Skip to main content

वाघ-या

लेखक चांदणे संदीप यांनी शनिवार, 05/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
(ही पूर्णत: काल्पनिक कथा असून या कथेचा अन्यत्र कुठेही कसल्याही प्रकारचा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती) "कुठला र तू?" दरेकर साहेबाने जेवता जेवता पाण्याचा ग्लास तोंडापाशी धरला आणि इतका वेळ दाराबाहेर हात मागे बांधून उन्हात उभा असलेल्या ठाकराच्या पोराला विचारले. दुपार तीन-साडेतीनची वेळ होती. दरेकर साहेबांची ब-याच दिवसांनी या पांबरे-माड धरणक्षेत्राला व्हिजीट पडली होती. इकडे येताना मुख्य राज्य महामार्ग सोडल्यानंतर रस्त्याने त्यांना गाडीत एका जागी स्वस्थ बसू दिले नव्हते. त्यामुळे ते वैतागले होते त्यात या धरणावरच्या कर्मचा-यांनी दुपारच्या जेवणाच्या व्यवस्थेत उशीर केला होता. त्यांच्यासारख्या खमक्या सरकारी माणसाला असली कामातली दिरंगाई आजिबात रूचण्यासारखी नव्हती. आणि आता हे कोंबडीचे दोन घास चवीने खातोय न खातोय तोच हा ठाकराचा पोरगा कसलीशी परवानगी मागायला आला होता आणि वर म्हणजे त्या धरण कर्मचारी अतनुरेला बाहेर न जुमानता थेट त्यांच्याकडेच आला होता. "सायेब मी किशा ठाकर. ह्या माघाल्ल्या डोंग्रापलीकहाडल्या आंबवटपाड्याचा हाये. तेवढ जरा आज रातच्याला हिथ वाघ-या टाकायच्या व्हत्या." किशा अतिशय अजिजिने बोलला. "आर होय की, पण तुला दिसतय का काय करतोय मी?" आपल्या वैतागलेल्या आवाजात मचाक मचाक मिसळत दरेकर साहेबांनी प्रश्न केला. "व्हय जी, आतनुरे सायेब म्हन्ले, पन यीळ चाललाय. आताच वाघ-या टाकाय पायजे, नाह्यतर पुना काय दिसायच?" "बाहेर थांब, आलोच!" दरेकर साहेबांची अशी अपेक्षित आज्ञा मिळाल्यावर किशा गप बाहेरच्या मोकळ्या जागेतल्या एका खांद्याएवढ्या उंचीच्या, लहानशा पाण्याच्या टाकीजवळच्या नळापाशी येऊन दोन पायावर दातात गवताची काडी धरून बसला. शंकर आप्पा जो त्याच्या बरोबर होता तोही मागे हात बांधून शांत पावले टाकत त्याच्या मागे उभा राहिला. तिकडून लांबवरून धरणाच्या भरावावरून दादया अन परशा येताना दिसले. जरा बर वाटल त्याला. दरेकर साहेबांनी जणू कुणाला हाकच मारताहेत अशा ढंगात ढेकर दिला आणि दोघांचा नाष्टा झाला असता एवढ्या उष्ट्या राहिलेल्या ताटात हात धुवायला त्यांनी सुरवात केली. तोंडात पाणी घेऊन चूळ भरली आणि खिडकीतून बाहेर पिचकारी मारत असताना त्यांना भरावाच्या दुस-या लांबच्या टोकाला एक गाडी धुरळा उडवित धरणाकडेच येताना दिसली. कपाळावर आठ्या जमून आल्या आणि भुवया बारीक करून ते निरखून पाहू लागले. गाडी पांढ-या रंगाची फोर्ड होती. आता ती खिडकीच्या बाजूने दिसेनाशी होत दरवाज्यातून दिसू लागली. भरावाच्या कच्च्या रस्त्यावरून सावकाश चालत ती धरणाच्या मुख्य भिंतीच्या अलिकडे पाचेक फुटांवर थांबली. तिन तरूण त्या गाडीतून उतरले. तिघेही आजूबाजूला पाहत सावकाशपणे संरक्षक कठड्याजवळ गेले आणि धरण परिसर न्याहाळू लागले. दरेकर साहेबांच्या हालचाली जरा जलद होऊ लागल्या. पहिला प्रश्न त्यांना पडला की 'असे कसे कोणीही येऊन उभा राहतंय धरणावर?!' आणि दुसरा म्हणजे, 'हे लोक आपल्यामागे नेहमीच येत असावेत काय?' असे ते दोन प्रश्न घेऊन दरेकर साहेब दरवाज्याबाहेर असलेल्या पाय-या उतरू लागले. क्रमश:
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2726
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

In reply to by मांत्रिक

धन्यवाद. फासे लावायचेत व्हय. चांगलय चांगलय. चालू द्या.

धन्यवाद..... स्वॅप्स, ३ए, अभ्या, मांत्रीक! पुढील भाग घेतलाय लिहायला, लवकरच टाकीन. सर्वांचे पुन्हा एकदा आभार! Sandy