मैत्र..

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
17 Jul 2018 - 6:59 pm

अगदी अचानक काहीच न कळवता आपण मित्राच्या घरी धडकावं.
त्याने दरवाजा उघडताच त्याला बाजूला सारून आत शिरावं.
चपला पर्स फेकून खिडकीजवळच्या मऊ गुबगुबीत माऊसारख्या खुर्चीवर धप्पकन बसावं.
आपलं अगडबंब वाढलेलं वजन, परीटघडीच्या ड्रेसला पडणा-या चुन्या, खांद्यावरून डोकावत असलेला किंवा नसलेला चुकार पट्टा कसला कसला विचार मनात येऊ देऊ नये तेव्हा.
"तुझीच आठवण काढली होती मी आज बघ डेविलिणबाई" म्हणत हसत त्यानं ग्लुकोज बिस्किटं आणि पाण्याचा ग्लास पुढे करावा.
खरंतर मनात खुश होत पण वरवर "चल् काहीही खोटं" म्हणत त्याला उडवून लावावं.
अगं हो, तुझ्या आवडीची शेवळाची भाजी केलेली हिने तेव्हा तुझी आठवण आलेली. त्याच्या शब्दातलं सत्य डोळ्यातून ओळखू यावं.
(त्याची "ही" ऑफीसला असणार हे आपल्याला नक्की माहित असावं)
"मग? काय म्हणतेस?" त्याने आपल्या समोर फतकल मारून बसत विचारावं.
"काही नाही मज्जेत!" तोंडभर हसत आपण उत्तर द्यावं.
त्यानं तसंच आपल्याकडं पहात बसावं, विस्कटणा-या डोळ्यांनी.
"ग्रेस वगैरे वाचलास की नाही हल्ली?"
"हा हा , बिझी इन बीईंग ग्रेसफुल" आपण फालतु पीजे मारावा.
त्यावर न हसता, चाचपडणा-रया नजरेनं तो आपल्याकडंच पहातोय हे जाणवताच आपणही न फुटणारं हसू आवरावं.
"मुलं काय म्हणतायत?"
मस्त मजेत. पंख फुटलेत त्यांना. आपण चिवचिवावं.
"यंदाच्या पावसात भिजलीस की नाही?" त्यानं खोडकर पणं विचारावं.
"देव बाभळी बघितली वाटतं?" आपण प्रश्नाला प्रश्नानं काटावं.
"Btw त्या दिवशी हरिप्रसादजींची मैफल काय रंगली होती सांगू"
आता हसण्याची पाळी त्याची असावी.
"गोविंदाची गाणी ऐकणारी तू , हरिप्रसाद कधीपासून enjoy करायला लागलीस?"
किती म्हणून हसण्याचा प्रयत्न केला तरी डोळे वाहू लागावे. कारण आपल्यालाही समजू नये.
"काय झालं" म्हणत त्याने हलके हात हातात घ्यावा. हळुवार थोपटावं.
त्या थोपटण्याच्या लयीत मनातला अव्यक्त संभ्रम, मळभ आपोआप निघून जावं.
ओठांवर पुन्हा सावरीचं हसू फुलावं.
तेव्हाच्या त्या स्पर्शात निव्वळ माया असावी. नजर नीतळ असावी.
मग इकडच्या तिकडच्या गप्पा , चिडवाचिडवी जोक यात वेळ भुर्रकन उडून जावा.
अरे बापरे उशीर झाला म्हणत आपण मोकळ्या हलक्या मनानं तिथून लगबगीने निघावं.
"अरेच्चा तो कसाय विचारायचं राहूनच गेलं की. वय झालं खरं आपलं." हा विचार मनात येईतो घरी पोचलेलं असावं.
कुकर लावायचाच, भाजी कसली करावी बरं या विचारात तोही विचार हरवून जावा.

असं मैत्र लाभायला भाग्य लागतं.
आणि जर चुकून कधी गवसलंच तर त्याला कध्धी कध्धी हरवू देऊ नये.

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

18 Jul 2018 - 3:30 pm | श्वेता२४

मन हेलावून गेलं हे सगळं वाचून

प्राची अश्विनी's picture

20 Jul 2018 - 8:53 am | प्राची अश्विनी

__/\__

शाली's picture

19 Jul 2018 - 9:06 pm | शाली

वा! खरच खुप सुरेख.
यावर चांगली कथा होईल. खरं तर असं मैत्र लाभतं बरेचदा पण आपणच थोडं शंकेने, थोडं भितीने दुर रहायचा प्रयत्न करतो.

प्राची अश्विनी's picture

20 Jul 2018 - 8:52 am | प्राची अश्विनी

खरंय , असेच मोती हातून निसटून जातात.

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Jul 2018 - 12:47 pm | ज्ञानोबाचे पैजार

कविता आवडली, कल्पना म्हणून(च) छान आहे

रच्याकने :-

असं मैत्र लाभायला भाग्य लागतं

खरं आहे मैत्रच असलं वागू शकत. मित्र किंवा मैत्रिणी नाही.
एक असलं मैत्र आहे आमच्या कॉलेजच्या ग्रूप मधे, त्याच्या घरी अशा अवेळी जाता की नाही ते मैत्रिणींना विचारावे लागेल.
मैत्र असण्याचा असाही फायदा असतो हे लक्षात आले नव्हते.

पैजारबुवा,

प्राची अश्विनी's picture

21 Jul 2018 - 11:09 am | प्राची अश्विनी

धन्यवाद.
काहीही हं पैजारबुवा. असतात हो मित्र आणि मैतरणी अशा. खरंच.

Secret Stranger's picture

20 Jul 2018 - 8:46 pm | Secret Stranger

खूप छान..

प्राची अश्विनी's picture

21 Jul 2018 - 11:10 am | प्राची अश्विनी

धन्यवाद.

माहितगार's picture

21 Jul 2018 - 9:10 pm | माहितगार

हातात इतर लेखन करावयाचे असल्याने सविस्तर प्रतिक्रीया देण्याची इच्छा असूनही शक्य होत नाहीए . हलक्या झालेल्या मनाने केलेल लेखन मोकळ आणि सुरेख झाले आहे. पु.ले.शु.

प्राची अश्विनी's picture

22 Jul 2018 - 7:38 am | प्राची अश्विनी

धन्यवाद आणि तुमच्या इतर लेखनास शुभेच्छा!

राघव's picture

23 Jul 2018 - 7:05 pm | राघव

वरचा सूर सुद्धा कोमल लागावा इतकं अलवार लेखन. :)

प्राची अश्विनी's picture

26 Jul 2018 - 10:22 am | प्राची अश्विनी

किती सुंदर प्रतिसाद आहे!_/\_

जव्हेरगंज's picture

23 Jul 2018 - 9:31 pm | जव्हेरगंज

सुंदर!!

प्राची अश्विनी's picture

26 Jul 2018 - 10:22 am | प्राची अश्विनी

_/\_

प्राची अश्विनी's picture

26 Jul 2018 - 10:39 am | प्राची अश्विनी

_/\_

यशोधरा's picture

26 Jul 2018 - 10:35 am | यशोधरा

आवडलं.

प्रचेतस's picture

26 Jul 2018 - 11:33 am | प्रचेतस

उत्कृष्ट

अनन्त्_यात्री's picture

26 Jul 2018 - 3:33 pm | अनन्त्_यात्री

...Platonic!