रायगड जिल्ह्यातील पारंपारिक गोकूळ अष्टमी साठी नैवेद्याचे कुट्याचे लाडू/घरगुती कुरमू-याचे लाडू

जागु's picture
जागु in पाककृती
30 Aug 2021 - 3:15 pm

|| जय श्री कृष्ण ||

गोकूळ अष्टमीला महाराष्ट्रात घरोघरी बालगोपाळाला गोडाचे नैवेद्य दाखविले जाते. रायगड जिल्ह्यात तांदळाची शेती केली जाते त्यामुळे घरगुती तांदळापासून बहुतांशी घरात कुरमुरे तयार करुन ते भरडून, गूळ व इतर जिन्नसे खल-बत्यात कुटून त्यापासून लाडू करून तो नैवेद्या दाखविण्याची परंपरा आहे. खलबत्यात कुटल्याने भरड पीठ व गुळ एकजीव होते. कुटतात म्हणून याला कुट्याचे लाडू असेही म्हणतात.
बरं हे कुरमुरे म्हणजे भेळवाल्याकडे मिळणा-या कुरमु-याप्रमाणे नसून पाण्यात अर्धा दिवस भिजवून तव्यावर अथवा कढईत खमंग भाजून मस्त कुरकुरीत केलेले तांदूळ असतात. गृहलक्ष्मीचे मनापासून केलेले कष्ट, भक्तीभाव, प्रेम या लाडूत उतरल्याने हे अत्यंत खमंग व रुचकर लागतात. अनेक शेतकरी घरात तसेच या लाडूची प्रथा पाळणा-या घरात ५-१० किलोच्या प्रमाणात कुरमु-याचे पीठ दळून आणले जाते. केलेले लाडू व पीठ आप्तांना भेट दिली जाते. हे पीठही खूप खमंग असते. अर्ध्या पिठाचे लाडू करून अर्धे चहातून व दूधातून खाण्यासाठी ठेवले जाते. हा एक प्रकारचा नाश्ताच होऊन जातो. याच्या खमंगपणामुळे मुलेही हे लाडू व भिजवलेले पीठ आनंदाने खातात. सगळ्यांनाच मोठ्या प्रमाणात हे लाडू वा पीठ करणे शक्य नसते म्हणून खालील व्हिडिओत पाव किलोच्या प्रमाणात लाडू तयार केले आहेत व चहातून आणि दूधातुन पीठ भिजवल्याचे प्रात्यक्षिकही दाखविले आहे.
https://youtu.be/eNj7UiKlMAs
साहित्य
पाव किलो घरगुती तांदूळ किंवा जाडसर तांदूळ
मीठ (तांदुळ भिजवत ठेवताना टाकण्यासाठी)
१ छोटी वाटी गूळ
२ चमचे किसलेले सुके खोबरे हलके भाजून
२ चमचे चिरलेला सुका मेवा
चिमुटभर जायफळ पावडर
पाव चमचा वेलची पावडर
२ चमचे तूप

कृती
तांदूळ स्वच्छ धुवून घ्या व ते बुडतील त्यापेक्षा जास्त पाणी घालून त्यात अर्धा चमचा मीठ घाला. ते ढवळून घ्या व झाकण ठेवून साधारण ७-८ तास भिजू द्या
रात्री ठेवले असतील तर सकाळी तांदूळ चाळणीत निथळा व पूर्ण पाणी निथळले की मध्यम आचेवर ढवळत सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. खमंग वास सुटेल. हे तांदूळ थंड करा व मिक्सरमध्ये भरड पीठ साधारण बारीक रव्यासारखे पीठ करा.
खलबत्ता असेल तर खलबत्यात नाहीतर मिक्सरमध्ये हे पीठ घेवून त्यात वरील प्रमाणानुसार.गुळ, सुका मेवा, सुके खोबरे, वेलची पूड, जायफळ पूड व तूप घालून कुटून घ्या. गुळ व पीठ एकजीव झाले की एका भांड्यात हे मिश्रण काढून लाडू वळा.

(मला अजूनही मोबाईलवरुन फोटो मिसळपाववर टाकायला जमत नसल्याने फोटो टाकला नाहीये.)

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

30 Aug 2021 - 6:54 pm | गॉडजिला

प्रकरणं आहे हे लाडू म्हणजे.