Skip to main content

पटेल, न पटेल

लेखक बहुगुणी
शनिवार, 29/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
व्हर्जिनियात राहणारे ग्लॅडिस आणि जिम त्यांच्या टेक्सासला राहणार्‍या मुलीला भेटायला दुपारी गाडीने निघाले होते. संध्याकाळ होता-होता वाटेत टेनेसी राज्यातल्या नॉक्सव्हिलपाशी पोहोचल्यावर त्यांनी रात्रीपुरतं एखाद्या मोटेल मध्ये रहायचं ठरवलं होतं. 40 West Expressway मधून exit घेउन ते बाहेर पडले. मोटेलची शोधाशोध करत असतांना एका रस्त्यावर 'Rama.. Inn' अशी नियॉन साईन दिसली. जवळ पोहोचल्यावर कळलं की पूर्वीच्या 'Ramada Inn' मधली दोन अक्षरं काढून टाकलेली होती, पण एकंदरीत इमारत आणि आसपासचा परिसर नीट-नेटका होता. ग्लॅडिसने गाडी पार्किंग लॉट मध्ये लावली आणि आपापली एक-एक बॅग घेऊन दोघे मोटेलच्या लॉबीकडे निघाले. लॉबीचं दार उघडताच समोर काऊंटर दिसला, पण तिथे कुणी नव्हतं. काही क्षणातच - बहुधा त्यांच्या दार उघडल्याची घंटा आत वाजली असल्याने असावं- काऊंटर मागचं दार उघडलं आणि एक अमेरिकन फॉर्मल वस्त्रांतली पण सावळी, चाळिशीच्या आत-बाहेरची अशी भारतीय गुजराती स्त्री आतून हसतमुखाने 'गुड इव्हिनिंग' म्हणत बाहेर आली. तिच्या मागचं दार हळू-हळू बंद होतं, पण ते पूर्ण बंद व्हायच्या आत आतला भारतीय मसालेदार स्वयंपाकाचा वास बाहेर आलाच! ग्लॅडिस आणि जिम दोघांनीही अनाहूतपणे दीर्घ श्वास घेतला, त्यांच्या चेहेर्‍याकडे पहात ती मोटेल फ्रंट डेस्क क्लर्क घाई-घाईने म्हणाली 'सॉरी अबाऊट द स्मेल!" "नाही, नाही, उलट मीच तुम्हाला विचारणार होते की वास छान येतोय, जेवण अजून चालू आहे की आम्हाला उशीर झालाय?" त्यांच्याकडे गोंधळून पहात ती डेस्क क्लर्क म्हणाली, "सॉरी, पण या मोटेलमध्ये रेस्टॉरंट नाहीये...मी स्वयंपाकात होते...आमचं किचन मागेच आहे." "ओह! सॉरी! पण आम्हाला डिनर घ्यायचं होतं, इथे कुठे जवळपास भारतीय रेस्टॉरंट मिळेल का?" "नाही, जवळ नाहीये, दहा-एक मैलांवर जावं लागेल, पण तुम्हाला इतर काही चालणार असेल तर पुढच्याच चौकात एक चागलं इटालियन रेस्टॉरंट आहे, मी हवं तर मॅप देऊ शकेन तुम्ही चेक-इन केलंत की." "चालेल," ग्लॅडिस थोडंसं अनिच्छेनेच म्हणाली, "आम्ही शॉवर घेऊन मग जाऊन येऊ." चेक-इन करून कार्ड कीज घेऊन दोघे आपल्या रूममध्ये पोहोचले. बॅगा अनपॅक करून जिमने दोघांचे दुसर्‍या दिवशीचे कपडे हॅंगरला लावून ठेवेपर्यंत ग्लॅडिस शॉवर घेऊन आली होती. तिच्यानंतर जिम शॉवर घेऊन आला आणि दोघे जेवायला जायला बाहेर निघणार इतक्यात दारावर कळेल-न-कळेल अशी हळूवार टकटक ऐकू आली. ग्लॅडिसने पुढे होऊन दार उघडलं. मघाची डेस्क क्लर्क बाहेर उभी होती, हातात एक ट्रे, आणि ट्रे वर दोन प्लास्टिक आवरणाने झाकलेल्या प्लेट्स. "आय होप यू डोंट माईंड, तुम्हाला चालणार असेल तर मी ही लँब करी केलीय ती आणलीय तुमच्यासाठी." भूक उसळलेली असतांना वाफाळत्या प्लेट्स मधून येणारा तो अफलातून सुगंध घेत जिम म्हणाला, "दॅट्स व्हेरी काईंड ऑफ यू! पण कशाला त्रास घेतलात?" "त्रास कसला?" प्लेट्स कॉफी टेबलवर ठेवत ती म्हणाली, "मी खात नाही नॉन-व्हेज, पण माझ्या नवर्‍याने आज बिझिनेस ट्रिपहून येतांना त्याच्या आवडीचा लॅंब कट आणला होता, म्हणून त्याच्यासाठी केलं होतं त्यातलंच थोडंसं तुम्हाला आणलंय, इतकंच. बरोबर नान ही आहे." "थोडंसं कुठलं? हे पुरून उरेल आम्हाला दोघांना! याचे पैसे दिले तर घ्याल का?' "मुळीच नाही, दिस इस ऑन द हाऊस! एंजॉय!" असं म्हणून ती दार ओढून घेऊन परत जायला निघाली. पण ग्लॅडिसने तिला थांबवलं, म्हणाली, "निदान बसा तर दोन मिनिटं. मला नेहेमीच कुतुहल वाटत आलंय मोटेल्स चालवणार्‍या भारतीयांचं, तुम्ही पटेल का?" ती हसत म्हणाली, "हो, कसं ओळखलं?" "नाही, अमेरिकेतल्या पन्नास टक्के मोटेल्स पटेल या एकाच आडनावाच्या भारतीयांच्या आहेत हे मी ऐकून आहे म्हणून खडा टाकला इतकंच. काय नाव तुमचं?" "मी आशा पटेल. आणि खरंय तुम्ही म्हणता ते. आमच्या स्वतःच्याच तीन मोटेल्स आहेत या एका शहरात." "आणि तुम्ही सगळी मंडळी भारतातल्या एकाच समाजातली आहात ना? कौतुक आहे किती चिकाटीने तुम्ही हा बिझिनेस वाढवता ते" जिम म्हणाला, "आम्हा सर्वसाधारण अमेरिकन लोकांना का जमत नाही हे?" आशा म्हणाली, "खरं सांगू का? फक्त भारतीय पटेलच नाही, तर चिनी लोकंही असेच कष्टाळू असतात. आमची दीर्घ काळ कष्ट करायची तयारी असते. आम्ही कुटुंबाची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारत नेतो, आमची मनोधारणा अशी असते की दहा डॉलरचे वीस, वीसाचे पन्नास असं करत हजार जमेपर्यंत धीर सोडायचा नाही, मग चिकाटीने त्याचे हजारो होतात यथावकाश!" "मग अमेरिकन का नाही करत असं?" "रागावणार नसाल तर खरं सांगू? मला वाटतं बहुसंख्य अमेरिकन लोकांना असं वाटतं की माझ्याकडे मिलियन डॉलर्स असतील तरच त्याचे बिलियन होणार, मिलियनच नाही तर कशाला प्रयत्न करायचे, आहे ते बरं आहे!" जिम आणि ग्लॅडिस दोघेही हसले, ग्लॅडिस म्हणाली, "खरंय, अमेरिकन लोकांना कॉलेज संपलं की एकदम जीएम चा सीईओ व्हायचं असतं!" आणखी काही मिनिटे भारतीय मसाले वगैरे विषयांवर बोलून झाल्यावर आशा खाली निघून गेली. जेवणं आवरून झाल्यावर थोडा वेळ लोकल टीव्ही चॅनेल्स वर हवामान वगैरे ऐकून झाल्यावर जिम म्हणाला, "नाहीतरी बाहेर जाण्यासाठी कपडे घातलेच होते, चल जरा शहरातून ड्राईव्ह घेऊन येऊयात आणि मग झोप काढू, सकाळी लवकर चेक आऊट करू या." दोघे रूम बंद करून एलिव्हेटरने खाली लॉबीत उतरले. बाहेर जातांना पाहिलं तर काऊंटर पुन्हा निर्मनुष्य. 'आता रात्री कुणी उशीरा येणारे प्रवासी नसतील' असा विचार करीत दोघे दाराकडे निघाले, इतक्यात दार उघडून आशा बाहेरून आत येतांना दिसली. डाव्या हातात गाडीची किल्ली आणि उजव्या हातात मॅक्डॉनल्डची कागदी बॅग. "अरेच्चा! इतकं उत्तम जेवण आम्हाला खायला घातलंत आणि तुम्हाला स्वतःसाठी बाहेरून आणावं लागलं? सो सॉरी!" "नाही, नाही," ती ओशाळून म्हणाली, " हे मॅकचिकन सँडविच आणि फ्रेंच फ्राईज आहेत, आम्ही भारतीय राहिलो आहोत, पण आमची मुलं अमेरिकन झालीयेत, त्यांना भारतीय खाणं आवडत नाही, म्हणून मग रोज...."
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7766
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

कथा पटली. अगदी मॅकडॉनल्ड नाही तरी रोज वेगळाल्या ठिकाणाहून पदार्थ मुलांसाठी आणणारी मराठी फॅमिली माहितीतली आहे म्हणून तेच डोळ्यासमोर आले. मुले तशीही पिझ्झा आणि पास्ता खायला सोकावतात. :)

सर्वप्रथम शीर्षक वाचून १९९४-९५ या काळात लोकप्रभेत वाचलेला 'पटेल न पटेल पण खंबीर न्यायाधीश' हा लेख आठवला. त्या काळात संजय दत्तला जामीन देण्यास पुन्हा पुन्हा नकार देणारे विशेष टाडा न्यायालयाचे न्यायाशीश पटेल यांच्यावर तो लेख आला होता. असो अमेरिकेत बरेचदा ज्या हॉटेलमध्ये थांबलोय (मॉटेल ६, सुपर ८, डेज इन) तिथे प्रत्यक्ष फ्रंटडेस्कवर मालक किंवा त्यांच्या कुटूंबातली भारतीय मंडळी भेटली आहेत. सकाळी नाश्त्यामध्ये डोनटवगैरेचा आग्रह होण्याचाही अनुभव आहे. कॅलिफोर्नियात एकदा तर एक पंचविशीचा पटेल भेटला होता. त्यांची एअरपोर्ट पिक अ‍ॅन्ड ड्रॉप सर्विस होती. दुसर्‍या दिवशी मला पहाटे पाच वाजता एअरपोर्ट ड्रॉप हवा आहे हे सांगून ठेवले होते. मला वाटलं की कुणी ड्रायव्हर असेल तर हाच तरुण मला हॉटेल व्हॅनने सोडायला आला होता. $५ शुल्क होते ते देखील त्याने माझ्याकडून घेतले नाही. मी सेंट लुईसला राहतोय हे सांगितल्यावर त्याने सांगितले की सेंट लुईस त्याची सासुरवाडी आहे अन तिथले एअरपोर्टजवळचे बेस्ट वेस्टर्न हॉटेल त्याच्याच सासर्‍यांचे आहे. माझ्या पंचविशीमध्ये मी साधा फ्रिज घ्यायलाही दर महिन्याला पैसे वेगळे टाकत असे ;-) .

आहे खरी विचार करायला लावणारी गोष्ट. पहिल्या पिढ्या नवीन ठिकाणी काही सिद्ध करायला जातात, त्यांची पुढची पिढी बहुदा तिथे जन्मल्या वाढल्यामुळे त्यांना काही सिद्ध करायचे नसते त्यामुळे बर्‍याच गोष्टी बदलत जातात शिवाय आजूबाजूचे लोक काय करतात त्याचाही परिणाम असतोच...परंतु हे बर्‍याच प्रमाणात अपरीहार्य आहे असे वाटते अन्यथा तुम्हाला जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागणार.

" बहुसंख्य अमेरिकन लोकांना असं वाटतं की माझ्याकडे मिलियन डॉलर्स असतील तरच त्याचे बिलियन होणार, मिलियनच नाही तर कशाला प्रयत्न करायचे, आहे ते बरं आहे!" ही फक्त अमेरिकनच नाही तर बहुतांश भारतीयांचीही मानसिकता असते म्हणूनच कदाचित आपण अपेक्षित प्रगती करू शकत नाही. " दहा डॉलरचे वीस, वीसाचे पन्नास असं करत हजार जमेपर्यंत धीर सोडायचा नाही, मग चिकाटीने त्याचे हजारो होतात यथावकाश." असा सगळ्यांनी विचार केला तर कोणीही सहज कोट्याधीश नाही तरी लक्षाधीश तर नक्कीच बनू शकतो. बाकी ते मॅकडोनाल्डस, पिझ्झा हट इ.मधील जंक फूड तर हल्लीचं स्टेपल डाएट आहे त्याबद्दल काय बोलणार, म्हणजे कधीतरी खाण्याबद्दल काही नाही पण रोज उठून बाहेरचे पदार्थ कोणीही आनंदाने कसे खाऊ शकतो याचे खूप आश्चर्य वाटते.

@बहुगुणः छान आहे लेख. पहिल्यांदा मला सायको चित्रपटासारखं काहितरी थरारक खून वगैरे असेल असं वाटलेलं होतं. पण असो. हलकाफुलका.

मस्त लेख. शिर्षक वाचुन सध्याच्या गुजरात घटनेबद्दल असेल असे वाटुन गेले.

मला वाटलं हार्दीकचं वार> इथे पण पोचलं कि काय. लेख आवडला.

In reply to by अर्धवटराव

आणि तंतोतंत. जरा भीत्भीतच धागा उघडला आणि अजिबात खंत वाटली नाही इतका सहज सुंदर लेख +मनोगत वाचायला मिळाले. नाखु

शेवट सध्याच्या गुजरातेत चाललेया प्रकरणावर येईल असं वाटलं होतं. पण हा शेवट देखील छानच! जे.पी.

अरेच्चा, सरप्राइजिंगली फ्रेश! आधी वाटलं त्या पटेल आंदोलनावर असेल म्हणून हा धागा ऑप्शनला टाकला होता. शेवटी सगळे धागे व नवीन प्रतिसाद वाचून संपवल्यावर काहीच उरले नाही म्हणून हा धागा उघडला आणि आधी का वाचला नाही म्हणून स्वतःवरच रागावलो. खरेच छान लिहिलेय. पैशाने पैसा जोडावा हे खरे. (कृपया पैसा व खरे यांच्यासाठी हे नाही.) :-)

मस्तच.
अमेरिकेतल्या पन्नास टक्के मोटेल्स पटेल या एकाच आडनावाच्या भारतीयांच्या आहेत हे मी ऐकून आहे म्हणून खडा टाकला इतकंच.
हा अनुभव मी एका रोड ट्रीपमध्ये सलग दोन दिवशी घेतला होता. पहिल्या दिवशी नॅशव्हिल, टेन्नेसी मध्ये तर दुसर्‍या दिवशी सेंट जोसेफ, मिसुरी येथे. सेंट जोसेफच्या मोटेलमध्ये तर काऊंटरच्या मागे "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" चे पोस्टर आणि अर्थातच कृष्णाचा फोटोही होता. अन्य एका रोड ट्रीप दरम्यान कॉलोरॅडो स्प्रिंग्ज मध्येही एका पटेलच्याच मोटेलमध्ये उतरलो होतो :)

मस्त कथा ! शीर्षकावरून ही हार्दीक पटेल संबंधीची किवा एखादी गुढभयकथा असावी असे वाटले होते :) ;) पटेल मंडळींनी आपल्या कष्टाळू आणि व्यापारी स्वभावाने युके आणि अमेरिकेत चांगलेच बस्तान बसविले आहे. सकाळी लवकर व्यवसायाला सुरुवात करणे; तो रात्री उशीरापर्यंत चालू ठेवणे; आठ तासांपेक्षा जास्त वेळ अंग मोडून व तेही हसतमुख राहून व्यवसाय करणे; आणि विषेशतः आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसात काम करणे या गोष्टी सर्वसामान्य अमेरिकन माणसाच्या पचनी पडत नाहीत. या उघड गुपीताचा या मंडळींनी पुरेपूर फायदा घेतला ! यांचे बरेचसे व्यवसाय (विषेशतः मोटेल्स, छोटी कझ्युमर मार्केट्स, इ) वरील कारणांनी स्पर्घेत मागे पडलेल्या अमेरिकन लोकांकडून विकत घेऊन वाढवलेले आहेत. यातले बरेचसे लोक युगांडातून स्थलांतरीत झालेले आहेत. इदी अमीनने राज्यक्रांती (१९७१) केल्यावर यातल्या बर्‍याच जणांना युगांडामधून पळून जाणे भाग पडले होते. बहुतेक जण सरळ तर बहुतेक युके मार्गे अमेरिकेत येऊन तेथे स्थाईक झाले. अमेरिकेच्या फेरीत एका नातेवाईकाचे कौटुंबिक मित्र पटेल असलेल्या परिवाराशी बर्‍याच गप्पा मारता आल्या. १९८९ मध्ये त्या विस्तारित ४३ जणांच्या कुटुंबाला युगांडाहून युके मार्गे तेथे पोहोचून १५ एक वर्षे झाली होती. तेवढ्या वेळात त्यांच्या उद्योगाचा पसारा आजूबाजूच्या परिसरातील दोनतीन फॅक्टर्‍या आणि तीनचार मोटेल्स इतका वाढवला होता. गृहिणींसकट कुटुंबाचे सगळे सभासद व्यवसायास जमेल तितका हातभार लावत असत. कर्मधर्म संयोगाने आम्हाला ज्या संध्याकाळि जेवायला आमंत्रण होते त्याच दिवशी त्यांच्या कुटुंबाचे शेवटचे आठ सभासद युकेहून अमेरिकेत कायम वास्तव्यासाठी दाखल झाले आणि त्यामुळे एक उत्सवच अनुभवायला मिळाला !

खूप मस्तं लेख. पटेल मंडळींचं खरोखर कौतुक वाटतं. तोंडावर साखर, डोक्यावर बर्फ आणि कामाला वाघ असतात ही लोक. अत्यंत मेहेनती. कुठल्याही कामाची लाज नाही. हॉटेल च्या लॉबी पासून हाउस्कीपिंग पर्यंत सगळं काम मालक, मालकीण आणि त्यांची मुले पाहतात. फक्त पीक सीज़न ला सीज़नल स्टाफ कामावर घेतात नाहीतर सगळी कामे स्वत:च.

लेख फार आवडला. अगत्य आणि खास पर्सनल टच हे भारतीय उपखंडातल्या मंडळींचं वैशिष्ट्य म्हणायला हवं. लेक जॉर्ज ला केलेल्या सहलीमध्ये एका मोटेल चा मालक पाकिस्तानी होता. त्याने पण अघळपघळ स्वागत, आम्हाला एक दिवस लवकर निघावं लागलं तर रीफंड दिलं काही खळखळ न करता, आम्ही चेक आऊट केल्यावर पण बराच वेळ हॉटेलात होतो कारण नवर्‍याला वाय फाय लागणार होतं काही कॉल्स करता. ही खुप मोठी गोष्ट नसेल त्याच्यासाठी पण आम्हाला आवडली.

अमेरिकन लोकांना कॉलेज संपलं की एकदम जीएम चा सीईओ व्हायचं असतं!" अमेरिकन च्या जागी मराठी शब्द सुद्धा चालून जाईल. हॉटेल व्यवस्थापन करतोय असे जेव्हा सांगायचो तेव्हा माझ्या काही हितचिंतकांनी आता काय वडा पाव ची गाडी टाकणार का असे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या विचारलेले स्मरते. यहुदी समाजाच्या कडव्या स्पर्धेला तोंड देत हिरा व्यापारात गुजराती समाजाने आपले स्थान बनवले जागतिक स्तरावर . हे अधिक कौतुकास्पद आहे .

मझ्या मते एकुनच गुजरथी समाज असाच कष्टाळु आहे. सदा हसतमुख, मदतीस हमेशा तयार आणि सर्वात महत्वाच म्हणजे विश्वासु लोक.

पण हुरहुर लावणारी कथा.

अमेरिका म्हणते नो पटेल, हे खरंय का? की उुगीच

In reply to by नमकिन

उुगीच
वा!! कसं जमलं हो हे असं लिहायला?

लेख म्हणून चांगला आहे. पण तुम्ही नाही पण इतर कोणी निष्कर्ष काढायला म्हणून गेले तर पटणार नाही. अर्थात त्यातील पटेल समाजाच्या कष्टाळू स्वभावाचा मुद्दा सोडल्यास तर. त्यासाठी अगदी सगळ्या बिंदूतून स्ट्रेटलाइन निघावी इतका डेटा आहे! :) अमेरीकेत मला वाटते अर्बन सेंटर्स मधे भारतीय अन्नपदार्थ सहज सर्वत्र मिळतात. म्हणजे नुसतीच उपहारगृहे नाहीत तर ग्रोसरी स्टोअर्समधे पण अनेकदा मिळते. ट्रेडर जोज् नावाच्या स्टोअरमधे अथवा होलफूड्स मधे तर भरपूर मिळते.. असो. याचा अर्थ मुलांना आणि मोठ्यांना देखील अ-भारतीय आवडत नाही अशातला भाग नाही. (उरलेला) पिझा ब्रेकफास्टला पण (हौसेने आणि चवीने) खाणारे माहीत आहेत. पण एका विशिष्ठ मर्यादेनंतर वरण-भातच हवा असेच अशांना देखील वाटते... त्या व्यतिरीक्त अमेरीकन्सना देखील भारतीय फूड मनापासून आवडते. त्यामुळे मुलांना पण आपण वेगळे वागतो असे वाटत नाही... (आमची कन्या, बाय हर चॉईस, शाळेत भारतीय अन्नपदार्थांचाच बर्‍याचदा डबा नेते... तिला तिथले कँटीनमधले आवडत देखील नाही. पण इतर मुलांना उस्तुकता असली तरी काही गैर वाटत नाही.) अर्थात हा देखील एक डेटा पॉइंट आहे. अपवाद नाही अथवा नियम देखील नाही....

In reply to by विकास

विकासजी एक उत्सुकता म्हणून विचारतो. हाॅलीवूड चित्रपटात अमेरिकन शाळकरी मुलांचं खूप क्रूर, वाईट चित्रण आढळतं. तसं खरेच आहे का?

In reply to by मांत्रिक

हाॅलीवूड चित्रपटात अमेरिकन शाळकरी मुलांचं खूप क्रूर, वाईट चित्रण आढळतं. तसं खरेच आहे का? तसे काही नसते हो साहेब! सगळीकडे माणसेच असतात. जसे भारतात स्थलानुरूप कल्चर बदलते तसेच काहीसे अमेरीकेत देखील होते असे म्हणेन... म्हणजे आमचा भाग (नॉर्थ ईस्ट) हा एकदम लिबरल आणि डाव्यांचा आहे (भारतीय स्टाईल डाव्यांचा नाही. हे "त्यातले" नाहीत! ;) ). तेच कॅलिफोर्निया वगैरे भागाच्या बाबतीत. मधल्या भागात आणि दक्षिणेत गेलात तर काही प्रदेश हा बायबल बेल्ट आहे. वगैरे.. तरी देखील यातील कुठल्याच भागात मुलांचे सरसकटीकरण करत चांगली अथवा वाईट म्हणता येणार नाही. तरी देखील किंचीत एक भाग म्हणजे ज्याला अमेरीकन अर्बन भाग समजला जातो तेथे शाळा आणि त्यातली मुले किंचीत अधिक चॅलेंजिंग असू शकतील असे वाटते.

आवडला...! असेच काही इन्ग्लिश पटेल आठवले.

लेख छान. बाकी हार्दिक पटेल म्हटलं की मोदींना त्याच्या 'नावा'ची आठवण येते म्हणतात. मोदी मस्ट वॉच हिज बॅक.

मस्त जमलाय लेख :) आवडेश! आणि मेन म्हणजे ह्यात हार्दिक न टाकल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन :)

पटेल मंडळींच्या बर्‍याच ठिकाणच्या हॉटेल-मॉटेल मध्ये राहिलो आहोत. बरेच ठीकाणी ऑफ- सिझन ला तर हॉटेल चे मालक्-मालकिण स्वतः जातिपूर्वक हॉटेलची साफसफाई करताना आढळलेले आहेत. ह्या लोकांचं कौतुक करायची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बर्‍याच आडवळणाच्या छोट्या शहरांमध्ये (छोट्यातल्या छोट्या पर्यटन ठिकाणी) पसरलेली हि मॉटेल्स आहेत. जिथे भारतीय दृष्टीने विशेष उद्योग-धंदे फोफावले नाहीत तेथेही ही मॉटेल्स आहेत. --मयुरा.

बर्‍याच लहाण गावांमध्ये देखिल यांचे मोटेल्स उत्तमरीत्या चालू असतात.