आर्टिकल १५ - जात नाही ती जात

Primary tabs

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
आर्टिकल १५ - जात नाही ती जात
काहब तो लगी जाये धक से
काहब तो लगी जाये धक से
बडे बडे लोगन के महला दो महला
बडे बडे लोगन के महला दो महला
और भय्या झूमर अलग से
हमरे गरीबन की झुग्गी झोपडिया
आंधी आये गिर जाये धड से
बडे बडे लोगन के हलवा पराठा
और मिनरल वॉटर अलग से
हमरे गरीबन की चटनी और रोटी
पानी पिये बालु वाला नल से
बडे बडे लोगन के इस्कूल कालिज
और भय्या ट्यूसन अलग से
हमरे बचवन के जिम्मे मजुरी
काते है का हुई पढके
काहब तो लगी जाये धक से
काहब तो लगी जाये धक से..

धुंवाधार पडणारा पाऊस. एका खोपटात गळक्या छपरातून येणार्‍या पाण्याच्या धारा झेलत चमकदार डोळ्यांची काळीसावळी ती आणि तिचे सहकारी जमून गात आहेत. ढोलकी चिपळ्यांची साथ आहे. काहब तो लगी जाये धक से .. पाऊस वाढतोच आहे. आजूबाजूला पावसात हुंगणारी डुकरे, निळ्या कोटातला आंबेडकरांचा पुतळाही चिंब झाला आहे. पिवळ्या रंगाची एक स्कूल बस पावसातच कुठेतरी जाते आहे. तिच्यातल्या भेदरलेल्या त्या मुली. कोवळ्या शरीराच्या बालिका. कुणीतरी त्यांना जवळ खेचते, खाडकन थोबाडीत मारते. धावत्या बसमधील त्या घाबरलेल्या, असाहाय्य मुली..

बदायूँमध्ये झालेल्या सत्य घटनेवर आधारित ‘आर्टिकल १५’ची सुरुवात अशी घट्ट पकड घेणारी आहे. ती पकड संपूर्ण चित्रपटभर कुठेही ढिली होत नाही, हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य. भारतीय संविधानातले आर्टिकल १५ आपल्याला सांगते की जात, धर्म, लिंग, जन्मस्थळ वगैरे कोणत्याही निकषावर लोकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही. कोणालाही कोणत्याही स्थळी या निकषांवर प्रवेशाला बंदी केली जाणार नाही. उपाहारगृहे, पाणवठा, विहिरी आशा ठिकाणी सगळ्या लोकांना मुक्त प्रवेश असेल वगैरे वगैरे वगैरे... हे वाचायला खूप पुरोगामी, प्रगतिशील विचारांचे वगैरे वाटते खरे, पण वस्तुस्थिती काय आहे?

या लालगावमध्ये अॅडिशनल कमिशनर म्हणून दिल्लीहून अयान रंजनची तात्पुरती बदली झाली आहे. बदली कसली, शिक्षाच म्हणायची. गाडीत ड्रायव्हर आणि शिपाई निहार सिंग आहेत. अयान आधी गावाकडच्या निसर्गसौंदर्यावर खूश वगैरे होतो. जातानाच एका गावातून पाण्याच्या बाटल्या घेताना त्याला त्याचा ड्रायव्हर "ते खालच्या जातीच्या लोकांचं गाव आहे, हे लोक डुक्कर पाळणारे आहेत" असे सांगतो. यांच्या हातचे पाणीही प्यायचे नसते, त्यांची सावलीही आपल्या अंगावर पडू नये असा संकेत आहे. आयन तेथून पाणी घेतो खरा, पण त्याला आता जातिव्यवस्थेची थोडी चुणूक दिसू लागली आहे. त्याच्या रस्त्यावर महंतजींचा मोठा आश्रम उभा राहतो आहे. पोलीस ठाण्यावर सर्कल ऑफिसर ब्रह्मदत्त सिंग त्याच्या स्वागताला उभा आहे. इतर लोकांमध्ये अंशू नहारियासुद्धा आहे. पोलीस ठाण्याचा सन्माननीय कंत्राटदार.

अयानच्या स्वागताच्या पार्टीतच त्याला ‘खालच्या’ जातीतल्या बेपत्ता झालेल्या तीन मुलींबद्दल माहिती मिळते. दुसर्‍या दिवशी त्यापैकी दोन मुली झाडाला लटकताना दिसतात. त्या मुलींचे समलैंगिक संबंध होते आणि त्यांच्या बापांनीच त्यांना मारून झाडावर टांगले, असे पोलीससुद्धा आणि विशेषत: पोलीस म्हणत असतात. तिसरी मुलगी गायब आहे. अयान या सगळ्याच्या तळाशी जाऊन चौकशी करतो, तेव्हा त्याला यामागचे भयानक, हिडीस सत्य दिसू लागते. या मुली अंशू नहारियाच्या रस्ता तयार करण्याच्या कामावर असतात. तेथे त्या पगार वाढवून मागतात, म्हणून नहारिया त्यांच्या मुस्कटात मारतो. मग या मुली ते काम सोडून कातड्याच्या कारखान्यात काम करायला लागतात. पण हे तर बंडच झाले. नहारियाला हे सहन होत नाही. मजुरीमध्ये तीन रुपये वाढवा म्हणून त्या दोन मुलींनी मालकाला विनंती केली आणि म्हणून त्यांना.. किती? अयानचा कानावर विश्वास बसत नाही. किती? तीन रुपये. तीन?

आणि मग पोलीस केस दाखल करतात ती या मुलींच्या बापांवर. ते लोक अयानला भेटायला येतात. गरीब, लाचार, पिळवटले जाणारे वाढलेल्या दाढ्यांचे, मळक्या, फाटक्या कपड्यांचे, रापलेल्या चेहर्‍यांचे, पाणावलेल्या डोळ्यांनी हात जोडून थरथरत्या आवाजात "हमरे बिटिया की हत्या हुयी है, साहब" असे म्हणत न्यायाची अपेक्षा करणारे लोक? ‘कीडे और मकोडे जैसे लोग बेचारे, घिसते घिसते फट जाते है, जूते जैसे लोग बेचारे, पैरों में पहन जाते है, जलसे और जुलूसो में संगेरों से सिले सिपाही, वर्दी की मल्बुसोमें, गोली से जो फट जाते है, चितडों जैसे फेक दिये जाते है.... लोग बेचारे’

पोलीसी असंवेदनशीलता, सुस्ती आणि मग्रूरी, कोडगेपणाने ‘एन्क्वायरी चल रही है सर’ किंवा ‘जवाब दे देंगे सर’ असे म्हणणे, मृतदेह झाडावरून खाली उतरवताना दोरीच्या गाठी सुटत नाहीत हीच मोठी अडचण वाटणे, ‘सूत्रोंसे पूछकर बताना’ असली भाषा.. यावर आता इतके सगळे बघून, वाचून झाले आहे, तरीही ‘आर्टिकल १५’ बघताना आतमध्ये कुठेतरी काहीतरी हलते. मृत मुलींवर सामूहिक बलात्कार झालेला आहे, काही दिवस केला गेलेला आहे असा रिपोर्ट लिहिणार्‍या प्रामाणिक डॉक्टरवर येणारा पोलीसी दबाव, ‘आप भावुक हो रही है मालतीजी. देखिये क्या कीजिये, फेसबुकपर दो चार कविता लिख डालिये, सब निकल जायेगा’ ही मग्रूरी, तिच्या वरिष्ठांना धमकी देणे हे सगळे.. राजकारण्यांबद्दल तर काय बोलावे? कधी कुठे कशाचे भांडवल करता येईल यापलीकडे त्यांना कशाचे सोयर आणि विशेषत: सुतक असते का? असलेच सगळे ‘आर्टिकल १५’ मध्ये दिसते. दलित नेत्यांबद्दल बोलताना ‘सत्ता में रहते हैंं तो अपना मूर्ती पे मूर्ती बनवाते रहते हैंं’ हे कोणाबद्दल म्हटले आहे हे सांगण्याची गरज नाही. बाकी स्थानिक कंत्राटदार आहेत, त्यांना पाठीशी घालणारे बाहुबली नेते आहेत, 'इन बातोंमे आप क्यूं उलझ रहे हैंं सर? आपसे निवेदन हैंं सर, संतुलन मत बिगाडिये...'

‘आर्टिकल १५’ नोकरशाहीतल्या सुस्तपणावर, हांजीहांजी संस्कृतीवर आणि लाळघोटेपणावर प्रहार करतो. अयान त्याच्या जुन्या मित्राला मोटरसायकलवरून सोडायला निघतो, तेव्हा त्याच्या हाताखालच्या लोकांची धांदल उडते. आपल्या वरच्या अधिकार्‍यांचे जेवण, ‘लंच’, त्यांचे चायपानी, आराम यातच गुरफटलेल्या बाबू संस्कृतीने या देशाला कसे पोखरून टाकले आहे हे माहीत नाही असे नाही, पण ते असे बघायला लागले की अस्वस्थ व्हायला होते. प्रेक्षकांना अस्वस्थ करण्याचे सामर्थ्य असणे हे चांगल्या चित्रपटाचे एक लक्षण मानले पाहिजे. त्या न्यायानेही ‘आर्टिकल १५’ चांगलाच चित्रपट वाटतो.

आजकालच्या चित्रपटांचे, अगदी सरसकटीकरण करून बोलायचे तर एक वैशिष्ट्य असे की त्यांतल्या लहानसहान, अगदी दुय्यम भूमिकाही अगदी चांगल्या लिहिलेल्या असतात आणि त्या करणारे कलाकारही तितक्याच ताकदीचे असतात. मनोज पहावा या अभिनेत्याला आजवर मुख्यत: विनोदी भूमिकांमधून पाहिले आहे. या चित्रपटात तो खलनायक म्हणून तितकाच प्रभावी ठरला आहे. (या अभिनेत्याने ‘पहावा’ असा अभिनय केला आहे अशी कोटी येथे सुचणे नैसर्गिकच आहे!) त्याचे वारंवार ‘इन फॅक्ट’ म्हणणे, फाईल बंद करण्याची घाई करणे, पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट कोठे आहे असे आयनने विचारल्यावर सुस्तपणे ‘आ जाएगी सर’ म्हणणे हे सगळेच एका टिपिकल भ्रष्ट पोलीस अधिकार्‍याचे वाटते. त्याची देहबोलीही मुद्दाम बघावी अशी आहे. कुमुद मिश्रा, सयानी गुप्ता, मोहम्मद झिशान आयूब, निसार यांच्याही भूमिका सरस आहेत. चित्रपटातले संवादही शांतारामी बटबटीतपणातून सनी लेओनी (किंवा या ताईंच्या आडनावाचा जो काही उच्चार आहे तो)च्या उल्लेखापर्यंत पोहोचले आहेत, हेही नसे थोडके. सयानी गुप्ता गौराच्या भूमिकेत कमाल करते. तक्रार घेऊन आलेल्या लोकांसमोर चहा पिताना अयान निर्विकारपणे "मुझे अफसोस हैंं" म्हणतो, तेव्हा गौरा तेवढ्याच थंडपणे "होना भी चाहिये सर" असे म्हणते आणि अयानबरोबर आपणही चमकून वर बघतो. स्वत: खालच्या जातीचा असलेला पण ‘त्यांच्यापेक्षा’ वरच्या जातीतला जाटव म्हणतो की "नाही, पण काही करा सर, हे लोक सुधारणार नाहीत. हे लोक.." तेव्हा अयानचा स्फोट होतो. "कौन हैंं ये लोग? ज्युपिटर से आये हैंं? गेट द फक आऊट ऑफ हिअर" आयुष्मान खुराणा कोणत्याही भूमिकेत अगदी सहज शिरतो. येथेही त्याने कमाल केली आहे.

भारतीय संस्कृतीला जातीचे वावडे नाही. आता तर इतकी जनजागृती, लोकशिक्षण वगैरे झाल्यानंतर काहीशा हताशपणाने आपण जातीला आपल्या असण्याचाच एक भाग म्हणून स्वीकारले आहे. तरीही ‘आपण’ आणि ‘ते’ असे ऐकताना प्रत्येक वेळी प्रत्येक सजग मनाला ठेच लागते, किमान लागायला हवी. ‘ते’ हे नेहमी दलितच असतील असे नाही. ते मुसलमान असतील, ख्रिश्चन असतील, नास्तिक असतील किंवा समलैंगिक असतील. पण ‘ते’ आपले असणार नाहीत. ही ठेच लागून काही लोक नव्याने रक्तबंबाळ झाले तरी अशा चित्रपटांच्या निर्मितीचे सार्थक झाले असे म्हणता येईल. सब बराबर बन जायेंगे तो राजा कौन बनेगा? हा प्रश्न आहे. होता आणि आहे. मग त्या दलितांनी मंदिरात प्रवेश केला म्हणून त्यांना बेदम मारहाण करणारे हात महंतजींच्या शिष्यांचे असोत की आणखी कुणाचे. काय फरक पडतो? सब बराबर बन जायेंगे तो राजा कौन बनेगा? ब्राह्मण कोण? क्षत्रीय कोण, वैश्य कोण.... ’इन लोगोंको औकात में नाही रख्खेंगे सर, तो काम ही नाही हो पायेगा’ ‘और औकात क्या है? ‘जो हम देते है वही औकात है सर’ या दुर्दैवी लोकांच्या बाजूने लढणारी गौरा आहे, भीम संघर्ष सेना आहे, तिचा नेता निशाद आहे. मोहम्मद झिशान आयूबने निषादच्या भूमिकेला झळाळी दिली आहे. पण अशा संघर्षांची परिणती जशी व्हायची तशीच होते.

‘आर्टिकल १५’मधील निसर्ग अंगावर येतो. पाऊस, धुके, दलदल, चिखल यातून माणसाइतकाच क्रूर असलेला निसर्ग समोर येतो. छायाचित्रकाराला पहिल्या वर्गात उत्तीर्ण केले पाहिजे. अंधारात चालणार्‍या पोलिसांच्या गाड्या, त्यांच्या प्रकाशात दिसणारे काही, त्या मागे न दिसणारे पण जाणवणारे आणखी काही हे सगळे इवान मुलीगन याने फार छान टिपले आहे. आयनच्या विजेरीच्या प्रकाशात आपण फिरतो आणि काय दिसेल, काय अंगावर येईल या कल्पनेने शहारायला होते. गव्हाच्या लोंब्या, पाण्याची डबकी , फ्लॅशलाइटच्या प्रकाशातले लोकांचे चेहरे यांवरून छायाचित्रकाराचा कॅमेरा अर्थपूर्णपणे फिरतो. हा निसर्ग पहिल्यांदा बघताना अयान ‘इट्स लाइक वाइल्ड वाइल्ड वेस्ट’ असे म्हणतो. पण हा जंगलीपणा फक्त निसर्गात आहे असे नाही. लोक, लोकांची मने, इथल्या सामाजिक यंत्रणा या सगळ्याच आदिम, जंगली आहेत. येथे बळीचा कायदा चालतो. पोस्ट मॉर्टेम झालेल्या मुलींचे देह सायकल रिक्षावर लादून घेऊन जाणारे त्यांच्या दुर्दैवी बाप आणि त्यांच्याभोवती त्यांना, त्यांच्या नशिबालाच गुरफटून टाकणारे धुके.. गौरव सोळंकी आणि अनुभव सिन्हा यांच्या कथेला आणि अनुभव सिन्हाच्या दिग्दर्शनाला दाद द्यायलाच हवी.

‘आर्टिकल १५’मधील संवादांना त्या भौगोलिक परिसराचा वास आहे. "सर, हमारे पिताजी वहींपर कार्यरत थे, इसालिये जानते हैंं" अशासारखे संवाद अस्सल वाटतात. निहाल सिंगची लहान बहीण अमली अयानच्या दिमतीला असते. अयान शर्ट बदलत असताना एकदा ती आत येते आणि चमकून परत जायला निघते. अयान तिला मायाळूपणे "आ जा बेटा" म्हणतो ते ‘ग्वाड’ वाटते. तुला कोणती भाजी चांगली करता येते असे? तो तिला विचारतो, तेव्हा ती काहीशा तोर्‍याने ‘हम तो सभी अच्छा बनाते है’ असे म्हणते तेही तसेच वाटते. पण असे हलके क्षण ‘आर्टिकल १५’मध्ये फार कमी आहेत. बाकी चित्रपटभर एक विलक्षण ताण जाणवत राहतो.

याचा अर्थ ‘आर्टिकल १५’ संपूर्ण निर्दोष आहे असे नाही. आणि तसे बघायला गेले तर कोणती कलाकृती ‘परफेक्ट’ असते? पण ‘आर्टिकल १५’मध्ये काही ढोबळ त्रुटी आहेत. ब्रह्मदत्त सिंगचे कुत्र्यांना बिस्किटे खाऊ घालणे हे प्रतीकात्मक असले, तरी अनावश्यक वाटते. एवढ्या सुस्त आणि भ्रष्ट यंत्रणेसमोर एका माणसाचा लढा यशस्वी होणे हे नायकाला ‘नायक’ म्हणून दाखवणे आवश्यक आहे म्हणून केलेली तडजोड वाटते. एका उदाहरणाने लोक जातिव्यवस्था विसरून जातील हेही अशक्य वाटते, नव्हे ते तसे आहेच. राजकारण, महंतजी, त्यांची दलित नेत्यांशी युती, निवडणुका वगैरे हेही अनावश्यक वाटते. आर्टिकल १५च्या प्रती काढून त्या जागोजागी चिकटवणे (व मग लगेच पार्श्वभूमीवर ‘वंदे मातरम’, मग जनजागृती वगैरे) हेही असेच उबवलेले वाटते.

तरीही ‘आर्टिकल १५’ हा एक महत्त्वाचा चित्रपट आहे असे मला वाटले. आज वर्गात मुलांना शिकवताना "किती जणांनी ‘आर्टिकल १५’ पाहिला आहे?" असे मी विचारले. एकदोन हात वर झाले. "किती जणांनी ‘बजरंगी भाईजान’ पाहिला आहे" असे मी विचारले. जवळजवळ सगळे हात वर गेले. यावरूनच ‘आर्टिकल १५’ हा किती महत्त्वाचा चित्रपट आहे हे माझ्या ध्यानात आले. हा सिनेमा आर्थिकदृष्ट्या यशस्वी ठरला आहे, हे याच्या कमाईच्या आकडेवारीवरून कळाले आणि मग बरे वाटले.


20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

26 Oct 2019 - 9:03 am | प्रकाश घाटपांडे

ब्रह्मदत्त सिंगचे कुत्र्यांना बिस्किटे खाऊ घालणे हे प्रतीकात्मक असले, तरी अनावश्यक वाटते.>>>> मला ही गोष्ट फारच कल्पक व कलात्मक वाटली. एकीकडे क्रूर शोषक मस्तवाल असलेल्या माणसात एक प्राण्याबद्द्ल मउ कोपरा आहे हे दाखवताना प्रत्येक माणसात एक सहृदयता असते ती फक्त आपल्याला कधी कधी दिसत नाही वा वाट्याला येत नाही पण ती असते हे अधोरेखीत होते

हा चित्रपट मी पाहिला नाही, बघणार नाही. इतके अंगावर येणारे वास्तव मला सहन होणार नाही. तुम्ही फार प्रत्ययकारी लिहिले आहे. वाचताना फार बोचले. लिखाण, चित्रपटातील दुःख, व्यथा, चीड, हतबलता सारे पोचले.

पाषाणभेद's picture

28 Oct 2019 - 9:29 am | पाषाणभेद

+१
नाही सहन होत इतक विखारी सत्य.

श्वेता२४'s picture

26 Oct 2019 - 6:26 pm | श्वेता२४

हा सिनेमा माझ्या सर्वात आवडीच्या सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमात सर्वात भावुक करणारा प्रसंग होता तो म्हणजे गटारातून घाण काढत वर येणारा माणूस.अक्षरश: अंगावर शहारे आणि डोळ्यात खळकन पाणी. हि खरीच गोष्ट ााााहे की हा सिनेमा परत बघणे शक्य नाही. तसाही तो ऋदयात घर करुन बसला आहे.

फारएन्ड's picture

26 Oct 2019 - 8:01 pm | फारएन्ड

जबरदस्त वर्णन केले आहे. त्या सुरूवातीच्या गाण्यापासून चित्रपट जी पकड घेतो ती अजिबात सोडत नाही. जातीपातींच्या अनेक लेयर्स मधली गुंतागुंत अगदी अस्सलपणे दाखवली आहे. संवादांतील स्थानिक भाषा - त्यातही उच्चभ्रू, सरकारी व स्थानिक लोकांच्या बोलण्यातील फरक, एकूणच व्हिज्युअल्स, सर्वांची कामे सगळेच जबरी आहे.

या लेखातून ते सगळे बरोब्बर पकडले आहे. फार छान लेख आहे.

जॉनविक्क's picture

27 Oct 2019 - 2:36 am | जॉनविक्क

पण ‘ते’ आपले असणार नाहीत. ही ठेच लागून काही लोक नव्याने रक्तबंबाळ झाले तरी अशा चित्रपटांच्या निर्मितीचे सार्थक झाले असे म्हणता येईल.

हो.

सुधीर कांदळकर's picture

27 Oct 2019 - 5:59 pm | सुधीर कांदळकर

परिचय. एकीकडे क्रौर्य तर दुसरीकडे कर्तव्यात कसूर करणार्‍यांची निबर, कोडगी मानसिकता हे चित्रपटात दाखवलेले वास्तव आपण छान उलगडून दाखवले आहे.

कमी संवेदनाशील मनांवर देखील कथेचा अन्वयार्थ ठसावा म्हणून जास्त ठसठशीत चित्रण असावे असे आपल्या चित्रपरिचयावरून दिसते आहे. हीच कथा, तसेच सैराटची कथा मी छोट्या पडद्यावर एका सत्य गुन्हेगारीदर्शन मालिकेत चित्रपट येण्यापूर्वी पाहिली होती.

सुधीर कांदळकर's picture

27 Oct 2019 - 6:00 pm | सुधीर कांदळकर

अनेक, अनेक धन्यवाद.

रुस्तुम's picture

28 Oct 2019 - 12:03 am | रुस्तुम

चित्रपट पाहिल्यावर मलाही असेच आत हलल्यासारखे वाटले होते. आर्टिकल १५ ह१५२०१९ मधला निःसंशय सर्वोत्तम चित्रपट आहे आणि सगळ्या कलाकारांनी आपापल्या भुमिकांना व्यवस्थित न्याय दिलाय.

जेम्स वांड's picture

28 Oct 2019 - 9:01 am | जेम्स वांड

बेकार वाटतं ऐन दिवाळीत, माणसाला माणूस म्हणून न वागवता येणे विषाद आणते फार. नेणिवेत जात प्रत्येकाला असते ती जाणिवेत परावर्तित न होऊ देणे हा संस्कारांचा भाग. नेणिवेतली जात म्हणजे "मी तर जात मानत नाही, बघा मी त्यांच्यासोबत बसतो लंच ब्रेकमध्ये जेवायला" त्यांच्यासोबत बसणे म्हणजे त्यांच्यावर उपकार करणे.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Oct 2019 - 10:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिसळपाववर कोणीतरी याच चित्रपटाची ओळख करुन दिली होती तेव्हा सिनेमा पाहिला होता आणि आवडला. आपल्या परिक्षणाने चित्रपटाच्या आणखी काही महत्वाच्या दुव्यांची आठवण झाली, सिंहावलोकन झालं. ‘आर्टिकल १५’मधील निसर्ग अंगावर येतो. पाऊस, धुके, दलदल, चिखल यातून माणसाइतकाच क्रूर असलेला निसर्ग समोर येतो. छायाचित्रकाराला पहिल्या वर्गात उत्तीर्ण केले पाहिजे. हे अगदी खरं. चित्रपट पाहतांना आपणही या दलदलीतून, चिखलातून, अंधार्‍या मार्गातून आणि आपल्या वास्तवातही कोणी आपल्याला मागून ओढून धक्काबूक्की करेल की काय असे चित्रपट पाहतांना वाटायला लागते. अशी उत्तम छायाचित्रण या चित्रपटात बघायला मिळालं, मला सर्वाधिक ते आवडलं. बाकी एकीकडे खूप बदलतं जग आणि एकीकडे जातीय कट्टरता अजून वाढतेच आहे, हे आता नाकारण्यात काही अर्थ नाही, चित्रपटातून ते अधिक ठळक आलेलं आहे. आपण समारोपात म्हणालात तसं काही अनावश्यक गोष्टी चित्रपटाच्या शेवटी यायला लागतात, पण चित्रपटाच्या काही उणिवा म्हणून ते स्वीकारता येतं, पण फार चर्चा न होता भवतालच्या वास्तवाचं भान हा चित्रपट देतो, या चित्रपटाने दिलं आहे. उत्तम परिक्षणाबद्दल आभार.

बाकी, मिपावर तुमचं परिक्षण आणि नाव पाहून गालातल्या गालात हलकीशी स्मायली आली. बरेच दिवस झाले आपलं लेखन वाचनात आलं नव्हतं म्हणून. पण चांगलं वाटलं, येत राहा, लिहावे वाटलं की लिहित राहा. बाकी तुम्ही कसेही असला तरी (खोडसाळपणा अ़जूनही आमच्यात आहेच) माझ्यासारखा वाचक अजूनही तुमच्या वर्तुळ आणि मरणा तुझा काय तेगार सारख्या लेखनाचा पंखा आहे.

अवांतर : गेल्या काही महिन्यापासून निवडणूकीच्या कामात होतो, निवडणूकीच्या आदल्यादिवशीपासून माझ्यासोबत मध्यप्रदेशातला एक पोलीस सोबत होता. माझ्या काही सहकार्‍यांच्या गप्पा ओघा ओघात, गप्पा जातींच्या कानोसा घेण्यापर्यंत गेल्याच. पोलिस म्हणालाच, आमची जात तुमच्या महाराष्ट्रातल्या सर्व जातींपेक्षा उच्च आहे. शिवाशिव वगैरे आमच्याकडे खूप आहे. सायंकाळी जेवतेवेळी तो अनुभव आलाच. आम्ही जेव्हा नॉनव्हेज खायला मागितलं तर आमचा टेबल सोडून तो दूरवर असलेल्या टेबलावर जाऊन बसला . मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही, पारंपरिक मडक्यांचं काही वाटत नाही, पण शिक्षणाने माणून अजूनही बदलला नाहीच असे सारखे वाट राहीले.

-दिलीप बिरुटे

कानडाऊ योगेशु's picture

8 Nov 2019 - 10:29 pm | कानडाऊ योगेशु

>>आम्ही जेव्हा नॉनव्हेज खायला मागितलं तर आमचा टेबल सोडून तो दूरवर असलेल्या टेबलावर जाऊन बसला .
फक्त एवढेच वाक्य संदर्भासाठी घेतले तर ह्यात जातीपातीचे कारण नसावे वाटते. मला स्वतःला च्युईंगम खाणारा कोणी जवळ बसला तर फार त्रास होतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2019 - 2:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमची जात नोनव्हेज खात नाहीत. शिवाशिव अशा अर्थाने त्याने सांगितलेले. बाकी आपल्या च्युईंगम वगैरे मताचा आदर आहेच.

-दिलीप बिरुटे

समजा जर तुम्ही नॉन्वेज मागवलं नसतं तर तो उठून गेला असता का? नाही बहुतेक कारण शिवाशीव, जातपात हे कारण असतं तर तो तुमच्या टेबलावर आधि बसलाच नसता.

- (जातपात आणि मांसाहार भिन्न आहे असे मानणारा) सोकाजी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2019 - 6:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>समजा जर तुम्ही नॉन्वेज मागवलं नसतं तर तो उठून गेला असता का?
बहुतेक नसता गेला.

>>>शिवाशीव, जातपात हे कारण असतं तर तो तुमच्या टेबलावर आधि बसलाच नसता.

खरंय....! पण त्याला या गोष्टी नाविलाजाने कराव्या लागल्या असतील असे वाटते.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

12 Nov 2019 - 7:05 pm | सुबोध खरे

व्यवहारात जातपात न मानणारे जैन लोक सामिष जेवणाऱ्यांच्या शेजारी आपले ताट घेऊन बसत नाहीत हे मुंबईत अनेक वेळेस दिसते.

आणि याबद्दल कुणालाही काही वाटत नाही. ( डॉक्टरांच्या पार्टीत असे अनेक वेळेस पाहिलेले आहे)

तुम्ही आधीच सांगतले कि त्या माणसाचे जातीचे बद्दल चे विधान त्यामुळे त्याने तिथून उठून जाणे यात दोन करणे आहेत १) त्याची जातीची कल्पना अँड २) शाकाहारी असणे
यातील १) हे वाईट आहे हे आपण निश्चित मह्नु शकतो परंतु बरेचद कारण हे २) असते.. मी स्वतः खवय्या जातीचा असल्यामुळे अनेक प्राणी खाल्ले आहेत आणि भाजी पोळी पण तेवढ्याच आवडीने... परंतु एखाद्या शाकाहारी माणसाच्या बाजूने विचार केला तर जिथे मासाचा वास येतो तिथे बसणे केवळ अशक्य होऊ शकते हे मी पूर्ण पणे समजू शकतो
याउलट एखाद्या "रोज मास हवाच" या प्रकार्च्या मांसाहारी माणसाला शाकाहारी चा वास सहन कारण एवढे अवघड नाहीये
त्यामुळे वरील अनुभवत जातीचा वास येत असला तरी कदाचित , कदाचित मुख मुद्दा हा शाकाहारी मांसाहारी असू शकतो

गवि's picture

28 Oct 2019 - 3:07 pm | गवि

उत्तम रसग्रहण.

गामा पैलवान's picture

28 Oct 2019 - 6:51 pm | गामा पैलवान

सन्जोप राव,

मी चित्रपट बघितला नाही. अनायसे कधी मिळाला तर बघेन.

एक शंका आहे. भारतात जे काही विकृत किंवा वाईट असतं त्याचा संबंध नेहमी भारतीय संस्कृतीशी का जोडला जातो? उपरोक्त चित्रपट एका गुन्ह्यावर आधारित आहे. त्या गुन्ह्याचा भारतीय संस्कृतीशी नेमका काय संबंध आहे? जातीभेद व बाबूशाही ही इंग्रजांची देणगी आहे. हे सामाजिक दुर्गुण त्याज्य आहेत हे खरंय, पण यांचा समावेश भारतीय संस्कृतीत का करायचा? भारतीय लोकं मुळातून हीन मनोवृत्तीचे आहेत हे दर्शवण्यासाठी तर नव्हे?

सतीच्या नावाखाली बाई जाळली तर तो हिंदू धर्माचा दोष कसा काय? अगदी सतीचं मंदिरं बांधून पूजाअर्चा केली तरी 'पत्नीने मृत पतीसह चितागमन करावं' असा स्पष्ट निर्देश कुठल्याही हिंदू धर्मग्रंथात नाही. मग सतीची धोंड हिंदुधर्माच्या गळ्यात कशाला?

आ.न.,
-गा.पै.

जॉनविक्क's picture

31 Oct 2019 - 3:52 am | जॉनविक्क

जातीभेद व बाबूशाही ही इंग्रजांची देणगी आहे.

जवळपास 3000 जाती आणी 25,000 उपजाती इंग्रजांनी दिल्या म्हणता ? साले इंग्रज गेले पण हरामी जातीभेद काय सोबत न्हेला असेच आता म्हणावे लागेल.

जॉनविक्क's picture

31 Oct 2019 - 3:53 am | जॉनविक्क

जवळपास 3000 जाती आणी 25,000 उपजाती इंग्रजांनी दिल्या म्हणता ? साले इंग्रज गेले पण हरामी जातीभेद काय सोबत न्हेला नाही असेच आता म्हणावे लागेल.

कपिलमुनी's picture

7 Nov 2019 - 9:01 am | कपिलमुनी

हाये कंबख्त तुने पढा ही नही!
पिक्चरच्या नावातच सर्व काहीं आहे. ती हत्या फक्त ट्रिगर आहे, त्याच्या तपासात समाजातील उतरंडी मधल्या जातींची भयावहता दाखवली जाते .म्हणून आर्टिकल 15 .
बाकी इंग्रज येण्याअगोदर भारतात जातीभेद नव्हता हे वाचून निर्वाण पावलो.

सोत्रि's picture

28 Oct 2019 - 7:00 pm | सोत्रि

जातीभेद व बाबूशाही ही इंग्रजांची देणगी आहे

जातीभेद इंग्रजांनी आणला? :O

- (भारतिय संस्कृतीचा पाईक) सोकाजी

गामा पैलवान's picture

29 Oct 2019 - 6:29 pm | गामा पैलवान

सोत्रि,

महाराष्ट्रातल्या परिस्थितीचं इथे विवेचन आहे : http://peshwekalinitihas.blogspot.com/2014/07/blog-post.html

भारतातली परिस्थिती फारशी वेगळी नसावी.

आ.न.,
-गा.पै.

जॉनविक्क's picture

31 Oct 2019 - 3:59 am | जॉनविक्क

मला मनुस्मृतीची मूळ इंग्रजी प्रत ब्रिटिशांनी कुठे ठेवली आहे आणी भारतात आल्यावर त्यांनी ती नेमकी केंव्हा तत्कालीक भारतीय ज्ञानभाषेत रूपांतरीत करून आपल्या गळी उतरवली तेव्हडे जरा अभ्यास करून समजावता का ?

गामा पैलवान's picture

31 Oct 2019 - 2:00 pm | गामा पैलवान

जॉनविक्क,

जुन्या मनुस्मृतीबद्दल माहीत नाही. सध्या भारतात बाबास्मृती प्रचलित आहे. तिची २०१९ ची इंग्रजी प्रत इथे आहे : http://legislative.gov.in/sites/default/files/COI-updated.pdf

आ.न.,
-गा.पै.

पण जातीभेद इंग्रजांनी आणला असल्याने मला त्यांची मूळ जुनीच इंग्रजीत असलेली जी इंग्रज भारतात आल्यानंतर जातीभेद भारतात तयार व्हावा म्हणून इथल्या लोकांसाठी भाषांतरीत केलेली मनुस्मृती हवी होती, कृपया थोडा अभ्यास वाढवून ती हुडकून काढाच!

शा वि कु's picture

31 Oct 2019 - 5:34 pm | शा वि कु

+1

गामा पैलवान's picture

1 Nov 2019 - 1:28 am | गामा पैलवान

जॉनविक्क,

मला नाही वाटंत मनुस्मृती मूळची इंग्रजीत असेल. तरीपण तुम्हांस तसं वाटंत असेल तर स्वत:च शोध घ्यावा म्हणून सुचवेन.

आ.न.,
-गा.पै.

हे पण स्पष्ट कराल काय ?

गामा पैलवान's picture

1 Nov 2019 - 6:58 pm | गामा पैलवान

जॉनविक्क,

मनुस्मृती हा मूळचा इंग्रजी ग्रंथ आहे, हा तुमचा दावा आहे. माझा नाही. त्यामुळे तुम्हीच मूळ प्रत मिळवून तो सिद्धीस न्या म्हणून सुचवेन.

आ.न.,
-गा.पै.

जॉनविक्क's picture

6 Nov 2019 - 11:11 pm | जॉनविक्क

जातिभेद इंग्रजांची देणगी असल्याचे तुमचे विधान सत्य ठरण्यासाठी मनुस्मृतीच्या इंग्रजी आवृत्तीची मदत होईल म्हणून ती मी तुम्हास मागितली.

गामा पैलवान's picture

7 Nov 2019 - 6:22 pm | गामा पैलवान

जॉनविक्क,

गायीच्या दुधाचा पुरावा प्रत्यक्ष दूध काढल्याने मिळतो. तिचं पोट चिरून त्यात मिल्क पावडर शोधायची गरज नाही.

आ.न.,
-गा.पै.

तुम्ही काय बोलताय हे तुम्ही सोडून इतर सगळ्यांना ही समजतंय या भ्रमात असेच रहा.

गामा पैलवान's picture

8 Nov 2019 - 1:30 pm | गामा पैलवान

जशी आपली आज्ञा, श्री. जॉनविक्क! जिवाच्या या अवस्थेची सुरुवात मनुस्मृतीच्या मूळ इंग्रजी प्रतीचं वाचन केल्याने होते. ती मिळाली की सुरू झालोच!
आ.न.,
-गा.पै.

जॉनविक्क's picture

8 Nov 2019 - 11:56 pm | जॉनविक्क

जातीभेद इंग्रजांची देणगी न्हवती एवढे ध्यानात राहीले पाहीजे आपल्या.

ह्या रसग्रहणातून एखादी भीषण, वास्तववादी कथा वाचल्यासारखा अनुभव आला!

मी हा सिनेमा पहिलेला नाही. तसेच "Entertainment, Entertainment, Entertainment..." ह्या सिनेमा पाहण्यासाठी (माझ्यापुरत्या मर्यादित) असलेल्या निकषावर हा सिनेमा उतरत नसल्याने कधी पाहणारही नाही.

आज वर्गात मुलांना शिकवताना "किती जणांनी ‘आर्टिकल १५’ पाहिला आहे?" असे मी विचारले. एकदोन हात वर झाले. "किती जणांनी ‘बजरंगी भाईजान’ पाहिला आहे" असे मी विचारले. जवळजवळ सगळे हात वर गेले.

मी ‘बजरंगी भाईजान’ पाहणाऱ्यांपैकी एक आहे 😊 प्रत्येकाच्या अभिरुची, आवडी-निवडी वेगवेगळ्या!

असो उत्तम प्रकारे केलेल्या ह्या रसग्रहणामुळे ‘आर्टिकल १५’ चे कथानक समजले, धन्यवाद.

परीक्षण वाचूनच एवढा त्रास झालाय कि मी हा चित्रपट बघू शकेन असं वाटत नाही :(. काही लोकान अतिशय सुखात तर काहीना अतिशय दुःखात आयुष्य का काढावं लागतं यावर उत्तर नाही :(. ३ रुपये वाढ मागितल्याबद्दल  :( :( 

समीरसूर's picture

31 Oct 2019 - 2:34 pm | समीरसूर

चित्रपटाचं परीक्षण उत्तम केलं आहे!

शा वि कु's picture

31 Oct 2019 - 5:32 pm | शा वि कु

आनंद पटवर्धन नावाच्या असमीची ही सिरीज आहे (youtube वर). अतिशय अंगावर येणारी आहे. आर्टिकल 15 साठी उत्तम companion piece आहे.

चित्रगुप्त's picture

1 Nov 2019 - 3:25 am | चित्रगुप्त

परिक्षण आवडले.वाचून नक्की बघावा असे वाटले. बघितल्यावर पुन्हा प्रतिसाद लिहेन.

उपेक्षित's picture

6 Nov 2019 - 8:04 pm | उपेक्षित

अतिशय उत्तम परीक्षण,
आर्टिकल १५ मधले एक एक कलाकार अक्षरशः हिरे आहेत अभिनयात, असे वाटतच नाही कि आपण चित्रपट पाहत आहोत.

सुबोध खरे's picture

8 Nov 2019 - 8:42 pm | सुबोध खरे

हे भयाण वास्तव मी बिहार (१९९८) मध्ये असताना पाहिले आहे.
लष्कर भरतीच्या वेळेस उमेदवारांना शर्ट आणि पॅन्ट काढून एका रांगेत उभे राहण्यासाठी सांगितले असताना काही उमेदवार केवळ शर्ट काढून उभे होते. त्यातील पहिल्या उमेदवारास विचारले तेंव्हा त्याने खालच्या मानेने सांगितले "साहब कच्छा नहीं है"
त्याच्या शी संवाद साधल्यावर भयाण वास्तव पुढे आले.
त्याला विचारले "पिताजी क्या करते है?"
तो-- खेती मी मजदुरी करते है
मी -- कितनी तनख्वा मिलती है
तो-- दो वक्त का लिट्टी चोखा और १८०० रुपये

भयाण वास्तव --१८०० रुपये वर्षाला, महिन्याला नव्हे

मी अवाक झालो.
भयानक गरिबीचे असे ओंगळवाणे दर्शन समोर उभे ठाकेल अशी कल्पना नव्हती.

( अर्थात ते उमेदवार कोणत्या जातीचे होते ते माहिती नाही)

गामा पैलवान's picture

10 Nov 2019 - 3:51 am | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

कच्छा म्हणजे काय? कुतूहल म्हणून विचारतोय.

आ.न.,
-गा.पै.

जॉनविक्क's picture

10 Nov 2019 - 5:06 am | जॉनविक्क

गामा पैलवान's picture

10 Nov 2019 - 2:33 pm | गामा पैलवान

!

:-(

-गा.पै.