'तंबोरा' एक जीवलग - ९

गौरीबाई गोवेकर नवीन's picture
गौरीबाई गोवेकर नवीन in जनातलं, मनातलं
24 Jan 2020 - 2:54 pm

सारांश काय तर गळ्यात सूर हवा. सच्चा सूर निरागसच असतो. त्याला बळेच निरागस करता येत नाही. त्या गाण्यात त्यांना बहूतेक, 'माझ्या कंठात असा निरागस सूर वसूदेत' असं गणपतीला म्हणायचं असावं. माझ्या गळ्यातला सूर निरागस होवो याला काही अर्थ नाही. म्हणजे आधी लुच्च्या होता तो निरागस होवो. अशक्य. काहीजण अस्सा निरागस सूर आधीच्या भागात सांगितलेल्या सगळ्या गुणवत्तेसकट कंठात घेऊनच जन्माला येतात. याला दैवी नाही तर काय म्हणावे! हे लिहिताना अशा मी काही ऐकलेल्या गवय्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणि सूर कानात गुंजतो आहे. त्या आगोदर मी न ऐकलेल्या पण ज्यांच्या सुराबद्दल ऐकलेल्या गवय्यांबद्दल. आईकडून सूरांच्या बाबतीमध्ये ऐकलेलं पहिलं नाव म्हणजे जयपूर घराण्याचे हैदरखां साहेब. तसा सूर कुणाचाच नाही ऐकला आजपर्यंत असं ती म्हणत असे. मी त्यांना प्रत्यक्ष कधीच ऐकलेलं नाही. दुसरे नांव त्याच घराण्याचे मंजीखां. त्यांचाही सूर अप्रतिम होता. दुसरे म्हणजे बडे गुलामअली खां साहेब. एवढा बलदंड देहाचा मनुष्य पण सूर्‍ असा की जणू रेशमाच्या लड्या उलगडतात की काय असा सुरेल, पल्लेदार, मुलायम. ते म्हणे गाणं करायच्या आधी पैलवानच होते. तशाच लक्ष्मीबाई म्हणून एक गायिका होत्या. बडोदा सरकारच्या राजगायिका. त्यांचाही सूर अत्यंत मुलायम, गोड.

उस्ताद अमानालींचा सूरही असाच लोभसवाणा. अख्तरीबाई, बालगंधर्व, ही सगळी मंडळी अशीच कंठात सूर घेऊन जन्माला आलेली. त्या पुढच्या मंडळीत चित्रपट संगीतात राजकुमारी आणि शमशाद बेगम यांचा सूरही असाच लोभसवाणा होता. त्याहीपुढे आशा भोसले आणि लताबाई. अशी ही दैवदत्त सूर घेऊन आलेली मंडळी. अशा तयार सुरांना शास्त्राचेच संस्कार काय ते करावे लागले असतील. पण मुळ पाया घेऊनच आलेली ही मंडळी.

या सर्व पार्श्वभूमीवर एक गमतीशीर आठवण येते आहे. आमचे खां साहेव स्वतः उत्तम तबलिये होते. उत्कृष्ठ तबला वाजवायचे. हिंदी सिनेमाच्या एका संगितकाराच्या पत्नी अशाच शास्त्रीय गाण गायच्या. एकदा त्यांची मैफिल होती कुठेतरी. कसं कोण जाणे पण आमच्या खां साहेबांना कुणीतरी गळ घातली की त्या बाईंना तबल्याची साथ करा. आता ज्याने विनंती केली त्याची ती विनंती अव्हेरण्यासारखी नव्हती. गेले. वाद्ये लागली. बाईंनी सूर लावला. गाणे सुरू झाले. पण बाई मुळीच सुरात गाईनात. त्या पलिकडे त्या तालालाही चुकू लागल्या.प्रत्येक वेळेस सम येऊन गेली की सावकाश त्या समेवर येत किंवा कधीकधी आधीच खाडकन समेवर येत. हा प्रकार थोडावेळ सहन केल्यावर खांसाहेबांनी वाजवणे थांबवले. तबल्यावर डग्गा उपडा घातला आणि म्हणाले, "बाईजी आपके गानेको ना किसी तबले की जुरूरत है ना कोई साज की आप उसके बगैर ही गाईये. ये हम चले." असे म्हणून ते निघून आले बाईंची प्रतिक्रिया बघायला ते तिथं थांबलेच नाहीत.

आता या उलट राजकुमारींबद्दल सांगते. त्या काही शास्त्रीय गाणं शिकलेल्या नव्हत्या मुळीच. तालिम घेतलेलीच नव्हती. पण गळ्यात सूर होता बाइंच्या. माझी त्यांची भेट झाली तेंव्हा माझ्या विनंती खातर त्या थोडे गायल्या. एक बंदीश आणि एक ठुमरी. पण सूर किती गोड. कंठात जणू शुगर फॅक्टरीच. फार फार गोड. अजूनही तो सूर कानात आहे. त्यांच्याविषयीच्या आणखी काही आठवणी आहेत त्या सांगेन कधीतरी.

एकंदरीत काय सूर हा आमच्या कलेचा पाया. कुंभाराचा चिखल. तो कुणी घेऊनच आलेलं तर कुणी मेहनतीनं त्याच्यावर हुकूमत मिळवलेली. मऊसूत लोण्यासारखा चिखल असेल तर कोणत्याही घाटाचा घट असो. कुंभाराला सहज शक्य होतं तो घडवणं. अशा गळ्यात घेऊनच जन्माला आलेल्या सूराला दैवी सूर म्हणतात. अशांनी नुसता षडज लावला की त्याचा साक्षात्कार होतो. ऐकणार्‍याची तंद्री लागते. मग तो फिरायला लागला की त्याच्या रसमय जाळ्यात ऐकणारा गुरफटत जातो. गुंतत जातो. मधाची सुगी होते. भान हरपते हळुहळू. पूर्वी ध्वनीमुद्रण नव्हते तेव्हा. असे कितीतरी अलौकीक सूर काळाच्या ओघात गेले असतील असे वाटून विषण्ण वाटतं खरं पण जी ध्वनीमुद्रणे उपलब्ध्द आहेत ती आशेचा किरण दाखवतात. असा निरागस सूर या भारतमातेच्या कुशीत निपजत राहो म्हणजेच सूर निरागस हो.

गौरीबाई गोवेकर.

क्रमशः

कलालेख

प्रतिक्रिया

अनिंद्य's picture

24 Jan 2020 - 7:25 pm | अनिंद्य

लेखनाची वाट पाहत होतो. नावे वानगीदाखल मोजकीच घेतली असावीत, तुमच्या आठवणीत आणखी दैवी सूर असणार यात शंका नाही.

अगदी मधाची सुगी केलीत तुम्ही. _/\_

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

28 Jan 2020 - 1:43 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

दैवी सूर अनेक ऐकले पण त्यात अधिकाधिक विविध गुण असलेल्यांचा उल्लेख केलाय. नाहितर कुणात गोडवा आहे तर पल्ला नाही, कुणात पल्ला आहे तर दमसास नाही असं....

मुक्त विहारि's picture

24 Jan 2020 - 9:09 pm | मुक्त विहारि

काही कला जन्मजात असतात. पण योग्य गुरू मिळाला की आयुष्याचे सोने होते.

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

28 Jan 2020 - 1:44 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

गुरूशिवाय पैलू कसे पडतील!

सुधीर कांदळकर's picture

25 Jan 2020 - 6:59 am | सुधीर कांदळकर

सच्चा सूर निरागसच असतो. त्याला बळेच निरागस करता येत नाही.

छान. अगदी खरे.


.............. तर कुणी मेहनतीनं त्याच्यावर हुकूमत मिळवलेली.

हे मात्र पटले नाही. तो निसर्गदत्तच असावा लागतो. नाहीतर मग मीही गायक झालो असतो की.

लेखातले सूर मात्र छान जुळ्ले आहेत. धन्यवाद. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

इथं मी जन्मजात सूर आणि मेहनतीने कमावलेला आवाज याच्यातील फरक सांगत होते. मेहनतीने सूर आणता येत नाही पण हुकूमी आवाज आणता येतो. केसरबाईंचेच उदाहरण पुरे आहे त्यांच्या आवाजाला पुष्कळ मर्यादा होत्या. दमसास कमी होता. हे तर सर्वश्रुतच आहे. त्या कारणाने खां साहेब अल्लादियाखां त्यांना सुरवातीला विद्या द्यायला तयार नव्हते. पण मग मोठ्या मुश्किलीने शिकवायला तयार झाले. बाईंच्याकडे अफाट जिद्द होती. अमर्याद मेहनत करायची तयारी. या बलस्थानांमुळे पुढे काय इतिहास घडला ते माहितच आहे. आपल्या गाण्यातल्या कमकूवत बाबी इतर नेत्रदीपक बाबींनी कशा झाकायच्या हे खां साहेबांनी शिकवले त्यांना अखेरीस. सबब त्यांची मैफल रंगली नाही असे होत नसे.

सुधीर कांदळकर's picture

28 Jan 2020 - 6:43 pm | सुधीर कांदळकर

माहितीत भर घातल्याबद्दल धन्यवाद.

श्वेता२४'s picture

25 Jan 2020 - 5:08 pm | श्वेता२४

प्रत्येक वेळेस सम येऊन गेली की सावकाश त्या समेवर येत किंवा कधीकधी आधीच खाडकन समेवर येत.
कल्पनाच करवत नाही.श्रोते कसं काय ऐकत होते?
असे म्हणून ते निघून आले बाईंची प्रतिक्रिया बघायला ते तिथं थांबलेच नाहीत.
बरोबर केलं खांसाहेबांनी. त्या बाईंची प्रतिक्रिया कल्पून हसायला आलं. पु.भा.प्र.

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

28 Jan 2020 - 1:56 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

तो सारा प्रकार गमतीशीरच होता. श्रोतेही हौशीच होते. दर्दी एखादा असता तर कळले असते. मोठ्या संगीतकाराची पत्नी इतकच काय ते जमेचं होतं.

अनिंद्य's picture

22 May 2020 - 1:41 pm | अनिंद्य

ही मालिका पुढे सरकली तर खूप आनंद होईल.