चुलीत निखारा जळत राहतो. जवारीच्या ताटाचं शेंडं जळावं तसं. उलथलेला तवा हसत राहतो. तो खूप मजेदार हसतो. घराच्या सांधीवाश्यात दडलेलं दारिद्र्य तो शोधून काढतो. हा अपशकून आहे.
बिऱ्हाडं येतात, जातात, जगतात, भुईला टेकतात. नव्या पायवाटांची गणितं मात्र मागे सोडतात. हे जंगल नाही. हे माजलेलं कुसळ आहे. हिरवा वारा इथेही वाहतो. वैशाखात इथं मृगजळांची भरमार असते. रौद्र भीषण उन्हाळ्यात जीव करपून जातो.
कुण्या डोंगराच्या गावात गेलेला नवरदेव, नवरी घेऊन परत आला. चार दिवस नवरी नांदली आणि यानं हाकलून लावली.
रत्नाबाईनं आयुष्यभर जीवाला जाच लावून घेतला. मग ती मरुन गेली बिचारी.
वावटळींसारख्या वावटळी उठतात.