स्फुटः आठवणी!

राघव's picture
राघव in जनातलं, मनातलं
17 Mar 2020 - 1:29 am

काही दिवसांपुर्वीची गोष्ट. नुकताच लग्न झालेला एक कलीग. जाम वैतागून, तावातावानं, "आयुष्यात काय काडीचा रस राहिलेला नाही.." असं वगैरे म्हणत, आम्हा सगळ्यांचं डोकं खात बसला होता. डोकं खात बसला होता असं म्हणण्याचं कारण म्हणजे, कुणी कितीही काहीही सांगितलं तरी याची ऐकायची काही तयारीच नव्हती. थोडक्यात त्याला जागं करणं शक्य नव्हतं! पण [कितीही मदत करायची ईच्छा असली तरी] उगाच ऐकून घ्यायला अन् कचरा डेपो व्हायला कुणाला आवडेल? मग आम्ही सगळ्यांनी मिळून एक प्लॅन बनवला.. दररोज, हा आला बोलायला, की कुणीतरी मागची एखादी चांगली आठवण काढायची आणि सगळ्यांनी मिळून त्यावर दंगा करायचा! त्यामुळे याचा सगळा मूडच बदलून जायचा आणि ना त्याचा कचर्‍याचा ट्रक व्हायचा ना आमचा कचरा डेपो! काही दिवसात त्याच्या अडचणी त्यानं स्वत:च सुधारणं सुरु केलं आणि एक जरा चांगलं वळण घेतल्या गेलं!

या अनुभवातून अनेक गोष्टी शिकण्यालायक आहेत खरंतर.. पण त्यावेळेस मनांत चमकून गेलेला विचार जणू चांगल्यापैकी कोरला गेलाय, आठवणींत!

आठवणी.. कितीही प्रयत्न केला तरी सामान्य माणूस थोडावेळ का होईना आठवणींत गुरफटतोच अधुन-मधुन! या आठवणी आपल्या आयुष्यात फार फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात, सुप्त मनोवस्थेत.
जसं, कुणाला आपल्या लहानपणी मिळालेली वाईट वागणूक आठवणीत असते, सुप्त मनांत ती आठवण जागृत असते. त्यातून कुणी जगाप्रती अत्यंत कठोर बनतं तर कुणी अतिशय मृदु!

खरंच, आपण आपल्या छोट्याशा आयुष्यात काय केलं आजतोवर.. असा विचार करून बघीतलं तर..?
त्याही पलिकडे जाऊन, आपल्या आयुष्यातल्या चांगल्या/आनंदी आठवणी किती.. असा विचार केला तर?
सामान्यतः माणसाला आपल्या दु:खद आठवणी जास्त लक्षात राहतात. कारण सुप्त मनात त्या बर्‍यापैकी जागृत असतात. आनंदी आठवणी त्यामानानं कमी लक्षात राहतात. कमी जागृत असतात. पण म्हणजे, सुख-दु:खाचा समतोल हा नेहमी दु:खाच्या बाजूनंच कललेला असतो काय?

मला वाटतं सामान्यतः आनंदी घटनांना, त्या घडत असतांना, आपण पुरेसं recognize [मराठी?] करत नाही. जेवढं दु:ख आपण मनाला लावून घेतो, तेवढं महत्त्व आपण आनंदाला देत नाही. किंबहुना, दु:खच लक्षपूर्वक उपभोगल्या जातं.. सुख/आनंद तेवढ्या प्रमाणात नाही.
आता ज्या घटनांना, त्या घडत असतांनाच आपण तेवढं महत्त्व देणार नाही.. तर त्यांना सुप्त मन तरी कशाला तेवढं महत्त्व देईल? :-)

जर आनंदी/घटना प्रसंग. आपण जाणीवपूर्वक उपभोगले आणि दु:खी घटना/प्रसंग दुर्लक्षीत ठेवले तर...? हा दॄष्टिकोनातला बदल आहे आणि त्याला वेळ लागणारच. चांगलंच बघायचं वळण मनाला लावणं म्हणजे हेच असावं.. अर्थात् याचा अर्थ असा अजिबात नाही की दु:खद गोष्टी सरळ सोडून द्यायच्या.. पण मनाला त्यातूनही, जेवढं जमेल तेवढं, चांगलं काय ते शोधायला लावत राहायचं.
जरी अजूनही पुरेसं जमलेलं नाही तरीही, ही सवय खूप मोलाची ठरते एवढं मात्र मी स्वानुभवावरून सांगू शकतो.

जर असा बदल आपल्या दृष्टीकोनात आपल्याला करता आला तर, आयुष्य बरंच चांगलं होऊ शकेल.. आपलंही आणि आपल्या आजुबाजूच्या इतरांचंही, नाही?

इत्यलम्

समाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

Nitin Palkar's picture

17 Mar 2020 - 1:19 pm | Nitin Palkar

खूपच मोलाचे विचार आहेत. पेला अर्धा रिकामा आहे की अर्धा भरलेला आहे हे जसं ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं तसंच, 'कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाण म्हणत, हे ज्याचं त्याने ठरवायचं' हे काविवर्य मंगेश पाडगावकर सांगून गेलेत.
....जरी अजूनही पुरेसं जमलेलं नाही तरीही, ही सवय खूप मोलाची ठरते एवढं मात्र मी स्वानुभवावरून सांगू शकतो- हे वाक्य महत्वाचं आहे आपल्या मनाला 'सकारात्मक विचार करण्याची सवय' आपण प्रयत्नपूर्वक लावू शकतो.
सुप्त मन, बाह्य मन या शास्त्रीय गुंत्यात न जाता देखील, चांगला विचार करू, चांगल्या गोष्टींचा विचार करू, दु:ख अधिक काळ न उगाळत बसलं तर त्याचा नक्की फायदा होतो.
'स्वयं सूचना' हे द. पां खांबेटे लिखित, माजेस्टीक प्रकाशनाचे पुस्तक यासाठी खूपच उपयुक्त आहे.

राघव's picture

19 Mar 2020 - 11:24 am | राघव

धन्यवाद नितीन!

तांत्रिक बाबी सोडल्यात तरी, आनंद उपभोगायला शिकणे हेही खूप मोठे काम आहे.
आनंदाच्या / सुखाच्या कल्पना प्रत्येकाच्या निराळ्या असं म्हणणं जरी वर-वर संयुक्तिक वाटलं तरीही, बहुतांश लोकांच्या सारख्याच असतात.

२ दिवसांचा वीकेंड आहे, करा एन्जॉय.. हे नेहमी कानावर पडणारं वाक्य? काय करायचं असं विचारलं तर, ९०% लोकं "खरेदी, जेवण आणि एखादा पिक्चर" हेच पहिल्यांदा बोलतील. "पुस्तक वाचन, लेखन, संगीत, एखादी कला, पाककृती, घर आवरणं, मुलांसोबत खेळणं, एखादा नवीन विषय शिकणं.." हे विचार आलेत तरी नंतर येतात. :-)

बाकी खांबेटे सरांच्या पुस्तकाबद्दल ऐकून आहे, पण अजून वाचलेले नाही.