गझल

(बार हो)

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जे न देखे रवी...
22 Mar 2018 - 10:23 am

प्रेरणा : यारहो ...

दादाश्रींची विनम्र माफी मागुन ..... अर्ज़ किया है ....

ह्या उन्हाचा जोर आहे वाढलेला यारहो
शोधुया नजदीक साधा एक बियर बार हो

ड्रॉट ज्या त्या ब्रॅन्ड्ची तिथलीच बॉटल चांगली
पण अता चालेल काही फक्त असु दे गार हो

मागवा चकली चना अन हाफ चीकन तंदुरी
कावळ्यांना भूक आहे लागलेली फार हो

ती म्हणाली सोड तू जमणार नाही आपले
दावले "जमवून" मग "ठरवून" वारंवार हो

एकदा केसांस वेडे मोकळे सोडून बघ
नेत्रसुख असती गडे हे झाकले उभार* हो

gajhalअनर्थशास्त्रअभय-गझलआता मला वाटते भितीकाहीच्या काही कवितागरम पाण्याचे कुंडजिलबीफ्री स्टाइलविराणीशृंगारस्वरकाफियाहझलशांतरसविडंबनगझल

यारहो ...

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
15 Mar 2018 - 9:35 am

दुष्मनांचा जोर आहे वाढलेला यारहो
जीव माझा आरशावर भाळलेला यारहो

बोर जिथल्या गावची तिथलीच बाभळ अंगणी
संग काट्यांचा मलाही भावलेला यारहो

पिंड कुठल्या वासनांचा राहिला मागे इथे?
कावळ्यांनी दंभ माझा टाळलेला यारहो

ती म्हणाली सोड तू जमणार नाही आपले
मी दुरावा मस्तकावर माळलेला यारहो

कोण तो वेडा भिकारी रोज हाका मारतो
प्राक्तनाने आरसा मज दावलेला यारहो

एकदा केसात वेडे वीज तू माळून बघ
बोल मग श्रृंगार मीही टाळलेला यारहो !

हंस कुठला? कोण कागा? वाद भलते वाढले
मी पुरावा सुज्ञतेचा जाळलेला यारहो

मराठी गझलगझल

आठवणींचा कप्पा म्हणजे...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
15 Mar 2018 - 3:35 am

पानगळीचा मौसम येतो,उगाच होते सळ-सळ नुसती...
आठवणींचा कप्पा म्हणजे,जुनी-जुनेरी अडगळ नुसती!

काळ गतीचा वेडा असतो,क्षणात घेतो वळणे नवखी...
वाट कुणाची पाहत नाही,जमात त्याची भटकळ नुसती!

ओळख झाली केंव्हा,कोठे?कधीतरी हे आठवताना...
एकांताचे पडते कोडे... समोर दिसते वर्दळ नुसती!

जेंव्हा जेंव्हा ती आठवते,उगाच स्मरते काही-बाही...
ओठावरती श्रावण फुलतो,उरात होते जळ-जळ नुसती!

मोहरलो होतो तेंव्हाचा..ऋतू मनाने जपला आहे...
घमघमते बघ अजून माझी,फुलावाचुनी ओंजळ नुसती!

—सत्यजित

मराठी गझलशांतरसकवितागझल

साधले तर वार कर ...

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
22 Feb 2018 - 11:27 am

कोण जाणे रोज ओझे जीव कसले वाहतो
बंद डोळ्यांनी सुखाचे भोग फसवे भोगतो

वाट चुकलेली कदाचित मागल्या वळणावरी
मी नवा उत्साह लेवुन गांव दुसरे शोधतो

अंबराची सांगता महती मला का सारखी
मी इथे मातीतुनी दररोज इमले बांधतो

सावजाला ठाव असते नाव व्याधाचे इथे
प्राण घेताना बळीचे आर्त डोळे टाळतो

साधले तर वार कर या काळजावरती सखे
अन्यथा मी पाठ फिरवुन नयन हलके झाकतो

© विशाल विजय कुलकर्णी

gazalगझल

लाज

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
15 Feb 2018 - 9:03 am

*******************

पोर वेडी पोट पकडुन झोपते
माय दिसता भूक विसरुन नाचते

देव सांगा राहतो कुठल्या घरी?
बंद दाराच्या गजातुन शोधते

एकदा भेटायचे बाबा तुला
पत्र कोरे रोज हटकुन टाकते

ग्राहकांची नेहमी गर्दी तिथे
पोर आहे..., माय विनवुन सांगते

भूक त्यां डोळ्यात आहे दाटली
वेळ थोडा पदर पसरुन मागते

भाकरीचा चंद्र द्या हो ईश्वरा
त्याचसाठी देह वाटुन टाकते

रोज आत्मा खर्चते माझाच मी
लाज माझी मीच उधळुन सोडते
*******************

© विशाल विजय कुलकर्णी

करुणगझल

जसे छाटले मी मला येत गेले,धुमारे पुन्हा!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
7 Feb 2018 - 2:33 am

जसे छाटले मी मला येत गेले,धुमारे पुन्हा
कळू लागले जीवनाचे फिरंगी,इशारे पुन्हा!

कुण्या डोंगरी एक पणती सुखाने,जळू लागली
तमाच्या तमेचे तिला येत गेले,पुकारे पुन्हा!

कळ्या वेचल्या काल माझ्या करांनी,गुन्हा जाहला
फुलू लागले श्वास-श्वासांत माझ्या,निखारे पुन्हा!

पुन्हा लेखणीला नवा बाज चढला,लिहू लागलो
तुला पाहिले अन् जुने स्वप्न झाले,कुंवारे पुन्हा!

तुझी लाट झालो तसे वाटले की विरावे अता
कुण्या वादळाने नको दाखवाया किनारे पुन्हा!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलशांतरसकवितागझल

नवखेच सखे फसतात इथे

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
23 Jan 2018 - 11:14 am

वृत्त - तोटक

अदमास पुन्हा चुकतात इथे
वनवास नवे मिळतात इथे

अवघे जगणे जगणे बनते
मिथके सगळी जुळतात इथे

रुसणे स्मरता हसणे स्फुरते
अलवार सुखे कळतात इथे

वळणे कळता सरती वलये
नवखेच सखे फसतात इथे

हलकेच पुन्हा जवळीक नवी
सुमने कवळी फुलतात इथे

विरहास नवे सहवास हवे
हळवे क्षण ते स्मरतात इथे

भुतकाळ जरा विसरू म्हणता
इतिहास नवे रचतात इथे

© विशाल वि. कुलकर्णी

माझी कविताकवितागझल

(तरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
18 Jan 2018 - 2:00 pm

(मौसम तरही का छाया है, तो गुस्ताखी माफ! पण तरहीच्या ओळीसाठी विशाल व क्रांतीताईंचे आभार,तसेच अगंतूकपणे तरही लिहिल्याबद्दल क्षमस्व!)

सूर्य मावळता कधीही व्हायचे नव्हते मला
या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला!

पावले वळली कितीदा त्याच त्या वळणावरी
ज्या जुन्या शहरात पुन्न्हा जायचे नव्हते मला!

आजही डोळ्यांत माझ्या धुंद ही आली कशी?
मी पुन्हा प्यालो..खरेतर, प्यायचे नव्हते मला!

वेळ नाही,काळ नाही,ना ऋतूंना लाजही
थेंब-थेंबाला विचारा,न्हायचे नव्हते मला!

भावनांना भाव नव्हता मैफलींमध्ध्ये तुझ्या
गात आलो गीत मी,जे गायचे नव्हते मला!

gajhalgazalमराठी गझलशांतरसकवितागझल

तरही गज़ल : या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
16 Jan 2018 - 4:05 pm

आज आमच्या एका व्हाट्सएप ग्रूपवर क्रांतिताईने (क्रांति साडेकर) दिलेल्या एका ओळीवर (तरही) लिहीलेली ही गज़ल !

ताईने दिलेली ओळ होती...

या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला

*********************

नाव कुठल्या ईश्वराचे घ्यायचे नव्हते मला
चाल तू रस्ता तुझा नियती पुन्हा म्हणते मला

तू नको सांगू गड्या वागायचे आता कसे
बुद्ध नसलो मी तरीही एवढे कळते मला

रोज मरणाची नव्याने कारणे मी शोधतो
चक्र जन्माचे निरंतर पाशवी छळते मला

थांबता चौकात गाडी पोर कोणाचे रडे
भूक त्या डोळ्यातली पाहून धडधडते मला

मराठी गझलगझल

अभिजात(चारोळी)

पराग देशमुख's picture
पराग देशमुख in जे न देखे रवी...
15 Jan 2018 - 8:14 pm

छंदात बांधण्याचे,
गेले सखे दिवस ते |
मज अभिजात जे उमजले,
ते मुक्त छंद होते....||

कविताचारोळ्याप्रेमकाव्यगझल