तेनाली रामा: "सोनी सब" चॅनलवरील उत्कृष्ट मालिका

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
8 Nov 2021 - 11:51 am

जुलै 2017 ते नोव्हेंबर 2020 इतका कालावधी चाललेली आणि 804 एपिसोड्स असलेली "सोनी सब" चॅनल वरची "तेनाली रामा" ही मालिका मी त्या वेळेस जरी मी बघू शकलो नव्हतो तरी काही महिन्यांपूर्वीपासून पासून बघायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत जसा वेळ मिळेल तसे जवळपास ५० एपिसोड बघून पूर्ण झाले आणि उरलेले सर्व एपिसोड बघायची माझी इच्छा आहे.

"सोनी लिव्ह" या ॲपवर या मालिकेचा ऑडियो आणि व्हिडिओ थोडा पुढे मागे होत असल्याने (त्याचे कारण माहिती नाही) मी ही मालिका युट्युबवर बघत आहे. युट्युबवर पूर्ण लांबीचे सगळे एपिसोड उपलब्ध आहेत. मी यापूर्वी दूरदर्शनवरची "तेनाली रामा" बघितलेली नाही आणि तेनाली रामावरची पुस्तकेही वाचली नाहीत. त्यामुळे आधीच्या कशाशीच आणि कोणतीच तुलना न करता मी ही मालिका बघू शकतोय. अमर चित्रकथा मध्ये लहानपणी वाचल्याचे पुसटसे आठवते.

"कॅन्टीलो इंटरटेनमेंट" या निर्मिती संस्थेने भरपूर खर्च करून या सिरियलची निर्मिती केली आहे, हे दिसून येते. अगदी भव्य दिव्य पद्धतीने ही सिरियल बनली आहे. ऐतिहासिक आणि विनोदी असे कॉम्बिनेशन असलेली अशी सीरिअल मी प्रथमच बघतो आहे. यातील काही कथा थोड्या थोड्या अकबर-बिरबल सारख्याच वाटतात परंतु बघायला खूप मजा येते. राजा कृष्णदेवराय, आचार्य तथाचार्य आणि तेनाली रामा (उर्फ पंडित रामकृष्ण) ही यातील तीन प्रमुख पात्रे आहेत. तिघांचे काम ज्या कलाकारांनी साकारले आहे, त्यांनी खरंच अप्रतिम अभिनय केला आहे. वेगवेगळ्या कथा जरी असल्या तरी सर्व कथांना एकसंध करून प्रेक्षकांना बांधून ठेवणे किंवा मागील कथेपासून पुढील कथेकडे सरकतांना एकदम तुटक वाटायला नको म्हणून त्यात योग्य अशी काही प्रसंगांची भर घातलेली जाणवते.

काही पात्रे कदाचित सिनेमॅटिक लिबर्टी किंवा गॅप भरून काढण्यासाठी किंवा मालिकेचे मनोरंजन मूल्य वाढवण्यासाठी त्यांनी टाकली असली (टाकली असावी असे वाटते) तरीही तसे जाणवत नाही. ती पात्रे यात सहजपणे सामावून जातात. अशा प्रकारची सिरियल आणि तेही रोज चालवणे (डेली सोप) हे काही सोपे काम नाही! त्यासाठी अशा गोष्टी कराव्याच लागतात. पण त्या नाही जमल्या तर सिरियल फ्लॉप होण्याची शक्यता असते. ही मालिका लिहिण्यासाठी लेखकाने खूप मेहनत केली असल्याचे जाणवत राहते. सर्व डायलॉग चांगले लिहिलेले आहेत. विनोदी बाज असला तरी अधून मधून अनेक चांगले प्रकारचे सुविचार यात येत राहतात जे अगदी लिहून ठेवण्यासारखे आहेत.

अशा प्रकारच्या मालिका बनवणे खूप खूप कठीण असते. राज दरबारात तेनाली रामाची नेमणूक कशी होते यात भरपूर एपिसोड्स खर्ची घातलेली आहेत. आधी दरबाराचे मनोरंजन करण्यासाठी "विदूषक" आणि नंतर मात्र राजाचा "सल्लागार" अशी तेनाली रामाची प्रगती होत जाते. दरम्यान, राज दरबारात एकेक समस्या निर्माण होते आणि त्याची सोडवणूक रामा कशी करतो हे खरंच बघण्यासारखे आहे. एवढेच नाही तर देवीची तपस्या करून देवीला जेव्हा तो प्रसन्न करतो तेव्हा देवीचीही तो फिरकी घेतो. अर्थात मुद्दाम नाही, तर निष्पाप मनाने तो देवीला प्रश्न विचारत असतो.

नुकत्याच बघितलेल्या एका एपिसोडमध्ये राजा कृष्णदेवराय काही कारणास्तव तेनाली रामा याला आठ मूर्ख शोधून आणण्यास सांगतो आणि नंतर त्यांना शिक्षा करणार असतो. तेनाली रामा पाच असे खरोखरच मूर्ख नमुने शोधून आणतो. मग उरलेले तीन मूर्ख कोण असतात? तसेच इतर पाच मूर्ख सुद्धा खरंच मूर्ख असतात का? त्यावरचे तेनाली रामाचे स्पष्टीकरण ऐकून त्यातून खूप शिकण्यासारखे आहे.

आणखी एका कथेत एक जपानी स्त्री अदृश्य साड्या घेऊन येते आणि त्या राजदरबारात राजाला राण्यांसाठी खरेदी करायला सांगते. त्याच्यावर तेनालीराम याने शोधलेला तोडगा असो किंवा मग शेजारच्या राज्यातील एक राणी विजयनगरच्या राजा कृष्णदेवराय यांचा दोन पैकी एकच राणीसाठी सोन्याचा दागिना (सिंदुर पट) पाठवते तेव्हा तो कोणत्या राणीला द्यायचा असा प्रश्न पडलेला राजा कृष्णदेवराय ती समस्या सोडवायला पुन्हा तेनाली रामालाच सांगतो. तो ही समस्या कशी सोडवतो हे तर खूपच रंजक आहेच परंतु त्यानंतर अजून एक सस्पेन्स आहे जो या संपूर्ण प्रकरणावर खूपच वेगळा प्रकाश टाकतो.

एका कथेत सर्वांसमक्ष एक माकड चंद्रमणी हिरा चोरतो ते तेनाली रामा शोधून काढतो. आणखी एका कथेमध्ये एका राज्यातून सत्य बोलणारा पोपट घेऊन एक जण येतो त्याचाही पर्दाफाश तेनाली रामा करतो. त्यावरून आपल्याला रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्याची आठवण येते.

राज पुरोहित "आचार्य तथाचार्य" याला तेनाली रामा हा खूप डोळ्यात सलत असतो. तो हरप्रकारे तेनाली रामाला खोटे पाडण्याचा प्रयत्न करतो परंतु तेनाली रामा त्याला पुरून उरतो.

तेनाली रामाच्या फॅमिलीमध्ये "बोलू शकणारी" पण काही कारणास्तव आजन्म मौन धारण करणारी त्याची आई आहे जी सतत काठी आपटून खुणेने आपले म्हणणे मांडते आणि त्याचे स्पष्टीकरण फक्त तेनाली रामाच्या बायकोला येत असते. या फॅमिलीमध्ये त्यांचे सोबत तेनाली रामाचा लहान वयाचा मित्र गुंडप्पा पण राहत असतो. आचार्य तथाचार्य चे दोन चमचे असतात जे त्याच्या पाठीमागे आणि कधी कधी तर त्याच्या तोंडावर त्याच्याच विरोधातच बोलत असतात. अर्थात हे सर्व विनोदी पद्धतीने दाखवले आहे. ही आणि इतर बहुतेक सर्वच पात्रे संपूर्णपणे विनोदी आहेत!

वाचकांना विनंती आहे की ही सिरियल जरुर बघावी. आपल्या कुटुंबासमवेत बसून बघावी. ती तुम्हाला निराश करणार नाही, आपले भरपूर मनोरंजन करेल, हसवेल, कधीकधी गंभीर करेल. तेनाली रामा सोबत आपणही नकळत मनात त्याच्यासमोर आलेली कोडी आणि उभ्या ठाकलेल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो, "जिगसॉ पझल" चे मिसिंग पिस शोधत राहतो आणि हेच या मालिकेचे यश आहे. कधी कधी समोर आलेल्या समस्येवर तेनाली रामा ला उपाय सापडत नसतो तेव्हा देवी लहान मुलीच्या रुपात येऊन त्याला प्रतीकात्मक प्रसंगांतून समस्या सोडवण्यासाठी इशारा देत असते.

- निमिष सोनार, पुणे

चित्रपटसमीक्षामाध्यमवेध

प्रतिक्रिया

जुइ's picture

11 Nov 2021 - 10:20 pm | जुइ

ही मालिका आमच्या सर्व कुटुंबाची आवडती मालिका होती. निखळ मनोरंजन करणारी. जटिल समस्यांचे तोड तेनाली रामा आपल्या बुद्धीकौशल्याने सोडवायचा ते पाहणे मनोरंजक असायचे. पात्रांमध्ये अम्मा आणि सर्वात पहिले शारदाचे काम करणारी नटी यांचे ट्यूनिंग फारच छान जमले होते. पंकज बेरी यांनी तथाचार्यंचे काम फारच चांगले केले आहे. तेनाली रामा आणि त्यांच्या चोटीचे संवादही चांगले असायचे. एकंदरीतच संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन फार चांगली मालिका!