एक होती परी
लेखनप्रकार
श्री. धनंजय यांनी सादर केलेले विंदांच्या बालगीतांचे रसग्रहण वाचून आणि विशेशत: परीची कविता वाचून,
अशीच एक मनांत ठसलेली परीची कविता सादर करण्याचा मोह आवरत नाही. या कवितेचा जनक कोण आहे ते ज्ञात नाही.
पण गूळ दाण्याच्या खाऊ इतकीच या कवितेची चव अजून जिभेवर रेंगाळते आहे.
एक होरी परी
एक होती परी खूप खूप गोरी
एवढीशी होती पण छान छान भारी
एकदा काय झालं
स्वर्गातल्या गंगेला पूर मोठा आला
परीचा बंगला वाहून गेला
रड रड रडली ,वेडी पिशी झाली
चांदोबा भाऊकडे धावत गेली
चंदोबा म्हणाला
दात ओठ नको खाऊस
येतो मी नदी काठीं
घर देतो बांधून
तेंव्हा पासून परी नदीतच राहिली
पाण्यांच्या लाटांची मालकीण झाली
चांदोबा चांदोबा लवकर ये
परीचा बंगला बांधून दे.
ही कविता म्हणजे स्वप्नरंजन आणि कारूण्य या दोनही भावनांचे विलक्षण मिश्रण आहे. खूप खूप गोरी या केवळ तीन शब्दांनी परीचे लावण्य डोळ्यापुढे उभे राहयचे. परीचा बंगला वाहून गेलाम्हटले की परी बरोबरच आम्हीही रडवेली होत असूं. मग चांदोबाने परीला पुन्हा घर बांधून देण्याचे अश्वासन दिले की हायसं वाटायचं .
पण अजूनही जेंव्हा जेंव्हा एखाद्या नदीकाठी जाणं होतं तेंव्हा त्या पाण्याच्या लाटा पहातांना लाटांची मालकीण परी मला अजूनही आठवते आणि चांदोबाने त्याचा शब्द अजून पाळला नाही म्हणून अजूनही त्याच्याशी कट्टी कराविशी वाटते. मग त्या लांटाना स्पर्ष केला की त्या लाटांतून परी बाहेर येऊन मला भेटेल असे मला अजूनही
वाटत राहते.
वाचन
4816
प्रतिक्रिया
0