मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुझे शहर

शिव कन्या · · जे न देखे रवी...
तुझ्या नकळत तुझे शहर फिरून आलेय – डोळे न उघडता तुला पाहून आलेय रस्ते ओलांडताना तुझा हात धरला आहे – तुझा हात घामेजला आहे मंदिरातले कासव ओलांडले आहे – तुझ्या हातावर तीर्थ ठेवले आहे दर्ग्यातल्या जाळीतून डोकावले आहे – लोबानचा गंध दरवळत आहे मिठाईच्या दुकानात इमरती घेतली आहे – हात चिकट, तोंड गोड झाले आहे भर बाजारात चिक्कीच्या बांगड्या घेतल्या आहेत – तुझे डोळे चमकत आहेत रसवंतीत पांढऱ्या मिशीचा रस प्याले आहे – तुझा रुमाल पुढे, हसू मागे आहे त्या झाडाखाली क्षणभर थांबलो आहोत – तू सावली, मी नि:श्वास झालो आहोत लाचा घेताना मी गोंधळले आहे – तू म्हणतोस, रंग जाऊ दे, आठवणी राहू देत ‘हेच तुझे घर का?’ मी विचारले आहे – हातात हात घेऊन तू मौन राखले आहेस अर्ध्यामुर्ध्या नदीत मी पाय सोडले आहेत – तू डोळ्यांत नदीला वाट दिली आहेस ‘मी वर्तमानात बोलते’ मी उगाच म्हणते – ‘तू कुठे माझा भूतकाळ आहेस!’ तुझा खोल श्वास बोलतो तुझ्या नकळत तुझे शहर फिरून आलेय – डोळे न उघडता तुला पाहून आलेय -शिवकन्या

वाचन 7165 प्रतिक्रिया 0