मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साकिया - पुर्वतयारी

नाटक्या · · पाककृती
साकिया या सदराला आपण आज पासून सुरुवात करणार आहोत. मागल्या वेळेला झालेल्या कट्ट्याच्या वॄत्तांतात मी हा बेत जाहीर केला होता. कॉकटेल्स बद्दल लिहीण्यापुर्वी आपण कॉकटेल्स म्हणजे काय? सजावट कशी करावी, कुठल्या प्रकारचे साहित्य लागते इ. इ. इ. ही पार्श्वभुमी समजवून घेतली पाहीजे. कॉकटेल्स म्हणजे काय? कॉकटेल्स म्हणजे वेगवेगळ्या मदिरा आणि फळांचे ज्युसेस ( यात दुध, अंड्याचा पांढरा बलक, क्रिम, चहा, कॉफी हे पण येतात) हे वापरून केलेले पेय. हा प्रकार १६व्या शतकात सर्व प्रथम केला त्यात टोमॅटॉ ज्युस किंवा मोसंबीचा रस याचाच मुख्यत्वे करून वापर असायचा. काही दिवसांनंतर हे फॅड मागे पडले. पण आज आपण ज्याचा कॉकटेल्स म्हणून उल्लेख करतो त्याची सुरुवात मात्र १९२० च्या दरम्यान अमेरिकेत झाली. याचे कारण म्हणजे १६ जानेवारी १९२० रोजी अमेरिकेत दारू पिण्यावर/विकण्यावर बंदी घातली गेली. परंतू कॅनडा आणि मेक्सीकोमधून दारू अवैध मार्गाने येतच होती तसेच सरकारने घरात काही प्रमाणात दारू (वाइन आणि बिअर वगैरे) बनवायला परवानगी दिली होती. ही घरगुती किंवा अवैध मार्गाने आणलेली दारू चवीला फारशी चांगली नसायची म्हणून मग ह्याचे चव सुधारण्याचे/बदलण्याचे वेगवेगळे प्रयोग सुरू झाले आणि त्यातुनच जन्म झाला कॉकटेल्सचा. ही बंदी काही प्रमाणात उठवल्यानंतर (१९३३ साली, १९६६ साली ही बंदी पुर्णपणे उठवण्यात आली) कॉकटेल्स बनवण्याची काही खास गरज उरली नाही त्यामुळे कॉकटेल्स हळूहळू मागे पडलेत परंतू पुन्हा गेले २०-२५ वर्षांपासून कॉकटेल्स पुन्हा लोकप्रिय व्हायला सुरुवात झाली आणि आता तर समाजामध्ये कॉकटेल्सने स्वत:चे असे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. कॉकटेल्स साधारणतः तिन प्रकारच्या असतातः १. ज्याचा मुख्य अंश कुठल्यातरी प्रकारची मदिरा असते आणि त्यात एक-दोन वेगळ्याप्रकारच्या मदिरा वापरून त्याचा स्वाद वाढवलेला किंवा थोडासा वेगळा केलेला असतो. २. परत कुठल्या तरी प्रकारची मदिरा आणि त्यात फळांचे रस किंवा इतर काही पदार्थ घालून (उदा. आले, जायफळ इ.) त्याला वेगळा स्वाद दिला असतो. ३. मदिरे मध्ये फळांचा रस, रंग वापरून त्याच्या रंगसंगतीला, सुवासाला किंवा चवीला उठाव दिलेला असतो. आणि अर्थातच नॉन-अल्कॉहोलिक मध्ये फक्त फळांचा/चे रस आणि इतर पदार्थ वापरून थोडासा वेगळा स्वाद आणलेला असतो. सजावट जवळजवळ सगळ्याच प्रकारचे कॉकटेल्स सर्व करताना त्यावर सजावट केलेली असते. सजावटीसाठी साखरेच्या पाकात घोळवलेली किंवा विविध रंगात उपलब्ध असलेली चेरी, संत्र्याची/लिंबाची साल/फोड, फळांचे काप, पुदिन्याचे पान, छोट्या आकरातल्या छत्र्या, वेगवेगळ्या आकाराचे/रंगांचे स्ट्रॉ इ. प्रकार वापरले जातात. बर्‍याचदा लाकडी किंवा प्लॅस्टीकचे टूथ-पिक्स पण फळांना टोचून वापरलेले असतात. छत्र्या/स्ट्रॉ/टुथ-पिक्स वापरताना त्या स्वच्छ करून घेणे फार गरजेचे असते. आणखी एक विशीष्ट प्रकारची सजावट म्हणजे फ्रॉस्टींग. यात ग्लासच्या कडेला लिंबू किंवा साखरेचा पाक / कॅरेमल सिरप असे काही तरी लावून ग्लास उपडा करून मिठ्/साखर्/कोको पावडर लावलेली असते. काही प्रकारच्या कॉकटेल्सना (उदा. मार्गारिटा) फ्रॉस्टींग असतेच असते. काही सुचना १. जेव्हा १ भाग मदिरा असे लिहीले असेल त्याचा अर्थ १/२ औंस. २. मोठ्या उभ्या ग्लासमध्ये मदिरा सर्व करतान साधारणतः २/३ ग्लास भरून बर्फ टाका, हेच प्रमाण छोट्या उभ्या ग्लास साठी १/२ ग्लासवर आणा. ३. जेव्हा फळांचा रस, मदिरा आणि ताजे फळ यांचे कॉकटेल बनवायचे असेल तेव्हा १/२ मिक्सर भरून बर्फ टाका. ४. शक्यतो ताजी फळे वापरा, गोठवलेली किंवा जुनी (बरीच पिकलेली) फळे वापरू नका. ५. फळांचे रस शक्यतो ताजे करून वापरा, जर शक्य नसेल तर फळांचे रस आणि इतर साहित्य फ्रिजमध्येच ठेवा. इतर साहित्य तुमचा कॉकटेल बार सजवताना तुम्हाला इतरही बरेच साहित्य लागेल. त्याची यादी पुढील प्रमाणे: १. Bottle opener २. Corkscrew ३. Can opener ४. Measuring cups and spoon set ५. Bar spoon with long handle and muddler on the end ६. Juice squeezer ७. Electric blender ८. Cutting board and a sharp knife ९. Ice bucket with an ice tong १०. Shaker and strainer ११. Towels १२. Vegetable peeler or a twist cutter for fruit peels १३. Grater १४. Glassware (खाली पहा) तसेच सजावटी साठी छत्र्या, स्ट्रॉ, टुथ-पिक्स वेळोवेळी आणावे लागेल.
कॉकटेल शेकर पुलंनी त्यांच्या "माझे खाद्यजीवन" या लेखात म्हटल्याप्रमाणे खाण्याचा आसनाप्रमाणे बासनाशी संबंध आहे. कुठल्या प्रकारची मदिरा कुठल्या प्रकारच्या ग्लासात सर्व करावी याचेही काही नियम आहेत. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ग्लासेस लागतील, अर्थात सगळे ग्लासेस एकदमच विकत घेतले पाहीजेत असे नाही. बजेट आणि आवडी प्रमाणे तुम्ही याचा संग्रह करू शकता. सर्व साधारण पणे लागणारे ग्लासेस पुढील प्रमाणे: १. Beer mug २. Beer pilsner ३. Brandy snifter ४. Champagne flute ५. Cocktail glass ६. Coffee mug ७. Collins glass ८. Cordial glass ९. Highball glass १०. Hurricane glass ११. Irish coffee cup १२. Margarita/Coupette glass १३. Old-fashioned glass १४. Pousse cafe glass १५. Red wine glass १६. Sherry glass १७. Shot glass १८. Whiskey sour glass १९. White wine glass
काचेचे ग्लास वापरताना घ्यायची काळजी काचेच्या ग्लासेस मुळे अपघात होऊ शकतात आणि जर असा अपघात झाला तर पार्टी मध्ये रंगाचा बेरंग होऊ शकतो. तेव्हा ग्लासेस हाताळताना थोडी सावधानता बाळगा. १. बर्फ घेण्यासाठी चिमटा किंवा मोठा स्कूप वापरा. ग्लासने बर्फ उचलू नका. २. जर बर्फाच्या साठ्याजवळ किंवा त्याच्या अगदी वरतीच ग्लास फुटला तर बर्फ फेकून द्या. बर्फ आणि काच एकमेकांत मिसळून जातात आणि त्यामुळे बर्फाबरोबर काचेचा तुकडा जाऊन अनर्थ होऊ शकतो. ३. थंड ग्लासमध्ये गरम पेय किंवा गरम ग्लास मध्ये बर्फाचे तुकडे टाकू नका. ४. बर्‍याच प्रकारचे ग्लासेस अतिशय पातळ काच वापरून तयार केलेले असतात. त्यामुळे ते एकमेकांच्या फार जवळ ठेवू नका, आपटून ग्लासला तडा जाण्याची शक्यता असते. तसेच "चिअर्स" म्हणून ग्लास भिडवताना ते एकमेकांना जेमतेम टेकतील आणि छान मंजूळ नाद उत्पन्न होइल इतकेच जवळ न्या. उत्साहाच्या भरात जोरात आपटू नका. ५. ड्रिंक्स सर्व करताना ट्रे मध्ये दोन ग्लास मध्ये आपला हात सहज जाऊ शकेल एव्हढी जागा ठेवा. दाटीवाटीने जास्त ग्लासेस बसवण्याचा अट्टाहास करू नका. आणखी एक फेरी ही ग्लास फुटून होणार्‍या अपघातापेक्षा नक्कीच स्वस्त पडेल. ६. ग्लास सर्व करताना त्याच्या तळाशी धरा जेणे करून तुमच्या हातांचे डाग/ठसे त्यावर पडणार नाहीत. डिस्क्लेमरः १. सूरापानासाठी किमान २१ (की १८?) वर्षे वय असणे गरजेचे आहे अथवा हे कायदे प्रत्येक देश/राज्यावर अवलंबून आहेत. २. अल्कोहोलचे सेवन आपापल्या जबाबदारीवर करावे. (सर्व चित्रे आंतरजालावरून साभार) धन्यवाद... - नाटक्या

वाचन 14068 प्रतिक्रिया 0