मला (न) जमलेली पाककला (पोळ्या)

मालविका's picture
मालविका in पाककृती
24 Nov 2022 - 5:09 pm

पाककला नावातच कला आहे. ते कौशल्य आहे. ज्याला साधलं त्याला साधल. अन्नपूर्णा देवी ज्याला प्रसन्न झाली त्यांना सलाम. माझ्यावर देवीने प्रसन्न व्हायला जरा वेळ घेतला. म्हणजे अजूनही मी निष्ठेने तिची सेवा करीत नाहीच त्यामुळेच असेल, अजून पूर्ण प्रसन्न नाही झाली. पण निदान माझे स्वतःचे खायचे वांदे होत नाहीत एवढे तिचे आशीर्वाद मात्र लाभले नक्की.

मुळात स्वयंपाकघरात रमणारी मी अजिबात नाही. त्यापेक्षा बाई ठेवून सगळं आयत खायला मिळालं तरी आवडेल मला. स्वयंपाक करण्यापेक्षा मी ढीगभर पुस्तक वाचून काढेन किंवा शेकडो किमी सायकल चालवेन. ते सोपं. पण आई आणि आता नंतर वहिनीच्या हातचं चविष्ट खायची सवय लागली की त्यानुसार पदार्थ झाले नाहीत की मनास उतरत नाहीत. त्यामुळे स्वयंपाकासाठी बाई हा उपाय बाद झाला.

लग्नापूर्वी अनुभवी स्त्रियांकडून सल्ला मिळाला होता की "काही आईकडून शिकू नको. नंतर सासरी आमच्याकडे असच असतं नी तसच नसतं करत त्यांच्याच पद्धती शिकायच्या मग डायरेक्ट तिकडचच काय ते शिक." हा सल्ला मी फारच मनावर घेतला. तरी नाही म्हणत आईने पोळी, भाजी, आमटी, भात असा एक बेसिक कोर्स करून घेतलाच. त्यात घडीच्या पोळ्या चांगल्या जमल्या. वाटलं आता काय जमलंच. पण ते तर हिमनगाचे टोक होत हे आता कळतंय. त्या दिलेल्या सल्ल्यात एक गोष्ट ऑप्शनला टाकली होती आणि तीच नेमकी माझ्या वाट्याला आली. लग्न होऊन मी गेले परदेशात. तिथे ना आई ना सासू. माझी मी मुखत्यार. आता अडल घोड. ना इकडची पद्धत ना तिकडची.

सुरवातीला वाटलं, पोळी भाजी बेसिक तर नक्की येतेय, पुढचं पुढे बघू. इंडियन स्टोर मधून आटा, तुर डाळ, तांदूळ आणला. बटाटा नी जनरल भाज्या लोकल ग्रोसरी स्टोअरला मिळाल्या. पहिल्या दिवशी कणीक भिजवली पण मनासारखी गुळगुळीत होईना. बराच वेळ मळून घेतली तरी इकडे व्हायची तशी होईना. थोडा वेळ झाकून ठेवली तर ती तेवली. आता त्या माझ्या दृष्टीने सैल कणकेच्या पोळ्या लाटण मला जमत नव्हतं. मला मध्यम प्रकारची कणीक लागते पोळ्याना. ना घट्ट ना सैल. त्या दिवशीच्या पोळ्या जरा कडकच झाल्या. गार पोळ्या तर जणू पापडच.म्हणून मग त्या दिवशी गरम गरम पोळी भाजी खाल्ली.

आईकडे गिरणीत दळलेल्या पिठाच्या पोळ्या करायची सवय. त्या मस्त मऊसूत होत. इथे आट्याच्या पोळ्या जमेत ना. रोज नवीन प्रयोग होत होते. सकाळची पोळी संध्याकाळी खाता यायची नाही. पहिला आटा आणला तो भीत भीत २ किलोच पॅक आणलं. तरी दोन आठवडे लागले ते संपवायला. मग पुढच्या वेळी ब्रँड बदलला. पण त्यांचं पॅकेट ५ किलोच. मग त्या आट्यावर प्रयोग सुरू झाले. हा आटा मला मैदा मिक्स असलेला वाटला. खरंतर काहीतरी चुकतंय एवढंच कळत होत. पण मुळात याची आवड आणि ज्ञान नसल्याने काय चुकतय हे कळत नसे त्यामुळे साहजिकच ते सुधारणार कसं ते कळत नसे. यावेळच्या आट्याच्या पोळ्या पातळ करून चालत नसत. मग रोट्यांसारख जाड ठेवून बघितलं. तरीही पसंतीस उतरेना. फुलका प्रकार कधी आधी करून बघितला नव्हता, तोही करून बघितला. ५ पैकी ३ जळलेले अश्या सरासरीने फुलके प्रकरण पण झेपेनास झालं. मग तो आटा कसा संपवता येईल यावरच माझा विचार जास्त चाले. इंटरनेट वर विविध रेसिपी बघून केक जरा जमायला लागला. मग आटा त्यात संपवू लागले.
पुढच्या वेळी पिल्सबरीचा आटा मिळाला. याच नाव भारतात पण ऐकलं असल्यामुळे मी मनोमन खुश झाले. चला, याच्या तरी पोळ्या चांगल्या जमतील म्हणून परत प्रयोग सुरू झाले. पोळ्यांचा गोल आकार फक्त पूर्वीसारखा जमत होता पण मऊसूतपणा, पापुद्रा हे प्रकार काहीही करून जमत नव्हते. नंतर नंतर तर ते ५ किलोच पॅक घेताना मला जीवावर यायला लागलं. कारण ते संपायला खूप दिवस लागायचे. मग पुऱ्या कर,पराठे कर आणि तत्सम प्रकार करून तो कसाबसा संपल्यावर मग नवीन आटा आणता यायचा.

सरते शेवटी एकदा अन्नपूर्णाचा आटा मिळाला आणि त्याच्या पोळ्या अगदी छान मनासरख्या झाल्या. त्या दिवशी अगदी तृप्त झाले मी. नंतर मात्र लोक जसं सांगतात मी अमुक ब्रँड च वापरते तश्यागत अन्नपूर्णा सोडून कुठलाही आटा घेतला नाही. पॉटलकच्या वेळेस मैत्रिणी देखील विचारायच्या कोणता आटा वापरते? इतकी पोळ्यांची स्तुती ऐकली आणि भरून आल. अन्नपूर्णा देवी थोडीशी हसलेली भासली मला त्या दिवशी.

- धनश्रीनिवास

प्रतिक्रिया

सरिता बांदेकर's picture

24 Nov 2022 - 8:46 pm | सरिता बांदेकर

माझाच अनुभव आहे हा.
मस्त लिहीलंय.

श्वेता२४'s picture

25 Nov 2022 - 11:02 am | श्वेता२४

विकतच्या पिठाच्या चपात्या बनविणे इतके अवघड असेल असे वाटले नव्हते. ॲडमध्ये तर किती फुगलेल्या दाखवतात.मी कधी केलेल्या नाहीत त्यामुळे सांगता येणार नाही.पण पाहिजे तशा चपात्या बनविता येईपर्यंत तुमची होणारी घालमेल समजू शकते.

श्वेता व्यास's picture

25 Nov 2022 - 12:22 pm | श्वेता व्यास

आमच्या इथे लोकल गिरणीमध्ये गव्हाचं तयार पीठ पण विकतात. चांगल्या होतात पोळ्या.
इतर आटे वापरून नाही पाहिले अजून, पण तुमचे अनुभव ऐकता देव करो आणि तशी वेळही न येवो :)

मुक्त विहारि's picture

25 Nov 2022 - 10:26 pm | मुक्त विहारि

भात आणि सांभार, हा सर्वोत्तम पदार्थ आहे ...

भातात पाणी जास्त झाले तर, मेतकूट भात आणि भात फडफडीत झाला तर, फोडणीचा भात....

नचिकेत जवखेडकर's picture

1 Dec 2022 - 7:03 am | नचिकेत जवखेडकर

मस्त लेख आहे. पोळ्या मला अजिबात जमत नाहीत. आकार उकार तर जौचदेत, पण मऊ पण होत नाहीत. मी जेव्हा शिकायला जपानला आलो होतो तेव्हा यायच्या आधी वरण भात लावायला शिकलो होतो. पण ऐन वेळेला कुकर मध्ये पाणी घालायचं विसरलो. सगळा कुकर जाळून काळा!

रच्याकने, रोटीमॅटीक वापरून बघितलंय का कोणी?

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Dec 2022 - 9:35 am | ज्ञानोबाचे पैजार

मस्त मनोगत आवडले,
पोळ्या पापडा सारख्या कडक होतात किंवा कधी कधी नीट भाजल्या जात नाहीत बिघडतात यावर एकच जालिम उपाय आहे. पोळीबरोबर खायला नेहमी रसभाजी किंवा आमटीच करायची. गरम गरम भाजीत / आमटीत पोळी मस्त पैकी डुंबली की झाले.
एकटा रहायची वेळ आली की नेहमी रस्साभाजीच करतो.
पैजारबुवा,