पुष्पक यानात भानू आणि पार्वती

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
7 Apr 2009 - 1:13 pm

पुष्पक यानात भानू आणि पार्वती

पुष्पक यानात भानू आणि पार्वती. मूळ हिंदी लेखक: गोरा चक्रबर्ती, अनुवादकः नरेंद्र गोळे
पहिले सादरीकरणः श्री.अशोक चिटणीस व सौ.शुभा चिटणीस,
१४-१२-२००८ रोजी भवन्स सभागृह अंधेरी येथे.

सार्वजनिक सादरीकरणाच्या अनुमतीसाठी 'मिपाच्या पोस्ट हापिसाचा' उपयोग करून मला पत्र लिहा.

प्रस्तावनाः भानू आणि पार्वती पुष्पक यानात बसलेले आहेत.
गंतव्य स्थळः चंद्र. काही क्षणातच उपग्रह प्रक्षेपण वाहनातून, पुष्पकयान अवकाशात प्रक्षेपित होणार आहे.
थुंबा प्रक्षेपण केंद्रात उलटी मोजणी सुरू झालेली आहे.
दहा, नऊ, आठ, सात, सहा, पाच, चार, तीन, दोन, एक, शून्य ... (अग्निबाण प्रक्षेपणाचा आवाज).

भानू: पार्वती, पार्वती! बघ आपला प्रवास सुरू झाला. चंद्रावर पोहोचायला आता केवळ तीनच दिवस लागणार.
पार्वती: अहो भानू ऐकलत का ! माझे शरीर किनई फार जड झालेलं वाटतंय हो.
भानू: बरोबरच आहे. आता अग्निबाण प्रज्वलित करण्यासाठी त्वरण म्हणजेच एक्सेलेरेशन होत आहे.
त्याला साराभाई केंद्रातले वैज्ञानिक "जी" म्हणतात.
या "जी" चा भाव सध्या खूप वाढलेला आहे. काळजी करू नकोस, केवळ तीन-चार मिनिटांचाच वेळ लागणार आहे.
पार्वती: अहो! हे बघा नं मी हातसुद्धा हालवू शकत नाही आणि नाक सतत हुळहुळतंय. प्लीज! जरा खाजवून द्या ना!
भानू: ही काय कटकट लावली आहेस? आता मी पुष्पकयानाचे नियंत्रण करतो आहे. तुझे नाक कसे खाजवून देऊ?
पार्वती: अहो, अहो भानू, मला नुकताच एक धक्का जाणवला बघा.
भानू: नुकताच अग्निबाणाचा पहिला हिस्सा बंगालच्या उपसागरात पडला आहे. म्हणूनच धक्का जाणवला.
पाहा, पाहा, लंकाद्विप कसं भारताच्या तळाशी, एखाद्या कुंकवाच्या टिळ्यासारखं दिसत आहे.
पार्वती: अगदी बरोबर सांगितलंत. आपल्या दिवाणखान्यातल्या पृथ्वीच्या गोलात जसं दिसतं तसंच ते दिसत आहे.
तो पाहा भारत, बांगलादेश, ब्रह्मदेश, सुमात्रा, जावा, बोर्निओ ...
भानू छे! तो काही पृथ्वीचा गोल नाही. ती तर आमची धरती आहे, सुंदर पृथ्वी.
पार्वती: सुंदर पृथ्वी? अहो सुंदर कुठे आहे! झाडं, जंगलं काहीच तर दिसत नाही.
अगदी दगडासारखी दिसतेय ती, निरस आणि निर्जीव.
भानू: बरोबरच आहे तू म्हणते आहेस ते! राक्षसांनी सारी जंगलं साफ करून टाकलीत!
मी लहान असतांना एका पुस्तकात वाचलं होतं - सुजलाम् सुफलाम्!
म्हणून म्हटलं सुंदर पृथ्वी. बरे हं आता तू तयार राहा, आणखी एक धक्का बसणार आहे.
अंतिम अवस्थेत अग्निबाण पेटून आपलं पुष्पकयान कक्ष-पथावर म्हणजेच ऑर्बिटमध्ये प्रस्थापित होतांना आणखी एक धक्का बसणार आहे!.
पार्वती: कक्ष-पथावर? हे कुठल्या आड रस्त्यावर नेताय?
भानू: आड रस्ता नाही, कक्ष-पथ. येण्यापूर्वी किती वेळा तुला सांगितलं होतं की रतनचं विज्ञान पुस्तक जरा वाचून घे म्हणून.
कक्ष-पथ म्हणजे आपलं पुष्पकयान एक वर्तुळाकार मार्ग धरून पृथ्वीची प्रदक्षिणा करणार आहे. तोच मार्ग.
पार्वती: आपण तर चंद्रावर निघालो आहोत ना? मग आपण पृथ्वीची प्रदक्षिणा का म्हणून करायची?
भानू: अगं तोही चंद्रयात्रेचाच एक भाग आहे. वर्तुळाकार कक्षेत राहून थुंबामधील पृथ्वीवरील नियंत्रकाचा सल्ला घ्यावा लागतो.
पार्वती: ऐकलेत का! मला अगदी कापसासारखं हलकं हलकं वाटत आहे. पाहा नं, मी कशी शून्यातनं उडते आहे.
भानू: हाऽ हाऽ हाऽ पार्वती! आपण कक्ष-पथावर आलेलो आहोत. थोडं सांभाळूनच उड.
कुठलीही कळ, खटका दाबला जाता कामा नये. पुष्पकयानात अनेक यंत्रं आहेत.
पार्वती: ओह, मला किनई फार छान वाटतं आहे. बघा नं, पक्षासारखी उडू शकते आहे मी आश्चर्यच आहे!
भानू: त्यात आश्चर्य कसलं? आपल्यावरचं पृथ्वीचं आकर्षण बल आणि वर्तुळाकार कक्ष-पथातील गतीमुळे प्राप्त झालेले केंद्रत्यागी बल, तुल्यबल झालं आहे.
अग आपण वजनरहित झालेलो आहोत. (थोड्या वेळानंतर) पार्वती, वर काय पाहते आहेस?
पार्वती: अहो मी ना? काचेच्या खिडकीतून बाहेरचं दृश्य पाहते आहे. कळलं का, अतिशय मनोहर दृश्य.
चारी बाजूंना किती रत्न आणि माणकं दिसताहेत.
भानू: रत्न आणि माणकं नव्हेत. ही तर ग्रह आणि नक्षत्रं आहेत.
पार्वती: अहो भानू पाहा, हे मी काय बघते आहे?
भानू: लवकर सांग काय पाहते आहेस?
पार्वती: एका काचेच्या पेटीत एक कुत्रा झोपलेला आहे!
भानू: काय म्हणतेस?
पार्वती: हो नं. तेच तर म्हणतेय. ती पेटी हळूहळू खूप दूर जाते आहे.
भानू: पार्वती तुझं जीवन अगदी सार्थकी लागलं. तू पाहिलास तो काही कुत्रा नाही!
पार्वती: मग?
भानू: कुत्री आहे ती, कुत्री. आणि तिचं नाव आहे लायका. १९५७ मधे सोव्हिएत वैज्ञानिकांनी स्फुटनिक उपग्रहाद्वारे "लायका"ला अवकाशात पाठवलं होतं.
तिथे बिचारी "लायका", खायला अन्नच न उरल्यानं मृत्यू पावली होती. मृत "लायका" आजही पृथ्वीची परिक्रमा करतेच आहे.
थांब, माझ्या दैनंदिनीत मी लिहून ठेवतो की आज तू मृत "लायका"ला पाहिलंस म्हणून.
पार्वती: (काही वेळानंतर) अहो तुम्ही आता डोक्यावर आणि कानावर हे काय लावता आहात?
भानू: अगं हा हेडफोन. पृथ्वीवरील नियंत्रकाशी मला आता बोलणं करायला हवं. पाहते आहेस ना, नियंत्रण पटलावरचे दिवे लुकलुकत आहेत ते.
तू ग्रह-नक्षत्रं पाहत राहा, तोवर मी पृथ्वीवरील नियंत्रकाशी बोलतो. "हॅलो! हॅलो! पुष्पकयान नियंत्रक. ... हो.
उंची? बरोबर आहे. ... इंधनपातळी? ठीक आहे. ... आवाजपातळी जास्त आहे? हो. हो. पार्वती बोलते आहे आणि उंच उडते आहे. ...
नाही. नाही. कक्षात सारं काही ठीक आहे. ... पार्वती? पार्वती वरच्या खिडकीतून बाहेर पाहते आहे. बरं तर.
आम्ही आता जेवून झोपतो. ठीक. ठीक. संवाद समाप्त."
पार्वती: अगं बाई, माझे नाव घेऊन काय बोलताहात?
भानू: अग छताखालच्या खिडकीतून उडता उडता तू गाणं म्हणत होतीस, त्यामुळे पुष्पकयानातील आवाजपातळी,
१५ डी.बी. म्हणजेच १५ डेसिबेलहून जास्त झालेली होती.
पृथ्वीस्थित नियंत्रक त्याचे कारण विचारत होता. आणि आता त्या नियंत्रकानं जेवून, झोपायला सांगितलं आहे.
पार्वती: आता जेवायचे? मी तर उडत, उडतच खाणार हं.
भानू: ठीक आहे! मी कळ दाबतो आहे. जेवणाचं पाकीट येईल. मग झोपून, बसून किंवा उभं राहून, जसं वाटेल तसं खा.
मात्र खातांना आपलं तोंड प्लॅस्टिकच्या पिशवीत घालूनच खा. (काही वेळानंतर) हे काय? चाललीस कुठे?
पार्वती: टॉयलेटला जाऊन येतेय.
भानू: जे काही करायव्चे आहे ते प्लॅस्टिकच्या पिशवीतच कर.
पार्वती: शी! काय सांगता आहात? शी! शी! सारं काही प्लॅस्टिकच्या पिशवीतच? का?
भानू: अग नाही तर अन्न, मल, मूत्र सगळं काही, तू जशी उडत आहेस तसं पुष्पकयानाच्या कक्षात उडू लागेल.
त्या प्लॅस्टिकच्या पिशवीत "शोषणयंत्र" म्हणजेच "सकर" बसवलेला आहे. सारे काही शोषून ते यंत्र बाहेर टाकून देईल.
पार्वती: शी! शी! काय हो घाण घाण बोलताहात. मी टॉयलेटला जाऊन येते कशी.
भानू: (स्वगत) या स्त्रीया वाटेत फारच अडचणी निर्माण करतात. पण पार्वती तशी नाही. तर्क जरूर लढवते पण तिची समजूतही पटते.
चंद्रावर तीर्थाटन करण्यासच जातो आहे, म्हणून पार्वतीला सोबत घेतलं आहे.
चंद्रावरच्या मारिया समुद्रकिनार्‍यावरील एक दगड गृहदेवता शाळीग्रामाच्या शिळेजवळ स्थानापन्न करेन.
त्यामुळे वंशाची कीर्ती सदा टिकून राहील. म्हणूनच रिटायर झाल्यावर मिळालेल्या पैशातून चंद्रावर जायचं तिकीट काढलं आहे.
(पार्वतीला उद्देशून) काय गं, आटोपलं का तुझं?
पार्वती: आटोपलं. आटोपलं. जेवणाचं बाहेर काढलंत की नाही?
भानू: काढायचंय काय त्यात? कळ दाबताच ते बाहेर येईल. सांग काय खाणार? तीच कळ दाबतो.
पार्वती: हो ना! ठीक आहे! मग! मला नं मासे-भात हवाय.
भानू: हाऽ हाऽ पार्वती, काही दिवसांकरता असं खाणं विसर आता.
खायला सँडविच आहे, इडली आहे, दहीभात आहे, पेस्ट्री आणि उकडलेलं अंडं आहे, अगदी ब्रेड-बटरही आहे.
पार्वती: छे, हो! यातली एकही गोष्ट माझ्या आवडीची नाही.
भानू: मग काय तुझा उपास करायचा विचार आहे?
पार्वती: उपास? उपास का करू? बरं गोडाचे काय आहे?
भानू: म्हैसूरपाक, लाडू आणि रसगुल्ला.
पार्वती: वा! रसगुल्ला आहे? थुंबामधे आजकाल कलकत्त्याचा रसगुल्लाही उपलब्ध झाला आहे काय?
भानू: कलकत्त्याचा रसगुल्ला आता भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय झालेला आहे. पुष्पकयानात आल्यावर आता तर तो वैश्विक झाला आहे.
पार्वती: ठीक आहे. तर मग मी सँडविच आणि रसगुल्लाच खाते!
भानू: त्याकरता ५ आणि ७ क्रमांकांची कळ दाब. (थोड्या वेळानंतर) काय झालं? खाण्याचं पाकीट का आलं नाही?
पार्वती: पाकीट? नाही हो. तुम्ही योग्य कळच दाबत आहात ना?
(पुष्पकयान हलू लागते.)
अरे. अरे. हे काय होतं आहे? पुष्पकयान असं का थरथरत आहे?
भानू: अग पण माझा चष्मा कुठं आहे गं?
पार्वती: अहो किती वेळा सांगितले तुम्हाला की चष्मा सांभाळून ठेवा म्हणून. आता तर तो अंतरिक्षात उडूही शकेल.
मला मारे सांगता की सर्व काही प्लॅस्टिक पिशवीतच कर म्हणून. आणि स्वतः?
घरीही दिवसातून तीन-चारदा चष्मा हरवतोच. इथं तर तो अंतरिक्षात उडणारच.
भानू: अग शोध की जरा. चष्मा लावून पाहा की योग्य तीच कळ दाबली का.
पार्वती: अहो भानू, तो पाहा तुमचा चष्मा पुष्पकयानाच्या "बी" दिशेला उडतो आहे.
भानू: जा लवकर आणि त्या उडत्या चष्म्याला घेऊन ये. या अवस्थेत मी नियंत्रण सोडून हलू शकत नाही.
आधी कळ पाहून मग पृथ्वीवरील नियंत्रकाशी विचारविनिमय करेन.
पार्वती: सापडला हं! हा घ्या तुमचा चष्मा.
भानू: हं, दे. (इकडे तिकडे पाहून) मी चुकीचीच कळ दाबली असावी. आता उद्जन धक्का प्रज्वलित झाला.
पार्वती: होऊ दे हो.. मला आधी जेवायला द्या.
भानू: आता खाणं सोड. पुष्पकयान आता चंद्राकडे चालू लागलं आहे. या वेळी खाणं-पिणं सर्व बंद.
ठीकठाक झालं नाही तर चंद्रयात्रा अगस्त्य-यात्राही ठरू शकते.
पृथ्वीवरील नियंत्रकाशी बोलू दे.
पार्वती: मग, बिनचष्म्याने कळ का दाबलीत?
भानू: कळ दाबल्याची गोष्ट सोड, पृथ्वीवरील नियंत्रकच सापडत नाही आहे. सारे लोक झोपले की काय?
पार्वती: का उगाच रागावता? नाही तर एक दिवस आधीच आपण चंद्रावर पोहोचू.
भानू: एक दिवस आधी चंद्रावर नाही, स्वर्गातच पोहोचू. स्वर्गात! देव जाणे पुष्पकयान आता कोणत्या दिशेनं जात आहे?
पार्वती: स्वर्ग का? अरे देवा! तुमच्या सांगण्यापायी चंद्राकडे निघालो. आमच्या दैवातच अगस्त्य-यात्रा दिसते आहे! (रडायला सुरूवात करते.)
भानू: ओफ. रडतेस कशाला? स्त्रीयांची हीच तर कटकट असते. ह्या सुखात रडतील.
दुःखातही रडतील. आणि बिना कारणही रडतील. आता रडायला काय कारण झालेलं आहे?
पार्वती: अहो, तुम्हीच तर म्हणालात नं, की आता स्वर्गात जावं लागेल?
भानू: छे ग! ती तर नंतरची गोष्ट आहे. घाबरू नकोस. जर पृथ्वीवरील नियंत्रक सापडला नाही तर मी स्वतःच पुष्पकयान नियंत्रित करेन.
पार्वती: याचा अर्थ असा आहे की माझे प्राणही आता तुमच्या हाती आहेत? मात्र, तुम्ही खरंच पृथ्वीवर पोचू शकाल ना?
भानू: अग पोचू शकाल ना? म्हणजे काय? पाहात नाहीस का की पुष्पकयानाचं थरथरणं बंद झालेलं आहे.
पार्वती: ते तर पाहतेच आहे. पण आता पृथ्वीवर परतायला किती वेळ लागेल?
बघा की स्वर्गात जायची आपली पाळी आली तरी अजून मी नातवाचे उष्टावणही पाहिलं नाही.
भानू: काय बोलते आहेस तू? अगं नातवाचे उष्टावणच काय त्याचे लग्नही पाहू शकशील. आता आणखी त्रास देऊ नकोस.
आपण आता बाह्य अवकाशात म्हणजेच महाकाशात आहोत. आता जवळपास मंगळ ग्रहाचा कक्षा-पथ पार करत आहोत.
पार्वती: काय? काय सांगताय? मंगळ तर चंद्रापासून खूप दूर आहे.
भानू: (स्वगत) हे परमेश्वरा! पार्वती थोडं विज्ञानही जाणते. पार्वतीला माहीत आहे की मंगळ चंद्रापासून दूर आहे.
पार्वती: काय बडबडतांय?
भानू: नाही नाही! काही नाही! मी म्हणतो आहे की यानंतर गुरू येणार.
काही दिवसांपूर्वी शूमेकर-लेव्ही धूमकेतूनी गुरूला धडक देऊन अस्ताव्यस्त करून टाकलं होतं.
मुंबईचं आकाश तेव्हा ढगाळलेलं होतं. म्हणून मी ते दृश्य पाहू शकलेलो नव्हतो. आता मी गुरूची अवस्थाही पाहून घेईन.
पार्वती: गुरूवर काय घडलं हे पाहून आम्हा पृथ्वीवासियांना त्याचा काय उपयोग होणार. तुम्ही आता लवकर पृथ्वीवर चला.
भानू: छे! माझी पण इच्छा नाही आहे, मात्र जर रस्त्यातच दिसणार असेल तर पाहण्यास काय हरकत आहे?
पार्वती: खरं सांगा हं, तुम्ही मला कुठे नेत आहात?
भानू: पार्वती, गप्प बस गं. आता आपण मंगळ आणि गुरू यांच्यामधे आहोत. इथं खूप एस्टेरॉईडस फिरत असतात.
त्यांपासून सांभाळून चालावं लागेल. नाहीतर टक्कर होणार.
पार्वती: टक्कर? कोणाशी? रेल्वेमधे टक्कर होते असे ऐकलेलं आहे. इथंही टक्कर होणार का? आणि एस्टेरॉईड म्हणजे काय? काय एखादी गाडी असते?
भानू: छे! तुला काही माहीत नाही आहे. एस्टेरॉईड म्हणजे लघुग्रह. अगं बघ बघ! पुष्पकयानासमोर आता सर्वात मोठा लघुग्रह "सेरेस" दिसतो आहे.
याच्यापासून तर वाचलो बुवा. आता थोडा वेळ तू गप्प बस.
पार्वती: तुम्ही अजूनही मला सांगितलेच नाहीत की मला तुम्ही कुठे घेऊन जात आहात?
भानू: पार्वती, बाहेर पाहा. आता आपण गुरूजवळ आहोत. अहाहा! शूमेकर-लेव्ही धूमकेतूनं गुरूचे काय हाल केले आहेत.
आणखी थोडं दूर काय दिसते आहे बरं?
पार्वती: दूरवर नं, एक मणी दिसतो आहे मणी. ज्याच्याभोवती कडं आहे.
भानू: अगं ते कडं नाही, ते शनीभोवतीचं वलय आहे. किती वेळा सांगितलं की रतनच्या शाळेचं विज्ञान पुस्तक जरा वाच म्हणून.
पार्वती: अहो सोडा तुमचे ते विज्ञान पुस्तक! ते कडं किती किती सुंदर दिसतं आहे. मुंबईला गेल्यावर मला शनीच्या त्या वलयासारख्या बांगड्या घेऊन द्या.
भानू: पुन्हा तेच तेच. तू आता आपल्या वयाचाही विचार करत जा जरा. आता असल्या बांगड्या तुझ्या सुनेनी घालायच्या. तू नाही.
पार्वती: ठीक आहे. सून घालेल. मात्र, आता लवकर परत चला.
भानू: नाही! शनीवर काही केल्याविना आता परतायचं नाही. ज्योतिषीमहाराजांनी मला सांगितलं होतं की माझ्या पत्रिकेत आठव्या घरात शनी आहे.
अर्थात्, माझी सध्या शनीदशा चाललेली आहे. यामुळेच माझ्या टिस्को शेअरचा भाव तळाशी गेला.
पार्वती: टिस्को शेअर्स तर अनेकांजवळ आहेत. त्या सगळ्यांची काय शनीदशा चालू आहे?
भानू: असं वाटतं आहे की टिस्को कंपनीचीच शनीदशा सुरू असावी.
पार्वती: पण तुम्ही शनीजवळ जाऊन काय करणार आहात?
भानू: काय करेन विचारतेस? शनीजवळ जाऊन पुष्पकयानाच्या एन्टेनानं शनीला एक धक्का देऊन बाजूला हटवेन.
बस्स! आपलीही शनीदशा समाप्त. मग शेअर्स विकून करोडपती बनू.
पार्वती : अहो मग त्यावेळी तरी तुम्ही असल्या बांगड्या घेऊन द्याल ना!
भानू: पुन्हा सुरू केलंस. ठीक आहे. घेऊन देईन. आता तरी गप्प बस.
पार्वती: काय झालं? दिवा का मालवलात?
भानू: पार्वती! आणीबाणीची वेळ आली आहे. पुष्पकयानाची वीज गेली आहे. मला काही करता येत नाही.
आता बहुतेक स्वर्गवासीच व्हावं लागणार. (मोठ्याने) पार्वती! पार्वती!!
पार्वती: भानू? काय झाले? तुम्ही स्वप्नात तर नाही आहात ना? या वयात माझं नाव घेऊन एवढ्या मोठ्याने काय ओरडता आहात?
बाजूच्याच खोलीत आपला मुलगा-सून झोपलेले आहेत. त्याची तरी भीड बाळगा जरा! कसलं स्वप्न पाहत होतात?
भानू: (जागा होऊन) अरे बाप रे. स्वप्न ना, खूपच वाईट स्वप्न होतं ते.
पार्वती: अहो शुभ शुभ बोलावे हो! सकाळी सकाळी असं वाईट-साईट बोलू नये हो.
भानू: अगं रिटायरमेंटच्या पैशातून टिस्कोचे शेअर्स खरेदी केले होते ना, असं वाटतं की ते बुडणार.
पार्वती: म्हटलं ना एकदा! सकाळी सकाळी असे अभद्र बोलू नये हो. तरीही सांगते, बुडू देत ते शेअर्स. मला त्या पैशांशी आता काही देणे-घेणे नाही.
आपला मुलगा आणि सून दोघेही छान कमावत आहेत. मुलगा, सून, नातवाबरोबर आपलं सुखात सगळे होईल.
ऐकलंत का, मंदिरात भजन सुरू झालेलं दिसतं आहे. मी मंदिरात जाते आहे. तुम्हीही चला. (निघून जाते)

(भजनाचा आवाज हळूहळू वाढू लागतो)

प्रवासराहणीविज्ञानप्रतिभाभाषांतरविरंगुळा