दोसतार - १४

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
15 Jul 2018 - 1:09 am

मागील दुवा दोसतार -१३ https://www.misalpav.com/node/42919

पुढच्या तास इनमादार सरांचा. ते आल्या आल्या फळा पुसतात. त्यानी फळ्यावरचे चित्र आज तरी पुसू नये म्हणून, वैजयंती , माधुरी, सोनाली , अंजी ,यांनी फळ्या भोवती उभे रहायचे ठरवले.
आम्ही पण सरांना फळा पुसू नका म्हणू विनंती करणार आहे. हे सगळं कुणीही न सांगता. न ठरवता.
अर्थात इनामदार सरांनी फळा पुसला तरी फरक पाडणार नव्हता. ती कविता आणि फळ्यावराचे चित्र मनात इतके भरून आहे की कुणीच ते पुसू शकणार नाही

इनमादार सर वर्गावर येवूच नयेत असे वाटत होते. आम्ही सगळेच एका कसल्यातरी तंद्रीत गेलो होतो. विलक्षण की काय म्हणतात ना तसे वाटत होते.नेहमी वर्गात जाणवणारा फरफर्या स्टोव्ह च्या आवाजासारखा संमिश्र बडबडीचा आवाजही येत नव्हता. सगळेच कसे शांत झाले होते. इनमादार सर वर्गात आले. आम्हाला तसे पाहून यानी फळ्याकडे पाहिले हातात डस्तर घेतले आणि त्याना काय वाटले कोणास ठाऊक डस्टर घेतलेला हात फळ्याकडे जाऊन फळा न पुसताच खाली आला. मग काहिही न बोलता खुर्चीवर बसले आणि टेबलावरच पडलेलं ते एल्प्याचं पुस्तक चाळू लागले.
सरांनी पुस्तकाची पाने उघडली. एका पानावर ते थांबले. मग भराभर एकेक पान उलटू लागले. पुढून मागे आणि मागून पुढे पाने उलटू लागले. मधूनच एखादे पान ते वाचत होते. त्या नंतर पुन्हा चारपाच पाने चाळत काहितरी शोधत होते.
कुणाचे आहे हे पुस्तक...... कुणाचे आहे हे पुस्तक. ठक ठक ठक.... सरानी डस्टर टेबलावर आपटले त्या आवाजाने आम्ही भानावर आलो.
कुणाचे आहे हे पुस्तक. कुणी बनवलंय हे.
माझे आहे सर. एल्प्या उत्साहाने हात वर करून बोट नाचवत म्हणाला.
हो सर . बाजारात नवी पुस्तके आली नाहीत म्हणून आम्ही बनवलं. टंप्याने एल्प्याला दुजोरा दिला.
मला वाटलंच होतं ते. हा प्रकार तुमच्या शिवाय इतर कोणी करेल असे होणारच नाही. काय पण डोकं आहे. एडीसनच जणू. एकाच पुस्तकात सगळं टाकलंय.
कसं जमवलंत हे? सत्कारच केला पाहिजे शासनाने तुमचा पद्मश्री देवून.
सर कौतूक करताहेत की रागवत आहेत हेच कळत नव्हतं. एल्प्या आणि टंप्या ला चेहेर्‍यावर उत्साह दाखवावा की अपराधीपणा दाखवावा ते ठरवता येत नव्हते.
सांगा सांगा कसं जमवलंत हे.
सर आम्ही गेल्या वर्षीची पुस्तके बाइंड करून आणली.
हो ते तुम्ही करणारच. गेल्या वर्षीची पुस्तके तुमच्याकडे नसणार तर मग कोणाकडे असणार.
एल्प्या आणि टम्प्या नापास होऊन याच वर्गात राहिले होते . सरांचा रोख त्याकडे होता.
पुस्तकं जपून ठेवली असतील .नाही का?
एल्प्या आणि टंप्या अजून नीट सावरले होते. काय चुकलं तेच त्यानाच काय पण आम्हाला कुणालाच कळालेलं नव्हतं.
काय लावलय काय हे तुम्ही. खेळ चालवलाय नुसता. विद्वान आहात विद्वान.
इतिहासाच्या पुस्तकात गणीत , गणीताच्या पुस्तकात नागरीकशास्त्राची पाने, नागरीकशास्त्राच्या मागे भुगोल , भुगोलाच्या पुस्तकात मराठी , मराठीच्या पुस्तकात जीवशास्त्र जीवशास्त्राच्या पुस्तकात इंग्लीश कविता. कमाल आहे. एडीसनच्या बापाला देखील ही कमाल साधता आली नसती.
बघा रे बघा हे पुस्तक बघा..... म्युझीयम मधे ठेवायला हवं. भविष्यात हे पुस्तक कधी उत्खननात कोणाला सापडलं ना तर काय होईल कोण जाणे.
नक्की काय केलंय हे पाहिलंय का तुम्ही.
हो सर. आम्ही नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके आली नाहीत, वर्गात अभ्यास सुरू व्हावा म्हणून आम्ही गेल्या वर्षीची सगळी पुस्तके रद्दीतून मिळवली.
पुस्तके खूप फाटलेली होती. पाने सुट्टी झाली होती म्हणून त्याना बुक बाइंडिंगला दिली. बाइंडरने सगळी पुस्तके एकाच पुस्तकात बांधली.
वा. छान.... फारच छान. वर्गात अभ्यास व्हावा म्हणून तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे . शालाप्रमुखांकडे शिफारसच करायला हवी तुमची. उद्याचे जगदगुरू तुम्ही.
बाइंडरकडून पुस्तक आणल्यावर वाचलं नसेलच.
नाही सर. शाळेला उशीर होत होता म्हणून तेथून तसेच शाळेत आलो आम्ही.
वा छान. वाचलेलं समजत असेल तर वाचणार ना. फार हुशार न वाचताच समजतं सगळं. लक्ष्मण पाटील , तुषार जोशी. ढवळ्या पवळ्याची खिल्लारी जोडी च की.
काय झालं सर? एल्प्या आणि टंप्या ला अजूनही इनामदार सर कसे बोलताहेत हे समजत नव्हतं.
काय झालं? बघा बघा कसे वर तोंड करून विचारताहेत बघा. अरे पुस्तक उघडलं असतं ना तर समजले असते तुम्हाला. अर्थात तो तुमचा दोष नाहीये. गेल्या वर्षी पुस्तकं उघडली असती तर पुन्हा याच वर्गात बसावे लागलं नसते. पण तुम्हाला नीट अभ्यास करायचा होता ना. एका इयत्तेत दोन वर्षे. करा सखोल प्रदीर्घ अभ्यास करा.
खरे तर टंप्या आणि एल्प्या आठवीत नापास झाले हे सरांनी असें पुन्हा पुन्हा सांगायला नको होते. एल्प्या आणि टंप्याला त्याबद्दल मनाला टोचणी होतीच की.
नसेल जमला अभ्यास काही कारणामुळे. सरांनी त्या बद्दल अगदी गुन्हा केल्या सारखे टोचून बोलायला नको होते. पण सर बहुतेक रंगात आले असावेत.
बघा रे बघा. नवा आविष्कार बघा. लक्ष्मण पाटील आणि तुषार जोषी या अभ्यासू मुलांचा. एकाच पुस्तकात सगळी पुस्तके.
तुम्हाला वाचून दाखवतो. कुठून बरे सुरवात करावी.
कुठून सुरवात करावी हा प्रश्नच आहे कारण पुस्तकाला सुरवात आणि शेवट च नाहिय्ये.
आपण कुठूनतरी सुरू करू या.
गणीतापासून घेऊया. चालेल! नमुना बघूया आपण पंचभेळ खाद्य खिचडीचा.
गणीत लिहीलय. एका हौदाला तीन तोट्या आहेत. पहिली तोटी तीन तासात हौद भरते. दुसरी तोटी तोच हौद चार तासात भराते. आणि तिसरी तोटी संपूर्ण भरलेला हौद पाच तासात रीकामा करते. हौद अर्धा भरलेला असताना जर तीनही तोट्या चालू केल्या आणि ..... महाराज विशाळगडावर पोहोचले.
एक क्षण शांतेत गेला . त्या नंतर मात्र वर्गात हसण्याचं धरण फुटलं. जो तो पोट धरुन हसत सुटला. हौदाच्या तीनही तोट्या चालू केल्या आणि महाराज विशाळगडावर पोहोचले.
इनामदार सरांना वाचनाची पोचपावती मिळाली असावी. त्यानी नवीन पान उघडले आता हे बघा. काय म्हणताहेत हे.
संहत सल्फ्यूरीक आम्लाची एखाद्या धातूसोबत क्रीया झाली तर , श्रावणमासी हर्ष मासी हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.
वर्गात पुन्हा हसण्याची जोरदार साथ आली. पोरं तर बाकावर हात आपटून जोरजोरात हसायला लागली.
आता पुढचे पान पहा वन्स अपॉन अ टाईम देअर लिव्ह्ड अ‍ॅन ओल्ड मॅन. इन हिज ओल्ड हाऊस द ओल्ड मॅन वीज लिव्हिंग विथ हिज वाईफ अँड अ ब्युटीफुल यंग डॉटर . वन डे , द किंग अँड हिज सोल्जर्स वेअर मार्चिंग ऑन द रोड इन फ्रंट ओफ द ओल्ड मॅन्स हाउस. ही सॉ द ओल्ड मॅन्स डॉटर प्लेइंग इन द गार्डन अँड. सूर्य चंद्र आणि पृथ्वी जेंव्हा एका रेषेत येतात त्या स्थितीत पृथ्वी ची छाया चंद्रावर पडते. याला ग्रहण असे म्हणतात.
पुन्हा एकदा सगळे जोरात हसले. आता हसून हसून गाल दुखायला लागले.
सरांनी विचारले पुढचे पान वाचू का? सरांच्या या प्रश्नाला उत्तर देण्याचेही त्राण आता आमच्यात उरले नव्हते.
टंप्या आणि एल्प्या मान खाली घालून उभे होते. वर्गात सरांनी त्यांची सर्वांसमोर खिल्ली उडवली होती. टंप्याच्या डोळ्यात कधीही पाणी येईल असे दिसत होते.
तास संपल्याची घंटा झाली. छोटी सुट्टी झाली . पुस्तक टेबलावर टाकून इनामदार सर वर्गाबाहेर गेले.. मुले अजूनही हसतच होती. एल्प्या आणि टंप्या जागेवर उभेच होते.
मी टेबलावरून ते बाइंड केलेले पुस्तक उचलून आणले.
एल्प्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला खाली बसवले. टम्प्या पण खाली बसला.
थोडावेळ कोणी काहीच बोलले नाही. वर्गातली मुले बाहेर गेल्यावर मी पुस्तक उघडून पाहिले.
पुस्तक बाइंड केलेले होते मात्र त्यात पानांचा क्रम लावलेला नव्हता. पानांचा क्रम सोडा पण कोणतेही पान कुठेही लावलेले होते.
मधेच इतिहासाच्या पुस्तकाचे पान त्यात मधेच गणीताची पाने. त्यातच एखादे जीवशास्त्राचे पान, मराठी कवितेच्या पानानंतर रसायनशास्त्राच्या पुस्तकातले पान.
एकूण घुसडघाईच होती.
मी टंप्याला ते दाखवले. त्याच्याही काय झाले ते लक्ष्यात आले. त्याने एल्प्याला दाखवले.
मग एल्प्याने काय झाले ते सांगितले.
टंप्या आणि एल्प्याने रद्दीवाल्याकडून गेल्या वर्षीची ८वी ची सर्व विषयांची पुस्तके घेतली. पुस्तकंची बांधणी खिळखिळी झाली होती. पाने सुट्टी झाली होती.
अभ्यासाच्या पुस्तकांची ही सगळी सुट्टी पाने एल्प्याने त्याच्या नेहमीच्या वही बाइंडिंग करणाराकडे दिली. पण देताना चुकून तो पानांची गठठा सायकलच्या कॅरीयरवरुन पडला. पाने विखुरली गेली. घाईघाईत तशीच पाने गोळा केली आणि बाईंडिंग करणार्‍या मुलाकडे दिली. नेहमी वहीचे बाइंडिंग करत असल्यामुळे त्याने पानंचा क्रम वगैरे असे काही न बघता जसा गठ्ठा आला तसा त्याने बाईंडिंगला घेतला. आणि त्यामुळे मराठी भौतीक शास्त्र गणीत भुगोल हिंदी इतिहास अशी पाने कशाही क्रमाने पुस्तकात आली होती.
हे समजल्यावर आता त्या पुस्तकात आणखी काय मजा मजा झाली आहे हे पाहू लागलो.
टंप्या आणि एल्प्या ही मघाशी आठवीच्या वर्गात नापास होण्यावरून इनामदार सरांनी मारलेले किजकट टोमणे विसरले.
आम्ही भूगोल आणि नागरीक शास्त्र एक करत समुद्राला उधाणाची भरती आणि ओहोटी येताना लोकप्रतिनीधींची कामे वाचून हसू लागलो.
मराठी आणि भौतीक शास्त्रातील न्युटनचा गतीविषयक तिसरा नियम क्रीया आणि प्रतिक्रीया या नेहमीच समान परंतु एकमेकंच्या विरुद्ध दिशेने घडतात. तुका म्हणे ऐशा नरा मोजोनी माराव्या पैजारा. हे वाचत राहीलो.
मधली सुट्टी संपून नव्या तासाचे सर वर्गावर आले तरीही आमचे वाचन चालूच राहीले.

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

16 Jul 2018 - 11:44 am | यशोधरा

वाचतेय..

शाम भागवत's picture

16 Jul 2018 - 2:39 pm | शाम भागवत

धम्माल चाललीय.

प्राची अश्विनी's picture

18 Jul 2018 - 12:38 pm | प्राची अश्विनी

;);)

चौथा कोनाडा's picture

11 Jul 2020 - 5:49 pm | चौथा कोनाडा

एल्प्याने आणि टंप्या .... धम्माल नुसती !
हा ही भाग +१