव्हता आणि दिनेशने कॉलेजात असताना घराचे रंगकाम चाललेले असताना हौशीने रंगार्‍यांमध्ये जी लिंबूटिंबू लुडबुड केली होती. एवढ्या भांडवलावर आम्ही रंगकाम करणे म्हणजे खोलीची आहे ती अवस्था बरी म्हणायची वेळ नको यायला.. असे म्हणून रंगार्‍यांना काम द्यायचे ठरवले आणि त्या दृष्टीने शोध सुरू केला. रंगापेक्षा रंगार्‍यांचे पैसे दुप्पट होतील हे समजल्यावर तो बेत रहित करून आम्हीच हातात ब्रश घ्यायचे ठरवले. 'बाऊ मार्केट' म्हणजे घराच्या बांधकामासाठी, सुतारकामासाठी, रंगकामासाठी आणि सजावटीसाठी लागणारे साहित्य मिळणार्‍या दुकानातून फिरून रंगकामासाठी लागणार्‍या खरेदीची पूर्वतयारी सुरू केली. रंगाच्या ब्रशाला पिंझेल म्हणतात आणि फार्ब म्हणजे रंग ह्या ज्ञानावर चालण्यासारखे नव्हते. त्यासाठीच्या वेगळ्या संज्ञा माहित असणे जरुरीचे होते, त्यामुळे मग दिवसचे दिवस बाउमार्केटात फिरुन कुठे काय मिळते? आणि कशाला काय म्हणतात? ह्याची माहिती गोळा करून नोंद केली. एकदा हातात माहिती आल्यावर दिनेश आणि मी दोघांनी परत दुकानात जाऊन रंगसाहित्याची पाहणी केली. रंगकामासाठी लागणार्‍या वेगवेगळ्या आकारांच्या ब्रशांचा ढिग पाहून कोणते ब्रश आपल्याला लागतील ह्याचा अंदाज येईना. तेथे मदतीसाठी असलेल्या काउंटरवर जाऊन विचारणा केली. साधा रंगाचा ब्रश,भिंतीचे कोपरे रंगवायचा वेगळा ४५अंशाचा कोन केलेला ब्रश,रेडिएटर रंगवायचा आणखी वेगळा ब्रश आणि रंग, वॉर्निशिंगसाठीचा ब्रश, रोलर आणि त्या,त्या कामासाठीचे रंग खरीदले. लासुअर म्हणजे वॉर्निश असे घोकून गेले होते. ते कुठे मिळेल ते ही विचारून घेतले.तर तिथे बर्‍याच रंगांचे डबे दिसले . रंगहीन लासुअरचा म्हणजे वॉर्निशचा डबा शोधून घेतला. दारांच्या फ्रेमा रंगवायला वेगळा रंग घेतला. घराला रंग कोणता द्यायचा? ह्या प्रश्नावर मतभेद व्हायला वावच नव्हता कारण पांढरा रंगच द्यायला त्यातल्या त्यात सोपा असल्याने 'मेरावाला पिंक' शोधण्याची भानगड नव्हती. इंटरनेटवर गुगल चॅटवर 'बिझी, डू नॉट पिंग'चा टॅग लावून गप्पांचा मोह टाळत गुगलबाबावर रंगकामविषयक शोध सुरू केला आणि चक्क अभ्यास करावा तशा नोटस काढल्या. दिनेशनेही कचेरीत जसा वेळ मिळेल तसे रंगकामविषयक वाचन सुरू केले आणि स्प्रे-मशिनचा शोध लागला.गाड्यांचेच स्प्रे पेंटिंग आतापर्यंत माहिती होते, पाहिले होते पण घराचे रंगकाम स्प्रे पेंटिंग मशिनद्वारे ही कल्पनाच आमच्यासाठी वेगळी होती, नवीन होती. लग्गेचच बाऊमार्केटात जाऊन चौकशी केली. तेथल्या कामगारांनी आम्हाला वेड्यातच काढले. एका खोलीसाठी मशिनमध्ये कसले पैसे वाया घालवता? त्यात रंग भरणे आणि नंतर साफ करणे ह्यात एवढा वेळ जाईल की तुमच्या दोन खोल्या तेवढ्या वेळात रंगवून होतील. असा सल्ला ऐकून यंत्र खरेदी न करताच घरी परतलो पण डोक्यातून मात्र ते मशीन जात नव्हते. त्यावरची अधिकाधिक माहिती मिळवताना एक फिल्मही सापडली, ती पाहिल्यावर तर मशीन घ्यायचा विचार पक्का झाला. कारण त्यात मशिनद्वारे रंगकाम म्हणजे अगदीच किरकोळ काम वाटत होते. छान कपडे घालून, मेकप करून मशीनचा काँप्रेसर खांद्यावर धरून त्यातील तरुणी भिंत रंगवत होती. कहर म्हणजे भिंत पूर्ण रंगवल्यावर एका कोपर्‍यात फुलांचे नक्षी कामही तिने केले आणि ह्या यंत्राने रंगकाम करणे म्हणजे कसा आल्हाददायक अनुभव आहे हे पापण्या फडफडवत सांगितले, ते पाहून आम्हीही भुललो आणि शेवटी आपण स्वतः रंगकाम करणार आहोत,रंगार्‍यांचे पैसे तर वाचले आहेत ना? मग मशिनमध्ये पैसे घालवायला काय हरकत आहे? आणि 'हे पैसे वेस्ट करत नसून इन्व्हेस्ट करत आहोत' या उदात्त हेतूने तातडीने यंत्रखरेदी करुनच टाकली. ज्या खोलीचा कायापालट करायचा होता ती रिकामी करून, घरातल्या इतर खोल्यांना अडगळीच्या खोल्यांचे रुपडे देऊन, आता उद्या रंगकाम सुरू करायचे ह्या विचारात स्वप्ने रंगवत झोपी गेलो. सकाळी ठेवणीतले जुने कपडे घालून, शॉवरकॅपने डोकी झाकून आम्ही दोघे रंगकामासाठी सज्ज झालो. त्या जाहिरातीतल्या बाईसारखे नवे कपडे आणि मेक अप करून रंगकाम करण्याचा आणि जमलं तर ते करत असताना फिल्मवण्याचाही एकदा माझा विचार होता पण क्काय बावळट आहे? जाहिरात आणि रिऍलिटीमधला फरक कळत नाही? असा चेहरा करून दिनेशने तो हाणून पाडला. मशिनबरोबर दिलेल्या सूचनांप्रमाणे आधी रंगात थोडे पाणी घालून पातळ केला आणि एका फिरकीने लस्सीसाठी ब्लेंडरने फेटावे तसा रंग घुसळला.रंगाचा डबा उघडल्याबरोबर तो नवेपणाचा ,कोरेपणाचा वास आला..आणि त्याचबरोबर उत्साहही.. शाळा सुरू व्हायच्या आधी खरेदी केलेल्या वह्या,पुस्तकांच्या कोरेपणाच्या वासाची आठवण झाली एकदम! भरकटलेल्या मनाला परत फ्रांकफुर्टात आणून तयार केलेला रंग यंत्राच्या डब्यात भरला आणि डबा बंद करून मोटरला जोडला. एका भिंतीवर थोडा रंग स्प्रे करून श्रीगणेशा केला आणि तो भाग उजळला की, पण थोड्याच वेळाने रंग बाहेर येतो आहे असे काही लक्षण दिसेना. उलट रंगात गुठळ्या आहेत असे वाटू लागले. रंग अगदी घट्ट नको, १०% पाणी घाला अशी सूचना वाचून परत रंग डब्यात ओतला आणि एका मोठ्या चाळणीतून चक्क रंग गाळून घेतला. परत लस्सीसारखे घुसळले आणि आता जरा पहिल्यापेक्षा पातळ रंग भरून स्प्रे सुरू केला. आता मात्र सरसर एकसंध असा रंग पाझरू लागला. मग काय? वॉशिंग्टनच्या कुर्‍हाडीसारखे आमचे रंगयंत्र दिसेल ती भिंत रंगवू लागले.चारही भिंती त्यामानाने खूपच लवकर रंगवून झाल्या पण छत रंगवायला मात्र अपेक्षेपेक्षाही जास्त वेळ लागला. रात्री ११ पर्यंत आम्ही,आम्ही म्हणण्यापेक्षा दिनेशनेच चारही भिंती आणि छत पूर्ण केले. दिनेशचे हात,खांदे भरून आले होते पण मनही पूर्ण भरलं होतं. आम्ही रंगकाम करू शकतो हा विश्वास निर्माण झाला होता, त्या आनंदातच पाठ टेकली. अजून रेडिएटर, दारांच्या फ्रेम्स, वॉर्निशिंग बाकी होते. दुसर्‍या दिवशी रविवार असल्याने आवाज करणारी यंत्रे वापरता येणार नव्हती. कसले हे ह्यांचे नियम? असे मनात चडफडत ब्रश हातात घेतला. दारांच्या फ्रेमा तैलरंगाने रंगवायच्या असल्याने काळजी घेणे आवश्यक होते, नाहीतर निळ्या कोल्ह्यासारखा आपला श्वेतकोल्हा व्हायचा ह्या विचाराने आणि जमिनीवर रंगनक्षी नको म्हणून आधी खालची जमीन कागदाने झाकून चिकटपट्टी लावली आणि दारांच्या फ्रेमा शुभ्र रंगात रंगल्या तर लाकडी दारांना वार्निश फासून झाले. भारतात असते तर हाताबरोबर अगदी ट्रंका जरी नाहीत तरी गेला बाजार पत्र्यांचे डबे, लोखंडी खाटा तरी रंगवून घेतल्याच असत्या पण इथे आम्हीच रंगारी असल्याने अगदीच आवश्यक वस्तू रंगवण्याकडे आमचा कल होता. तरी मानफ्रेडच्या टेबलाचे पाय वाकुल्या दाखवू लागल्याने उदार मनाने त्यांना रंगवून काढले. आता खरे किचकट काम रेडिएटर रंगवण्याचे होते. एकेक पाते रंगवायला फारच वेळ लागला, लिटरभर रंग आणि एक पूर्ण दिवस रेडिएटरने खाल्ला. आधी जुनीपुराणी, गरीब बिच्चारी वाटणारी खोली आता अगदी नवी दिसू लागली, त्याहीपेक्षा ती आम्ही स्वतः नवी केली ह्याचा आनंद जास्त आहे. इतर खोल्या आता तिच्यापुढे गरीब बिच्चार्‍या आणि जुन्या वाटत आहेत पण सध्या तरी आम्ही तिकडे लक्ष देणार नाही आहोत. कदाचित स्वतः रंगकाम करणार्‍यांच्या दृष्टीने 'ह्यात काय विशेष?' असे असेलही .. पण हा आमचा पहिलाच रंगानुभव आम्हाला समृद्ध करून गेला हे मात्र खरं!

वाचन 10479 प्रतिक्रिया 0