प्रेरणादायी युवा उद्योजिका - नीलिमा देशपांडे

प्रीत-मोहर's picture
प्रीत-मोहर in लेखमाला
8 Mar 2017 - 6:40 am

.

अनाहिताच्या महिला दिन विशेषांकाचं आवाहन आलं, तेव्हा मी बर्‍याच इतर गोष्टींमध्ये बिझी होते. त्यामुळे विचारही केला नव्हता; कमिट केलं आणि मग जमलं नाही तर मग ते मनाला खात बसतं, म्हणून आधी काहीच कमिट करायचं नाही असं ठरवलं होत. मग गोव्यातल्या मतदानाला आठ-एक दिवस असताना काम थोडंसं कमी झालं, म्हणून असंच धाग्यावर नजर मारली, तर तेव्हा वाटलं मला नाही जमणार. काही दिवसांनी आमच्या एका मित्राशी बोलत असताना लक्षात आलं की सामान्यातले असामान्य म्हणजे काही मंगळावरची माणसं नाहीयेत. तुमच्या-आमच्यातलीच अशी माणसं, जी आपल्याला inspire करतात अशा व्यक्ती म्हणजे सामान्यातले असामान्य. आणि मग एकदम 'काखेत कळसा . . . ' असं वाटलं. माझी खूप जवळची मैत्रीण आणि खळखळत्या उत्साहाचा झरा असलेली नीलिमा देशपांडे अशीच एक व्यक्ती आहे. एक युवा उद्योजिका, शिक्षिका, अनुवादिका, लेखिका आणि सगळ्यात महत्त्वाचं एक खूप छान माणूस आहे. World behind boundaries अशी टॅगलाईन असलेल्या 'रमा' आणि 'रमा अ‍ॅक्टिव्हिटीज'ची मालक या नात्याने तारेवरच्या कसरती करतानाच, लेक आणि नवर्‍याच्या साथीने ती 'जल्लोश मिसेस कोल्हापूर २०१६'ची फर्स्ट रनर अप आहे.

हाय नीलिमा

नमस्कार.

प्रश्नः आमच्या वाचकांना 'रमा'बद्दल सांग ना. Edu-cultural tourism ही संकल्पना कशी सुचली? किंवा या क्षेत्रात जावंसं का वाटलं?

ramaa ramaa१

नीलिमा: 'रमा'बद्दल सांगायचं म्हटलं की मला शब्द अपुरे पडतील. आईला जसं आपल्या लहानग्यांचं कौतुक वाटतं, साधारण तसंच काहीसं!!
२००८ला UPSCमध्ये अडचणी निर्माण झाल्यावर, सेट/नेट करत असताना मार्केटमध्ये सुरू असणारी जीवघेणी स्पर्धा डोळ्यासमोर उभी राहिली. आपणही ह्या शर्यतीचा एक भाग होऊन राहायचं का? आणि नसेल तर वेगळं काय? अशा अनेक प्रश्नांतून 'रमा'चा जन्म झाला.

फिरण्याची आवड होतीच. ह्याच सुमारास घरात मी आईचा रोल निभावत होते. आणि लक्षात आलं, पालकांची इच्छा असूनही मुलांसाठी द्यायला त्यांना वेळ मिळत नाहीए. मुलंसुद्धा त्याच त्या चक्रात अडकलेली आहेत. तेव्हा त्यांच्या ज्या सहली जातात, त्यासाठी आपण काही करू शकू का? आणि 'edu-cultural' टूरिझम सुरू झालं.

प्रतिसाद फार उत्तम होता अशातला भाग नाही. पण मी वेगवेगळ्या शाळांमध्ये जायचे, त्यांच्याशी बोलायचे; पलीकडून उत्तर यायचं “कल्पना छानच आहे, पण...” - हा 'पण' काही मुहूर्त लागू देत नव्हता. मग सरळ जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी दिल्या आणि खऱ्या अर्थाने 'रमा एज्यु-कल्चरल' सुरू झालं. मग वेगवेगळे ग्रूप्स, खाजगी क्लासेस आणि मार्ग सापडत गेला.

या टूरिझममागे एकाच विचार होता - मुलांना डोळसपणे प्रत्येक गोष्टीकडे पाहता यावं. सहल म्हणजे बटाट्याची भाजी-पोळी आणि अंताक्षरी याहूनही खूप काही आहे. ट्रिप म्हणजे फक्त फोटोज नव्हेत. किंवा तिथल्या गाइडने सांगितलेली माहिती म्हणजे सगळं नव्हे. स्वतः पाहा, विचार करा, प्रश्न पडू द्या.

शिवरायांचे किल्ले बघताना अफझलखान-शाईस्ताखान यापलीकडे महाराजांचं मोठं काम आहे. त्यांनी बांधलेली आरमारी सेना असेल, किल्ल्यांचं वास्तुशास्त्र असेल - असं बरंच काही. अर्थात कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत आपला देश नटलेला आहे, त्याला मोठी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, ही आपल्याला समजायला हवी, त्याची आवड निर्माण व्हायला हवी, हा 'रमा'चा उद्देश. एक चिनी म्हण आहे - एक रुपया मिळाला, तर आठ आण्याची भाकरी घ्या आणि आठ आण्याचं फूल - भाकरी तुम्हाला जगवेल, फूल तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल.

कसं जगायचं? हे शिकता यावं हाच रमाचा प्रयत्न आहे. लवकरच आपण या धर्तीवर परदेशही पाहायला मिळावा अशा प्रयत्नात आहोत.

अर्थात हे काम सीझनल असायचं. आणखी नवीन काही करायला हवं, म्हणून 'रमा अ‍ॅक्टिव्हिटीज' उदयास आलं. यात आपण सॉफ्टवेअर कन्सल्टन्सीपासून सुरुवात केली. पुढे आज वाढत वाढत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि सोल्युशन्सपर्यंत आपण मजल गाठली आहे.
आज कॉम्प्युटर वापरला जात नाही असं एकही क्षेत्र नाही. त्यामुळे त्या त्या व्यवसायाच्या गरजा ओळखून कस्टमाईज्ड सोल्युशन्स आपण पुरवत आलो आहोत.
अगदी किराणा माल दुकानदार ते डॉक्टर्स अ‍ॅप ,घरपोच भाजीवाल्याला लागणारी कॉम्प्युटर सिस्टिमपासून एका नाटकाच्या प्रोड्युसरला लागणाऱ्या मॅनेजमेंट सिस्टिमपर्यंत आपण सेवा दिली आहे.

राजकीय क्षेत्रातही याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. संपूर्ण पारदर्शक अशी व्यवस्था आपण नगरसेवकांना पुरवली आहे. वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकांच्या प्रचाराची (इ-प्रचाराची) जबाबदारीसुद्धा पेलली आहे. आणि याचे उत्तम रिझल्ट्स समोर आले आहेत.

वायफाय ही अलीकडे सर्वत्र लोकप्रिय झालेली संकल्पना. या क्षेत्रात तर फक्त दिग्गज आणि तथाकथित नामांकित कंपन्या काम करत होत्या. अशा वेळी यात पाऊल टाकणं आणि यशस्वी होणं दोन्ही धाडसाचं होतं, अर्थात स्वतःवर असलेला विश्वास कितीही मोठा असला तरी मार्केटमधील प्रतिस्पर्धी तुलनेने खूपच मोठे होते. अशा वेळी आपल्या कामाची क्वालिटी आणि त्या संदर्भातील संपूर्ण ज्ञान या दोन गोष्टी हाताशी धरत आम्ही पुढे गेलो.

A

प्रश्नः हे सगळं सोपं सरळ नसेलच....

नीलिमा: अर्थातच यात खूप मोठा संघर्ष होता. अनेक वेळा निराशा यायची. हाताशी आलेली कामं - केवळ आपल्याकडे 'नाव' नाही म्हणून जायची. पण आम्ही जिद्द सोडली नाही, आणि 'देर है, अंधेर नहीं'ची प्रचिती आली.

एका जागतिक दर्जाच्या कंपनीने आपल्याकडे मुंबईमध्ये वायफाय सुविधा सुरू केली. मीसुद्धा त्यासाठी प्रयत्न करत होते. अर्थात परत तेच - 'ब्रँड' नावाची आमच्यातली ही दरी खूप मोठी होती. तरीसुद्धा केवळ आपल्या क्वालिटी वर्कचा अनुभव घेतलेल्या एका मोठ्या नेत्यांनी त्या महान ब्रँडच्या व्यासपीठावर मला उभं केलं. इतकंच नव्हे, तर रमाच्या कामाची केवळ 'make in India' इतकंच नव्हे, तर त्याही पुढे जाऊन 'made by Indians' म्हणून दखल घेतली जाणं आवश्यक आहे याचा विशेष उल्लेख केला.

एक प्रश्न नेहमी असतो की मोठ्या पदावरच्या लोकांना भेटायचं कसं? माझं मनापासून म्हणणं आहे की थेट जा. आजकाल फेसबुक, ईमेल, ट्विटर यासारखे मार्ग सहजगत्या उपलब्ध आहेत. पण जेव्हा मी कामाला सुरुवात केली, तेव्हा याचा विशेष वापर होत नव्हता. सरळ त्या ऑफिसला जाऊन तुम्ही थेट तुमचा प्रश्न मांडा - तुमची दखल घेतली जाते.

आणखी एक प्रश्न नेहमी विचारला जातो - मुलगी म्हणून/बाई म्हणून असं एकटं जाताना भीती वाटत नाही का?
अजिबात नाही. मुळात आपण काम करत असताना आपल्यातील हा भेदभाव (मी स्त्री वगैरे) मनातसुद्धा आणू नका. मी कधीच आणत नाही. विशेष सवलती मी नेहमीच नाकारते - म्हणजे बाईमाणूस म्हणून रांगेत मध्येच पुढे जाणं किंवा मला उशीर होतोय - मी खूपच वेळ बाहेर आहे - वगैरे सबबी सांगून गैरफायदा घेणं.
समोरच्याशी बोलताना कामाचा मुद्दा सोडून काही वेगळं वळण लागलं, तर तिथेच सुनावते. अशी काही पथ्य पाळली की या अडचणी राहत नाहीत. आणि मनमोकळेपणाने काम करता येतं.

प्रश्नः या क्षेत्रात तू घेतलेलं शिक्षण व व्यवसाय सुरू करण्याअगोदर घेतलेला अनुभव काय होता? या क्षेत्राची आवड सुरुवातीपासून होती का? व्यवसाय सांभाळतानाच तू तुझं पुढचं शिक्षणही घेते आहेस, त्याबद्दल सांगशील थोडंसं? कसं जमवलंस?

नीलिमा: खरं तर माझं शिक्षण मराठीत MA झालं आहे. आता 'अनुवादाचा तौलनिक अभ्यास' या विषयावर Ph.D. करत आहे. अर्थात भाषा हा माझा आवडीचा प्रांत आहे. घरातल्या वातावरणामुळे बऱ्यापैकी संस्कृत वाचता येतं. आवड म्हणून फ्रेंच शिकले आहे. तेव्हा आताचं माझं शिक्षण हा पूर्णपणे स्वानंदाचा भाग आहे.
इंटेरिअर डिझाईनिंग हा आणखी एक आवडता प्रांत; त्यातही पदविका घेऊन घरच्या घरी त्याचे प्रयोग सुरू असतात.

मुळात आमचं लेखकांचं घराणं!! शिवलीलामृत, हरिविजय, पांडवप्रताप हे ग्रंथ ज्यांनी लिहिले, त्या श्रीधरस्वामी नाझरेकरांचे आम्ही वंशज. मातृ-पितृ-गुरू या ऋणांसोबत माझ्यावर हे घराण्याचंही एक गोड ऋण आहे. सध्या अनुवाद, काही स्वतःचं लेखन ,कविता ,कॉपी रायटिंग इतकंच काम करत असले, तरी पुढेमागे सर्वसमावेशक असं काही - जे लहान मुलांना (संस्कारक्षम वयासाठी) मार्गदर्शक ठरेल, रुचेल असं काही विशेष लिहिण्याचं मनात आहे.
तसं पाहिलं, तर टेक्निकल क्षेत्रात जाताना माझ्याकडे कोणतीच तशी डिग्री नव्हती. मी स्वतः डिग्री (निव्वळ तो कागद)च्या विरोधात आहे.
मग सुरू झाली शिकवणी!!

पार्टनरचा सपोर्ट असेल तर तुम्ही चार पावलं आणखी जोमाने चालू शकता. तशी इंजीनियर असणाऱ्या माझ्या नवऱ्याकडे माझी शिकवणी सुरू झाली. अक्षरशः मला आवश्यक असणाऱ्या ज्ञानासह मी दोन महिन्यांत तयार झाले. मग स्व-अध्ययनावर जोर दिला. समजून घेणं, आपणच आपल्याला प्रश्न विचारणं अव्याहत सुरू असायचं.
एक गोष्ट खरी आहे - तुम्हाला एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल, तर 'ध्यास' महत्त्वाचा. मी ध्यास घेतला होता. 'हटके' काहीतरी करायचं - मळलेल्या वाटा नको वाटतात - आपले नवीन मार्ग शोधू या. यातून जान्हवीच्या - आमच्या लेकीच्या - होम स्कूलिंगचा जन्म झाला.

प्रश्नः आजकाल मुलांच्या शिक्षणाबद्दल, कोणत्या शाळांमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश घ्यावा ह्यावर पालक फार जागरूक झालेत. अशा पार्श्वभूमीवर तू चिऊसाठी होम स्कूलिंग निवडलंस. चिऊच्या होम स्कूलिंगबद्दल थोडं सविस्तर सांगशील का?

नीलिमा: मुलांचा पहिला वाढदिवस झाला की वेध लागतात शाळेचे! आजच जगसुद्धा खूप फास्ट आहे, तेव्हा मूल स्मार्ट’च’ असायला हवं. अगदी सकाळी सहा ते रात्री दहा – सगळे क्लास लावू आम्ही – त्याला सगळं यायला हवं; अभ्यास, खेळ, डान्स, गाणं, गेलाबाजार कवितासुद्धा करता यायला हवी – किती विदारक आहे हे? कधी स्वत:च लहानपण आठवून पाहिलं आहे? किंवा कधी हा विचार केला आहे का, की खरोखरच आपण जे शिकलो त्यातलं नक्की किती उपयोगाचं आणि किती खर्डेघाशी होती? तेच ते रूटीन - आपल्या उष्ण कटिबंधात न झेपणारे ड्रेसेस आणि शूज, होमवर्क आणि क्लासेसचा मारा.... एक भयंकर शर्यत सुरू आहे आणि आपण ही विचार न करता 'ट्रेंड-ट्रेंड' म्हणत धावायचं - न धावाल तर पायदळी तुडवले जाल.

बरं, गंमत अशी - मी आणि ऋतुराज (नवरा) दोघेही शाळा-कॉलेजमध्ये टॉपर .-तरी आम्हाला दोघांनाही शाळा आवडायची नाही -म्हणजे काय ते बांधलेपण, तो अविरत धावायचा प्रकार. हाच विचार आम्ही केला आणि ठरवलं - मुलीला शाळेतून काढायचं! शाळा छानच होती, सगळ्या सुविधा, लक्ष देणारे शिक्षक, जागतिक दर्जा – पण आम्हाला हवा होता शिकण्यातला मोकळेपणा!! काय होईल हिला शाळेतच नाही घातलं तर?! शिकू दे घरी... अगदीच चुकीचं काही घडतंय असं वाटलं, तर घेऊ अ‍ॅडमिशन. एखादं वर्ष वाया जाईल, यापेक्षा वेगळं काय होणार आहे?

बरेचदा भारताबाहेर फिरताना होम स्कूलिंगबद्दल ऐकलं होतं; पण तिथल्यासारखी आपल्याकडे ही पद्धती सर्वमान्य नाही, तरीही एखादं वर्ष करून तरी बघू, म्हणून हे शिवधनुष्य उचललं. इथे ते मोडून चालणार नव्हतं. पेलायचं होतं, तोलायचं होतं!! त्यातून आम्ही दोघही वर्किंग. तेव्हा पूर्ण विचारान्ती हा निर्णय घेतला.
शाळा नाही म्हटल्यावर सुरुवातीचा सगळा वेळ टीव्ही बघण्यात घालवला जाऊ लागला. पण पंधरा दिवसातच त्याचा कंटाळाही येऊ लागला. मग भन्नाट खेळून झालं, मग टिवल्याबावल्या करून झाल्या – दोनेक महिन्यांनी अभ्यासाला सुरुवात झाली.
पण नेमका अभ्यास करायचा म्हणजे तरी काय? मग शुद्धलेखन, पाढे, पुस्तक वाचन, वेगवेगळ्या विषयांवर घरात गप्पा सुरू झाल्या. कधीतरी मुख्य प्रवाहात यावंच लागलं, तर... म्हणून शालेय पुस्तक आणून ठेवलेली. SSC /CBSE/ICSE सगळीच पुस्तकं घरात असायची. जे आवडेल त्याचा अभ्यास करायचा. भाषेच कोणतंही बंधन नव्हतं, दोन्ही भाषांमध्ये पुस्तक आणून ठेवली होती .

खरा होम स्कूलिंगचा धडा सुरू झाला तो प्रवासात! आम्ही कामानिमित्त फिरत असतो – मग वेगवेगळे प्रदेश, तिथली वैशिष्ट्यं, त्याची ऐतिहासिक-पौराणिक पार्श्वभूमी, तिथल्या भाषा, मातीचे प्रकार, घरांचे प्रकार, बोलीभाषा, वेषभूषा आणि मुख्य म्हणजे तिथले प्रसिद्ध असे खाण्याचे पदार्थ – भूगोल, इतिहास, भाषा विषय असेच शिकवत आहोत. वेगवेगळी राज्यं, त्यांच्या सीमा, त्या सीमाभागातील चालीरितींची देवाण-घेवाण, सगळंच मनोरंजक होऊ लागलं.

nili

आपण वयाने मोठे असलो, तरी,आईवडील म्हणून आपण मुलांच्याच वयाचे असतो, तेव्हा आपणही शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेत असतो - हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो. मुलीच्या वयासोबत आईबाबा म्हणून आमचाही त्याच वयाचा वाढदिवस असायचा. एक म्हटलं जातं किंवा तसा एक गोड गैरसमज आहे की जे आम्हाला मिळालं नाही, ते मुलांना मिळायला हवं, आणि यासाठी आईवडील काहीही करायला तयार असतात. आम्ही जरा वेगळा विचार केला. आपण किमानपक्षी एवढंतरी नक्की देऊ जे आपल्याला आपल्या आईवडिलांनी दिलं! हे खूप उपयोगी पडलं. आईवडील म्हणजे ’देव’ नव्हेत, आपल्यावर खूप प्रेम करणारी दोन माणसं, हा विचार आधी रुजवला.

मुळात एवढ्या चांगल्या शाळा असताना होम स्कूलिंगच का? घरातून - बाहेरून खूप विरोध झाला, तुमच्या भलत्या विचारांपायी तुम्ही मुलीच्या भवितव्याशी खेळताय, हे सगळं कानाआड करत आम्ही तिघेही पुढे निघालो. मुळात आपल्या पाल्याने ‘शिकायचं कसं?‘ एवढं आधी शिकावं हा आमचा अट्टहास होता. अभ्यास आणि अभ्यासक्रम नंतर.

शिकायचं म्हणजे घोकंपट्टी किंवा भरपूर मार्क्स असली कोणतीच स्पर्धा नव्हे. एखादी गोष्ट शिकताना तिच्या मुळापर्यंत जाता यायला हवं. सगळेच विषय हे एकमेकांना धरून असतात हे दाखवून दिलं. कशाला पाहिजे मराठी, किंवा इतिहास किंवा गणित? असं नसतं. उद्या मोठे होऊन इंटेरियर डिझाईनर झालात आणि मोगलकालीन डिझाईन करायचं असेल, तर तुम्हाला इतिहासाची जाण हवीच ना!अशा पद्धतीने आमचा अभ्यास पुढे पुढे सरकत गेला. घरीच अभ्यास असल्यामुळे, ठरावीक काम ह्या आठवड्यात झालं पाहिजे, असा दंडक आहे. मग तुला हवं तेव्हा कर. उरलेला वेळ तिने तिच्या छंदासाठी वापरावा. कधी रेडिओ जॉकी तर कधी कार्यक्रमाचं निवेदन अशा गोष्टी ती यातून शिकत गेली.

आईवडील म्हणून आम्हा दोघांनी यातील जबाबदार्‍या चक्क वाटून घेतल्या. काही विषय त्याने, तर काही मी घ्यायचे. मग आम्हीच तिला विचारलं, तुला कोणत्या विषयासाठी कोण हवंय ते तू निवड. अभ्यासाव्यतिरिक्तसुद्धा हीच पद्धती वापरली. तिचा बाबा सोफ्टवेअर इंजीनियर असल्यामुळे, कॉम्प्युटर त्याने शिकवायचा, त्याचा आकाशदर्शनाचा अभ्यास आहे, तो उत्तम गातो, गाणी कम्पोज करतो, त्याला पेंटिंगमधलं खूप कळतं, खेळ कसा बघायचा, मूव्ही पाहायचा दृष्टीकोन कसा असू शकतो, हे सगळं ती बाबाकडून शिकतेय. इतिहास,भाषा, कविता, नीटनेटकेपणा, उत्तम स्वयंपाक, बिझनेस सुरू करणं म्हणजे काय, तो चालवताना येणार्‍या अनेक अडचणी, त्यावर मात कशी करायची? हे सगळं आईकडून. अर्थात ह्या गोष्टी काही पुढ्यात बसवून शिकवायच्या नसतातच. इथे मोकळेपणा उपयोगी पडला. एकत्र बसून जेवताना नानाविध विषय मिळू लागले. बरेचदा दोघांनाही कामासाठी जावं लागतंं. कोणीतरी एक जण तिला सोबत घेऊन जातो. त्यातूनही नकळत ती खूप शिकली. मान-सन्मान बघणं ही एक बाजू झाली; कधीकधी घ्यावा लागणारा कमीपणा, अपमान तसंच त्या कामासाठी केले गेलेले कष्ट – सगळं तिला पाहता आलं. ह्याचा फायदा म्हणून आम्ही एकमेकांचे जिवलग मित्र झालो.

आपलं मूल आत्मविश्वासपूर्ण असावं, ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. पण हा आत्मविश्वास येतो कुठून? एखाद्या गोष्टीचं संपूर्ण ज्ञान ‘आत्मविश्वास’ निर्माण करतं. उथळपणाने, नको ती स्पर्धा करत, मला कसं सगळ्यांच्या आधी उत्तर आलं – असल्या गोष्टींना जागाच शिल्लक ठेवली नाही. आता महत्त्वाचा मुद्दा आपण शिकतो ते पोटापाण्याच्या सोयीसाठी. त्याचं काय? शाळेत न गेलेल्या अशा मुलीचं भवितव्य काय? इथेसुद्धा आपण पालक मोठी चूक करतो. खरं तर आपण मुलांना पाण्यापर्यंत नेऊ शकतो, पाणी पिऊन तहान भागवणं त्यांच्या हातात आहे. आज आम्ही मुलीला वेगवेगळ्या क्षेत्रातील संधीबद्दल नेहमी सांगत असतो. परंतु, तुला हेच करायचं आहे, ह्यात प्रसिद्धी आहे, ह्यात पैसा आहे अशा गोष्टी प्रकर्षाने टाळतो.

वेगवेगळ्या विषयांवर पुस्तकं वाचायला उपलब्ध करून ठेवली आहेत, तिला हवं तर तिने वाचावीत. सुरुवातीला कंटाळा यायचा. मग तिला त्यातली मज्जा दाखवून दिली. तू टीव्हीवर पाहतेस त्या कथा कोणाच्या तरी इमॅजिन करण्याचा पार्ट आहे, तेव्हा यामध्ये तुझ्या मेंदूला चालना मिळण्याच कामच राहत नाही. उलट पुस्तक वाचनात वर्णनानुसार आपला मेंदू आपण पाहिलेल्या आणि आपण इमॅजिन केलेली चित्रं डोळ्यासमोर उभी करतो, त्यातून चालना मिळत राहते, नवनवीन सुचत जातं. हे मान्य आहे की व्हिडिओमुळे गोष्ट चटकन समजते, हाच त्यातील धोकासुद्धा आहे.

अभ्यास म्हणजे फक्त पाठ्यपुस्तक असू नये, यावर आमचा आजही कटाक्ष आहे. चांगली भाषा बोलता येणं ही काळाची गरज आहे. भाषा कोणतीही असो. शब्दांचे उच्चार, पाठांतर, जीभ आणि मेंदूवरील हे संस्करण अतिशय आवश्यक आहे. ही जबाबदारी मात्र माझ्या आईबाबांनी पार पडली. संस्कृत श्लोक असोत की ज्ञानेश्वर, तुकाराम... आपली ज्ञानाची परंपरा जपलीच पाहिजे. ह्यात धर्म किंवा जातीचा कोणताही संबंध नाही, हेसुद्धा तिला नीट समजावून सांगितलं.

होम स्कूलिंगचे फायदे आहेत यात शंकाच नाही; परंतु ह्यासाठी आईवडिलांना मात्र शब्दशः तारेवरची कसरत करावी लागते. एकतर होम स्कूलिंग म्हणजे चोवीस तासांची शाळाच बनून जाते, शिकत राहणं या अर्थाने. ह्यात बरेचदा मूल सोशल होत नाहीत, त्यांना मधली सुट्टी – डब्बा, मित्र-मैत्रिणी ह्यातील आनंद उपभोगता येत नाही, असं बर्‍याच जणांनी विचारलं. खरं तर आमच्या बाबतीत असा अजिबात घडलेलं नाही. उत्तम ज्ञान असल्याने ती आत्मविश्वासाने बोलते. गल्लीभर तिचे मित्रमैत्रिणी आहेत. आतापर्यंत जिथे जिथे राहिलो, तेथील मित्रमैत्रिणींशी आजही ती संपर्कात आहे. माझ्या मते सोशल असणं एक स्वभाव आहे. राहिला प्रश्न डब्बा आणि शाळेतल्या गमतीजमतींचा – ह्यापेक्षा तिचं ‘परिपूर्ण’ होणं आम्हाला जास्त महत्त्वाच वाटलं.

गेली ६-७ वर्षं तिला होम स्कूलिंग आहे. सध्या ती रूढार्थाने सातवीला आहे. पण गणितात आठवीला आणि भूगोलात सहावीला आहे. अभ्यास उमजून पुढे जायचं आहे, तेव्हा हे होणारच. अभ्यासाव्यतिरिक्त वाचन, गाणं, चित्रकला अशा गोष्टींमध्ये तिला रस निर्माण होतो आहे. IFS व्हायचंय असं अलीकडेच आम्हाला सांगून झालं आहे. अर्थात, ते दर पंधरा दिवसांना बदलत असतं. गमतीचा भाग वगळता जगाकडे डोळसपणे पाहायला ती शिकतेय, यात आम्ही आनंदी आहोत. तिच्या भवितव्यात तिने जे काही व्हायचं आहे, त्यातील सगळी स्किल्स तिच्याकडे असणं हा यामागील हेतू आहे.

गंमत म्हणून एक उदाहरण देते - कराटे क्लासला ती जात होती आणि ज्या दिवशी त्यांची परीक्षा होती, त्या दिवशीच नेमकी आजारी पडली. अर्थात परीक्षा बुडली, म्हणजे सर्टिफिकेट नाही. तेव्हा तिला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली - उद्या तुला कुणी त्रास दिला, तर तू सर्टिफिकेट दाखवणार आहेस का स्किल्स? बस्स, तेव्हापासून सर्टिफिकेटची क्रेझ आमच्यातून हद्दपार झाली. अलीकडेच अशा पद्धतीने शिकणाऱ्या एका भारतीय मुलीची अमेरिकन MITमध्ये निवड झाली, त्या निमित्ताने आम्हालाही आपण योग्य दिशेने जातोय ह्याची जाणीव झाली.

अलीकडे CBSE/ICSE अशा बोर्डांनी होम स्कूलरसाठी थेट दहावीची सोय केली आहे. त्यामुळे बरेच अडथळे कमी झाले आहेत. मुळात शिक्षणाचा उदात्त हेतू, स्वतःला काहीतरी ज्ञान प्राप्त व्हावं, त्यातून चांगलं काही घडावं हाच विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. समाजऋण अर्थात देशाची सेवा, देशाचा विकास ही बीजं रुजणं अत्यंत आवश्यक आहे. ’जरी उद्धरणी व्यय न तिचा हो साचा, हा व्यर्थ भर विद्येचा’ याप्रमाणे वाटचाल झाली तर आणखी काय हवं? अर्ध्या तपाहून जास्त सुरू असलेली आमची शाळा मुलीसोबत आम्हालाही आनंद देत आहे. शालेय अभ्यासक्रमाला धरून सोबतीने गाणी, चित्र, खेळ, वाचन आणि तिला आवडणार्‍या गोष्टीवर वेळ खर्च होतो आहे, ह्यातच समाधान आहे.

तसं पाहिलं, तर प्रत्येकच पालक होम स्कूलिंग करत असतो. ८ तासांची शाळा झाली की १६ तास मूल घरच्यांसोबत असतं. होम स्कूलिंग हा काही फॉर्म्युला नाही, ती वैयक्तिकरित्या आपल्या सोयीने आणि विचाराने करण्याचा भाग आहे. अगदी शाळा सोडूनच हे सगळं करायला हवं, असं अजिबात नाही. मुलांना आपला वेळ देऊन त्यांना त्यांच्या कलाने वाढू द्यावं. ह्या प्रक्रियेत आपणही ‘मोठे’ होत जातो. मुलांना काय दिल पाहिजे, तर हा चिरंतन ठेवा, आनंदी जगण्याचा वसा द्यायला हवा. जान्हवीला घडवत असताना मी आणि ऋतुराजही घडत गेलो, डोळ्यादेखत मूल वाढताना, शिकताना पाहणं - अनुपम सोहळाच तो!

A

प्रश्नः तुझ्या कामाच्या निमित्ताने अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींशी तुझी भेट होते. त्यामुळे तू अनुभवसमृद्ध, ज्ञानसमृद्ध होतच असशील. आमच्याशी काही अनुभव शेअर करशील का?

नीलिमा: कामाच्या निमित्ताने खरंच खूप मोठमोठ्या लोकांच्या भेटी होतात. विशेषतः राजकीय क्षेत्रात - आपण कॉमन मॅन म्हणून काहीबाही ऐकत असतो, मीडियामधून पाहत असतो. पण प्रत्यक्षात मला वेगळंच चित्र पाहायला मिळालं.

वायफायच्या निमित्ताने श्री किरीट सोमय्या यांची भेट झाली. अतिशय प्रसन्न, अभ्यासू आणि मुद्द्यांवर बोलणारं व्यक्तिमत्त्व. माझी आधी थोडी परीक्षा घेतली त्यांनी. माझा प्रोजेक्ट कसा कॉमन आहे आणि त्याहीपेक्षा हे सगळं कसं किरकोळ वगैरे आहे अशा शब्दात सुरुवात केली. अर्थातच मी माझ्या मुद्द्यावर ठाम तर राहिलेच, त्याशिवाय त्यांना माझ्या कामाचं वेगळेपण पटवून दिलं. खूप छान अनुभव होता. यातूनच पुढे मला मुंबईच्या पन्नास रेल्वे-स्टेशनचं काम मिळालं. ते अजूनही सुरू आहे.

कृषी संदर्भात एक संकल्पना राबवावी म्हणून श्री शरद पवार साहेबांना भेटले होते. या वयातही त्यांचा कामाचा उरक आणि एनर्जी जबरदस्त आहे. मुख्य म्हणजे शांतपणे सगळे मुद्दे ऐकून - मला जी मदत अपेक्षित होती त्या दृष्टीने माणसं जोडून दिली. मुळात अचानक समोर आलेल्या व्यक्तीचा मुद्दा इतक्या कमी वेळात समजून घेण्याची कला त्यांना मोठं बनवून गेली आहे, यात शंका नाही.

मी म्हटलं तसं आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला तर काम लवकर होतात. पुणे-मुंबई हायवे वायफाय संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्रजींना SMS केला होता. अक्षरशः अर्ध्या तासाच्या आत त्यांच्या ऑफिसमधून फोन आला. दुसऱ्या दिवशीची वेळ दिली गेली. त्यांच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण माहिती समजून घेऊन त्या संदर्भात पुढे अपडेट्सही दिले आहेत. अर्थात हे काम अजून बाल्यावस्थेत आहे.

काही कारणाने, मैत्रीमैत्रीतून श्री. ज्ञानेश्वर मुळे सरांची ओळख झाली. अतिशय सध्या घरातून केवळ शिक्षणाच्या जोरावर आज 'पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया' म्हणवला जाणारा हा माणूस ऋषितुल्य आहे. त्यांच्याशी बोलताना त्यांचा साधेपणा आणि त्यांच्या ज्ञानाची उंची भारावून टाकते.

a

प्रश्नः इतक्या सगळ्या गोष्टींतून वेळ काढून तू समाजसेवाही करतेस. निर्भया टीम उपक्रमात तुझा सहभाग होता. आणखीही काय काय करतेस?

नीलिमा: वेळात वेळ काढून वगैरे नाही, पण समाजासाठी काही करावं ही प्रत्येकाची इच्छा असते. अर्थात माझे विचार जरा वेगळे आहेत. शक्यतो आम्ही पैसे स्वरूपात दान किंवा देणगी देत नाही. आपला वैयक्तिक सहभाग हा महत्त्वाचा असं मी मानते. 'निर्भया टीम' हे सिकंदराबादचे कमिशनर श्री महेश भागवत सर यांचं ब्रेन-चाइल्ड. कोल्हापूरमध्ये त्याची सुरुवात झाली, तेव्हा या ना त्या रूपाने त्या टीमचा भाग होता आलं, छान वाटलं. अलीकडेच झालेल्या वाढदिवसाला मला एक अनोखी गिफ्ट मिळाली. माझा कॉलेज फ्रेंड आणि एक समाजकारणी श्री योगेंद्र थोरात यांनी, त्या दिवशी जन्माला आलेल्या मुलींच्या आईला माझ्या हाताने साडी-चोळी देऊन त्यांचा सत्कार केला. त्या मुलींना छोटुसं गिफ्टही आणलं होत. खूप छान प्रसंग होता तो .... आपल्यासाठी कुणीतरी असं काही करतंय की ज्यामुळे इतरांच्या डोळ्यात आनंद दिसणार आहे.

समाजात एक मधला असा भाग आहे, जे गरीब नाहीत, पण त्यांना पुरेसं उत्पन्न नाही. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा काही वाटा वैयक्तिक पातळीवर आम्ही उचलतो. कारण त्यांना त्याची विशेष गरज असते. हे शिक्षण त्या विद्यार्थ्याला काम मिळवून देणार असेल याची काळजी घेतली जाते. कारण ह्या वयोगटाला शिक्षणासाठी पैसे नाही मिळाले,तर नैराश्यातून ती व्यसनाधीन होऊ शकतात. एकूणच युवा गट डोळ्यासमोर ठेवून हे काम केलं जात.

प्रश्नः आता तुझ्या फॅमिली फ्रंटबद्दल सांग.

नीलिमा: हो फॅमिली!! ती सगळ्यात महत्त्वाची.
रमा असं कंपनीचं नाव ठेवण्याचं कारण म्हणजे 'माझी आई'!! मनोरमा ह्या तिच्या नावातली काही अक्षरं - हो, कारण मी तिच्याकडून सगळं शिकू शकले नाहीए, , जे काही थोडंफार शिकले त्यातून हे सगळं जमवतो आहे.
आई शब्दशः विदुषी होती. संस्कृत भाषा अभ्यासक - धर्म - राजकारण - उत्तम स्वयंपाक - वक्तृत्वकला - माणसं जोडण्याची कला तिला अवगत होती. अठरा अध्याय गीता तोंडपाठ असणारी आई शेवटच्या काळात कॉम्प्युटरही शिकली होती. नव्या-जुन्याचा उत्तम संगम तिच्याचकडून माझ्यात आला आहे.
बाबा शिक्षक, नाटकवेडे, गाणारे आणि मुख्य म्हणजे कधीच गंभीर नसणारे - माझ्यातला नटखटपणा त्यांचीच देणगी!! भाषेची आवडही त्यांच्यामुळे लागली. नाटक हा जिव्हाळ्याचा विषय - सहज म्हणून सांगते, लवकरच समांतर रंगभूमीवर एक नाटक येत आहे, मुख्य रोल असेल त्यात माझा.

आयुष्याच्या महत्त्वाच्या वळणावर ऋतुराज भेटला. माझ्या धाडसी निर्णयांना त्याचा नेहमी पाठिंबा असतो. लग्नात जी सात वचन देतात - त्यातलं महत्त्वाचं म्हणजे नेहमी पाठीशी खंबीर उभा राहीन - हे तो खरं करत आला आहे. अतिशय शांत स्वभावाचा, कविमनाचा आणि संगीतप्रेमी इंजीनियर, आज त्याच्या व्यवसायाचा पसारा जगभर पसरत आहे. पण प्रसंगी माझ्या स्वप्नांसाठी तो स्वतःच काम बाजूला ठेवून मला साथ देत आला आहे. आमची कन्या जान्हवी उर्फ चिऊ सध्या आमच्याबरोबर राहून आम्ही तिच्यावर जे जे प्रयोग करतो त्याला उत्तम प्रतिसाद देत आहे. स्वयंपाकाची आवड ते फूटबॉलची रेफ्री व्हायचं अशा रेंजमध्ये तिची स्वप्नं सुरू असतात.

फॅमिलीचाच महत्त्वाचा पार्ट आहे मित्रमंडळ. खरंच मागचा जन्म असेल तर मी खूप पुण्य केलं आहे, असे एक से एक मित्रमैत्रिणी मला मिळाले आहेत. माझ्या पडत्या काळात माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवून त्यांनी मला खंबीर साथ दिली, म्हणून आजची ही वाटचाल मी करू शकले.

a

वरच्या फोटोत उजवीकडुन डावीकडे जान्हवी, नीलिमा, मधुर भांडारकर आणि ऋतुराज

प्रश्नः रमासाठी तुझे फ्यूचर प्लान्स काय आहेत?

नीलिमा: फ्यूचर असं नाही, पण येत्या दोन वर्षांत एज्युकेशन, केजी टू पीजी या क्षेत्रात E-Educationच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी घरच्या घरी उत्तम शिक्षण घेण्याचं विश्वसनीय माध्यम निर्माण करण्याचा मानस आहे. तसंच कृषिप्रधान देश ही संकल्पना Information and Technologyशी संलग्न करून त्यामध्ये आमूलाग्र बदल होईल, ज्याचा बळीराजाला वैयक्तिक पातळीवर विशेष फायदा करून घेता येईल यावर काम सुरू आहे.

तू इतक्या मस्त गप्पा मारल्यास आमच्याशी म्हणून आभार वगैरे नाही मानणार . तुझ्या ह्यापुढच्या वाटचालीसाठी तुला, ऋतुराजला आणि चिऊलीला आमच्याकडून भरभरून शुभेच्छा!!

धन्यवाद.

.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

उल्का's picture

8 Mar 2017 - 3:50 pm | उल्का

अतिशय सुन्दर मुलाखत!

पद्मावति's picture

8 Mar 2017 - 3:57 pm | पद्मावति

एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची मनमोकळी मुलाखत. आवडली.

मस्त व्यक्तिमत्व..सुंदर मुलाखत..खूप आवडली..

पैसा's picture

9 Mar 2017 - 5:40 pm | पैसा

मुलाखत आवडली. अफाट मुलगी आहे ही!

स्नेहानिकेत's picture

10 Mar 2017 - 12:03 am | स्नेहानिकेत

एकदम मस्त मुलाखत!!! अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे नीलिमा देशपांडे यांचे.

सविता००१'s picture

10 Mar 2017 - 3:11 am | सविता००१

मस्त मुलाखत घेतली आहेस प्रिमो. फार आवडली.

ही मनमोकळी मुलाखत आवडली.

सुरेख उमद्या व्यक्तिमत्त्वाची तेवढीच छान ओळख.

स्नेहल महेश's picture

10 Mar 2017 - 11:02 am | स्नेहल महेश

खूप छान ओळख
प्रेरणादायी व्यक्तिमत्व आवडलं

काय काय करत असतात स्त्रिया खरच _/\_अतिशय प्रेरणादायी.
मस्त मुलाखत प्रिमो.

गिरिजा देशपांडे's picture

10 Mar 2017 - 11:55 am | गिरिजा देशपांडे

मस्त मुलाखत. आवडली.

पूर्वाविवेक's picture

10 Mar 2017 - 12:30 pm | पूर्वाविवेक

प्रिमो, खूपच धडाडीची आहे तुझी मैत्रीण. मुलाखत सुंदर झालीय.

मुळात आपण काम करत असताना आपल्यातील हा भेदभाव (मी स्त्री वगैरे) मनातसुद्धा आणू नका. मी कधीच आणत नाही. विशेष सवलती मी नेहमीच नाकारते - म्हणजे बाईमाणूस म्हणून रांगेत मध्येच पुढे जाणं किंवा मला उशीर होतोय - मी खूपच वेळ बाहेर आहे - वगैरे सबबी सांगून गैरफायदा घेणं.

हे फार आवडलं.

इडली डोसा's picture

10 Mar 2017 - 12:44 pm | इडली डोसा

सगळ्याच गोष्टिंबद्दल किती सुस्पष्ट विचार आहेत.

निलिमाचे खूप कौतुक आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

जव्हेरगंज's picture

11 Mar 2017 - 11:28 pm | जव्हेरगंज

माझी आधी थोडी परीक्षा घेतली त्यांनी. माझा प्रोजेक्ट कसा कॉमन आहे आणि त्याहीपेक्षा हे सगळं कसं किरकोळ वगैरे आहे अशा शब्दात सुरुवात केली>>> हे कशासाठी बॉ!

मस्त लेख!

मुलाखत आवडली. बरेच काम करतायत त्या. आपल्याला यातले कितपत जमेल असा प्रश्न मनात येऊन गेला.

प्राची अश्विनी's picture

12 Mar 2017 - 7:33 am | प्राची अश्विनी

काय भन्नाट व्यक्तिमत्व आहे. छान ओळख.

पिशी अबोली's picture

13 Mar 2017 - 7:53 pm | पिशी अबोली

सुं-द-र!

कविता१९७८'s picture

14 Mar 2017 - 5:39 pm | कविता१९७८

खुप छान मुलाखत प्रिमो.

पियुशा's picture

15 Mar 2017 - 11:15 am | पियुशा

किती उत्साही अवलिअया आहेत ह्या , ध्न्स ग प्रिमो :)

मोदक's picture

15 Mar 2017 - 1:37 pm | मोदक

झक्कास मुलाखत..

सानझरी's picture

15 Mar 2017 - 3:15 pm | सानझरी

अतिशय सुंदर मुलाखत.. खूप आवडली!!

पुष्करिणी's picture

15 Mar 2017 - 4:23 pm | पुष्करिणी

छान मुलाखत प्रीमो,
निलिमाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

नूतन सावंत's picture

15 Mar 2017 - 5:06 pm | नूतन सावंत

झकास मुलाखत.आपल्या मुलाला काय शिकवायला हवेय हे जाणून घेऊन त्यासाठी स्वत:चा वेळ देणारी,कष्ट करणारी नीलिमा भावून गेली.प्रिमो,मस्त,मस्त.

निशाचर's picture

15 Mar 2017 - 5:23 pm | निशाचर

मस्त मुलाखत!

मधुरा देशपांडे's picture

18 Mar 2017 - 11:30 am | मधुरा देशपांडे

सुंदर झाली आहे मुलाखत प्रीमो...निलीमाला खूप शुभेच्छा!! तिच्या होम स्कुलिंग च्या अनुभवाबद्दल पुढेही वाचायला आवडेल...

प्रीत-मोहर's picture

18 Mar 2017 - 11:41 am | प्रीत-मोहर

सगळ्या प्रतिसादकांचे धन्यवाद.

नीलिमा नुकतीच मिपाकरीण झाली आहे. अाता तिलाच लिहायला सांगते.

सुचेता's picture

18 Mar 2017 - 1:59 pm | सुचेता

मस्त मुलाखत ग

अभिजीत अवलिया's picture

18 Mar 2017 - 8:12 pm | अभिजीत अवलिया

मुलाखत आवडली. होम स्कुलिंग हा पर्याय मला देखील पटायला लागलाय हल्ली.

रुपी's picture

14 Jun 2017 - 3:47 am | रुपी

मस्त मुलाखत!