रॉजर फेडरर- एक संयमी झंझावात

वझेबुवा's picture
वझेबुवा in जनातलं, मनातलं
17 Sep 2022 - 11:08 am

अवघ्या टेनिस विश्वाला भुरळ पाडणारा नजाकतदार खेळाडू. गेल्या २० वर्षांत, जे लोक नियमित टेनिस पाहतात किंवा जे लोक केवळ ग्रँडस्लॅम पाहतात त्यापैकी बहुतांश लोकांचा आवडता खेळाडू कोण असे विचारल्यास नक्कीच फेडरर हे उत्तर मिळेल.
पीट सॅम्प्रस चं लयाला जाणार साम्राज्य याने बळकावले आणि हा टेनिस जगताचा नवीन सम्राट म्हणून उदयास आला. आधी विम्बल्डन बॉईज मध्ये विजेतेपद नंतर मुख्य विम्बल्डन मध्ये सेमीफायनलला सॅम्प्रसला हरवून हा प्रेक्षकांना खुणावू लागला. आणि मग पुढील वर्षी विजेतेपद पटकावल्यावर याने मागे वळून पाहिलेच नाही. आता तर विम्बल्डन म्हटलं कि पुरुष एकेरीमध्ये एकच नाव पटकन डोळ्यासमोर येत ते म्हणजे रॉजर फेडरर!

आयुष्यात काही गोष्टी आपल्याला अत्यंत आनंद देणाऱ्या असतात. त्या गोष्टी एन्जॉय करताना अगदी आतून वाहवा येते. अश्या गोष्टींची माझी जी यादी आहे त्यातली एक गोष्ट म्हणजे ग्रँडस्लॅम सेमी व फायनल मॅचेस. त्यातून फेडरर ची मॅच, आणि त्यातून सेन्टर कोर्टवरील मॅच म्हणजे आनंदाची परमावलीच. लहानपणापासूनच बाबांकडून बोर्ग, मॅक्नरो, अमृतराज यांचे किस्से ऐकलेले. त्यामुळे टेनिस हा खेळ सुरुवातीपासूनच पाहत आलो. मी पाहायला सुरुवात केली तो सॅम्प्रस चा शेवटचा काळ होता. स्टेफी, मोनिका सेलेस यांच्याही मॅचेस पाहिल्याचं आठवत. आणि समज आली तेव्हापासून फेडरर चा खेळ बघत बघत मोठा झालो.

विद्यार्थी दशेच्या दिवसात ग्रँडस्लॅमचे दोन आठवडे म्हणजे मजाच मजा असायची. मॅचेस पाहायच्या आणि आतासारखं व्हॉट्सऍप नसल्याने, दुसऱ्यादिवशी कॉलेज / क्लासेस मध्ये त्यावर चर्चा रंगायची. आम्ही दोन मित्र फेडररचे चाहते आणि आमचा एक मित्र नदालचा चाहता. त्यामुळे चर्चेला अजून उधाण यायचं.
जेव्हा तुमचा प्रतिस्पर्धी तुमच्या तोडीचा असतो किंवा किंचित अधिक सरस असतो तेव्हा तुम्हाला क्षमतेपेक्षा अधिक द्यावे लागते आणि यातूनच खेळाडूचा खेळ दिवसेंदिवस बहरत जातो. फेडरर आणि नदाल ही अशीच प्रतिस्पर्ध्यांची जोडी. दोघांनी एकमेकांचा अत्त्युच खेळ चाहत्यांसमोर आणला. आणि नंतर त्यात भर घातली नोव्हाक जोकोविच ने. फेड-राफा-जोको च्या त्या फायनल्सना तोडच नाही. मॅचची बेस्ट रॅली / बेस्ट शॉट हाच असे दर पंधरा मिनीटांनी वाटत राहायचे.
एखाद्या मॅच्युअर्ड खेळाडूने ऑनकोर्ट / मैदानात कसे वावरावे याचा आदर्श मला फेडरर वाटतो. विम्बल्डन ची सुरुवात करताना असलेली केसांची पोनी जाऊन एक छान केशरचना आली. कपाळावर कापडाची पट्टी, जेणेकरून केस कपाळावर येणार नाहीत. केस वाढलेले असतांना सर्विसच्या आधी ते पट्टीमध्ये किंवा कानावर अडकवायची त्याची लकब प्रेक्षणीय होती. जसजसा तो यशस्वी होत गेला, त्याच्या खेळासोबतच त्याच्या राहण्यामध्ये / वावरण्यामध्ये एक परिपक्वता आली. RF आता एक ब्रँड झाला होता. टीशर्टवर, टोपीवर, बुटांवर आता सोनेरी रंगात RF झळकू लागलं.

त्याच्याकडे ना रॉडिक सारखी दमदार सर्विस होती, ना नदाल सारखे जोरदार फोरहँड्स होते... त्याच्याकडे होते नजाकतदार वन हँडेड बॅकहॅन्डस, सर्व्हिसचा आदर्श स्टान्स आणि प्रत्येक फटक्यात असलेला एलिगन्स, कंट्रोल आणि सहजता. वन हँडेड क्रॉस कोर्ट आणि डाऊन द लाईन बॅकहँड्स मारणं म्हणजे सबके बस कि बात नहीं. त्याचे क्रॉस कोर्ट फटके, नेट वरचा खेळ पाहतांना त्याचा बॉलवर आणि एकूणच गेमवर असलेला कंट्रोल समजायचा. त्याचे बॅकहॅन्ड आणि फोरहँड विनर्स पाहून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे याच्याकडे मसल्स नसले तरी टायमिंग आणि ताकद अफाट आहे.
एस असो वा लॉन्ग रॅली नंतरचा विनर त्याने ना कधी उड्या मारल्या ना कधी तो ओरडला, रॅकेट डाव्या हातात घेऊन उजव्या हाताची मूठ मिटून केलेलं येस्स किंवा कमॉन सर्व काही सांगून जायचं. सामन्यावर असलेला त्याचा पूर्ण ताबा त्याच्या याच संयमी आणि आत्मविश्वासी हालचालींनी तो सहज प्रेक्षकांपर्यंत आणि प्रतिस्पर्ध्यापर्यंत पोहोचवायचा.

त्यामुळेच माझ्या दोन आवडत्या खेळाडूंची तुलना करण्यावाचून मी स्वतःला रोखू शकत नहीं. जिलेट रेझरची जाहिरात सोबत केलेले आपापल्या खेळातील दोन सर्वोत्तम खेळाडू रॉजर फेडरर आणि राहुल द्रविड. दोन जेंटलमन. दोघांकडे असलेली परिपक्वता, संयम, क्लास, एलिगन्स मला भावतो. ऑन द फिल्ड दोघंही फोकस्ड आणि शांत पण ऑफ द फिल्ड दोघांचा असलेला मिश्किल स्वभाव मला आवडतो. क्रीडा क्षेत्रातील माझे दोन आयडॉल!

याच वर्षी विम्बल्डन कडून माजी विजेत्यांचा सन्मान करणारा एक सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये विजेतेपदाच्या चढत्या क्रमाने खेळाडूंना बोलावण्यात आले. सर्वात शेवटी नाव घेण्यात आलं, आठ वेळचा विजेता 'रॉजर फेडरर'...! आणि ती त्याची दिमाखदार एन्ट्री, त्याचा टापटीपपणा, त्याचा एलिगन्स ... आहाहा.. जणू काही तो सोहळा त्याच्याच साठी आयोजित केला होता, की सर्वजण ऐका, पाहा आणि लक्षात ठेवा... विम्बल्डन चा अनभिषिक्त सम्राट कोण?... 'रॉजर फेडरर'..!
हा सोहळा माझ्यासारख्या चाहत्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे!

इथे मी कोणतेही आकडे देणार नाहीये. इतके ग्रॅण्डस्लॅम्स जिंकले, इतके एटीपी जिंकले, ते तर आपल्याला सगळीकडे वाचायला मिळतील. सॅम्प्रसच्या विजेतेपदाचे विक्रम फेडररने मोडले पण आता तो विजेतेपदाच्या यादीत पहिल्या क्रमाकांवर नसला तरीही माझ्यासारख्या असंख्य टेनिस चाहत्यांसाठी रॉजर फेडरर हाच सर्वोत्तम खेळाडू होता व नेहमीच राहील!

फेडररचा निवृत्तीचा कालचा निर्णय दुःखद असला तरी अनपेक्षित नक्कीच नव्हता. गेले एखाद दोन वर्ष याची चाहूल लागलेली होतीच. तरीही जसा नदालने कमबॅक करत यावर्षी दोन ग्रॅण्डस्लॅमस जिंकले तसेच फेडरर अजून एखादे ग्रँडस्लॅम नक्कीच जिंकेल अशी भाबडी आशा माझ्यासारख्या चाहत्याला होती.
पण शेवटी कालाय तस्मै नमः !

क्रीडालेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

17 Sep 2022 - 11:27 am | मुक्त विहारि

मनापासून लिहिलेले आहे, हे जाणवते ....

हकु's picture

17 Sep 2022 - 12:48 pm | हकु

आपण एकत्र एखाद दोन वेळा पाहिलेल्या फेडरर च्या विम्बल्डन फायनल आठवल्या. द्रविड तुझा फेव्हरिट होताच पण नजाकतीच्या बाबतीत तुला आवडायचा तो गांगुली सुद्धा या निमित्ताने आठवला.
खूप छान शब्दबद्ध केलं आहेस. पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!
(तुला नुकताच एक विषय सुचवला मी)

विनोदपुनेकर's picture

17 Sep 2022 - 6:20 pm | विनोदपुनेकर

खर तर बाहेर मस्त पाऊस चालू असतांना घरा मधे चंहा आणि भजी चा आस्वाद घेत विंबल्डन टीव्ही वर पाहत बसने हा आपला आवडता उद्योग.

पिट सेंपरास हा शांत अमेरिकन खेळाडू, त्याला हरवून रोजर ने प्रकाश झोतात येणे, कुठलीशी एक मॅच आंद्रे आगासी ला फेडरर ने पराभूत केले नंतर आंद्रे बोलला की मी एका बेस्ट प्लेयर कडून हरलो यांचा मला आनंद आहे, आणि हा छान लाजत वगैरे हसत होता तेव्हाच खेळाडू म्हणून आवडला हा स्विस बॉय.

नंतर तो विंबल्डनचा राजा बनला, एका मागून एक फायनल मारत गेला, खास करून मॅच टाय ब्रेक मधे गेली की सहज टाय ब्रेक मधे तो समोरच्याला पराभूत करायचं, काहीही म्हणा पण हा जिंकत राहिलेले पाहत राहणे खूप आवडायचे. पण नंतर वय, दुखापती, फॉर्म आणि जोकोविच चा उदय, तो जोकोविच आणि नदाल कडून पराभूत होतोय हे पाहणे असह्य होत होते .
बाकी कोर्ट वर तुझे हसणे आणि जिंकल्यावर भावनिक होत आनंद व्यक्त करणे आम्ही मिस करू कायम रोजर

उगा काहितरीच's picture

17 Sep 2022 - 7:18 pm | उगा काहितरीच

खूप छान समयोचीत लेख. खरंच फेडरर म्हणजे क्लास... फेडरर म्हणजे संयम... फेडरर म्हणजे परिपक्वता... फेडरर म्हणजे आत्मविश्वास... काय काय नि काय काय!

चांदणे संदीप's picture

18 Sep 2022 - 4:02 pm | चांदणे संदीप

यावर्षीच्या त्या विंबल्डन सोहळ्याबद्दल बाडीस.

शेवटी कालाय तस्मै नम: हेच खरं. :)

सं - दी - प

तुषार काळभोर's picture

18 Sep 2022 - 9:20 pm | तुषार काळभोर

मागील १५-१९ वर्षे फेडरर (२०), नदाल (२२) आणि जोकोविच (२१) यांनी ७६ पैकी ६३ ग्रँड स्लॅम विजेतेपदे जिंकली. एवढं निर्विवाद आणि एकसमान वर्चस्व या तिघांनी टेनिस जगावर गाजवलं!
मागील १९ वर्षात वावरिंका (३), अँडी मरे (३) हे अधून मधून धूमकेतू सारखे चमकून गेले, पण या तिघांच्या वर्चस्वाला धक्कासुद्धा लागला नाही. हा या तिघांच्या खेळाचा करिश्मा की नवीन खेळाडूंना विजेतेपद मिळवण्यात आलेले अपयश, हा एक प्रश्न आहे. कारण ७६ पैकी ६३ वेळा हे तिघे विजेते होतेच पण उपविजेता देखील बहुतेकदा यांच्यातीलच एक असायचा! म्हणजे हे तिघेच एकमेकांना आव्हान द्यायचे. इतर कोणी आव्हानवीर तयारच झाले नाहीत!
येत्या काळात टेनिस जगात नवं रक्त उदयास येईल हे नक्की!

अगदी अगदी...

प्रत्येक क्षेत्रांत, हे घडतेच

पण तरीही , कतृत्वामुळे काही जण, काळाच्या ओघांत देखील, चिरकाल टिकून राहतात ...

बाॅबी फिशर, डाॅन ब्रॅडमन, हे त्यापैकीच ...

उन्मेष दिक्षीत's picture

19 Sep 2022 - 12:01 am | उन्मेष दिक्षीत

ला ४थ राऊंड मधे हरवले होते. पण लेख मस्त आहे ! किंग ऑफ टेनिस !