माझ्या पुण्याचा माझा गणेशोत्सव

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
5 Sep 2025 - 1:15 pm

सात- आठ वर्षांपूर्वीची गोष्ट. गणपतीचे दिवस होते. एरवी पुण्यात असताना कधी घरी गणपती बसवले नाहीत; पण दिल्लीत पांडे, गुप्ता, अरोडा, ब्रार, यादव, खान, मोइत्रा, रेड्डी, अय्यर अशा शेजार्‍यांच्या आग्रहामुळे दाही दिवस रोज घरी गणपतीची तबला - पेटी - ढोलकच्या साथीत जोरदार आरती व्ह्यायची. रोज एका घरातून बाप्पांसाठी प्रसाद यायचा. आमच्या घरी गेल्या दोन पिढ्यांत बनले नसतील इतके उकडीचे मोदक त्या एका आठवड्यात बनवले गेले होते. एकंदर धमाल होती. पण पुण्यातला गणेशोत्सव अर्थातच मिस करत होतो.

असाच एक दिवस लवकर निघायच्या तयारीत असतानाच ऑफिसच्या डेस्कवरचा फोन वाजला. Long ring म्हणजे बाहेरचा फोन. मला डेस्कवर कोण फोन करणार?

"सरजी - दलबीर बोल रहा हूं."

"जी दलबीर, बोलिये." मला लिंक लागत नव्हती.

"अर्रे सर, भूल गये?? दलबीरसिंग भट्टी!!"

"अब्बे सरदार??? छह महीनेबाद फोन कर रहे हो और वो भी ऑफिसमें. कैसे हो??"

"एकदम चंगा सर... आपका मोबाईल नंबर नहीं था तो ऑफिसमें फोन घुमाया. सर - आपके पुणेमें हूं...ये दगडूशेठ हलवाईके गणेशजी के सामने. This is magical sir.... this is divine. ये माहौल छोडके आप दिल्लीमें क्या कर रहे हो सर?"

दलबीर - माझ्या टीममधला धिप्पाड आणि सदा-हसतमुख सरदार. पण This is magical म्हणताना त्याचाही आवाज कातर झाला होता.

"दलबीरे - अबे तू तो senti हो गया."

"सर - ये देखके तो नास्तिक भी senti हो जाए. मैं तो भगवानको मानता हूं."

दलबीर senti झाला होताच. पण त्याच्या दोन शब्दांनी मलाही senti केलं. "आपका पुणे". हो यार! "माझं पुणे". वाटलं त्याला सांगावं - सरदार.... काय योग्य वेळी गेला आहेस रे "माझ्या पुण्यात". आहेस तिथून थोडा मागे चालत जा - आधी आमच्या ग्रामदैवत कसबा गणपतीच्या पायी डोकं ठेव आणि मग आमची ग्रामदेवता आई तांबडी जोगेश्वरीचं दर्शन घे. अजूनही पुणेकराच्या घरात कार्य निघतं तेव्हा पहिली निमंत्रणपत्रिका कसब्याच्या गणपतीला जाते आणि दुसरी तांबड्या जोगेश्वरीला.

पलिकडेच भाऊसाहेब जावळे रंगारींचा राक्षसवध करणारा गणेश बघ. त्वष्टा कासारचं दर्शन घेऊन मग दलबीरे - तू गुरुजी तालमीचा मूषकावर स्वार गणपती आणि तुळशीबागेची भव्य गणेशमूर्ती बघ. "डॅडी" इमामभाई खान यांचा जगोबादादा तालीम गणपती बघून मंडईच्या शारदा - गजाननाचे आशीर्वाद घे आणि तिथेच बाबू गेनू मंडळाची मूर्ती बघून, जिलब्या मारुती मंडळाच्या अनुपम सात्विक गणेशमूर्तीसमोर नतमस्तक हो. तिथून काही अंतरावरच्या केसरीवाड्यात लोकमान्यांच्या गणेशाचं दर्शन घे. तुला दिसेल खरं पुणं.

हाच प्रसंग आठवला आणि लहानपणापासून पहिलेला पुण्याचा गणेशोत्सव डोळ्यांसमोर तरळून गेला. माझा जन्म पुण्याचा आणि शिक्षणही. त्या अर्थी माझं "गाव" पुणेच. तेव्हाही ते शहर म्हणवलं जायचं, पण माहौल सगळा गावाचाच. गोष्टी बदलल्या आहेतच - आणि बदलणारच हो. कुठली गोष्ट पूर्वीसारखी राहिली आहे? 'आमच्यावेळी असं नव्हतं' चे उसासे टाकण्यात काय हशील? पण जे काही चांगलं, उत्तम टिकलं आहे, नवीन निर्माण झालं आहे, त्याचा आनंद घ्यायला तर हवा ना?

यंदा कित्येक वर्षांनी चतुर्थीच्या निमित्ताने "गावात" चक्कर मारली आणि माझ्या "गावाने" टिकवलेलं "गावपण" डोळे भरून बघितलं. हा - आधीच्या गावात शंभर - शंभर ढोल ताश्यांची पथकं नव्हती, "कॉनफेटी" नव्हती, अन मिनरल वॉटरच्या बाटल्याही नव्हत्या - पण मी बघितलं की आजही जोगेश्वरी आणि तुळशीबागेचे गणपती मिरवणुकीत समोरासमोर आल्यावर लोकं भरतभेट बघितल्यासारखी भारावून ते दृश्य पाहत होती. एकाच देवतेची ही दोन रूपं आहेत ह्याचाही विसर पडल्यासारखी. मी पाहिलं लोकांना तांबडी जोगेश्वरी आणि केसरीवाड्याच्या मूर्तींना पाणावलेल्या डोळ्यांनी नमस्कार करताना. मी "शिवगर्जना"च्या एका मुलाला "श्रीराम" च्या एका ढोल घेऊन जाणार्‍याला "लिफ्ट" देतानाही पाहिलं आणि टळटळीत उन्हात "श्रीं" ची पालखी मनोभावे वाहणारे अनवाणी कार्यकर्ते देखील पाहिले. वाटलं, काही गोष्टी पुण्यात कधीच बदलणार नाहीत. बदलू नयेत.

मंडईच्या मागचा आमचा "अकरा मारुती कोपरा". आमची रोषणाई आणि मग भव्य देखावे. शेखचंद नाईक तालीम, शाहू चौक, लाकडी गणपती ह्या रोजच्या बघण्यातल्या मूर्ती. सेवा मित्र मंडळाचे सामाजिक उपक्रम. पंचमुखी मारुती. लक्ष्मी हनुमान पंच मंडळाची दर वर्षी वेगळ्या साहित्याने बनवलेली कल्पक गणेशमूर्ती. चिंचेच्या तालमीवरून काळा हौद, बदामी हौद, जुन्या जाईचा गणपती करत सरळ यावं नातूबागेच्या गणपतीच्या पुढ्यात. तिथे अर्धा-एक तास उभं राहून "होठोंपे ऐसी बात" आणि चौघड्याच्या तालावर थिरकणारी रोषणाई नाही बघितली तर मोक्ष मिळायचा नाही. मग चिमण्या गणपती, निंबाळकर तालीम, राजाराम मंडळ, नवजीवन मंडळ यांची आरास बघत. नागनाथ पाराची रिद्धी - सिद्धी गणेशाची सुबक मूर्ती बघून शनिपाराला असणारा जिवंत देखावा बघावा. नगरकर आणि लोखंडे तालीम बघून, नातूवाडा आणि मेहुणपुर्‍याचे माहितीपूर्ण देखावे अगदी रांग लावून देखील बघायला हवे असे. टिळक रोडवरून फिरताना खडकमाळ आळी, हिराबाग, ग्राहक पेठ, खजिना विहीर, हत्ती गणपती हे चुकवून चालणारच नाहीत.

गणेशोत्सवाचे दहा दिवस गाव घरात लग्नकार्य असावं तसं सजलेलं असतं. अजूनही व्याख्यानं, समाजप्रबोधनाचे उपक्रम राबवले जातात आणि कित्येक दर्जेदार संगीत मैफिलींची तर मेजवानी असते. आणि चतुर्दशीला तर विचारायची सोय नाही! आमचे महापौर मानाच्या गणपतींची पूजा करतात. पूर्वी सुमित्रा आणि नंतर अनारकली ह्या हत्तीणी गजाननाला हार वाहायच्या. पहिल्या बैलगाडीत चौघडा आणि गायकवाड, दैठणकर किंवा खळदकरांची सनई. त्यांच्यामागे फर-कॅपमधल्या भारदस्त व्यक्तिमत्वाच्या क्लॅरोनेटवादक बंडोपंत सोलापूरकरांच्या मागे त्यांच्या "प्रभात ब्रास बॅन्ड" चा ताफा. दर वर्षीची उत्सुकता ही की ह्यावर्षी कुठल्या गणपतीला कोणाचं "पथक"?

ढोल ताशा पथकं म्हणजे आमच्या गावच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग. ज्ञानप्रबोधिनीच्या आप्पा पेंडश्यांनी आम्हाला दिलेला वारसा. आजच्या ढोल-ताशा पथकांच्या गर्दीतही शाळांच्या पथकांची शिस्त आणि शान और असते. ज्ञानप्रबोधिनीच्या बर्ची पथकाचं सादरीकरण चुकवून चालणारच नाही. पांढरी गांधी टोपी आणि गुलाबी झब्ब्यातली अतिशय शिस्तबद्ध मुलं. आकाशी कुर्त्यातल्या मुली. भगव्या गांधी टोपीतले विमलाबाई गरवारे प्रशालेचे, तांबडं उपरणं घेतलेले रमणबागेचे, नू.म.वि, कामायनी विद्यामंदीर, स्व-रूपवर्धिनी वगैरे वेगवेगळ्या शाळांचे आजी-माजी विद्यार्थी त्यांच्या पेहरावावरून ओळखू येतात. बाकी नव्याने तयार झालेली आवर्तन, शिवगर्जना, नादब्रह्म, कलावंत, रुद्र वगैरे पथकं असतातच.

ह्यांच्याबरोबरच आमच्या गावच्या उत्सवाला पूर्णत्व देणारी केसनंद, राहाटणी, चर्‍होली, घोटावडे, कोंढवे, मुळशी, पौड, काले मावळ, पिरंगुट, डोणे मावळ अशा आसपासच्या गावांची झांज किंवा लेझीम पथकं येतात ती आपली वेगळी ऊर्जा घेऊन. शहरांत नोकर्‍या करून, गावी शेती किंवा दुधाचा व्यवसाय करून गणेशोत्सवाच्या सुपार्‍या मिळवून, गावच्या शाळेसाठी, मंदिराच्या कामासाठी निधी गोळा करणारी 'आमची लोकं'. त्यांच्या गावचं विसर्जन एक दिवस आधी करून पुण्यात येणारी. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्या पुण्याचा गणेशोत्सव.
उद्या पुन्हा विसर्जन मिरवणुकीच्या उत्साहाला उधाण येईल. प्रभात, सुप्रभात, मयूर, गंधर्व, दरबार हे ब्रास बॅन्ड सुरेल धुन वाजवतील, केंदुर्कर, जाधव, गावड्यांसारख्या कसलेल्या कारागिरांनी ढोल-ताशांचा दणदणाट होईल, जरीपटका दिमाखात नाचवला जाईल, तरुणाई बेधुंद होऊन जल्लोष करेल. रोषणाईचा झगमगाट असेल, भव्यदिव्य देखावे असतील आणि डोळे दिपवणारी दिमाखदार विसर्जन मिरवणूक असेल. आख्खं गाव सहभागी होईल.

पावणेचारशे - चारशे वर्षांपूर्वी एका द्रष्ट्या, धाडसी माऊलीनं तिच्या महापराक्रमी पुत्राला हाताशी धरून सोन्याच्या नांगराने हे गाव वसवलं. देशाला फार फार मोठी लोकं दिली ह्या गावानं. जोतिबा आणि सावित्री ह्या गावचे. टिळक, सेनापती बापट, केशवराव जेधे, अण्णासाहेब शिंदे, आनंदीबाई जोशींचं हे गाव. कलाकारांसाठी हे गाव भीमसेन जोशी, भातखंडे गुरुजी, शांता शेळके, डॉ. लागू, निळू फुलेंचं तर शिक्षणक्षेत्रातल्या लोकांसाठी शां.ब. मुजुमदार, पतंगराव कदम, विश्वनाथ कराड, रघुनाथ माशेलकर, जयंत नारळीकर ह्यांच्यासारख्या मातब्बरांचं. उद्योगक्षेत्रातल्या बजाज, किर्लोस्करांच, बाबा कल्याणींच, अनू आगा, दाजीकाका गाडगीळ, सायरस पूनावाला, काका हलवाई आणि अर्थातच चितळ्यांचं. डॉ. ग्रांट, संचेती, बानू कोयाजी, ह.वि.सरदेसाईंसारख्या दिग्गज डॉक्टर्सचं. बाबा आढाव, मोहन धारिया, भाई वैद्य, प्रतापराव गोडसेंचं. योगाचार्य अय्यंगारांचं, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर्‍यांचं.

ही सारी मंडळांची, संस्थांची आणि गावकर्‍यांची नावं घेण्यामागचा अट्टाहास ह्यासाठी की ह्या नावांनी पुणेकरांना भरभरून अभिमान दिला आहे पण त्याच बरोबर एक जबाबदारी देखील. ह्या यादीत ह्यापुढे येणारी नावं आपल्यातूनच येणार आहेत आणि ती नावं ह्या नावांच्या तोलामोलाची असायला हवीत. नुसतं आपला "इतिहास", आपला "वारसा", आपली "परंपरा" ह्यांच्या आठवणींमध्ये रमून चालणार नाही. ही मशाल हाती घ्यायची तर आपली मनगटंही त्या ताकदीची हवीत. नुसतं गणपतीसमोर ढोल-ताशा वाजवून, डीजेच्या भिंतींसमोर बेधुंद नाचून भागणार नाही. काय काय करावं लागेल ते प्रत्येकाला आतून माहिती आहेच. लाखोंच्या लोकसंख्येचं पुणे इतरांसाठी असेल "सेमी-मेट्रो" पण आमच्यासाठी ते गावच. त्या गावाचं गावपण जपायचं तर आपली वीण घट्ट करायला हवी. कशी ती ज्यानं-त्यानं ठरवायचं!

शेवटी अस्सल पुणेकराला ते सांगायची गरजच काय?

© जे.पी.मॉर्गन

संस्कृतीधर्मसमाजप्रकटनविचारसद्भावनाआस्वाद

प्रतिक्रिया

श्वेता व्यास's picture

5 Sep 2025 - 4:17 pm | श्वेता व्यास

हा लेख वाचून "माझं पुणं" या अभिमानाने पुन्हा एकदा ऊर भरून आला,
जरी आता पूर्वीचं पुणं राहिलं नसलं तरी :)
शेवटचा परिच्छेद खास !

सुक्या's picture

5 Sep 2025 - 9:34 pm | सुक्या

"माझं पुणं" म्हणन्याईतपत पुण्यात निगुतीनं रहायला कधी मिळालेच नाही. पण पुण्याचा गणेशोत्सव मात्र अक्षरशः जगलो आहे.
या लेखाच्या निमित्ताने पुन्हा जाउन आलो.

रामचंद्र's picture

6 Sep 2025 - 12:36 am | रामचंद्र

सुमित्रा आणि अनारकली! एक पेशवे पार्कात तर दुसरी आगीच्या बंबाशेजारी... जुने दिवस आठवले.

कर्नलतपस्वी's picture

6 Sep 2025 - 1:38 pm | कर्नलतपस्वी

मस्त, सर्वच मनसोक्त उपभोगल्याने हल्ली कुठेच जात नाही. अर्थात जायची इच्छा असते पण एकतर कसबा पुनवडी पासून दूर हाडंपसरली आहेत. दुसरे ध्वनिप्रदूषण सहन होत नाही.

बरेच वेळा महाराष्ट्राबाहेर गणपती उत्सव साजरा केल्याने त्या आठवणी वेगळ्या आहेत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Sep 2025 - 6:37 pm | राजेंद्र मेहेंदळे

पण आत्ता अनंतचतुर्दशीच्या दिवशी एका कानाने काटा लगा आणि दुसर्‍या कानाने पैलवान आला गं पैलवान आला ऐकत आहे. तिसर्‍या कोणाच्या डीजेमुळे काचा हादरत आहेत आणि गाडी तर बिल्डिंगच्या बाहेर काढायची सोयच नाही. गाडी म्हणजे दुचाकी बरं का!! आणि गावात तर.........
कॉलिंग अस्सल नदी अलीकडचे पुणेकर

प्रतीक्षा करा. रात्री बारा ते सहा तरी त्यापासून मुक्ती मिळेल. ही बाप्पाची कृपाच समजा.

चौथा कोनाडा's picture

7 Sep 2025 - 2:36 pm | चौथा कोनाडा

व्वा .... सुंदर लिहिलंय ... लेखन वाचताना कातर व्ह्यायला झालं !

मी पुण्याचा नाही.. पण ४० वर्षांपुर्वी उपनगरात रहायला आलो .. अन पुणे संस्कृतीने आपलंस केलं ! हा प्रवास मी ही पाहिला , अनुभवला आहे.
शेवटी जुनं ते सोंनं हेच खरं ! नव्यातील उपद्रवी गोष्टी दॄष्टीआड करायच्या अन नव्या आप्ल्याश्या .. हाच उपाय !

प्रचेतस's picture

7 Sep 2025 - 4:16 pm | प्रचेतस

अप्रतिम.

अभ्या..'s picture

7 Sep 2025 - 5:14 pm | अभ्या..

सुंदर लिखाण पण....
उबग आलाय ह्या उत्सवाचा.
तुमच्या म्हणण्याप्रमाणे अस्सल पुणेकराला काही सांगायची गरज नसते तशी काही ऐकून घेण्याचीही नसावीच.
मूळ उद्देश वगैरे तर सोडून द्या, फक्त झुंडशाही, राजकारणी शक्तीप्रदर्शने, पैश्याचा प्रचंड चुराडा आणि सक्तीचे ध्वनीप्रदूषण, बाहतुकीचा बोजवारा, मोठमोठ्या विभूतींची नावे जोडत घेतेलेले व्हॅलिडेशन, नाही तसल्या प्रथा आणि कृतींना संस्कृतीचे आणि परंपरांचे गोंडस लेबल आणि तेच खरे असे सांगत सर्वत्र होत असणारा त्याचा मूर्ख प्रसार हे पाहता अशा उत्सवावर सुंदर शब्दात लिहिलेल्या निबंधाची कीव करावी की संताप तेच कळत नाही.

रामचंद्र's picture

9 Sep 2025 - 12:02 am | रामचंद्र

<फक्त झुंडशाही, राजकारणी शक्तीप्रदर्शने, पैश्याचा प्रचंड चुराडा आणि सक्तीचे ध्वनीप्रदूषण, बाहतुकीचा बोजवारा, मोठमोठ्या विभूतींची नावे जोडत घेतेलेले व्हॅलिडेशन, नाही तसल्या प्रथा आणि कृतींना संस्कृतीचे आणि परंपरांचे गोंडस लेबल आणि तेच खरे असे सांगत सर्वत्र होत असणारा त्याचा मूर्ख प्रसार>

+ दुसऱ्याला होणाऱ्या त्रासाबद्दल कमालीचा बेमुर्वतखोरपणा, समाजद्रोही सर्वपक्षीय राजकीय नेतृत्व आणि थंड आणि षंढ बहुतांश यंत्रणा...

हा लेख एक प्रवास आणी त्याच्या आठवणी आहेत. खर तर हा लेख भटकंतीत हलवायला हवा. "वन्स अप ऑन अ टाईम"असा सिंड्रोम असतो. यावर ना तो संताप व्यक्त करायची जरूर आहे ना ही किव करायची गरज. सद्यस्थितीत आपले म्हणणे तंतोतंत खरे आहे पण कोण काय करू शकतो. कानावर, डोळ्यावर,खिशावर,जुन्या संस्कारी मनावर योजनाबद्ध बलात्कार आहे. काहीच करू शकत नाही तर मग सहन करण्याशिवाय गत्यंतर नाही.

बाकी जुनी नावे वाचून त्या काळात गेल्यासारखे जरूर वाटले.

लहानपणी पुण्यामध्ये जायचा योग आला नाही पण सार्वजनिक गणपती उत्सवाबद्दल ऐकून आहे.

II श्रीमंत पेशवे II's picture

10 Sep 2025 - 10:27 am | II श्रीमंत पेशवे II

एका दमात पुर्ण सिक्वेन्स सान्गित्लात

"आहेस तिथून थोडा मागे चालत जा - आधी आमच्या ग्रामदैवत कसबा गणपतीच्या पायी डोकं ठेव आणि मग आमची ग्रामदेवता आई तांबडी जोगेश्वरीचं दर्शन घे. अजूनही पुणेकराच्या घरात कार्य निघतं तेव्हा पहिली निमंत्रणपत्रिका कसब्याच्या गणपतीला जाते आणि दुसरी तांबड्या जोगेश्वरीला.

पलिकडेच भाऊसाहेब जावळे रंगारींचा राक्षसवध करणारा गणेश बघ. त्वष्टा कासारचं दर्शन घेऊन मग दलबीरे - तू गुरुजी तालमीचा मूषकावर स्वार गणपती आणि तुळशीबागेची भव्य गणेशमूर्ती बघ. "डॅडी" इमामभाई खान यांचा जगोबादादा तालीम गणपती बघून मंडईच्या शारदा - गजाननाचे आशीर्वाद घे आणि तिथेच बाबू गेनू मंडळाची मूर्ती बघून, जिलब्या मारुती मंडळाच्या अनुपम सात्विक गणेशमूर्तीसमोर नतमस्तक हो. तिथून काही अंतरावरच्या केसरीवाड्यात लोकमान्यांच्या गणेशाचं दर्शन घे. तुला दिसेल खरं पुणं."

विअर्ड विक्स's picture

13 Sep 2025 - 8:55 pm | विअर्ड विक्स

मूळचा गिरगावकर नि कामानिमित्त पेठकर ( सदाशिव पेठ) नि निवासनिमित्त डोंबिवलीकर .
त्यामुळे मुंबई नी पुणे दोन्ही कडील मजा अनुभवली आहे . पेठेतील गणपतींचे सुरेख वर्णन केलय .

लेख आवडला, तरी यापैकी अनेक गणपती पाहायचे राहिले .
निंबाळकर पेठचा यावर्षीचा जिवंत देखावा प्रेक्षणीय होता , शनिपारची द्वारका पाहायचे स्वप्न गर्दीच्या महापुरात वाहून गेले .