मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिलपिटास येथील चटपटीत कट्टा - वृत्तांत

धनंजय · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
गेल्या आठवड्यात उत्तर कॅलिफोर्नियामध्ये जाण्याचा योग आला. निघण्याआधी मी "मिसळप्रेमी तितुका मेळवावा" वचनाला अनुसरून चौकशी सुरू केली. आणि सान-होसे बे-एरिया भागातील लोकांनी त्याचवेळी कट्टा आयोजित केला. पहिला खुलासा : सनीव्हेल-सानहोसे म्हणजे अगदी नारायणपेठ-नवसह्याद्री आहे असे म्हणतात, ते खोटे आहे. खडूसपणाची खूणही खरवडून खरवडून सापडली नाही. त्यामुळे लोकहो, सदाशिव पेठेतले घर सोडून इथे येण्याचा विचार खोडा. त्रास होईल. चार पैसे जास्त लागले, तरी आपले कोथरूडच बरे. दुसरा खुलासा : पुढील चित्रांमध्ये "चित" होऊन चेष्टा करणारे सर्व प्रौढ लोक आहेत. फळांचा रस घेऊन शहाण्यासारखी वागणारी ती लहान मुले. उगाच घोटाळा व्हायला नको. तिसरा खुलासा : स्पॉयलर अलर्ट. या नाटकातली नायिका वारुणी आणि नायक पडला चाट (चित्रात मिरच्यांनी चाटची जागा घेतली आहे). त्या दोघांचेही बाकीच्या पात्रांनी शेवटी नामोनिशाण ठेवले नाही, म्हणजे ही शोकांतिका आहे. Image removed. - - - कट्टा संध्याकाळी ५-६ वाजेस्तोवर सुरू झाला. बबलू यांनी घर सजवून ठेवले होते. कोणी ऐरेगैरे येऊ नयेत म्हणून कॉलनीच्या फाटकापाशी संकेताक्षर टंकावे लागते. ते संकेताक्षर मला (ऐरागैरा असल्यामुळे) माहीत नव्हते. स्टियरिंग-चक्रधर बेसनलाडू यांचे कुशल सारथ्य होते म्हणून बरे. संकेताक्षराविना आम्ही शिताफीने आत घुसलो. महाराजांच्या गडांवरती हे असे चालले नसते. मावळ तो मावळ मिलपिटास तो मिलपिटास. पाहुणे असे कोणी नव्हतेच - सगळेच मिसळपाव-घरचे मित्रलोक. तरी बबलू अतिशय लक्षपूर्वक अतिथ्य करत होते. या चित्रात त्यांच्या पेल्यात साक्षात टेकीलाचा सूर्य उगवतो आहे, पण त्यांचे डोळे वर "सगळ्यांचे ठीक चालू आहे ना?" असे भिरभिरत आहेत. Image removed. हा सूर्योदय कसा अनुभवायचा ते नाटक्या यांनी आपल्याला सांगितलेच आहे (दुवा). इथे त्यांचा सढळ हात दिसतो आहे. Image removed. नंतर भेळ आली. बेसनलाडू यांचे लक्ष हातातल्या भेळेकडे नव्हते (उणे ५ गुण) पण कॉकटेल बनवण्याच्या कृतीकडे होते (+५ गुण) : Image removed. आतावर ज्या ओळखी झाल्या होत्या त्या तुम्ही-कुठचे-आम्ही-कुठचे अशा गोग्गोड. काहीतरी झणझणीत आणि कडक असल्याशिवाय तिखटामिठाच्या ओळखी होणार नाहीत, असे श्री. व सौ. नाटक्या यांना माहीत होते. म्हणून "हॉट टेकीला" हा प्रकार बनवला गेला. Image removed. लिंबाचा रस, टेकीला आणि मिरच्या! ग्लासचा मुका घेतला तर आधी जिभेला लागते ते मीठ आणि लाल तिखट. त्यातही सांगायचे म्हणजे सौ. नाटक्यांचे कॉकटेलांबद्दल ज्ञान भरपूर असले, तरी त्यांची आवड मॉकटेलांचीच. त्यामुळे सर्वांच्या डोळ्यांसमोर रंगमंच फिरता असला तरी सौ. नाटक्या यांचे सूत्रसंचालन तल्लखपणे चालू होते. Image removed. त्यांच्यासह जो हासरा स्त्रीवृंद होता त्यांच्यापैकी येथे दिसतात सौ. अमोल, सायली आणि दिपाली पाटील. Image removed. दिपाली पाटील यांच्या वडापावाच्या दणदणीत लोकप्रियतेमुळे, कॅमेरा आणेपर्यंत पाव हातोहात गायब होत होते, म्हणून येथे पावांच्या पाकृचाच दुवा घ्या. पाणीपुर्‍या भरताच तोंडात जातात, म्हणून त्यांचा फोटो नाही. रगडा पॅटिसचा फोटो का नाही, याबद्दल सुद्धा काहीतरी सबब होती, पण मी ती विसरलो आहे. नंतर रंगीत ओळखीचा कार्यक्रम झाला. म्हणजे नाव-गाव नव्हे तर छंद-फंद. प्रत्येक जण ओळख सांगत होते, आणि मग श्री किंवा सौ. नाटक्या त्यांची मिष्किल "छुपी" ओळख करून देत होते. श्री. नाटक्या यांची मिष्किल ओळख त्यांच्या चिरंजीवाने करून दिली. चि.(क्र२) नाटक्या यांच्या शर्टावर "जसा बाप, तसा लेक" असे लिहिले होते. खेटरांनी आरती कशी ओवाळावी त्याचे प्रात्यक्षिक ते दाखवत आहेत. श्री. नाटक्या (हिरवा शर्ट) कौतुकाने बघत आहेत, तर श्री. अमोल यांचे लक्ष पुढील चित्रातील चि. अमोल कडे आहे. Image removed. चि.अमोल : Image removed. श्री अमोल यांच्याहीपेक्षा अधिक गृहकर्तव्यदक्षता श्री. सायली व श्री. दिपाली यांची खासियत आहे. सायली व दिपाली मिसळपाव संकेतस्थळावर जाऊ लागल्यानंतर आता त्यांना घरातले "सगळे-सगळे" करायला जमू लागले आहे. असे सांगताना हे श्रीयुत-द्वय येथे दिसत आहेत : Image removed. अधूनमधून "तुमच्या कट्ट्यातले ग्लास रिकामेच फार" अशी कुरकुर दस्तूरखुद्द धनंजय श्री. नाटक्यांपाशी करत होता : Image removed. शेवटी ही आग आगीनेच विझवायची असे जाणून श्री नाटक्या यांनी "फायर अँड आइस" नावाच्या कॉकटेलला पेटवूनच दिले : Image removed. आता चिंब पेटलेली महफिल काव्य-शास्त्र-विनोदात गुंतत चालली. दिलखुलास विनोद आणि मद्यार्काचे रसायनशास्त्र आधीच होते. त्यात श्री. बेसनलाडू यांनी गझलेच्या आस्वादाबद्दल मुद्देसूद चर्चा सुरू केली. श्री. व सौ. नाटक्या, श्री अमोल यांनी नाटक बसवण्याबद्दल अनुभव सांगितले. संगीतात तर आकर्ण डुंबलेले तिथले बहुतेक लोक होते. (सौ. अमोल यांना गाण्याची फर्माईश पूर्ण करण्यापूर्वी घरी जावे लागले, ही चुटपुट मला लागून आहे.) त्या कानसेनांच्या सभेमध्ये संगीत शिकताना आपल्या झालेल्या पचक्याचा दु:खद किस्सा धनंजयने सुनावला. "रडू नकोस, ही कॉफी पी", असे म्हणत श्री नाटक्या यांनी कॉफीचीच कॉकटेल बनवून धनंजयचे सांत्वन केले. अशा करुण अनुभवाने कट्ट्याची सांगता होऊ नये, म्हणून बबलू यांनी आपल्या सी.डी.पोतडीतून भैरवीचे दोन अप्रतिम नमुने शोधून काढले, आणि सर्वांना सुनावले, सुखावले. या जिंदादिल मंडळींचे कट्टे पुन्हा-पुन्हा होत राहाणार आहेत, आपण इथे मात्र या एकाच कट्ट्याला हजेरी देऊ शकणार, हा विचार सर्वांना विदा देताना माझ्या मनात येत राहिला...

वाचन 8883 प्रतिक्रिया 0