एक उनाड भटकंती भाग दोन

श्वेता२४'s picture
श्वेता२४ in भटकंती
29 Jan 2020 - 11:47 am

एक उनाड भटकंती सुरुवात

      त्यादिवशी सकाळी लवकरच उठले. मुलाला आवरुन डे केअर मध्ये पाठवलं. ऑफीसला येणार नसल्याचं कळवलं. याआधी ससुला 1 वर्षाचा असताना आमच्या 20 जणांच्या एकत्र कुटुंबासह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली होती. पण वेळेअभावी कान्हेरी गुंफा बघायला जमलं नव्हतं. त्यामुळे आज आम्ही कान्हेरी गुंफा बघायला जायचं ठरवलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जेवणाची फारशी सोय नसल्याचा अनुभव असल्याने दुपारी जेवायला सोबत पराठे-दही-लोणचं-पाणी असं सगळं बॅकपॅकमध्ये भरुन घेतलं. बोरीवली लोकल पकडली आणि आम्हाला खूपच रोमांचकारी वाटू लागलं. चक्क ऑफीसला दांड्या मारुन आम्ही भटकंती करत होतो! ऑफीसची वेळ निघून गेली असल्याने लोकल बरीच रीकामी होती. निवांत गप्पा मारु लागलो. खूपशा जुन्या आठवणी पुन्हा उजळून निघत होत्या व मन आनंदाने व उत्साहाने भरुन गेलं होतं.
      साधारण पाउण तासात आम्ही बोरीवली स्टेशनवर उतरलो. संजय गांधी उद्यान तसे स्टेशनपासून चालत जाण्याच्या अंतरावर आहे. पण आम्हाला अंमळ उशीरच झाला होता पोहोचायला. त्यामुळे सरळ रिक्षा केली आणि उद्यानाच्या प्रवेशद्वारावर पोहोचलो. मीटरने फारतर 20-25 रु. होतात पण तेथील रिक्षावाले काहीच्याकाही भाव सांगतात तेव्हा याची काळजी घ्यावी.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील दरपत्रक

दरपत्रक

दरपत्रक 2

      नुकताच पावसाळा सुरु झाला होता. एक दोनदा पाऊस पडून गेला होता. तरीही पावसाने अजून जोर पकडायचा होता. वातावरण काहीसे ढगाळ पण कोरडे होते. एकदोनदा पाऊस पडून गेल्यामुळे सर्वत्र हिरवळ व थंडावा जाणवत होता. उद्यानात पोहोचताच आपण मुबंईत आहोत याचा विसर पडतो इतका हवेमधील बदल जाणवायला लागतो.कान्हेरी गुंफा या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बऱ्याच आत आहेत. चालत जाण्यासारखे हे अंतर नाही. अर्थात उत्साही लोकांना पायी भटकायचे असेल तर जाऊही शकतात. पण एकंदरीत तो रस्ता तसा वर्दळीचा नाही. त्यामुळे चालत जाण्याच्या दृष्टीने सुरक्षित वाटला नाही. तीथे पोहोचायला उद्यानाच्या वतीने बसेस आहेत पण खाजगी टॅक्सीवाले शेअरवर मिळतात. माणशी 50रु. घेतात. शिवाय सायकल/टू व्हीलर भाड्यानेही मिळतात. आम्ही शेअर टॅक्सीने गेलो.

      संजयगांधी राष्ट्रीय उद्यानात फिरायला यायचं तर सकाळी 9 पर्यंत येऊन कान्हेरी गुंफा पहाव्यात. दुपारी द्यानात परत येऊन जंगल सफारी करावी व तलावात बोटींग करावे. बोटींग संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच आहे. यानुसार प्लॅनिंग केले तर एका दिवसात येथील मुख्य आकर्षणे पाहून होतील. पण खरं सांगायचं तर राष्ट्रीय उद्यानाचा हा परीसर अतीशय रमणीय आहे व निवांत फिरावा असा आहे. आमची गाडी हिरव्यागार जंगलातून मार्गाक्रमण करत होती. काही अंतरावर रस्त्याच्या बाजूला रानमेवा विक्रेते बसले होते. एकंदरीत रस्ता चांगला होता. आमचे आपापसातील हितगुज संपून निसर्गाशी हितगुज सुरु झाले.
टॅक्सितून घेतलेले काही परिसराचे फोटो
टॅक्सितून परिसराचे घेतलेले फोटो

टॅक्सितून परिसराचे घेतलेले फोटो क्र2

उद्यानात परिसरात दिसलेली काही घरे
उद्यान परिसरातील घरे

रानमेवा विक्रेते
रानमेवा विक्रेते
      10-15 मिनिटात आम्ही कान्हेरी गुंफा येथे पोहोचलो. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर तिकीटघर आहे. माणशी 15 रु. तिकीट आहे. ही जागा परिरक्षणासाठी भारतीय पुरातत्वखात्याच्या नियंत्रणाखाली आहे. हा परिसर अतीशय स्वच्छ आहे. नवे बांधकाम सुरु होतो. जवळच एक टपरीवजा हॉटेल व बाजूला बसण्याची व्यवस्था करणारे दगडी बांधकाम चालू होते. त्यामुळे तिथे प्रवेश निषिद्ध होता. हॉटेलच्या उजव्या बाजुला थोडे चालत गेले की, स्वच्छतागृहाची सोय आहे. पिण्याच्या पाण्याचीही सोय आहे. एकंदरच योणाऱ्या पर्यंटकांच्या सोयीचा इतका विचार केला आहे हे पाहून आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. एव्हाना सव्वाबारा वाजले होते त्यामुळे आम्ही जेऊनच लेणी बघायला जायचे ठरवले. इथे एकमेव हॉटेल असून ते काही फारसे चांगले नाही. बटाटेवडे, समोसा व मिसळ असे काही मोजके पदार्थ तेथे खाण्यासाठी मिळतात. तर बिस्कीट,चहा,कॉफी,पाणी व निवडक शीतपेये मिळतात. या हॉटेलमध्ये असलेल्या बैठकव्यवस्थेवर आम्ही सोबत आणलेल्या दही-पराठेंचा आस्वाद घेतला. या परिसरात माकडांचे प्रमाण खूप आहे. आपल्या आसपास माकडे सतत फिरत असतात त्यामुळे सावध राहावे लागते. पोटोबा झाल्यानंतर आम्ही गुफांकडे प्रयाण केले.
एकमेव हॉटेल
एकमेव हॉटेल
दगडी बांधकाम व माकडांचे फोटो
दगडी बांधकाम व माकडांचे फोटो

प्रतिक्रिया

पियुशा's picture

29 Jan 2020 - 12:13 pm | पियुशा

मी पयली , लैच excitment वाटते न अस काही करायचं म्हणजे :) फोटो अजून द्या की भरभरून :)

गवि's picture

29 Jan 2020 - 12:45 pm | गवि

भटकंती छान.

पुढील वेळी या ठिकाणी ज्येष्ठ मिपाकर श्री रा रा प्रचेतस यांस घेऊन जावे.

भरपूर तंगडतोड करवतील परंतु त्या गुंफांचा कानाकोपरा स्कॅन करून उलगडून दाखवतील. लेणी वगैरे म्हटलं की हा कामाचा मनुष्य कामातून जातो.

पियुशा व गवि प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पुढच्या भागात अधीक फोटो पाहायला मिळतील.

तुमची भटकंती वाचून इतरांना हुरहुरी येणारच.
--------
काय भयानक आहे दरपत्रक,सुचनापत्रक,,सरकारी,,पत्रक!
पैसे ,शुल्क वाढलेत तर आता जे आहे तेच लिहा ना. शिवाय ते ५३, ५९ , ३१ ,८९ वगैरे रुपये जिएसटी धरून असो पण सुटे कोण देणार? सरळ २०, ५०, १०० ठेवावेत.

--------
पूर्वी काही गोंधळ नसायचा. बोरिवली स्टेशनबाहेरच एका मोठ्या BEST BUS मध्ये बसायचो , कंडक्टर तिकिटे द्यायचा गेट/लायन विहार/ मिनीट्रेन/गांधी टेकडी/शेवटचा स्टॉप कान्हेरी. बस गेटवर पोहोचली की वनखात्याचा माणूस आत येऊन प्रवेश पावती द्यायचा. झालं काम. तिकडे लेणी पाहून लोक जेवणाचे डबे उघडत. दोन वाजता परत वाटेत गांधी टेकडी . इथे गुलाबांची प्रचंड बाग. ती पाहून मागे यायचं पार्कात. तिकडे मग चहा,पेय,, वडे, भेळ झालं की नौकानयन मग बाहेर. रानमेवा एप्रिल मेमध्ये. कैऱ्या, करवंदे,जांभळे. मडक्यातले मसाला आवळे प्रसिद्ध.
अगदी स्वस्तात भरपूर मजा. आम्ही कान्हेरीच्या मागे तुळशी तलाव दिसतो तिकडेही भटकलोय. आतल्या का भागात मोठेमोठे आश्रम , मठ स्थापून जागा बळकावलेल्या. काजू नारळ फणस आंबे लावून वाड्या/ मठ केलेले गुरु लोक. छोटी राधाकृष्ण, मारुतीची देवळे. त्यांच्या दर्शनासाठी श्रीमंत शेठ शेठाणी .सुग्रास भोजनाची सोय. आता यांना पर्यायी जागा डोंबिवलीत देण्यासाठी जवळच एक गाव वसवलेले. स्थानिकांनी विरोध केला.
आता गांधी उद्यानात रस्ता सोडून जाऊ नका म्हणतात. दंड होईल! आत गावं वसलीत.

श्वेता२४'s picture

29 Jan 2020 - 2:12 pm | श्वेता२४

नवीन माहिती. दरपत्रक जाणाऱ्यांना उपयोगी पडेल म्हणून मुद्दाम दिले आहे

कंजूस's picture

29 Jan 2020 - 3:45 pm | कंजूस

होय खरंच उपयुक्त.

सुधीर कांदळकर's picture

29 Jan 2020 - 6:05 pm | सुधीर कांदळकर

माझ्या शाळेतल्या सहलींच्या आठवणी जागविल्यात. तेव्हा १८८ कमांकाची बस होती. ६५ की ८० पैसे म्हणजे खूप रकमेचे तिकीट होते. प्यायचे पाणी विकत मिळे. बसने जाऊन लेणी पाहायची, नंतर सतरंज्या अंथरून झाडाखाली बसायचे. सोबत आणलेले डबे उघडून भोजन करायचे, नंतर तासदोनतास उभा खोखो वगैरे खेळ, चालत परत येतांना गांधीजींची छत्री पाहायची आणि नंतर उद्यानात यायचे असा कार्यक्रम असे. छत्रीच्या प्रवेशस्थानी स्तूपांना प्रवेशाशी असते तसे दगडी तोरण होते. अजून आहे का? वर जाणारा पायर्‍यापायर्‍यांचा मनोहर रस्ता छत्रीकडे नेई.

संजय गांधी य्द्यानात एक प्राणीसंग्रहालय होते. तिथे चितळ, सिंह वगैरे प्राणी होते. मुख्य म्हणजे छोट्यंसाठी वनराणी नावाची मिनी टॉय रेलवेगाडी होती. नंतर कधीतरी प्राणी जिजामाता उद्यानात हलवले आहेत अशी बातमी होती.

मस्त लेख आणि चित्रे फारच आवडली. धन्यवाद.

प्रचेतस's picture

31 Jan 2020 - 8:15 am | प्रचेतस

छान लिहिताय.
मिपाकरांसोबत केलेल्या कान्हेरी लेणी भटकंतीच्या आठवणी जाग्या झाल्या.

मित्रहो's picture

2 Feb 2020 - 12:19 am | मित्रहो

छान सहल.
२००२-३ मधे आम्ही बोरीवलीला नॅन्सी कॉलनी परिसरात राहत होतो. तेव्हा संजय गांधी उद्यानात कितीतरी भटकंती केल्या असतील. बहुधा पायीच. सार्‍या आठवणी जाग्या झाल्या

मस्त भटकंती.
उद्यानातील हिरवाई खूपच छान आहे.
आणि महाराष्ट्रात असून देखील अंकासह सगळी पाटी मराठीत आहे हे पाहून आश्चर्य वाटले.

जाताजाता - एखाद्या प्रसिद्ध उद्यानाला नाव देण्याइतपत योगदान होते का असा विचार मात्र मनात आला.

कुमार१'s picture

2 Feb 2020 - 11:39 am | कुमार१

मस्त भटकंती.

श्रीरंग_जोशी's picture

5 Feb 2020 - 10:52 pm | श्रीरंग_जोशी

स्थलवर्णन आवडले.

दरपत्रकानंतरच्या पहिल्या फोटोत झाडापलिकडे रेल्वेरुळ आहेत का?

श्वेता२४'s picture

5 Feb 2020 - 11:00 pm | श्वेता२४

बरोबर आहे