तोळा तोळा

लौंगी मिरची's picture
लौंगी मिरची in जनातलं, मनातलं
7 Nov 2018 - 9:23 am

ओठांवरचे शब्द बोलके
पापण्यांचे खेळ ते बालिश
तुझ्या मिठितले श्वास जिवंत
स्पंदनातुनहि बरसतो आशीष...

तुझ्या माझ्यातली प्रित बहरतेय , मोहरतेय , दरवळतेय त्या रातराणी सारखी . उगाच फुलुन येते रात्रीची .गंधाळलेला आसमंत , त्यात ती एकटीच नसते , सोबत असते चांदण्यांची . शांत रात्रीची , मुग्ध रातकिड्यांची .
तुला आठवतय ?पहिल्यांदा पाहिलं तुला तेव्हा थबकले होते मी , नजरेत अडकलास माझ्या , बरेच दिवस फक्त तुला शोधण्यातच घालवले , आणि मग भेटलास , भेटलास तो हि असा , मुक्त ,स्वच्छंदि .. सतत गर्दि आजुबाजुला . वाट काढणहि मुश्किल होतय . पण त्यातहि माझे प्रयत्न तुला मिळवण्याचे .
कधी कधी तुझ्या पाठमोर्या आक्रुतिवरहि मी फिदा असते . सरळ पण आडव्या बांध्याचा तु . एखाद्या उंच पर्वतासारखा वाटतोस , ऐकुन घेतोस माझं .. कधी त्या जराशी विसावलेल्या झाडासारखा भासतोस.. तुझ्या पाठीवर डोकं ठेवुन सुख दु:खात भागिदारी करायची असते मला .
तुझं ते वार्याकडे तोंड करुन उभं राहाणं , चेहर्यावरचे हावभाव बदलणं ,
ओठांना एकिकडे गालात ओढुन हसणं , जिवघेणं स्मायिल. जगात याशिवाय मनमोहक काहि असुच शकत नाहि यावर शिक्का मोर्तब होतो माझा .
हरवल्यासारखं विश्व असतं हल्ली माझं . तुझी वाट पहाणं , तुला पहाणं , तु दिसलास कि आजकाल माझ्या काळजाची धडधड मलाच ऐकु यायला लागलिये . श्वासांचे मजले जड पावलांनी चढल्यागत वाटतं . तुला पाहिलं कि मन अलगद वार्यासोबत झुलतं . शहारतं , बहकतं , माझं अंतरमन माझ्यासोबतच चढाओढ करतं ... थांबतं .
आणि तु नेहेमीसारखाच असतोस , तुझ्या बोलण्यात वेगळीच लकब , भारदस्त आवाज त्याला रुजव्याची किनार .माझ्याशी बोलताना सतत माझं तुझ्याकडेच लक्ष आहे ना ,ह्याची खात्री करणं . माझ्या बोलण्यावरुन माझा अंदाज घेणं , दोघांमधले नेमके दुवे शोधणे ... हे जे करतोस त्यातच तर अडकतो माझा श्वास .
गुंतणं माझ्या हातात नव्हतं , थांबवणं तुला जमत नव्हतं , ओघळत्या भावनांशी सलगी करण्यात तुझं माझं विश्व एकदम मग्न होतं . अफलातुन होतं सगळच . सोडुन दिलं मग मीहि स्वताहाला समजावणं , तुझ्याकडुन उत्तर मिळालं , त्या उत्तराच्या जोरावर सगळे डाव मांडले.
आता फक्त खेळायचं ..

तुझ्यासाठी तोळा तोळा झुरायचं ,
तुझ्यात मनसोक्त गुंतायचं
तुझ्या मागे बिरभिरणारं मन
तुझ्यासोबतच जपायचं ...

मांडणीप्रकटन