कटाक्ष-
नेटफ्लिक्स
माहितीपर
सहा भागांची लघू-मालिका.
एकूण वेळ - ६ तास ४३ मिनिटे
भाषा- इंग्रजी, हिंदी (परभाषीकरण अर्थात डबिंग)
ओळख-
नेटफ्लिक्स ची 'वाईल्ड वाईल्ड कंट्री' ही मालिका स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू रजनीश तथा ओशो च्या कारकीर्दीवर आधारित एक सत्यकथा आहे. पुण्यातील रजनीश आश्रम सोडून अमेरिकेतील ओरेगोन राज्यात जवळपास 80 हजार एकर जमीन खरेदी करून तेथे उभारलेल्या अत्याधुनिक 'रजनीशपुरम' या शहराभोवती ही मालिका फिरते. १७ रोल्स रॉयसचा मालक असणारा रजनीश अमेरिकेतील पहिली जवळपास साडेतीन वर्षे सार्वजनिक जीवनापासून दूर असताना ओसाड जागेवर स्वतःचे विमानतळ, स्वतःची पोलीस यंत्रणा असणारे सुसज्ज शहर उभी करणारी ओशोची सचिव 'मा आनंद शीला' ही या मालिकेच्या (आणि रजनीशच्या आयुष्यातही) पूर्वार्धातील प्रमुख पात्र आहे. अमेरिकी संविधानातल्या तरतुदी अक्षरशः नागड्या करून धर्माच्या नावाखाली स्वतःचे सत्ताकेंद्र उभारणाऱ्या शीला आणि रजनीशच्या बुद्धीला सलाम करण्याची प्रेरणा व्हावी एवढ्या अतर्क्य प्रकारे रजनीशपुरम वसवले गेले होते.
'वाईल्ड वाईल्ड कंट्री' ही मालिका मुळात उपलब्ध माहितीचे कलात्मक प्रसारण नसून रजनीशच्या भरभराटीच्या काळातील (१९६०-८५) मुळ चित्रफितींचे अप्रतिम संपादन आहे. त्यामुळे साडे सहा तासांच्या मालिकेतील जवळपास चार एक तासांचे चित्रण हे त्या काळातील मूळ चित्रफिती आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची महती नेमकेपणाने उमगलेल्या रजनीशची ही कमाल! स्वत:च्या जवळपास सर्व सार्वजनिक कृत्यांचे ध्वनिचित्रमुद्रण करणारी यंत्रणा ओशोजवळ होती. कदाचित हीच कहाणी आता नेपथ्य उभारून सत्याचा अजिबात अपलाप न करता सादर करण्यात आली असती तर तिच्यावर अनेकांचा विश्वास बसला नसता अशा करामती रजनीशी भक्तांनी अमेरिकेत प्रत्यक्षात आणल्या होत्या. परंतु अमेरिकी वृत्तवाहिन्यांच्या आणि रजनीशपुरम मधील तेव्हाच्या मुळ चित्रफितींमुळे यावर विश्वास ठेवणे अपरिहार्य होऊन जाते.
मालिकेत मध्येमध्ये ओशोच्या विचार प्रणालीची ओळख करून देण्यात आली असली तरी ती चूक की बरोबर यावर टिप्पणी करायचे टाळून केवळ प्रत्यक्षात भौतिक जगातील ओशोच्या कर्माचा लेखाजोखा मांडला आहे. आधी रजनीशच्या 'प्रेमात' आकंठ बुडालेली शीला आयुष्याच्या उत्तरार्धात रजनीश करिता काही 'दशलक्ष डॉलर्स ची लूट करून गेलेली एक वेश्या' कशी होते, या १८० अंशातील प्रवासाचा वेग धक्कादायक आहे. रजनीशपुरमच्या स्थापनेत आणि वाढीत निर्णायक भूमिका बजावणाऱ्या ओशोच्या सध्या हयात सहकाऱ्यांच्या मुलाखतींनी मालिकेत एक रंगत आणली आहे. सध्या स्वित्झर्लंडच्या बेसल शहरात राहणारी मा आनंद शीला आपल्या मुलाखतीत तिच्या आक्रमक आणि क्रुर स्वभावाची झलक दाखवतेच.
मालिकेच्या शेवटाकडे रजनीशपुरम च्या विरोधातील स्थानिकांच्या लढ्याचे निर्णायक वळण, ओशोच्या अंतर्गत वर्तुळात दोन प्रभाव क्षेत्रे निर्माण होणे, मा आनंद शीलाची एक कुटील चाल आणि आणि अमेरिकी तपास यंत्रणांना हुलकावणी देण्यासाठी ओशोचा जवळपास यशस्वी झालेला एक हवाई डाव या सर्वांमुळे हा माहितीपट कुठल्याही थरारक चित्रपटापेक्षा कमी रंजक नाही.
मालिकेनंतरची शिल्लक-
असत्य आणि अप्रामाणिकपणा वर आधारित धार्मिक आणि राजकीय कारकीर्द यांचा अंत कशा प्रकारे होतो हे मानवजातीला नवीन नाही. हिटलर ने एकूण किती ज्यू मारले यापेक्षा त्यावेळी इतर जर्मनांना ज्यू मारणे अत्यावश्यक का वाटले हे समजून घेणे हा इतिहास असतो. कुणा गुरुने स्वर्णिम भविष्याचे स्वप्न दाखवून हजारो मानवांना त्यांच्या नकळत दास बनवणे हे एकाच वेळी मानवाच्या अद्भुत बौद्धिक क्षमतेचे आणि त्याच बुद्धीच्या क्षणिक ठिसूळतेचे निदर्शक आहे, हाच या 'वाईल्ड वाईल्ड कंट्री' चा धडा.