मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१४

स्वाती दिनेश · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
याआधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१३
राजधानी
टोकिओला जाण्याचा बेत ठरला तोही बुलेट ट्रेनने... बुलेट ट्रेन नाही म्हणायचं,' शिनकानसेन' म्हणायचं बरं.. शिन कोबे हे टर्मिनल फक्त शिनकानसेन साठीचे आहे. तेथे आदल्या दिवशी संध्याकाळी जाऊन पाहून येऊ या असा विचार केला आणि सगळी फय्यर निघाली शिनकानसेन आणि शिन कोबे पहायला.. आम्ही स्टेशनात शिरत असतानाच समोरुन तीही आत येत होती. माशाच्या तोंडासारखा निमुळता पुढचा भाग आणि माशासारखीच सुळक्कन आली की. डोळे भरुन तिला पाहताना कॅमेर्‍याच्या डोळ्यात तिला साठवण्याचा मोह अर्थातच आवरला नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी ८.१६ ची आमची गाडी होती. आम्ही ८ च्याही आधीच स्टेशनात आमचा ११ नं.चा डबा जेथे येईल असे बोर्डावर लिहिले होते तेथे जाऊन उभे होतो. बरोब्बर ८.१५ वाजता उद्घोषणा झाली आणि त्यापाठोपाठ आमची मासोळी आली आणि प्लॅटफॉर्मची ऍटोमॅटिक दारे उघडली. त्यापाठोपाठ गाडीचीही दारे उघडली आणि आम्ही आत शिरलो. आपल्या शताब्दी किवा राजधानीसारखा दिमाख, पण खाणे पिणे तुमचे तुम्ही आणायचं बरं का,नाहीतर रेल्वेच्या पँट्रीतून विकत घ्यायचं.(मनात विचार आला मग आमची राजधानी मस्त की, जेवण बिवण तरी देते,) पण फरक असा की राजधानी दिवसाला एक आहे तर दर १५ मिनिटाला एक प्रमाणे हिकारी लाईन वरची शिनकानसेन हिमेजी -तोक्यो धावते.६४० किमीचे अंतर तीन तासात पार करते. ह्या गाडीत,खरंतर जपानमधल्या अगदी लोकल ट्रेनमध्ये सुध्दा आपल्या सीटा फिरवून समोरासमोर तोंडे करून बसता येते हे एक विशेषच! शिनकानसेनमध्ये आपल्या आसनासमोर एक चार्ट असतो. त्या चार्ट मध्ये डब्यात असलेल्या सोयी आकृतीसकट लिहिलेल्या असतात त्यामुळे भाषा जरी समजली नाही तरी काम चालून जाते. गाडीत असलेल्या इलेक्ट्रॉनिक बोर्डावर येत असलेल्या फिरत्या सूचना जपानी व इंग्रजीत असल्याने तेथेही भाषिक प्रश्न आड येत नाही. तोक्योला जाताना वाटेत फुजीसान आपल्याला दर्शन देतो. डाव्या बाजूच्या खिडकीतून फुजीसान दिसेल अशी जपानी घोषणा झाली आणि डब्यातले सगळे लोकं आपापले कॅमेरे घेऊन डाव्या बाजूला धावले. आम्ही बावळटासारखे त्यांच्याकडे पाहत राहिलो. आमच्या चेहर्‍यावरचा गोंधळ रेल क्रूच्या लक्षात आला. त्यांच्यातल्याच एका ललनेने सायबाच्या भाषेत आम्हाला डाव्या बाजूच्या खिडकीतून काही वेळाने फुजीसान दिसेल तेव्हा त्या बाजूला पाहिलेत तर तुम्हाला तो पाहता येईल आणि फोटो सुध्दा काढता येईल असा बहुमोल सल्ला दिला. फुजी स्टेशनात गाडी थांबते, आणि त्या मिनिटभरात शेकडो कॅमेर्‍यांचा क्लिकक्लिकाट होतो. जपानमधील सगळीच स्टेशनं इतकी स्वच्छ आणि आकर्षक आहेत! स्टेशनात ठिकठिकाणी माहितीच्या पाट्या लावलेल्या असतात. "मे आय हेल्प यू?" च्या पाटीखाली हेल्प करायला कोणीतरी असते. त्या पाट्यांवर स्वतःचे वाड्मय आणि चित्रकला दाखवण्याचा सोस तेथील जनतेला नाही ,खर्‍या अर्थाने ती 'जनताकी संपत्ती' आहे. एक वैशिष्ठ्य जाणवलं ते म्हणजे स्टेशनात जागोजागी ठेवलेले त्यात्या गावचे नकाशे! जपानी आणि इंग्रजी भाषेतले ते नकाशे वापरायला सहज,सोपे. टूरिस्ट गाइडची गरजच नाही. कोणाला विचारायला सुध्दा लागत नाही. तिकिट काढण्यासाठी कुठून कुठे जायचे ते टाइप करुन मशिनच्या खाचेतून नोट सरकवली की बोर्डावर ते दिसणार आणि उरलेले पैसे व तिकिट दुसर्‍या खाचेतून बाहेर येणार असे जवळजवळ सर्वच प्रगत देशात आहे पण त्यावेळी आमचा तो पहिलाच अनुभव होता. मशिनने पैसे खाल्ले तर.., ते ऑपरेटच झालं नाही तर..तिकिटावर नीट शिक्काच उमटला नाही तर.. असे विचार कायम माझ्या शंकाखोर मनात येत पण सुदैवाने तसं कधीच झालं नाही.जपानमध्ये तुम्ही तिकिट पंच केलं की प्लॅटफॉर्मकडे जाणारे दार उघडते आणि तुम्ही आत/बाहेर करू शकता. टीसी नसतोच,असतो तो फेअर ऍडजस्ट करणारा.थोडक्यात आपल्या एक्सटेंशन काऊंटरचं काम तो करतो. गाडीत बसल्यावर मध्येच तुमचा विचार बदलला आणि तुम्ही दुसरीकडेच जायचं ठरवलंत किवा चुकीच्याच गाडीत बसलात.(दुसरी गोष्ट घडायचीच शक्यता आमच्या बाबतीत जास्त!) तर परत बाहेर जाऊन तिकिट काढायची गरज नाही तर त्याच्याकडून पुढचे तिकिट घ्यायचे. येथे लोकांनी टीसीला फसवण्याची वृत्ती दिसली नाही आणि रेलकर्मचारीही तुमच्यावर अविश्वास दाखवताना दिसले नाहीत.
तीनसव्वातीन तासात आम्ही तोक्योला पोहोचलो. प्रवासाचा शीण नव्हताच आणि बरोबर सामानही फार नव्हते त्यामुळे टोकिओ टॉवर पाहून मग हाटेलावर सामान टाकायचे ठरले. आयफेल टॉवरच्या धर्तीवर बांधलेला तोक्यो टॉवर दिमाखात उभा आहे. १५० मीटर उंचीवरुन आपल्याला तोक्योचे विहंगम दर्शन होते. तिकिटाबरोबरच नकाशा मिळतो. लिफ्टने टॉवरच्या माथ्यावर नेऊन सोडतात. तेथे सर्व बाजूंनी काचा लावलेले मोठे दालन आहे. काचेवर दिशा लिहिल्या आहेत आणि जागोजागी दुर्बिणीही ठेवलेल्या आहेत. हातात असलेल्या नकाशाच्या आधारे आणि दुर्बिणीच्या सहाय्याने आपण नेमके काय पाहत आहोत हे समजून पाहिले जाते. एक जण जर दुर्बिणीतून पाहत असेल तर बाकीचे रांगेत शांतपणे आपला नंबर यायची वाट पाहत नुसत्या डोळ्यांनी जेवढा नजारा दिसतो तो पाहत किवा माहिती वाचत उभे राहतात. "ओ भाऊ,चलाकी आता..कितीवेळ लावता?.. आम्हाला पण बघू द्या की.." असले प्रेमळ संवाद नाहीतच पण आरडाओरडा,गोंधळ तर अजिबातच नाही. खूप वेळ तोक्योचे विहंगम दर्शन घेऊन मग आम्ही इंपिरिअल पॅलेस पाशी आलो.जपानी सम्राटाचे ते भव्य निवासस्थान त्याच्या समोर असलेली तितकीच भव्य आणि सुंदर उद्याने पाहिली. ह्या राजवाड्याच्या सभोवतीची भक्कम तटबंदी आणि पाण्याचे खंदक आजही सुस्थितीत आहेत. ह्या पाण्यात विहरणारे लाल गुंजेच्या डोळ्यांचे काळे डौलदार राजहंस प्रथमच पाहत होतो.(पुढे असाच काळा राजहंस म्युनस्टरच्या आसे मध्ये पाहिला.) नंतर आम्ही डायट ऑफ जपान अर्थात पार्लमेंट हाउस पाहिले. लोअर हाउस म्हणजे हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज आणि अप्पर हाउस म्हणजे हाउस ऑफ काउंन्सेलर्स.सर्वप्रथम इंपिरिअल डायट नावाने मेइजी कॉन्स्टीट्यूशन जापान्यांनी १८८९ पासून अनुसरली. संसदभवनाला डायट ऑफ जपान का म्हणत असावेत? हा प्रश्न साहजिकच आमच्या मनात आला. जपानी राजकारण्यांचा उच्चस्तरीय भ्रष्टाचार तर सर्वश्रुत आहेच, त्यावर त्यांनी सामुहिक डायट करण्याचे हे केंद्र तर नव्हे? असा एक खोडकर विचार मनात आला. त्यानंतर रेंकोजी टेंपलपाशी आलो. नेताजींचा अस्थीकलश येथे ठेवलेला आहे. तसेच त्यांचा अर्धपुतळाही तेथे आहे. एका वेगळ्याच अनामिक भावनेने सगळे भारून गेलो होतो पण आमच्या दुर्देवाने टेंपल काही दिवसांसाठी बंद होते. कळसाला नमस्कार करून नाइलाजाने मग आम्ही पुढे निघालो. जगातलं महाग शहर तोक्यो आणि तेथले महाग मार्केट गिंझा बझार! विंडो शॉपिंग करायलाही घाबरावं अशा किमती ! उंच उंच इमारतीतील सुपरमार्केटं आणि त्यातील वस्तूंच्या किमती पाहूनच जीव दडपतो. खरेदी तर दूरची गोष्ट. तेथील सोनीची अतिभव्य इमारत पाहून वासलेला आ कितीवेळ बंदच होईना. आता आम्हाला जायचे होते रेनबो ब्रिज पहायला, पहायचा होता चमचमणारा तोक्यो टॉवर आणि तोक्योचा लखलखाटही ! पाय दमले होते तरी मनातला अमाप उत्साहच पायांना चालवित होता. पॅसिफिक महासागरावर बांधलेल्या अनेक अजस्त्र पूलांपैकी हा एक रेनबो ब्रिज, सप्तरंगी दिव्यांच्या लक्षलक्ष दीपमालांच्या लखलखाटाने आपलं नाव सार्थ करत आत्ममग्न असा तो सेतु आपल्याच प्रतिबिंबाच्या प्रेमात पडलेला वाटतो. सागरातलं ते सप्तरंगी प्रतिबिंब पाहताना तर प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर वाटत होती. तेथे असलेला स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा आजच्या जपानी पिढीच्या अमेरिकावेडाची साक्ष आहे. तेथून उठावसं वाटत नव्हतंच, मात्र नाइलाजाने तेथून निघालो कारण तोक्यो टॉवरचा दीपोत्सव खुणावत होता.

वाचन 20868 प्रतिक्रिया 0