लेखणी का कीबोर्ड ? (उत्तरार्ध)

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
22 Jun 2018 - 1:05 pm

पूर्वार्ध इथे आहे: https://www.misalpav.com/node/42843
* * * * * *

इ-माध्यम
सध्या यांत प्रसिद्ध होणारे साहित्य ते साधारण ३ गटांत मोडते:
१. वैयक्तिक अनुदिनी: येथे एखादा लेखक त्याचे लेखन स्वतःच जालावर नियमित प्रसिद्ध करतो. या प्रकारे जगातील कोणीही इच्छुक लेखक बनू शकतो आणि मनसोक्त, विनाअडथळा लिहू शकतो.
२. संस्थळे: यांना एक प्रकारे जालावरची नियतकालिके म्हणता येईल.
३. इ-पुस्तकांची निर्मिती.

या लेखाचा उद्देश मुख्यतः छापील व इ-नियतकालिकांची तुलना करण्याचा असल्याने (मराठी) संस्थळांना केंद्रस्थानी ठेऊन आढावा घेतो.
अजून एक स्पष्टीकरण. अलोकडे बरीच छापील नियतकालिके त्यांची इ-आवृत्तीसुद्धा जालावर प्रकाशित करतात. त्यांचा विचार इथे केलेला नाही. जी नियतकालिके फक्त जालावर प्रकाशित होतात त्यांचीच तुलना छापील अंकांशी करीत आहे.
आता ठरलेल्या मुद्द्यांच्या आधारे बघूया या माध्यमाच्या अंतरंगात डोकावून.

धोरण
गेल्या पंचवीस वर्षांत जालावर विविध भाषांतून अनेक संस्थळे सुरु झाली आहेत. आज प्रत्येक मातृभाषेची माणसे जगभर विखुरलेली आहेत. एखादे संस्थळ सुरु झाल्यावर त्यावर कोणालाही ठराविक बाबीची पूर्तता केल्यावर मुक्त प्रवेश असतो. येथे लेखक वा वाचक म्हणून वावरताना आपले खरे नाव जाहीर करायचे बंधन नसते. त्यामुळे बरेच सभासद हे चित्रविचित्र नावांनी वावरतात. पुन्हा ते नाव कितीही वेळा बदलायची मुभा ! तसेच आपल्या खऱ्या किंवा अर्थपूर्ण टोपणनावांनी लिहिणारेही येथे असतात. येथील लेखनविषय तर अमर्याद असतात. एखाद्याला फक्त मूक वाचक व्हायचे असेल तर मग सभासद न होता देखील फुकटात वाचायची सोय असते.

कारभार

रूढ अर्थाने संस्थळांना कार्यालय असे नाही. कार्यालयीन वेळा असलाही प्रकार नाही. जणू काही अदृश्यपणे वावरणारी काही मंडळी हे दृश्य संस्थळ चालवत असतात ! काही साहित्यप्रेमी आणि संगणक-पारंगत व्यक्ती एकत्र येऊन त्याचा कारभार बघतात. हे झाले मालक, पण पगारी संपादक असला प्रकार नाही. सभासदांपैकीच काही उत्साही लोक मानद संपादक म्हणून काम पाहतात. या माध्यमाचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे ते जालावर अखंड (२४ x ७) चालू असते. (३-४ महिन्यांकाठी काही तास काय ते तांत्रिक कारणासाठी सुटी). त्यामुळे येथील लेखनावर काटेकोरपणे लक्ष ठेवणे हे आवाक्याबाहेरचे काम आहे. म्हणून लेखक जे काही लिहील ते आपोआप प्रसिद्ध होणे ही तडजोड स्वीकारावी लागते.

इथला सभासद कितीही लिहू शकतो. स्वतःच्या संगणकावर लिहून झाले की एक दोन टिचकीसरशी तो स्वतःच ते प्रकाशित करतो. बहुतेक संस्थळांत प्रसिद्धीपूर्व संपादन नसल्याने लेखन धडाधड प्रसिद्ध होते. जोपर्यंत एखादे लेखन सभ्यतेच्या मर्यादा ओलांडत नाही तोपर्यंत इथले मालक त्याच्या संपादनाच्या वा उडवण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे छापील अंकांप्रमाणे इथे नकार वा ‘साभार परत’ असला प्रकार नाही. लेखकाला मानधन देण्याचाही प्रश्न नाही कारण जो तो इथे स्वेच्छेने दाखल होतो. (अपवाद म्हणून कुठे मानधन देत असल्यास मला कल्पना नाही). उलट काही ठिकाणी लेखकालाच संस्थळाचा काही आर्थिक वाटा उचलावा लागतो.
काही संस्थळे जाहिराती स्वीकारून उत्पन्न मिळवतात. तर काही ठिकाणी मालकलोक पदरमोड करून संस्थळ चालवत आहेत; हे कौतुकास्पद आहे.
संस्थळाचे अस्तित्व आणि लोकप्रियता त्यावर जास्तीतजास्त किती जण वावरतात त्यावर ठरते. ती टिकवण्यासाठी संपादकीय धोरण मवाळ ठेवावे लागते. जेव्हा एखादा आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध होतो त्याकडे जागरूक वाचकांनी लक्ष वेधल्यावर तो काढून टाकणे, हा मध्यममार्ग इथे स्वीकारावा लागतो.

सारांश: या माध्यमाचा कारभार हा बहुतांशी ‘लेखककेंद्री’ आहे. छापील अंकाचा संपादक हा काहीसा हुकुमशहा असतो, तर ‘इ’ मध्ये मात्र अगदी खुल्या लोकशाहीचे वातावरण असते.

लेखकाच्या दृष्टीने माध्यमाचे फायदे/तोटे:
इथला लेखक त्याच्या आवडीच्या जगातल्या कोणत्याही विषयावर लिहू शकतो. एखाद्याला आपले विचार अगदी चार ओळींत मांडायलाही वाव असतो आणि दुसऱ्या टोकाला हव्या तेवढ्या दीर्घलेखनाची मुभा असते. एकंदरीत लेखकवर्ग या विश्वात स्वैर संचार करतो. साधारणतः छापील माध्यमात जे विषय शिष्टसंमत नसतात अथवा टाळले जातात, त्यावरही इथे मुक्तपणे लिहीले जाते.
पुरुष किंवा स्त्रियांच्या खाजगी विषयचर्चांमध्येही भिन्नलिंगी व्यक्ती हिरीरीने भाग घेतात. त्यात कुठलाही संकोच नसतो. इथल्या लेखनाची भाषा तर अनेक प्रकारची असते – ग्रामीण, निमशहरी, महानगरी, धेडगुजरी अथवा उठसूठ इंग्रजीच्या कुबड्या घेऊन चालणारी. छापील माध्यमाला प्रिय असणाऱ्या ‘प्रमाण’भाषेला इथे सरळ धाब्यावर बसवले जाते. तसेच शुद्धलेखन हा सर्रास दुर्लक्षिण्याचा विषय असतो.

इथले लेखन हे जालावर वाचण्यास खुले असल्याने त्याचा प्रसार खरोखर जागतिक होतो. लेखकाला मिळणारा वाचकवर्ग हा छापीलच्या तुलनेत कित्येक पट जास्त असतो. एखादे लेखन प्रसिद्ध करून जेमतेम काही मिनिटे लोटली, की लगेचच त्यावर वाचक-प्रतिसाद चालू होतात. पुढे ते दीर्घकाळ चालू राहू शकतात. वाचकांचे अनुकूल अथवा समतोल प्रतिसाद लेखकाला सुखावतात व त्याची उमेद वाढवतात. पण त्याचबरोबर इथे जहाल भाषेतील आणि लेखकाला खच्ची करणारेही प्रतिसाद येतात. याची २ कारणे आहेत:
१. प्रसिद्धीपूर्व संपादनाचा अभाव आणि
२. सभासदाला आपले खरे नाव लपवायची असलेली मुभा

याबाबतीत मात्र छापील अंकांची संपादकीय चाळणी नक्कीच उपयुक वाटते. छापीलच्या तुलनेत इथल्या लेखकाला तिखट प्रतिसाद शांतपणे झेलण्याची ताकद अंगी बाणवावी लागते. तरच त्याचे मानसिक संतुलन ठीक राहते.
या माध्यमाचा आवाका जागतिक असल्याने ते मोठ्या प्रमाणावर प्रसारित होते. बऱ्याच लेखकांची खरी नावे नसल्याचा फायदा उठवून काही लोक इथून साहित्याची उचलेगिरी करून अन्यत्र स्वतःच्या नावावर सर्रास खपवतात. या चौर्याला आळा घालणे खरोखर अवघड आहे.

एक गोष्ट मान्य करावी लागेल की साहित्यजगतात नवनवीन लेखकांना उत्तेजन देण्यात पारंपरिक छापील माध्यम कमी पडले. इ-माध्यमातील काही लेखकांनी, आपण छापील अंकांच्या संपादकांच्या मनमानीला कंटाळून पूर्णपणे ‘इ’ कडे वळल्याचे नमूद केले आहे. याउलट ‘इ’ मध्ये लेखकांना भरमसाट वाव मिळाल्याने इथे त्यांची जत्रेसारखी गर्दी झाली !किंबहुना, या नव्या माध्यमाने लेखकाची व्याख्या ही ‘काहीही लिहू शकतो (म्हणजेच कळफलकावर बडवू शकतो)’ तो लेखक, इतकी सोपी करून टाकली.

वाचकाच्या दृष्टीने माध्यमाचे फायदे/तोटे:
इथले वाचन करताना वाचकाची नजर सतत प्रकाशित पडद्यावर असते. म्हणजेच त्याला सतत कृत्रिम प्रकाशाकडे पाहावे लागते. म्हणून हे वाचन नैसर्गिक नाही. त्याच्या दीर्घ वाचनाने निरनिराळ्या शारीरिक व्याधी कमीअधिक प्रमाणात उद्भवतात. त्यांना दुर्लक्षून चालणार नाही. या वाचनाच्या विविध उपकरणांसाठी भरपूर वीज वापरली जाते. याचा पर्यावरणीय दृष्टीकोनातून विचार व्हावा. इथले वाचन हे एका बैठकीत कमी प्रमाणात होते. तसेच ते पुरेशा एकाग्रतेने होत नाही. त्यामुळे त्याची स्मृती अल्पकाळ राहते.

आता फायद्याची बाजू बघू. इथे वाचकाला बसल्या जागी सर्व नवे-जुने वाचनसंदर्भ टिचकीसरशी उपलब्ध होतात. छापीलप्रमाणे ‘अंक गहाळ होणे’ हा प्रकार नाही. खूप मोठ्या प्रमाणावरील मजकूर अत्यंत सुटसुटीतपणे स्वतःजवळ बाळगता येतो आणि कुठेही सहज नेता येतो. वाचकाची प्रतिक्रिया खात्रीने प्रसिद्ध होते व त्यासाठी वाट बघावी लागत नाही. एकंदरीत लेखक-वाचक यादरम्यान दुहेरी आणि वेगवान संपर्क हे या माध्यमाचे वरदान आहे.

साहित्याचे जतन :
याबाबतीत छापीलपेक्षा हे माध्यम कितीतरी वरचढ आहे. यात माहिती साठवण्यासाठी भौतिक जागा व्यापली जात नाही, हा तर फार मोठा फायदा. तंत्रज्ञानाच्या किमयेमुळे आपण एखाद्या सहस्त्रकात निर्माण झालेले अख्खे जागतिक साहित्यसुद्धा अफाट अशा महाजालात आरामात साठवू शकतो. कोणाही वाचकाला जतन केलेली माहिती कधीही व कुठेही सहज उपलब्ध होते. अर्थात, असे जतन हे संगणकातील तांत्रिक बिघाडाने गायब होण्याचा धोका संभवतो. तसे होऊ नये यासाठी संबंधित संगणक यंत्रणा अधिकाधिक सक्षम कराव्या लागतील.

माध्यमाचे भवितव्य :

येत्या काही शतकांनंतर तरी जगभरात ‘इ’ चे वर्चस्व असेल. तरीदेखील तेव्हा छापील नामशेष झालेले नसेल, असे आजतरी वाटते. छापील माध्यम कागदाचा प्रचंड वापर करते आणि छपाईसाठी वीज खाते. तर ‘इ’ लिहिताना व वाचताना असे दोन्ही वेळेस बऱ्यापैकी वीज वापरते. या दोहोंत कोणाचा वापर अधिक पर्यावरणपूरक आहे याची शास्त्रीय चिकित्सा व्हावी.
...
समारोप:
पारंपरिक लेखक लेखणीने लिहित आला आहे. आजच्या पिढीतील लेखकांसाठी लेखणीच्या जोडीला कळफलक हाही पर्याय उपलब्ध आहे. काळाच्या ओघात कळफलक लेखणीवर मात करणार का, या प्रश्नाचे आज कुतूहल वाटते. साहित्याच्या अमर्याद व कायमस्वरूपी जतनासाठी इ-माध्यम वरदान आहे, हे नक्की. भविष्यात ते लेखनासाठी सर्रास वापरले जाईल. तरीसुद्धा प्रत्येक लेखकाला एक नैसर्गिक क्रिया म्हणून कधी ना कधी हातात लेखणी धरवीशी वाटेल. तसेच ‘इ’ च्या अतिवापरामुळे जर बऱ्याच समस्या निर्माण झाल्या तर वाचकांकडूनसुद्धा छापीलची मागणी वाढू शकेल.
********************************************************************
पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक.

साहित्यिकविचार

प्रतिक्रिया

सुधीर कांदळकर's picture

26 Jun 2018 - 12:23 pm | सुधीर कांदळकर

लेखात अनेक पैलूंचा उहापोह छान केला आहे. पहिल्या भागाला आलेले रतिसाद देखील बोलके आणि वाचनीय आहेत. आणखी एक म्हणजे. कागदावर लिहिणे ही बर्‍याच जणांना न आवडणारी गोष्ट आहे. मी पण त्यातलाच एक. तेव्हा माझे लेखन हे महाजालावर मासिके सुरू झाल्यावरच सुरू झाले. मिपावरच पहिले. तेव्हा कळफलक हे लेखणीपेक्षा जास्त लोकप्रिय माध्यम आहे असे म्हणायला हरकत नाही.

लिखित मजकूर वाचण्याबद्दल म्हणाल तर लॅपटॉप वा टॅबपेक्षा मोठी पुस्तके उदा. पानिपत, नाझी भस्मासुराचा उदयास्त मी बसमध्ये वाचलेली आहेत. तेव्हा मोबाईल वा डोंगल द्वारा जालसेवा उपलब्ध नसे. मांडीवर बॅग आणि बॅअगवर पुस्तक असे ठेवल्यामुळे डोळ्यापासून योग्य अंतर राहते आणि पुस्तकाचा भार जाणवत नाही.

डोळ्यांच्या त्रासाबद्दल म्हणाल. तर ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट बरोबर केला की फारसा त्रास होत नाही. टेबलाची मॉनिटरची उंची आणि आसनव्यवस्था नीट असेल तर मानही दुखत नाही.कार्यालयात वयाच्या पन्नाशीनंतरही मी डेस्कटॉपवर सकाळी ८ पासून चांगले सात आठवाजेपर्यंत काम करीत असे. फक्त दर अर्ध्या तासांनी पाच मिनिटांचा ब्रेक न चुकता घेऊन उभे राहून हातपाय ताणून कमरेत वाकून वळून वगैरे करून कण्याला व्यायाम देऊन नंतर बुबुळे गोल फिरवून चोळत असे. गेल्या वर्षी तर संगणकावरचे तातडीचे काम दिवसभर शेतावर उभा राहिल्यानंतर संध्याकाळी ७ ते १० असे तीन तास चक्क आरामखुर्चीत बसून लॅपटॉपवर काम केले होते. आरामही झाला आणि कामही झाले. तेव्हा जर व्यवस्थित खबरदारी घेतली आणि द अर्ध्या तासाने पाच मिनिटांचा विश्राम घेऊन हातपाय, कणा मोकळे करून बंद डोळ्यांना तळव्याने हलक्या हाताने गोल फिरवून मालिश केले तर फारसा त्रास होत नाही. अखेर स्टॅमिना राखून काम करणे ही पण एक कला आहे. तेव्हा माझे जास्त आवडते माध्यम कळफलक हेच आहे. आणि मोबाईलचे वा टॅबचे वजन याचा भार शरीरावर न घेता खुबीने वापर करायला पाहिजे.

असो नव्या विचारांना चालना देणारा लेख आवडला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jun 2018 - 12:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेखनप्रवासाचा उत्तम लेखाजोखा घेणारी ही द्विलेखमालिका आवडली !

कुमार१'s picture

26 Jun 2018 - 1:00 pm | कुमार१

अभिप्रायाबद्दल आभार !
सुधीर, इ-वाचन करण्यासंबंधीच्या तुमच्या सूचना मौलिक आहेत. अनुकरणीय.

कुमार१'s picture

27 Jun 2018 - 10:54 am | कुमार१

लिखित मजकूर वाचण्याबद्दल म्हणाल तर लॅपटॉप वा टॅबपेक्षा मोठी पुस्तके उदा. पानिपत, नाझी भस्मासुराचा उदयास्त मी बसमध्ये वाचलेली आहेत. >>>>

या निमित्ताने चालत्या वाहनातून वाचनाबद्दल एक मुद्दा.
नेत्र तज्ज्ञांच्या मते असे दीर्घ वाचन करू नये कारण इथे पुस्तक सतत हलत्या स्थितीत असते.

आवडला लेख, मी पण प्रयत्न करीत आहे असा!

वन's picture

12 Nov 2018 - 6:51 pm | वन

मार्मिक !
किंबहुना, या नव्या माध्यमाने लेखकाची व्याख्या ही ‘काहीही लिहू शकतो (म्हणजेच कळफलकावर बडवू शकतो)’ तो लेखक, इतकी सोपी करून टाकली >>>> + 111

.. दोन्ही माध्यमांचा सुंदर आढावा. आवडला.

कुमार१'s picture

5 Feb 2023 - 9:01 am | कुमार१

समाजमाध्यमांतील लेखनाचे फायदे/तोटे विशद करणारा साहित्य संमेलनातील एक व्याख्यान-लेख :
https://www.aksharnama.com/client/article_detail/6550

समाजमाध्यमांनी एक प्रमुख गोष्ट केली- जी अगदी महत्त्वाची आहे, आणि माध्यमाच्या दुष्परिणामांबद्दल आपण कितीही बोललो, तरी त्याने या एका गोष्टीचं महत्त्व कमी होत नाही. आणि ती गोष्ट म्हणजे ‘लेखणीचं लोकशाहीकरण’. समाजमाध्यमांनी प्रत्येकाला आवाज दिला, प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी दिली, प्रत्येकाला आपण लिहू शकतो, याची जाणीव करून दिली.