एका नातवाची आजी....

Vivekraje's picture
Vivekraje in जनातलं, मनातलं
2 Oct 2020 - 9:56 am

रोजची रात्री साडेआठची बस. या बसला शक्यतो रोज अप डाऊन करणारे, काही कॉलेजची मुलं अशी नेहमीची गर्दी. मुंबईत नसलो तरी आम्ही बस ने अप डाऊन करताना तसाच लोकलचा फील यायचा आम्हाला. कारण प्रत्येक बस ला वेगळा ग्रुप, वेगळी माणसं त्यामुळे आपली रेग्युलर बस चुकली की एकदम अनोळखी प्रदेशात आल्यासारखं वाटायचं.
असंच त्या दिवशी माझी रोजची साडेसातची बस चुकली अन मी साडेआठच्या बस मध्ये बसलो. बस गच्च भरलेली घामाचा कोंदट वास , उन्हाळ्याचे दिवस त्यामुळे हवेतही उष्णता जाणवत होती. बस सुटायला थोडावेळ बाकी असताना एक आजी बसमध्ये शिरली, हातात छोटंसं गाठोडं , एक नायलॉनची पिशवी. आजीला बसायला जागा नव्हती, म्हातारं माणूस म्हणून मी माझ्या शेजारी आजीला ऍडजस्ट केलं. बसल्यावर आजीने तिच्या नायलॉनच्या पिशवीतून एका प्लस्टिकच्या पिशवीत बांधलेला आइस्क्रीमचा कप काढला, आणि आजी ते वितळलेलं आईस्क्रीम दुसऱ्या पिशवीत काढायला लागली, मला कुतूहल वाटलं. म्हटलं "आजी कशाला पिशवीत काढते , खाऊन घे इथेच , घरी जाईस्तोवर नाही राहणार हे" . आजी म्हणाली , "माझ्यासाठी नाही घेतलं, माझ्या नातवासाठी घेतलं.रोज घरी गेल्यावर खाऊं मागतो मला. म्हणून येताना घेतलं त्याच्यासाठी". मला अजीशी खूप बोलावंसं वाटलं, "म्हटलं आजी केव्हढा आहे तुझा नातू", मग आजींनी पूर्ण संसार कथा सांगितली, "नातू हाये दोन आडीच वर्षांचा , माझा मुलगा काही कमवत नाही दारू पिऊन पडलेला असतो, सुनबाई जाते शेतात पण आता उन्हाळ्यात काही काम नसतं, मग मी येते इथे जळगांव ला, मार्केटमध्ये भीक मागायला , वयस्कर असल्यानं लोक देतात पैसे, सकाळी दहा अकरा वाजता यायचं रात्री ह्या बसनं घरी जायचं, जेष्ठ नागरिकच तिकीट काढलं कि पैसे पण कमी लागतात, जाताना नातवासाठी काहींना काही पाच दहा रुपयाचं घेऊन जायचं, लय हट्टी हाये, पण मी घरी गेली की मला सोडत नाही, सारखा आजी काय आणलं काय आणलं करतो, मलाही बरं वाटत, त्याचा लय जीव हाय माझ्यात". क्षणभर मी सुन्नच झालो. म्हटलं "आजी एव्हढ्या पैश्यात घर भागतं का, म्हणाली, जेमतेम होत पण श्रावण बाळ योजनेचे पैसे पण मिळतात थोडेफार त्यात जमवतो काहीतरी". आणि मग आजी दिवभरातली चिल्लर मोजायला लागली.
मी विचार करत बसलो, आज ही आजी नातवासाठी जे करतेय तो नातू त्याची थोडीफार परतफेडही करू शकेल कि नाही काय माहित. कारण एकदा आपण मोठे झालो की आपल्या आजी-आजोबाबद्दल आपल्याला तेव्हडी माया , आपुलकी असते का, आपण तर मोठ्या पॅकेजच्या मागे फिरताना या किंमती माणसांना शून्य समजायला लागतो. बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं, नातवांच्या शेवटच्या भेटीसाठी आसुलेले त्यांचे डोळे शेवटी आसुलेले राहतात, आणि नातवंड आता काय वय झालंय त्यांचं आज ना उद्या जातीलच म्हणून त्याना टाळत राहतात. ज्या झाडांनी कधी काळी गोड फळं दिली आणि आज ती झाडं फळं देत नाही म्हणून काय असं दुर्लक्षित करायचं. त्यांची मायेची सावलीही आपल्या आयुष्यात खूप मोलाची असते, याची जाणीव ते नसतांना होते.
गाव आलं आजी गाठोडं घेऊन घराकडे जायला निघाली, नातवाच्या भेटीसाठी..............

मांडणीवावरमुक्तकसमाजजीवनमानप्रकटनविचारअनुभव

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

5 Oct 2020 - 6:41 pm | टर्मीनेटर

विदारक वास्तव!

सिरुसेरि's picture

5 Oct 2020 - 7:38 pm | सिरुसेरि

सुन्न .

गोंधळी's picture

5 Oct 2020 - 9:15 pm | गोंधळी

.

दुर्गविहारी's picture

6 Oct 2020 - 4:12 pm | दुर्गविहारी

फारच चटका लावून जाणारे लिहिले आहे.

Prajakta Sarwade's picture

10 Oct 2020 - 1:51 pm | Prajakta Sarwade

मोठ्या पॅकेजच्या मागे फिरताना या किंमती माणसांना शून्य समजायला लागतो.
मेसेज ही खूप मस्त होता article चा.

बबन ताम्बे's picture

10 Oct 2020 - 3:14 pm | बबन ताम्बे

आजी आजोबांनी लहानपणी केलेले लाड तरुण नातवांना आठवत नाहीत. नंतर त्यांची अडगळ वाटू लागते.