सरकार

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
11 Jan 2022 - 7:41 pm

"कुटायस रे ल*ड्या? कार्पोरेशनला ये. 'संगम'ला बसू." सरकारांचा मेसेज.
आता तुम्ही म्हणाल की बरं मग?
तर मग वगैरे काही नाही. सरकार म्हणजे आमचे जुने हितसंबंधी. या शहरात उगवतात अधूनमधून आणि मग काढतात आमची आठवण. आकस्मिक येऊन चकित करण्याची त्यांची पद्धत आहे.
आपणही समजा अशा ऑफरला नाही म्हणत नाही.
अर्थात कामं वगैरे नाचत असतातच पुढ्यात. पण त्याचं काय एवढं..! आख्खं आयुष्य त्यासाठीच पडलेलं आहे..! आज नाही केली तर उद्या करता येतील. किंवा परवा करता येतील.
किंवा करू करू म्हणता येईल.

शिवाय थोडा बदलही पायजेच ना माणसाला..!
रोज रोज एकटेच कसे बसणार..!
बसणार म्हणजे काही अगदी शब्दश: बसणं असं नाही. उभ्याउभ्याच असतं ते.!
एक टॅंगो पंच, चनाडाळ आणि दोन बॉईल्ड अंडी,
असल्या मेन्यूसाठी साग्रसंगीत बसायला कशाला पायजे? मोजून अर्ध्या तासाचं काम..! लय लय तर पाऊण घंटा.

बाकी अशा अड्ड्यांवर सभ्य मनुष्यांस थोडे ऑकवर्ड वाटू शकते, हे मला माहीत आहे. कारण मलाही ते तसेच वाटायचे.

समजा येकाद्या कोपऱ्यात आपला आपला कार्यक्रम चालू असतो, तेवढ्यात हरप्रकारची बेहाल खंगार मनुष्ये जवळ येऊन संवाद साधतात. दहा रूपये चहासाठी मिळावेत अशी तीव्र इच्छा प्रकट करतात.
त्यांस पैसे सरळसरळ टंपास साठीच हवे असतात. पण तसं उघडपणे सांगू शकत नाहीत.
मनुष्यस्वभावाची त्यांना जाण असते.
हळूहळू मागणीचा स्तर घसरत जाऊन घायकुतीला आल्याचे स्वरूप धारण करतो.

त्यामुळे समजा सभ्य सुसंस्कृत मनुष्ये तिथे अस्वस्थ
होऊ शकतात. पण ते त्यांचे त्यांनी बघून घ्यावे.
माझ्या बाबतीत ती समस्या उद्भवत नाही.
मला काही ते मनुष्य पैसे मागत नाहीत. कारण आता
ते सगळे ओळखीचे झालेत, हा एक मुद्दा आहेच.

आणि शिवाय मी त्या तमाम होतकरू डंगऱ्या पब्लिकला उद्देशून पूर्वीच एक ऐतिहासिक भाषण ठोकून दिलेलं आहे की, "बाबांनो, तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की तुम्हाला वाटते तेवढा मी मोठा नाही..! तुमच्या सुखाची काळजी घेण्याएवढे माझे खांदे रूंद नाहीयेत..!
माझ्याच भणंग मनाच्या बोझ्याने मी पिचलो आहे..!
तुम्हाला काही देण्याच्या परिस्थितीत मी असतो तर
रोज इथे कशाला आलो असतो?? साधं लॉजिक आहे..!
त्यामुळे सांप्रतकाळी तुम्ही मजपुढे रडूनही दाखवले तरीही मी तुम्हांस दहा रूपये देऊ शकत नाही..! कारण माझ्याकडे ते नाहीच आहेत..! परिणामी तुम्ही तुमच्या प्रिय संत्रास मुकाल आणि तुमच्या दिलास मोठे दु:ख होईल, याची मला जाणीव आहे. परंतु त्याबद्दल तुम्ही मला खुल्या दिलाने माफ केलं पाहिजे..! आणि आता यापुढे तुम्ही माझ्या तुटपुंज्या आनंदात अडथळा आणला नाहीत तर बरं होईल, अशीही माझी अर्जी आहे. इत्यादी. इत्यादी."

तर आता ते नाहीत मागत पैसे वगैरे.
शिवाय मध्यंतरीच्या काळात अजून एक महत्वाचे परिवर्तन घडून आले. पूर्वी ते माझ्या समोरची चनाडाळची पुडी बेधडक लंपास करायचे..! आणि मला तसाच आश्चर्यचकीत अवस्थेत सोडून द्यायचे..!
आता तसं करत नाहीत..! आता ते आधी परवानगी मागतात..! आणि मग मी त्यांना चार दाणे घेण्याची परवानगी देतो.!
ओह् कम्मॉन्..! डोन्ट बी सो रिडिक्यूलस..! चनाडाळच तर आहे..! त्यात काय एवढं..! तेवढी छटाकभर दिलेरी दाखवू शकतो आपण..! किंवा तेवढी दिलेरी प्रदर्शित करण्याइतपत प्रेमळ झालेलो असतो आपण, असं म्हणा हवं तर..!

बाकी ह्यात माझं स्वतःचं असं काही मोठेपण नाही..!
हे सगळं क्रेडिट टॅंगो-पंचला दिलं पाहिजे..!
कारण पंधरा-वीस मिनिटांत मनुष्याचा सगळा टणकपणा किंवा तत्सम स्टीफनेस वितळवणं, ही काही सामान्य घटना म्हणता येणार नाही..!
'भंगू दे काठिण्य माझे' वगैरे कविता वाचून मला नवल वाटते. कारण माझ्यावर तशी वेळच येत नाही. मनाच्या बरड रूक्षपणाचं हिरव्यागार बागायतीमधी रूपांतर करण्याचा राजमार्ग ज्याला गवसला, तो कशाला प्रार्थना करेल..!

दुसऱ्या सकाळी ते हॅंगोव्हर उद्वेग वगैरे असतंच.
'आम्ल जाऊ दे मनीचे' म्हटले तरीही ते काही सहजासहजी जात नाही. घट्ट वेटाळून राहते.
शरीर डगमगतं..!
पण काही इलाज नसतो..!
हे असं असतंच ना..!
आयुष्याचं डंगरेपण, रिकामपण किंवा होपलेसनेस चुभत राहतं..! ती चुभन सोसता येत नाही माणसाला..! तगमग ससेहोलपट वगैरे असतेच.! जगण्याचे निरनिराळे दाब असतात..! चुराडा होतो त्याखाली.! त्यातून आंतरिक झगडा निर्माण होतो..! धीर खचतो..! आणि मग त्या झगड्यातून मुक्त
व्हायची घाई किंवा निकडयुक्त तलप होते मनुष्याला..! आणि अशी सशक्त तलप पूर्णत्वास न्यावीच लागते ना मग..! काय करणार..! त्याशिवाय चित्ताला हवीहवीशी टवटवीच येत नाही..!

मग दुसऱ्या दिवशी ही खंत कशासाठी ?
ह्या खिन्न विरक्तीचं काय प्रयोजन?
कशासाठी उगाच हा बोकेसंन्यास ?

तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मनात समजा एक प्रकारची फुर्ती किंवा उल्हास दाटून आला की, सरकारांच्या माध्यमातून आजचे नियोजन उत्कृष्ट होऊन जाईल..!
आणि विशेष म्हणजे ते विनामूल्य होणार असल्यामुळे तर मग मनीमानसी जे उधाण किंवा जोश येतो, त्या लाटांवर सवार होत मी विनाविलंब 'संगम'च्या प्रवेशद्वारावरती उभा.

सरकारांचं आगमन.
सोबत ड्रायव्हरशिवाय आणखी एकजण. एलपी किंवा तत्सम यूएसपोलोचे शर्ट्स, लिवाईज् च्या जीन्स, ब्रेसलेट, शूज नाइकेचे बहु आरामदायी आणि वरती समजा वुडलॅंडचे जॅकेट वगैरे.

आपल्या कर्तृत्वाला वाव देण्यासाठी सरकारांनी शासकीय बांधकाम कंत्राटदारीचे क्षेत्र निवडले आहे.
वडिलोपार्जित व्यवसाय. बऱ्यापैकी व्याप. सगळी सूत्रे सरकारांकडे सोपवून वडीलांनी आता यातून माघार घेतली आहे.

कारण त्यांना आता लोकांच्या आग्रहास्तव जिल्हा परिषद सदस्य वगैरे व्यापक पट मांडावा लागलाय. त्या रस्त्याने वेगवान दौड करायची म्हटल्यावर रिसोर्सेसचं योग्य वाटप केलं पाहिजे.
काही गोष्टींचा भार कुटुंबातील सदस्यांवर टाकला पाहिजे. मग आपण लोकसेवेच्या मुख्य ध्येयावर पूर्णपणे फोकस करू शकतो..! शिवाय त्यातून मग सरकारी कंत्राटांचा ओघही मुक्तपणे केवळ आपल्याच दिशेने वाहता राहतो, हे महत्वाचे..!
काही लोक बोंबलतात..!
पण त्यांना दुसरं काम तरी काय असतं..!
त्यांच्या बोंबलण्याकडे आपण कौतुकाने पहावं.

बाकी सरकारसुद्धा कुशल संघटक मनुष्य. त्यामुळे साथीला दरवेळी कुणीतरी मानकरी झिलकरी वगैरे असतातच..!
नसतील तर फोनवरून बोलवून घेण्याची व्यवस्था करतात. सरकारांच्या आतिथ्यशील आमंत्रणाला सहसा कुणी नकार देत नाही.

तर यावेळी टेबलला ऑलरेडी एक मनुष्य.
''आपन फक्त बिल्डिंगा बांधतो आन् इकतो.
बाकी मला काय म्हाईत नाय'' अशी त्यांनी स्वतःची
ओळख दिली..!
अशा प्रसंगी स्वतःची ओळख करून द्यायची म्हटलं की माझा चेहरा वेगाने पडतो. कारण मग समोरच्या नजरेत आश्चर्य दिसतं की, "आयच्या गावात ! तुमी हितं कसं काय..!"
आता यावर आपण काय बोलणार..!

तर व्हॅट सिक्सटी नाईन. सोडा. आईसक्यूब्ज. बॉईल्ड शेंगदाणे. तुकडा चकली. विंग्ज. सुरमई रवा फ्राय. सिगारेट्स ब्रॅंडचं एवढं काही नाही. जी मिळेल ती आपलीच म्हणायची. आणि उखाळ्या पाखाळ्या..! त्या असतातच..!

"आरं पन आमी हितं येवडं खवन्या बसलू आसताना आमाला येका शब्दानं इचारलं नाय त्येंनी.. आमी काय न्हाय म्हनलं नस्तं.. म्हागं त्यो सातकीतला पाझर तलाव फुटला हुता तवा कशी फाटली हुती..! कसं पिदवलं हुतं आप्पानं..! आली हुती दोगंबी मळ्यावर.. पॅंटीत मुतायचीच राह्यली हुती..! जाऊ दी सोड.. बांद फुडून कुनी ताजं होत नसतं म्हनावं..‌!"

"चांगला मटका बिटका चाल्लाय न् त्येंन्ला काय धाड
भरलीय..! मंग काय तर..! आरं लय बारा बोड्याची हैत दोगंबी..! उगं आन्नांकडं बगून आपन गप बसतूय तर लैच लांब चाल्ले हे..! कदी ना कदी घावतीलच गी पट्ट्यात."

"आ लगाss त्येला म्हनाssव आदी तुजं तुजं बूड आजून कुटं नीट स्थिरस्थावर झाल्यालं नाssय.. आन् कशाला पायजेल ही इचारसरनी न् फिचारसरनी न् ल*डा लसून..! सांगतू तेवडं कर म्हनाव..! ठीव फोन आता.!"

बरेच दिवस बडबड केली नाही तर ऊर्जा साठत जाते.
ही अतिरिक्त बिनकामाची ऊर्जा डोक्यात जाते.. तुंबते.! क्रंदत राहते..! आणि मग खऱ्या अर्थानं चुथडा होतो..!

ए आर रेहमान माणूस श्रेष्ठ आहे..! डोक्यात ताडताड स्फोट करतो..! ताणलेल्या नसा ठ्ठो ठ्ठो मोकळ्या करतो..!
आ जा आ जा जिंदे शामियाने के तलेss आ जा जरीवाले नीले आसमान के तले.. जय होss ... !! जय होss.. !!

काही गाण्यांच्या ओळी सरळ लाईनीत असतात..
काहींमध्ये ओळींच्या थोड्याफार लाटा असतात. काही शब्दांशी चढ लागतो आणि काही शब्द उतारावर असतात..!
परंतु हे वेगळंय..! यात अंदाधुंद मन सनान् झेपावत वर जातं Peak पर्यंत. हाच तो बिंदू..! जिथं एक मुक्तीदायी अवकाश मिळतो..! मग मन तसंच कोऱ्या जागेवरून पुढे घरंगळत स्वतःला तोलून धरायला बघतं..! मग परत माघारी येतं..!
पुन्हा एकदा त्या झंकार बीट्सवरून फिरतं, मघाशी जे
जाणवलं होतं ते घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करत..!

ऐकता ऐकता आत्मभान येतं की साला आपण कुठेही
उपरेच असतो..! ह्यावर तुम्ही म्हणाल की आता हे काय नवीनच? हे आत्मभान वगैरे काय असतं? उगाच मोठे शब्द वापरायचा सोस..!
तर होय. तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. अगदीच अचूक. ग्रेटच. काही विषयच नाही.

कथाजीवनमानस्थिरचित्रविचारअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

निनाद's picture

13 Jan 2022 - 8:11 am | निनाद

भारी आहे!
बसल्याचा फील एक नंबर!

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Jan 2022 - 12:55 pm | ज्ञानोबाचे पैजार

"भंगू दे काठिण्य माझे" आणि "आम्ल जाऊ दे मनीचे" हे वाचताना तर फुटलोच, कवितेचा फारच चपखल वापर ..

बाकिचे पंचही जोरदार आहेत.

पैजारबुवा,

मुक्त विहारि's picture

13 Jan 2022 - 1:18 pm | मुक्त विहारि

पण कथा अपूर्ण वाटते

सुखी's picture

19 Jan 2022 - 10:36 pm | सुखी

लिहिते रहा