दोसतार - ३५

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
30 Jan 2020 - 9:09 am

कोणाला येत नसेल त्याने भौतीक शास्त्रातील न्यूटन चा नियम शिकवा म्हणजे तुम्हाला तो नीट समजेल काय सुषम " सुषम चा आणि भौतीक शास्त्राचा कायमचा युद्धाचा पावित्रा असतो हे आम्हीच काय पण बाइंनाही पण माहीत आहे हे आम्हाला आजच कळले.
"आणि तू काय शिकवणार आहेस"
" मी सातवीच्या वर्गाला समांतर रेषां शिकवणार आहे" एल्प्याच्या या उत्तरावर आम्हीच काय पण तारकुंडे बाईपण अचानक दप्तरात बेडूक दिसल्यासारख्या चमकल्या.

मागील दुवा : http://misalpav.com/node/46021

एल्प्या हे असे काही म्हणेल याची कोणीच कल्पना केली नव्हती. बाइंसारखेच आम्ही सगळेच चमकलो.
"तू आणि भूमिती ? " आंजीचा जबडा आश्चर्याने अगदी दरवाजा उघडावा तसा सताड उघडा झाला . जमणार आहे का! नाही तर आठवी ब चे नाव उगाच खराब करशील. आम्ही कोणी बोलणार नव्हतो पण आमच्या सगळ्यांच्याच मनातली शंका आंजीने उघडपणे मांडली.
"का नाही जमणार? " तारकुंडे बाईंच्या प्रश्नावर चमकायची पाळी आता एल्प्याची होती. " जमेल की. थोडं समजून घ्यावे लागेल इतकेच. आपण प्रत्येकजण काहीतरी शिकत असतोच. एखादी गोष्ट समजायच्या अगोदर अवघडच असते. समजली की ती एकदम सोप्पी वाटते. लहान बाळाला चालता येत नाही. पण चालायला आल्यावर ते घरभर धावायला लागते. तुम्हाला विषय समजला नसेल तर पेपरची भिती वाटते. विषय समजला तर तोच पेपर सोप्पा वाटतो. आणि दुसरे म्हणजे आपण एखादा विषय कोणाला शिकवायला लागलो ना की तो आपल्यालाही नीट समजतो. काय ? पाटील शिकवेल की भूमीती नीट. काय रे शिकवशील ना नीट" एल्प्याचा त्याच्या कानावर विश्वास बसत नसावा बहुतेक. तो एखादी गोष्ट जबाबदारीने नीट शिकवू शकेल असे कोणी कधी त्याला म्हणालेच नव्हते. " तुला काही अडचण आली ना तर मला विचार. तुझी मस्त तयारी करून घेईन." तारकुंडे बाईनी एल्प्यावर इतका विश्वास टाकल्यावर आमच्या चेहेर्‍यावरचे प्रश्नचिन्ह मावळले .
" आणि तू काय शिकवणार रे"
"मी ऑफ तास घेणार. जो त्या दिवशी रजा असेल त्याचा तास मी घेईन." माझ्या उत्तरावर तारकुंडे बाईंनी काही प्रतिक्रीया दिली नाही. बरेच झाले म्हणा तेही. कारण ऑफ तासाला काय घ्यायचे हे कोणालाच माहीत होते.
विषय ठरले. प्रत्येक जण जो जो धडा घेणार होते त्याची तयारी करायला लागले. तसे फार अवघड नव्हते. कारण ते सगळे आम्ही मागल्या इयत्तेत शिकलेलोच होतो.
गायन ,चित्रकला, शारीरीक शिक्षण या विषयांचा प्रश्नच नव्हता. चित्रकलेला राजा ने "देखावा " घ्यायचे ठरवले . त्याची तयारी तो थत्ते सरांकडे जाऊन करायला लागला. थत्ते सरांनी त्याला देखावा , चित्राचा तोल कसा सांभाळायचा, वॉटरकलरने झाडे काढताना ब्रशचा वापर करून पाने फांद्या कशा काढायच्या, माणसांचे ठिपके कसे काढायची याची बरीच माहिती दिली. . चित्रकलेत असे काही असते हे कधी जाणवलेच नव्हते.
सुषम ने न्यूटनचे नियम वाचायला घेतले.
अपी ने इतिहासातली " उंबरखिम्डीतली लढाई " वैजूने नागरीकांची कर्तव्ये , सुम्याने संस्कृतातली सुभाषीतमाला, जयंताने द्वीदल आणि एकदल वनस्पती .
मिल्याने चतुष्पदी , अभ्याने पाचवीच्या वर्गाला इंग्रजी कविता , असे विषय घेतले. प्रत्येकजण तयारी करायला लागले. आठवी च्या इतर वर्गातल्या मुलांनीही काय काय विषय शिकवायला घेतले होते. तारकुंडे बाईंनी सगळ्यांची यादी बनवली आणि सूचनाफलकावर लावली. प्रत्येक जण काहीना काही काम करणारच होता. वाचनालय , प्रयोगशाळा , कार्यालय सगळ्याच ठिकाणी आमच्यापैकी कोणी ना कोणी काम करणार होते. अगदी पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापकही . आठवी क च्या शिराझ ला पर्यवेक्षक तर दत्ताराम मुख्यध्यापक होणार होता.
" त्या दिवशी पोशाख काय करायचा? " टंप्याचा प्रश्न बरोबर होता. शाळेत शिक्षक व्हायचे तर मुलांनी हापप्यांट किंवा मुलींनी फ्रॉक स्कर्ट मधे येवून चालणार नव्हते. हाप प्यांट घालून शिकवायला आलो तर मुले ऐकतील का तरी." निदान शिक्षक वाटायला नको का त्याना आम्ही.
टंप्याला अन्याने दुजोरा दिला. अन्या वर्गात सर्वात उंचीने कमी. माझ्या खांद्याच्याही खाली त्याचे डोके यायचे. वर्गात सगळ्यात पुढे बसला तर त्याला फळा दिसायचा आणि शिक्षकांनाही तो दिसायचा. मला तर तो अगोदर वर्गातल्या कोणाचातरी धाकटा भाऊच वाटला होता. पाचवीतली मुले असतात तेवढा दिसत होता.
मुख्याध्यापक सरांनी एकदा त्याच्या कडे पायापासून डोक्यापर्यंत पाहिले थोडेसे हसले. त्यांनाही अन्याची अडचण समजली असावी. त्यानी मुलांना प्यांट आणि गणवेशाच्या रंगाचा शर्ट आणि मुलींना गणवेशाच्या रंगाच्या साडी ची परवानगी दिली. मुख्याध्यापक सराच्या खोलीतच कोणीतरी जोरात " है...." म्हणाले. काही जण म्हणाले काही गप्प बसले. शिक्षक " है...." म्हणून ओरडतात की कसे ते माहीत नव्हते ना.
शाळेच्या चालू दिवशी नेहमीच्या गणवेशाच्या ऐवजी इतर वेगळे कपडे घातले की आपण तसेही वेगळे दिसतो. इथे तर दिवस भर मिरवायला मिळणार होते.
तयारी करायला बरोब्बर तीन दिवस उरले . मंगळवारी शिक्षक दिन.

क्रमशः

कथालेख

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2020 - 9:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजूभौ लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

सुधीर कांदळकर's picture

2 Feb 2020 - 7:11 pm | सुधीर कांदळकर

मजायेते आहे. माझ्याही आठवणी ताज्या होताहेत.


" टंप्याचा प्रश्न बरोबर होता. शाळेत शिक्षक व्हायचे तर मुलांनी हापप्यांट किंवा मुलींनी फ्रॉक स्कर्ट मधे येवून चालणार नव्हते. हाप प्यांट घालून शिकवायला आलो तर मुले ऐकतील का तरी."

अगदी खरे. शिकवणारा धिप्पाड असेल तर मात्र मुले घाबरून असतात.

रंगतदार लेखन. धन्यवाद. पुभाप्र