पुणे ते कन्याकुमारी सायकल सफर पूर्वार्ध-१

केडी's picture
केडी in भटकंती
5 May 2020 - 3:34 pm

1

"दिस डज नॉट चेंज एनिथिंग!", मी हॉस्पिटल च्या बेडवर बायकोला म्हणालो. काही तासांनी मला ऑपरेशन थिएटर मध्ये नेऊन डाव्या हाताच्या तुकडे पडलेल्या हाडांची, प्लेट व रॉड टाकून शस्त्रक्रिया होणार होती. "ह्यावर्षी मी कन्याकुमारी राईड करणारच!"

२०१७ च्या मे महिन्यातली ही गोष्ट. निम्मित झालं मित्रपरिवारा सोबत हापुसवाडी, दमामे ला २ दिवस धम्माल करायला जायचं. मुलांसोबत खेळता खेळता अतिउत्साहाच्या भरात क्रिकेट चा चेंडू अडवायला गेलो आणि सॅंडल अडकून पडलो. जागेवर आवाज झाला आणि मला लक्षात आलं की आपलं डाव्या हाताचं हाड मोडलंय!

मग धावपळ करत दापोली गाठलं, नेमका रविवार असल्याने बहुतेक हाड वैद्य सुट्टीवर होते, शेवटी तिथल्या सरकारी दवाखान्यात एक्सरे काढला आणि माझी भीती खरी ठरली! डाव्या हाताच्या एका हाडाचे दोन तुकडे झालेले.

तिथे असलेल्या डॉक्टर ने, ह्यासाठी खेड ला जाऊन ऑपरेशन करून घ्या, असा सल्ला दिला. मी त्याला विचारले, लगेच करायची गरज आहे का? पुण्यात पोचल्यावर केलेलं चालेल? त्याने मग पेन किलर दिल्या आणि पुण्यात जाऊन शस्त्रक्रिया करा अशी परवानगी देखील दिली. दापोलीच्या मार्केट मध्ये पुन्हा पळापळ करून एक स्लिंग विकत घेतला आणि आम्ही परत मुक्कामी हापुसवाडी ला आलो.

आता प्रश्न होता, तो आपण परत जायचं का राहून सगळ्या सोबत निघायचे हा. मी म्हंटल नाही दुखत, थांबुयात इथेच आणि मी तसेच पेन किलर आणि स्लिंग मध्ये २ दिवस काढले.

पुण्यात आल्यावर पुन्हा ऑर्थो कडे जाऊन रीतसर एक्सरे काढून ऑपेरेशन ची तारीख निश्चित झाली. काही तासांच्या शस्त्रक्रियेनंतर हातात प्लेट आणि स्क्रू ने हाडे जोडण्यात आली. आता पुढले २ महिने हात स्लिंग मध्येच राहणार होता. त्यात मी नेमका डावखुरा असल्याने एकंदर प्रकरण अवघड होणार हे तेव्हाच लक्षात आलं.

ह्या सगळ्यापेक्षा, मला मात्र चिंता होती ती, नोव्हेम्बर मध्ये प्लॅन केलेल्या पुणे ते कन्याकुमारी ह्या सायकल सफरीची!

सायकल, शाळे नंतर पुन्हा आयुष्यात आली, ती अगदीच आकस्मिकपणे, २००९ साली. सेथु , माझा मित्र, हा अमेरिकेला कामा निम्मित निघालेला, आणि त्याच्याकडे एक बीएसएची ६ गियर ची सायकल धूळ खात पडून होती. तो म्हणाला घेऊन जा आणि वापर. मी ती धुळीने माखलेली सायकल कशीबशी घरापर्येंत आणली आणि नंतर ती कित्येक महिने तशीच धूळ खात पडून राहिली. एकदा दोनदा तिचे तेलपाणी करून आणले, पण चालवायचा योग आणि मूड आलाच नाही.

तिचा वापर करायला उजाडलं ते म्हणजे २०१३ साल. त्याला कारणीभूत ठरले ते २ मित्र. त्यांनी एंडयुरो ह्या ऍडव्हेंचर रेस मध्ये भाग घ्यायचा ठरवलेलं.

एंडयुरो, ३/३ च्या टिम मध्ये भाग घ्यायची एक ऍडव्हेंचर रेस, अतिशय खडतर रस्त्यावरून साधारण ७० ते १०० किमी सायकल चालवणे, डोंगरातून रात्री ट्रेकिंग करत शेवटी एका तलावात कॅनुईंग करत ही रेस दिलेल्या वेळेत संपवायची असते.

हा मित्र त्या रेस साठी सराव करत होता, मी म्हंटल त्याला कंपनी आणि आपल्या सायकलिंग चा श्रीगणेशा होईल म्हणून त्याच्या सोबत १०/१२ किमी च्या राईड्स करू लागलो. प्रचंड दमछाक व्हायची, साधा चांदणी चौकातला चढ चढताना उतरावे लागे सायकल वरून.

हळूहळू स्टॅमिना वाढला, आणि त्या सायकल वर २०/२५ किमी राईड्स जमू लागल्या. यथावकाश मित्रांनी एनडुरो केली, दुर्दैवाने त्यांना ती रेस अर्धवट सोडावी लागली. त्यातला एकाला भेटल्यावर, त्याच्याशी बोलल्यावर एक जाणवलं, आपणही असं काहीतर भन्नाट करायला पाहिजे! मग तिकडेच त्याने, मी आणि आमचा तिसरा मित्र ह्याने ठरवले, पुढल्या एंडयुरो मध्ये आपण टीम म्हणून उतरायचंच!

एंडयुरो च्या तयारी निम्मित सायकल पुन्हा बाहेर काढली, विकएंडस ला आधी छोट्या मग मजल दर मजल करत मोठ्या राईड करू लागलो, एकदोनदा सिंहगड घाट, नंतर एकदा लवासा, अश्या सराव राईड केल्यावर थोडा आत्मविश्वास वाढला, आणि आम्ही तिघांनी ते एनडुरो ची ऍडव्हेंचर पूर्ण केली! (ह्या बद्दल मी आणि अमित ने एक धागा इथे सुरू केलेला. तो अनुभव पुढे कधीतरी संपवू आम्ही!).

एनडुरो केली ती २१ गियरवाली सायकल भाड्याने घेऊन आणि लक्षात आलं की चांगली हलकी सायकल असेल तर त्याने भरपूर फरक पडतो, म्हणून मग एक नवीन हायब्रीड सायकल विकत घेतली आणि सायकलिंग सुरू ठेवले.

आता सायकलिंग मुळे अजून काही मित्र जोडले गेले, वीकएंड राईड्स होऊ लागल्या, त्यात बीआरएम ह्या सायकलिंग प्रकारची ओळख झाली.

दिलेल्या वेळात दिलेल्या रूट वर सायलिंग करायचे ह्या रेस प्रकाराला ब्रेव्हे (brevet) किंवा रानडोनियरिंग असे म्हणतात. २००, ३००, ४००, ६००, १००० आणि १२०० किमी च्या ह्या ब्रेव्हे चे आयोजन पुण्यातल्या एआयआर (AIR) ही संस्था करते.

२०० किमी १३ तासात, ३०० किमी ची २० तासात असे ह्याचे आखलेले वेळापत्रक आणि पूर्वनिर्धारीत रूट असतो. (ब्रेव्हे बद्दल इथे पुष्कळ लोकांनी लिहिलंय, त्यामुळे त्याबद्दल अधिक माहिती त्या धाग्यांमवर मिळू शकेल).

मी माझी पहिली आणि शेवटची बीआरएम केली तीच सर्वात अवघड समजली जाणारी, मांढरदेव ची २०० किमी.

बाणेर पासून ते वाई एसटी स्टँड आणि परत, मध्ये मांढरदेव कडे जाणारा घाट! साधारण संपूर्ण राईड चे एलिव्हेशन ६००० फूट च्या आसपास!

अर्थातच ही राईड मी वेळेत संपवू शकलो नाही, पुरेशी तयारी न्हवती आणि एकंदरीतच माझी सायकल रमत गंमत फोटो काढत जाण्याची सवय! इथेच मला कळून चुकले की माझ्यासाठी सायकल टुरिंग हेच जास्ती सोयीचं आहे! निवांत सायकल चालवत जाणे हाच माझा पिंड आहे.

मग अर्थातच, एका रम्य शुक्रवारी रात्री, कुठल्याश्या बार मध्ये विषय निघाला "भाई गोवा चलते है! सायकल पे!" झालं, तयारी, प्लॅन आणि विचारचक्र सुरू झालं.

आंतरजालावर लोकांचे अनुभव वाचून मग मी प्लॅन बनवला. कधी निघायचं, रोज किती अंतर कापायचे, रूट काय, राहायचे कुठे हे सगळे बारकावे टिपले. येतानाचं ट्रेन चे बुकिंग झाले. सायकली पुण्यात परत पाठवण्याची व्यवस्था झाली.

आता सुरू झाल्या प्रॅक्टिस राईड्स, कधी सिंहगड घाट, एकदा मांढरदेव, कधी लवासा, अश्या वीकएंड राईड्स करून सराव सुरू झाला.

हो नाही म्हणता म्हणता ७ जण तयार होते. राईड ५ दिवसांची, त्यात सहाव्या दिवशी रेस्ट (आणि अर्थात गोव्यात धम्माल), आणि येताना ट्रेन. सगळ्या राईड सेल्फ सपोर्टेड (थोडक्यात बॅकअप ला कुठला टेम्पो किंवा कार नाही) करायच्या हे आधीच ठरलेलं.

आमच्या पुणे-कोंकण-गोवा रूट साधारण असा होता:
१. पुणे ते महड (ताह्मणी मार्गे) - १३० किमी
२. महड ते गुहागर - १२५ किमी
३. गुहागर ते पावस - १०० किमी
४. पावस ते तारकर्ली - ११० किमी
५. तारकर्ली ते गोवा - १२० किमी

ही राईड अतिशय अविस्मरणीय आणि अनुभव देणारी ठरली, ह्यात भरपूर गमती जमती, काही अवघड प्रसंगातून गेलो, पण राईड शेवटी सुखरूप पार पडली. (ह्या बद्दल पुन्हा कधीतरी)

ह्या राईड ने आता आत्मविश्वास भरपूर वाढला आणि आता पुणे कन्याकुमारी राईड चे सगळ्यांनाच वेध लागले.

पुन्हा प्लॅनिंग सुरू केलं, रूट बघणे, जास्तीतजास्त समुद्रकिनारपट्टी वाले रस्ते निवडणे, दिवसाला साधारण १२० ते १३० किमी पेक्षा जास्ती अंतर होऊ नये म्हणून मग मुक्कामाला कुठल्या गावी थांबता येईल, ह्याची रूपरेखा आणि आराखडा तयार केला. आधीच्या राईड च्या अनुभवावरून मग वाटेत असणारी सायकल दुरुस्त करणारी दुकानांची नावे आणि पत्ते, वाटेत लागलेच तर इमर्जन्सी हॉस्पिटलस वैगेरे हे देखील नोंदवून घेतले. एक प्लांनिंगची मोठी एक्सेल तयार केली. कामांची वाटणी केली, एकाने हॉटेल बुकिंग तर दुसर्याने सायकल परतीचे नियोजन, तर तिसर्याने विमान तिकिटं काढायची जवाबदारी अशी सगळी कामे वाटून घेतली.

आधी ७/८ उत्साही कार्यकर्त्यांनी हो म्हंटलेले, ते गळत गळत फक्त आम्ही ४ उरलो, सेथु, किरण आनंद आणि मी.

२५ नोव्हेंबर, २०१७ ला पुण्यातून प्रस्थान आणि प्लॅन प्रमाणे ८ डिसेंबर ला कन्याकुमारीत आगमन, एक दिवस मुक्काम आणि मग ९ डिसेंबर ला परतीच्या विमान प्रवासाची तिकिटं सुद्धा बुक झाली!

यंदा, कन्याकुमारी होणार, आता प्रॅक्टिस राईड्स चे नियोजन करायला हवे...एवढं म्हणतो न म्हणतो तोच हापुसवाडीत हा अपघात झाला.

पण, फार तर फार २ महिने लागतील बरं व्हायला त्यामुळे मी निर्धास्त होतो, म्हणूनच बायकोला प्लॅन मध्ये काहीही बदल होणार नाही हे ठणकावून सांगत होतो. (हे तिला सांगत होतो का मी स्वतःला समजावत होतो कोणास ठाऊक!). पण पुढे येणाऱ्या संकटांची तेव्हा मात्र मला काडीमात्र कल्पना न्हवती!

क्रमशः

प्रतिक्रिया

मोदक's picture

5 May 2020 - 3:56 pm | मोदक

झक्कास सुरूवात...

पुढील भागाच्या प्रतिक्षेत..!!!

किरण कुमार's picture

5 May 2020 - 3:58 pm | किरण कुमार

येवू द्या अजून , नवीन वाटा , दक्षिण दिशा ,प्रवास आणि अजून ...

प्रशांत's picture

5 May 2020 - 6:08 pm | प्रशांत

मस्त सुरुवात झाली...

लेख लवकर येवु वाट पाहतो (खास करुन फोटो ची)

पु ले शु.

- प्रशांत

स्वतन्त्र's picture

7 May 2020 - 11:00 am | स्वतन्त्र

लिखाण मस्तच ! माझा सायकलिंग चा अनुभव सध्या वीकएंड पुरताच आहे.पुणे ते भोर भाटघर,लवासा,पानशेत इतका आहे.आपल्याबरोबर अशा मोठ्या मोहिमेचा अनुभव घायला आवडेल.

चौथा कोनाडा's picture

8 Jun 2020 - 12:54 pm | चौथा कोनाडा

अतिशय रोचक सुरुवात !
ओघवतं लेखन वाचायला मजा आली !