वसंतपालवी
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तुझं माझं आयुष्य
दोन समांतर रेषा
कधीही न भेटणार्या
तरीही भेटलोच की...
एका सुरेख वळणाने
नकळत बदललेल्या वाटेने...
अचानक दिसलीस
आणि अभावितपणे मी चालू लागलो
तू तुडवलेली तीच उष्टी वाट.
तू मात्र मग्न होतीस
स्वतःच्याच विश्वात
खरे भाग्यवान ते
होतीस ज्यांच्या सहवासात.
तुझा तो बहरही मी अनुभवायचो
तुझी तृप्ती दुरुनच बघायचो
तुझा सभोवतालचा बघून वावर लाघवी
माझ्या वसंतालाही फुटायची थोडीशी पालवी
कधीतरी बघशील या पाऊलखुणा मान वळवून
तुझ्या मागे मागे डोळे बंद करुन चाललेल्या...
कधी घेशील मागोवा माझ्या अस्तित्वाचा...
लागेल कधी सुगावा माझ्या झुरण्याचा..
कधी जाणवतील तुला ही स्पंदनं..
तुझ्या फक्त नजरेनीही उठलेली ही कंपनं...
तुझी सारी रुपं साठवली आहेत
हृदयाच्या एका गोड गुलाबी कप्प्यात
करीन कवाडं खुली
कधीतरी आयुष्यात.
त्या "कधीतरी" ची वाट आतुरतेनी बघतोय
काय काय बोलायचं हे आत्तापासूनच ठरवतोय
पण तोपर्यंत तुझा फुलोरा असाच जपून ठेव
माझी पालवीही एक वृक्ष होणार हे ध्यानात ठेव.
जयश्री अंबासकर
वाचन
1784
प्रतिक्रिया
0