मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुमचं सर्वात आवडतं ड्रिंक कोणतं?

पिवळा डांबिस · · काथ्याकूट
तुमचं सर्वात आवडतं ड्रिंक कोणतं? कसा झक्कास विषय आहे! सर्वांना भाग घेता येण्यासारखा आहे की नाही? पण थांबा, थांबा! जरा विचार करा. एकदम "बाजीराव-मस्तानी" असं ओरडू नका! हे ड्रिंक असतं हे मला आमच्या एका पुणेरी मित्राकडून समजलं. आम्ही या इतिहासातील व्यक्ति आहेत असं समजत होतो. :) तेंव्हा जरा विचार करा आणि मग सांगा. मात्र चर्चेत सामील होतांना खालील पथ्ये पाळूया, जरा मजा येईल... १. नुसतंच ड्रिंकचं नांव किंवा एकच वाक्य नसावे. जरा अधिक वर्णन द्या. २. ड्रिंक "अल्कोहोलिकच" असायची जरूर नाही. नॉन्-अल्कोहोलिक ड्रिंक्स सुध्धा चालतील. भगिनींना भाग घ्यायला आता हरकत नाही. ३. ते ड्रिंक तुम्हाला का आवडतं ते सांगा ४. त्याविषयीची एखादी आठवण असल्यास ती शेअर करा. ५. जमल्यास त्या ड्रिंकची रेसिपी द्या म्हणजे इतरांनाही त्याची लज्जत लुटता येईल. ठीक आहे? चला, मी सुरवात करून देतो... माझं सर्वात आवडतं ड्रिंक आहे... स्कॉच ऑन द रॉक्स! सुवर्णकांती झळाळणारं... आपला आब राखून असणारं... फक्त बर्फाशिवाय आणखी कुणाशी (सोडा, लेमन, ज्यूस वगैरे) सलगी न करणारं... दिवसभराचा कामाचा शीण नाहीसा करणारं, पण बेताल होऊ न देणारं.... एक स्वच्छ चकाकणारा क्रिस्टलचा ग्लास घ्यावा. हेवी बेस असल्यास अगदी उत्तम, हातात फिट बसतो. त्यात बर्फाचे किणकिणणारे चार-पाच स्फटिक घालावे. बेताची, जेमतेम स्फटिक बुडतील, न बुडतील इतकी स्कॉच घालावी. शिवास रीगल ही माझी वैयक्तिक आवड कारण मला तिची चव आवडते आणि मला तिचा हँगओव्हर येत नाही. पण इतरही स्कॉच तुमच्या आवडीप्रमाणे वापरायला हरकत नाही. सोनेरी प्रभा उधळणारं ते पेयरत्न दोन मिनीटं नुसतं न्याहाळत रहावं... सुंदर स्त्रीप्रमाणे सुंदर मद्याने भरलेला चषकही अत्यंत आकर्षक दिसतो हे उमजावं... चषक तोंडाला लावून पहिला 'सिप' घ्यावा. घोट नव्हे, फक्त सिप... बस्स, जेमेतेम ओठाला स्पर्श होईल इतपतच.. आपलं आवडतं पुस्तक उघडावं. मि.पा.चं खातं उघडून बसलं तरी चालेल... चषकातील मदिरा चुंबित, चुंबित संपवावी... पहिला पेग संपल्यावर दुसरा भरावा... तितक्यात तळलेल्या कोलंबीने भरलेली बशी बायकोने पुढे करावी... बशी देऊन जाता जाता चषकातली मदिरा तिने हळूच चाखावी.... "जास्त वेळ लावू नको हं, जेवण तयार होईल लवकरच" अशी प्रेमळ धमकी द्यावी... चुलीवरच्या कोल्हापुरी मटणाचा सुगंध आसमंतात दरवळावा..... ..... ..... अरे, स्वर्ग स्वर्ग म्हणजे तरी दुसरा काय असतो? आपला, (उन्मनी) डांबिसकाका

वाचन 33176 प्रतिक्रिया 0