मैत्र - २

Primary tabs

शाली's picture
शाली in जनातलं, मनातलं
12 Jul 2018 - 5:52 pm

मैत्र - १

दत्ता तसा अगदी सरळ गडी. त्याच्या जगण्याची सुत्रे खुळेपणा वाटावी इतकी विचित्र पण अतिशय ठाम. म्हणजे “मी कोणाचे वाईट केले नाही त्यामुळे माझे वाईट व्हायचे काही कारण नाही” किंवा “जगात कुणीच कुणाला फसवू शकत नाही, ज्याला वाटते आपण दुसऱ्याला फसवले, खरं तर तो स्वतःच फसलेला असतो” वगैरे. आणि विशेष म्हणजे आम्ही कोणत्या भानगडीत सापडलो तर “तुमच्या घरच्यांकडे पाहून सोडतोय” अशी धमकी मिळून सुटायचो. पण दत्त्या सोबत असला की “याला पाहून सोडतोय यावेळी” अशी धमकी मिळून सुटका व्हायची. आम्हाला आश्चर्य वाटायचं. पण आज कळतय, ती दत्त्याच्या जगण्याच्या ‘खुळ्या तत्वांची’ कमाल होती. त्याची दोनच श्रध्दास्थाने, एक ‘माऊली’ पण त्याने कधी ज्ञानेश्वरीला हात लावला नाही. आणि दुसरी म्हणजे ‘आई’ पण तिला ‘म्हातारे’ शिवाय कधी हाक मारली नाही. आम्ही सगळे एकाच वर्गात होतो. सातवीपर्यंत मराठी शाळेत शिकलो. मग दहावीला हायस्कुलमध्ये प्रवेश केला. शाळा आवडत नसतानाही मित्रांसाठी यानेही प्रवेश घेतला. बारावी पर्यंत हाही शिकला. आमच्या बरोबर ऊनाडक्या करायला असायचा तसा रात्री आम्ही शाळेत अभ्यासाला जायचो तिथेही यायचा. कधी पन्नास टक्क्याच्या खाली आला नाही आणि पंचावन्नच्या वर गेला नाही.

शिक्षकही दत्ताला जरा वचकूनच असत. भौतीकच्या सरांचे (हे फार खडूस होते.) आणि याचे कधी पटले नाही. म्हणजे दत्ताच्या काही मनात नसायचे पण सरांना वाटायचे हा मुद्दाम करतो. हायस्कुलचा पहिलाच दिवस, पहिलाच तास, तोही या भौतिकशास्त्राच्या सरांचा. त्यांनीही पहिल्याच दिवशी मुलांवर जरब बसवण्यासाठी वर्गात आल्या आल्या टेबल आणि बेंच याच्यामध्ये खडुने रेषा काढली आणि गंभीर आवाजात म्हणाले “ही तुमच्या आणि माझ्यामधली लक्ष्मणरेषा, ही ओलांडायला मला लावू नका. समजले!” आम्ही एकदम भेदरलेलो. फक्त माना हलवल्या. सरांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले इतक्यात दत्त्याने हात वर केला.
सरांनी विचारले “हं, काय शंका आहे?”
“सर ही लक्ष्मनरेशा, पन रावन पलिकडं की अलीकडं?”
पहिल्याच दिवशी, पहिल्याच तासाला दत्त्या “सरळ विचारलं तर बाहेर का काढलं?” याचा विचार करत वर्गाबाहेर.

एकदा मराठीच्या सरांनी ‘वृत्ते’ शिकवली व फळा पुसता पुसता विचारले “समजलं ना सगळ्यांना?” अर्थात या प्रश्नाला काहीच अर्थ नसे. कारण ज्यांना कळालय त्यांचा प्रश्नच नसे आणि ज्यांना नाही कळाले ते तासानंतर सरांना विचारत असत. पण दत्ताला हे काही पटायचे नाही. नाही समजले तर लगेच विचारावे हा त्याचा सरळ नियम. त्याला समजले नव्हते त्यामुळे त्याने तोंडातून ‘च्यक’ असा आवाज काढला. (गावाकडे नाही म्हणन्यासाठी तोंडाने असा आवाज काढतात.) सर वळाले. चेहऱ्यावरुनच कळत होते की ते गोंधळले आहेत.
त्यांनी विचारले “कोणी आवाज काढला हा?”
मी दत्त्याची मांडी दाबून धरली होती. न जाणो हा ऊठायचा म्हणून. सरांनी परत विचारले. मी त्याला अजुन घट्ट दाबले आणि कुजबूजलो “दत्त्या ऊठू नको, सगळ्या मुली हसतील तुला.”
मग सरांनी सगळ्यांवरुन सावकाश नजर फिरवली आणि बरोबर दत्त्याला उठवले.
“दत्तात्रय, तू आवाज काढलास का?”
दत्ता उठला आणि अगदी आत्मविश्वासाने त्याने ‘मी नाही’ या अर्थाने जोरात ‘च्यक’ केले. वर चेहऱ्यावर ‘मी कशाला आवाज काढू उगाच?’ असा भाव. सगळ्या वर्गात हसण्याची लाट उसळली. पुढील संवाद म्हणजे तर अगदी विनोदी प्रहसन असावे तसे रंगले.

पण ते सगळे असो. बारावीनंतर कुणी वडीलांच्या ईच्छेखातर तर कुणी स्वतःची आवड म्हणून कुठे कुठे प्रवेश घेतला. याला विचारलं तर याचं ऊत्तर “शाळेत काय मजा नाय राव. उगा तुमच्या नादाने शाळेत यायचो. पन आता तुम्ही कुठल्या कुठल्या होस्टेलात रहानार. मीही कुठल्यातरी होस्टेलच्या रानात एकटं पडन्यापेक्षा घरचं रान संभाळतो. म्हतारीलाबी करमायचं नाय मी गेलो तर. सुट्टीला यालच की सगळे.” त्याच्या भावानेही खुप सांगून पाहीले पण हा ठाम राहीला. निघायच्या दिवशी एसटी स्टँडवर प्रत्येकाला निरोप देताना ‘सासरी चाललेल्या’ मुलीच्या बापाच्याही वरतान केली दत्त्याने अगदी. मला निरोप द्यायचे सोडून या दत्त्याचेच सांत्वन करायला लागले आईला.

तर असा हा दत्त्या आज आई-बाबांबरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा करायला आला होता. मी गाडी गावाच्या वेशीतुन आत घेतली. समोरच दस्तगीरच्या दुकानासमोर धोंडबा पंपाने सायकलला हवा भरत होता. शाम पंपाची नळी वॉल्व्हवर दाबून बसला होता. मी जवळ जावून स्कुटर थांबवली.
मला पहाताच शाम म्हणाला “दत्तू कुठाय रे? तुझ्याकडेच जातो म्हणून गेलाय इथून तासापुर्वी”
मी त्याला म्हणालो “तो थांबलाय घरी. त्याला बोलायचय आई बाबांशी काही तरी”
“आई बाबांबरोबर? गुरुजींबरोबर बोलायचे असेल त्याला. त्या चेअरमनचे आणि त्याचे वाजलेय काही तरी. त्यासंबधी असेल त्याचं रडगाणं”
“नाही रे, त्याला दोघांशीही बोलायचय. विषय माझाच आहे आणि मी नकोय त्याला त्यावेळी तेथे. म्हणून आईने हुसकले मला” म्हणत मी शामकडे पाहून हसलो.
धोंडबा म्हणाला “अप्पा, तू हस्तोय म्हणजे तुला माहितीय काय ते. काय झालं? गुतवला का त्याला मोठ्याईच्या तावडीत? अप्पा, उगा त्याची शेपटी पिळीत जावू नको नाय त फिरन एखाद्या दिशी तुझ्यावं. मंग तू पाया पडला तरी ऐकायचं नाही ते येडं.”
दोघांना म्हटलं “वाट पाहू. तासाभरात येईलच तो. मग तोच सांगेल काय झालं ते.”

“बस दत्ता, चिडू नको असा.” म्हणत आईने त्याला पाण्याचा तांब्या आणून दिला. वडील कोपरीवरच बसले होते ते ऊठून आत गेले आणि शर्ट घालून आले. समोरच्या सोफ्यावर बसले. आईनेही खुर्ची जवळ ओढली आणि दत्तासमोरच बसली. दोघांनाही अजुन काही अंदाज आला नव्हता. ते दत्ताच्या तोंडाकडे पहात बसले. ते पाहून मोठ्या तोऱ्यात घरी आलेला दत्ता थोडा गडबडला. त्याला सुरवात कुठून करावी हे कळेना आणि हा ‘सुरवात का करत नाही’ हे आईबाबांना कळेना.
“हे बघा मोठ्याई, अप्पानी तुमाला न सांगता मला सांगीतलं म्हनून वाईट नका मानू. कुनाकं का व्हईना पन त्यानं सांगीतलं हे महत्वाचं.” शेवटी दत्ताने सुरवात केली.
“कुनाला न सांगता जर मनातच कुढत बसला असता तर आपल्याला काय कळलं असतं का? त्यागुनं त्याला रागवायचं नाही गुर्जी”
बाबा म्हणाले “रागावायचं की नाही ते पाहू नंतर दत्ता पण झालय काय नक्की? काय केलय अप्पाने?”
दत्त्याने जरा विचार केल्यासारखा चेहरा केला आणि म्हणाला “नाय, तसं काय काळजी करन्यासारकं नाय केलं त्यानं. पन वेळीच आपन लक्ष नाय घातलं त मंग काय खरं नाय.”
आईने प्रत्युत्तर म्हणून म्हटलं तर ‘हो’, म्हटलं तर ‘नाही’ अशा दोन्ही अर्थाने मान डोलावली. तिच्या चेहऱ्यावर आता काळजी दिसायला लागली होती. दत्त्याचं अजुन नमनच चालू होतं.
दत्त्या मोठ्या माणसाचा आव आणत बाबांना म्हणाला “ तुमीच सांगा गुर्जी, आता हा असा घरापासून, दोस्तदारांपासून लांब तिकडं होस्टेलात ऱ्हातो. वय आसं आडनिडं. तुमी ते होम्सिक की काय म्हनता तसं होत असन का नसन त्याला?”
सकाळपासून आई-बाबा बोलत होते आणि दत्ता हतबल झाला होता. आता दत्ता बोलत होता आणि हतबल व्हायची पाळी आई-बाबांची होती.
बाबा आता जरा चिडल्यासारखे झाले. “दत्ता, अरे कसला होमसिकनेस घेऊन बसला आहेस? जेमतेम दोन तासांचा प्रवास आहे. दर पंधरा दिवसांनी येतो अप्पा. मीही कामानिमित्त अधून मधून जात असतोच. तसं काही असतं तर बोलला असता तो. मला तर छान रमल्यासारखा वाटतोय तो. काय झालं ते जरा निट आणि पटकन सांगशील का? की त्यालाच विचारू सरळ?”
दत्ता घाई घाईत म्हणाला “नाय, त्याला कशाला. मी सांगतो ना. ते आपले तुकानाना आहेत ना?”
“अरे आहेत ना म्हणजे काय? आहेतच ना, काल तर भेटले मला बँकेत. त्यांचे काय मध्येच?”
“नाय, त्यांचं नाय. त्यांची मुलगी आहे ना रमा तिच्याबद्दल”
ईतक्यावेळ गप्प बसलेली आई न राहवून म्हणाली “अरे तिच्याबद्दल काय?”
दत्ता सावरुन बसत म्हणाला “कशी वाटती पोरगी मोठ्याई?”
“कशी वाटते म्हणजे, गुणी आहे पोर. गेल्या वर्षी बारावीला तालुक्यात पहिली आली होती ना?”
“हा तिच. कशी वाटती म्हन्जे आपल्या अप्पाला शोभन का नाय असं म्हनतोय मी”
बाबा सोफ्यावरुन आणि आई खुर्चीवरुन पडता पडता सावरली. दत्त्याने दिलेला धक्का एकदम अनपेक्षित होता. आई-बाबा एकमेकांकडे पहात होते आणि दत्त्या त्या दोघांकडे पहात होता. या सरळ साध्या माणसांवर आपण चक्क बाँब टाकलाय हे त्याच्या गावीही नव्हते. आई-बाबा जरा सावरले. आईला तर हसावे की रडावे हेच समजेना. बाबांच्या सगळा प्रकार चटकन लक्षात आला आणि इतक्यावेळ त्यांच्या मनावर आलेला ताण एकदम शिथिल झाला. त्यांच्या लक्षात आले, एकूण दत्तूसाहेब आपल्या चिरंजिवांच्या लग्नाची बोलणी करायला आले आहेत.
बाबा आलेले हसू दाबत म्हणाले "तुला अप्पाने सांगितलं का हे सगळं विचारायला?"
दत्ता म्हणाला "नाही गुर्जी, तो काय बोलनार नाय. म्हनून म्हनलं का आपनच काय तरी मार्ग काढला पायजे. त्याला माहीतपन नाय मी काय बोलायला आलोय ते”
आईने न रहावून विचारलं “अरे पण रमा त्याला आवडते हे त्याने सांगितलं का तुम्हाला? का तुम्ही मित्रांनीच ठरवलय सगळं?”
“सांगायला कशाला पायजे. लगेच समजतं की.” दत्ताने तारे तोडले.
आईने धास्तावून विचारलं “हे तू आम्हाला सांगतोय ते अजुन कुणाला बोलला आहेस का दत्ता? म्हणजे नानांच्या घरी कुणाकडे काही बोललास का?”
“ह्या! मी कशाला बोलन नानांच्याकडे. आपली मुलाची बाजू. जे काय बोलायचं ते त्यांनाच बोलू द्या. हाय का नाय गुर्जी” आज आकाशात तारे शिल्लक ठेवायचे नाहीत असंच ठरवलं असावं दत्त्याने.
आता मात्र आई चिडलीच. एक तर तिने फार वेळ मनावरचा ताण कसाबसा सहन केला होता.
ती दत्त्यावर चांगलीच चिडली “अरे कशात काही नाही आणि कसली मुलीची बाजू, मुलाची बाजू. काय पोरखेळ आहे का दत्ता. बाहेर कुणाला समजले तर किती त्रास होईल बिचाऱ्या पोरीला. नाना शेण घालतील आमच्या तोंडात ते वेगळच. अहो, तुम्ही काय शांत बसलाय असे. अप्पाला बोलवायला पाठवा कुणाला तरी आणि जरा खडसावा. त्याने काही सांगितल्याशिवाय का दत्ता हे असं काहीबाही बोलतोय?”
आता बाबांची खरी कसरत होती. त्यांना आईचे डोके शांत करायचे होते आणि त्याचवेळी दत्त्याचे डोके साफ करायचे होते. दोन्ही गोष्टी नाजुकपणे हाताळल्या नाही तर सगळाच गोंधळ होणार होता. आईचा राग शांत नाही झाला तर संध्याकाळी त्यांचा लाडका लेक नक्की मार खाणार आणि दत्ताला व्यवस्थित नाही हाताळला तर “अप्पाच्या आणि रमाच्या प्रकर्णात गुर्जी व्हिलनगीरी करतात” हे डोक्यात घेउन दत्त्या आणखी वेगळीच काही शक्कल लढवायचा.
बाबा आईला म्हणाले “तू चहा टाक थोडासा सगळ्यांसाठी. मी पाठवतो कुणाला तरी गावात.”
बाबा उठले आणि दत्ताशेजारी जाउन बसले. थोडा वेळ त्याच्या मांडीवर थोपटत राहीले.
“हे पहा दत्ता, लग्नासाठी अप्पा अजुन लहान आहे. शिक्षणही पुर्ण नाही झाले. रमाचीही अजुन दोन वर्ष बाकी आहेत कॉलेजची. तु म्हणतोस तसं मी अप्पाबरोबर बोलतो. तुझाही नुसताच अंदाज आहे. त्याला नक्की काय वाटतय तेही पहायला हवे. बाकी तु येउन सांगीतलेस ते फार बरे केले.”
“पन गुर्जी, मी लग्नाचंच मनावं घ्या लगेच असं कुठं म्हंतोय? या दिवाळीला नुस्ता साखरपुडा करुन टाका दोघांचा मंग करुद्या किती अभ्यास करायचाय तो” दत्ता काही मुद्दा सोडायला तयार नव्हता.
बाबा डोकं शांत ठेवत म्हणाले “दत्ता अरे नानांकडे हा विषय काढायला हवा, अप्पाच्या काकांनाही विचारायला हवे. इतरही बऱ्याच गोष्टी असतात लग्न ठरवायचं म्हटलं तरी. पटतय का तुला?”
“पटतय. पन गुर्जी तुम्ही टाळाटाळ करायला लागला लगेच. कायपन कारनं सांगुन टाळायला बघता हे काय मला पटत नाय” दत्ता कुरबुरला.
बाबा दत्ताला समजावत म्हणाले “अरे पण नाना म्हणत होते ‘डिग्री झाल्याशिवाय पोरीचं लग्न नाही करायचे’ म्हणजे अजुन तिन वर्ष तर नक्की नाही”
पण दत्ता काही हेका सोडायला तयार नव्हता. त्याला ‘माझा प्रेमभंग झाला आणि मी देवदास वगैरे झालो तर काय करायचं?’ ही चिंता होती. तो म्हणाला “पन गुर्जी, साखरपुडा उरका की दिवाळीत. आन अप्पा इतकाही बारीक नाये.”
बाबांना समजेना दत्ताची समजूत कशी काढायची. ते म्हणाले “कसं आहे दत्ता, अप्पा छान रमलाय अभ्यासात. ऊद्या तू म्हणतोस तसा साखरपुडा केलाही दोघांचा तर काय होईल? अप्पाचं लक्ष लागेल का मग शिक्षणात? तू घेतो का जबाबदारी?”
दत्ताला हे पटलं. साखरपुडा झाला की अप्पाला रान मोकळं मिळणार, मग काय करायचं? ‘साखरपुडा करुन मित्राला रान मोकळं करुन द्यायचं की त्याचा देवदास होवू द्यायचा’ हे त्याला काही समजेना.
त्याचा गोंधळलेला चेहरा पाहून बाबा म्हणाले “आपल्या दोघांमध्येच ठेवणार असशील तर मी काही सुचवू का?”
आता दत्त्याची बुध्दी काम करेनाशी झाली होती. या बाबतीत त्याचा मोठ्याईवर अजिबात विश्वास नव्हता. आता आधार फक्त गुरुजींचाच. तो पटकन म्हणाला “गु्र्जी, तुमी कव्हा चुकीचं सांगीतलय का? तुमी म्हनाल तसं”
बाबा दत्त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले “खरं तर मलाही जे सुचलं नाही ते तुला सुचलं. आम्हाला रमा पसंत आहे. चांगली मुलगी आहे अप्पासाठी. पण तुर्तास साखरपुडा, लग्न सगळं डोक्यातून काढ दत्ता. माझ्यावर विश्वास आहे ना?”
दत्ता उत्साहात म्हणाला “मंग कसं, आहेच!”
बाबा दत्ताचा हात हातात घेत म्हणाले “मग मी तुला शब्द देतो दत्ता. अप्पाचं लग्न फक्त रमाबरोबरच लावून देईन. नानांना पसंत नसले तरी. तुला माहीत आहे मी दिलेला शब्द मोडत नाही कधी. आता अजुन काय हवय तुला सांग.”
दत्ता हरखला. जणूकाही त्याचेच लग्न जमले होते. हसुन म्हणाला “मंग काय पायजे अजुन! हेच तर मी सांगायला आलतो.”
बाबा खाजगीत बोलावे तशा आवाजात म्हणाले “पण माझी अट आहे दत्तोबा”
दत्त्या आता कशालाही तयार होता. “एक काय गुर्जी हजार अटी असुंद्या.”
त्याचा आनंद पाहून बाबांना हसु आले, म्हणाले “अरे ऐकशील तर खरं. मी जे काही म्हणालोय ते दोघांचे शिक्षण झाल्यानंतरच. आणि महत्वाचे म्हणजे यातले काहीही अप्पाच्या किंवा तुझ्या मित्रमंडळींच्या कानावर जाता कामा नये. ही जबाबदारी तुझी. काय?”
“तुम्ही काळजीच करु नका गुर्जी अजिबात. पार कुनाला कळू देनार नाय. आता पयल्यांदा अप्पाला जावून सांगतो खुशखबर” म्हणत दत्त्या ऊठलाही जाण्यासाठी. बाबांनी डोक्याला हात लावला. दत्त्याच्या लक्षात आलं आपलं काय चुकलं ते.
गालावर हात मारत म्हणाला “चुकलं चुकलं. नाय सांगनार गुर्जी. ते जरा गडबड झाली म्हनून आलं तोंडात”
आतुन आई ओरडली “अरे चहा ठेवलाय दत्तू, निघालास कुठे तसाच”
“मला नको चहा आता मोठ्याई” म्हणत दत्ताने सायकलवर टांग मारली.

आम्ही शामच्या घराच्या ओट्यावर बसलो होतो. दत्त्या सायकल घेवून आला. हसतच सायकल ओट्याला टेकवून उभी केली आणि सरळ दारात जावून ओरडला “इन्ने, चहा कर आम्हाला. डबल गोड कर”
शामने विचारले “काय रे दत्त्या, काय काम होतं गुरुजींकडे. काय म्हणाल्या मोठ्याई?”
दत्ता फक्त हसला मस्तपैकी “काय नाय. असंच काम होतं”
“आरं पन सांगशील तर खरं काय ते” धोंडबाला माहीत असुन त्याने विचारले.
दत्त्या क्षणभर विचारात पडला आणि मग बराच वेळ सुटत नसलेलं कोडं अचानक सुटावं तसा म्हणाला “अरे ते चेअरमनचं बेनं लय वैताग देत होतं आठ दिवस. दोन पोती जास्त दे पेंडंची म्हटलं तर ऐकना. म्हटलं गुर्जींच्या कानावं घालावं. दुसरं काय!”
मी ओळखलं, बाबांनी ‘दत्त्याचे भुत’ बरोबर बाटलीत उतरवलय. पुढे बाबांना दिलेला शब्द दत्त्याने पाच वर्ष कसोशीने पाळला. सगळ्यांना माहीत असलेले गुपीत त्याने माझ्या लग्नाच्या दिवसापर्यंत पोटात ठेवले.

आजही दत्ता घरी आला की माझ्या पहिलीतल्या मुलाला सांगतो “अरे तुझ्या बाबाचं लग्न मी होतं म्हनून झालं. इचार तुझ्या आईला पायजे तर” आणि आम्हीही “दत्ता नसता तर आमचं काय झालं असतं” असा चेहरा करुन दत्ताच्या म्हणन्याला दुजोरा देतो.

वावरलेख

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

14 Jul 2018 - 7:23 pm | ज्योति अळवणी

खूपच आवडली कथा. इतकी साधी सरळ माणस खरच असतात का? असतीलच! नाहीतर जगाच रहाटगाडग कसं चालेल?

शाली's picture

15 Jul 2018 - 10:32 am | शाली

धन्यवाद ज्योती!

श्वेता२४'s picture

16 Jul 2018 - 5:08 pm | श्वेता२४

खूप आवडली

विनिता००२'s picture

7 Feb 2019 - 1:10 pm | विनिता००२

म्हणजे खरंच रमाशी लग्न झाले का आप्पाचे?