सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


स्त्री असणं ही मर्यादा नव्हेच!

Primary tabs

इनिगोय's picture
इनिगोय in विशेष
8 Mar 2015 - 1:52 am
महिला दिन

स्वाती पांडे बँकिंग इंडस्ट्रीतील इन्फ़र्मेशन सिक्युरिटी व ईडीपी ऑडिट याविषयातील तज्ज्ञ समजल्या जातात. विशेषतः महाराष्ट्रातल्या सहकारी बँकिंग क्षेत्रात त्यांनी सिस्टिम ऑडिटच्या प्रसार व प्रशिक्षणासाठी केलेलं काम मूलगामी असून त्या क्षेत्राचा चेहरा बदलून टाकणारं ठरलं आहे. ब्रिटिश स्टँडर्ड इन्स्टिट्युट या जागतिक मानांकने बनवणाऱ्या संस्थेने भारतातील 'एलिट ऑडिटर्स पॅनल'वर त्यांना निमंत्रित केले असून या पॅनलवर काम करणारी ही पहिली मराठी महिला आहे. या संस्थेतर्फे भारतातील मोठ्या आयटी कंपन्यांचे इन्फ़र्मेशन सिक्युरिटी ऑडिट केले जाते तेव्हा स्वाती पांडे यांचा त्यात समावेश असतोच. विशेष म्हणजे या क्षेत्रातील त्यांची कारकीर्द त्यांनी वयाच्या पस्तिशीनंतर सुरू केली असून अल्पावधीतच अत्यंत सन्माननीय असे यश मिळवले आहे.
स्वाती यांना मिळालेले काही सन्मान याप्रमाणे-
- Women Entrepreneurs of 21st Century - मुंबई विद्यापीठ (२०१०)
- आदर्श डोंबिवलीकर सन्मान (२०११)
- सकाळ तनिष्का सन्मान - सकाळ वृत्तसमुह (२०१२)
- डी एन एस बँक विशेष सन्मान प्रमाणपत्र (२०१२)

सहकार क्षेत्राला माहिती तंत्रज्ञानाची जोड देत आपला ठसा उमटवणाऱ्या स्वाती पांडे यांच्याशी साधलेला हा संवाद.
----------------------------------------------------------------------------------------

SwatiP
प्र. तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल आणि पहिल्या करियरबद्दल काय सांगाल?
उ. मी तशी करियरच्या बाबतीत कोणतीही मोठी स्वप्नं नसलेली साधारण विद्यार्थिनी होते. बारावीनंतर (१९८४) मी एक संगणकाचा कोर्स केला. त्या क्लासनंतर मला जाणवलं की हे करण्यात खूप मजा आहे. तेव्हा भारतात नव्यानेच संगणक आले होते. यात मला रस वाटतोय हे लक्षात आल्यावर वडिलांनी मला प्रोत्साहन दिलं आणि वाणिज्य शाखेची पदवी मिळाल्यावर मी मास्टर्स इन कॉम्प्युटर सायन्स ला प्रवेश घेतला. त्यात विशेष नैपुण्य म्हणून संरचनात्मक प्रणालींचे विश्लेषण व आरेखन (स्ट्रक्चर्ड सिस्टिम ऍनालिसिस अँड डिझाइन) हा अभ्यासक्रम केला. तो त्या वेळेस अगदीच नवीन होता. केवळ संगणकाच्या आज्ञावली लिहिण्यापेक्षा एकंदरीत कोणत्याही प्रकल्पाचा अभ्यास करून त्याची सॉफ्टवेअरच्या संबंधातली गरज निश्चित करणं हे आम्हाला त्या अभ्यासक्रमामध्ये शिकवलं गेलं. त्यावेळी कोणत्याही प्रोग्रॅमर्सना हे शिकवलं जात नसे. या क्षेत्रात माणसं कमी होती, आणि त्यावेळची ती गरज होती. त्यामुळे ते अगदी क्लिक झालं. मी पूर्णपणे याच क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. लिपी डेटा सिस्टिम्स मध्ये मी सीनियर प्रोग्रॅमर म्हणून काम सुरू केलं, आणि नंतर तिथल्या स्ट्रक्चर्ड सिस्टिम ऍनालिसिस अँड डिझाईनिंगच्या विभागाची प्रमुख झाले. तिथे मी ८-९ वर्षं काम केलं.
मला नेहमीच नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे. त्यावेळी संगणक या क्षेत्राचं भविष्य नेटवर्किंगमध्ये आहे, असं लक्षात आलं. मग ऍनालिसिसचं काम करत असतानाच मी सिस्को सर्टिफाइड नेटवर्क इंजिनियरिंगची परीक्षा दिली. त्यातही माझ्या बॅचमध्ये मला बेस्ट रँकिंग मिळालं होतं. एव्हाना मला हे क्षेत्र इतकं आवडायला लागलं की केवळ आवड म्हणून मी हार्डवेअरचाही डिप्लोमा केला. या आवडीमुळेच असं शिकता शिकता मी म्हणजे सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि नेटवर्किंग या सगळ्याचं एक पॅकेजच झाले. एक अतिशय आश्वासक अशी करियर माझ्यासमोर उभी होती.
याच सुमारास माझं लग्न झालं, मुलगी झाली. कुटुंबाची गरज म्हणून मी मग नोकरी करणं सोडून दिलं. एक होतं, की पैसा कमावण्यासाठी नोकरी करायलाच हवी असं मला कधीच वाटलं नाही. नोकरी केली नाही तरी मी पैसे कमावू शकेनच ही खात्री मला कायमच होती. मात्र आधीच्या नोकरीत असताना, नंतर घरी असताना आणि त्यानंतरही नेहमीच मी पुढे शिकत राहिले.
माझी मुलगी जेव्हा शाळेत जायला लागली, तिचा दिनक्रम रुळला तेव्हा मग मी एका सहकारी बँकेत माहिती तंत्रज्ञान विभागाची प्रमुख म्हणून रुजू झाले. सहकारी बँकांचं संगणकीकरण हा एक मोठा टप्पा त्यावेळी सुरू झालेला होता. मात्र तिथे सहा महिने काम केल्यानंतर तिथल्या संकुचित वातावरणात आपलं मन रमणार नाही, हे दिसून यायला लागलं. शिवाय ज्या व्यक्तीला माझ्या विषयातलं काही कळत नाही, अशा व्यक्तीच्या हाताखाली काम करणं मला कधीही जमत नाही. हा माझा दोष म्हणा, किंवा गुण.. पण हे असं आहे. या दोनही कारणांमुळे मी ती नोकरी सहा महिन्यातच सोडून दिली. पण आपण एक दरवाजा बंद करतो, तेव्हा अजून कोणत्यातरी खिडक्या आपल्यासमोर उघड्या होत असतात. या नोकरीच्या काळात बँकांसाठीचं इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑडिट याचा मला अनुभव मिळाला. त्याचा मी पूर्ण आढावा घेतला. आणि ठरवलं की आपण ही परीक्षा द्यायची आणि यातच पुढे काम करायचं. ते वर्ष होतं २००२.
प्र. बँकेमधली सुरक्षित अशी नोकरी सोडून संपूर्ण करियरच बदलून टाकण्याचा हा निर्णय घेताना तुम्हाला अवघड गेलं नाही का?
उ. असे धाडसी निर्णय घेताना मी कधीच घाबरले नाही. शिवाय माझ्या घरचे लोकही याबाबतीत माझ्या एक पाऊल पुढेच आहेत. त्यांचा मला कायमच पूर्ण पाठिंबा होता. ही परीक्षा वर्षातून एकदाच होते, आणि अमेरिकेच्या संस्थेकडून सर्टिफाइड इन्फर्मेशन ऑडिटर असं प्रमाणित केलं जातं. तेव्हा त्या परीक्षेची डॉलर्समधली फी भरण्याइतके पैसे माझ्याजवळ नव्हते, ते मी माझे दागिने गहाण ठेवून उभे केले. आणि त्याहीवेळी हे दागिने पुढच्या सहा महिन्यात आपण सोडवून घेणार आहोत, हे पक्कं होतं. त्याच दरम्यान ब्रिटिश स्टॅंडर्ड इन्स्टिट्यूटने (बीएसआय) माहिती तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेशी संबंधित '२७००१' हे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली होती. ही एक आंतरराष्ट्रीय मानक प्रमाणित करणारी संस्था आहे. मी तेही करायचं ठरवलं. अशा तऱ्हेने २००३पर्यंत CISA (Certified Information System Auditor) हे (ISACA या) अमेरिकन संस्थेचं आणि ISO 27001 हे बीएसआयचं अशी दोन्ही सर्टिफिकेट्स मी मिळवली होती!
प्र. तिथून पुढे प्रत्यक्ष कामाला सुरुवात कशी झाली?
उ. आता पुढे काय, हा विचार करत असतानाच माझ्या नवऱ्याची डॉक्टर तराळेंची ओळख झाली. ते महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशनचे प्रमुख कार्यकारी अधिकारी होते. मी सरांना भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं, की आमच्या सहकारी बँकांनाही इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑडिटची गरज आहे. त्या वेळी एका बँकेला तातडीने ऑडिटरची गरज होती आणि नेमलेला ऑडिटर ठरल्याप्रमाणे तिथे गेला नाही. तेव्हा सरांनी मला विचारलं. मग माझ्या निवडप्रक्रियेचा भाग म्हणून माझं एक व्याख्यान ठेवलं गेलं, एका परिषदेत मध्ये प्रेझेंटेशन देण्यासाठी मी अमरावतीलाही जाऊन आले. या दोन्ही टप्प्यात मी समाधानकारक कामगिरी केली आणि अशा तऱ्हेने बँकेच्या लेखा परीक्षणाची पहिली संधी मला मिळाली!
एका महिन्याच्या अवधीत घडलेल्या या घटना म्हणजे माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता. तोवर मी स्वाती पांडे म्हणून मी काय करत होते, तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वसामान्यपणे काम करणारी इतर अनेकांसारखीच एक बाई होते. इथपर्यंत माझा प्रवास हा 'आवडतंय तर करून बघू' या विचाराने सुरू होता. माझ्या वाटा शोधण्याचा प्रयत्न करत होते. आपल्याला कशात गती आहे, किंवा आपल्या क्षमता नेमक्या काय आहेत, हे समजून घ्यायला माझ्या वयाची पस्तिशी यावी लागली. काही काही लोक फार नशीबवान असतात, ज्यांना खूप लवकर आपल्या गुणांचा शोध लागतो. पण माझ्या बाबतीत प्रशिक्षण कौशल्य, मनुष्यबळ व्यवस्थापन, नियोजन, काम करून घेणं हे मला तसं उशीरानेच कळलं. त्यासाठी मला या संघटनेमध्ये येण्याची वेळ यावी लागली. या संधीनंतर माझ्यातल्या अनेक क्षमतांची मलाच ओळख होत गेली.
प्र. या कामाचं स्वरूप कसं आहे? तुमच्या अनुभवांबद्दल सांगा.
उ. मी जे काम करते ते थोडंसं वेगळं आहे. लोकांच्या पटकन लक्षात येत नाही.
आमची संघटना शहरी तसं जिल्हास्तरीय सहकारी बँकांसाठी काम करते, ५०० हून अधिक सभासद बँकांच्या उत्कर्षासाठी काम करणं ही संघटनेची जबाबदारी आहे. ही ना नफा तो तोटा तत्त्वावर काम करणारी संस्था आहे. बँकांच्या गरजेनुसार त्यांना लागेल ती मदत करणं हे आमचं काम. माहिती तंत्रज्ञान संदर्भातलं लेखापरीक्षण हा माझ्या कामाचा भाग. २००५ मध्ये मी हे काम सुरू केलं तेव्हा मला कोणाचंही मार्गदर्शन नव्हतं. इतकंच कशाला आजही या क्षेत्रात फारशी माणसं नाहीतच. या क्षेत्रात बायकांची संख्या तर आजही शून्य आहे. बँक कर्मचाऱ्यांमध्येही बायकांची संख्या अगदीच नगण्य आहे. असं सगळं असताना गेली दहा वर्षं महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यापाड्यापर्यंत जाऊन असोसिएशनशी निगडित असलेल्या ५०० हून अधिक बँकांच्या शाखांची सिस्टिम ऑडिट्स मी करते आहे. आतापर्यंत या कामासाठी मी दीड लाख किलोमीटर्सचा प्रवास केला आहे. वडिलांकडून आम्हाला मिळालेला एक मोठा वारसा म्हणजे फिरण्याची आवड. दुसरं म्हणजे माणसांशी संवाद साधणं. याचा उपयोग मला माझ्या कामात फारच झाला.
या काळात मी खूप अनुभव घेतले. सगळ्या महाराष्ट्रात विभागांमध्ये पार सिंधुदुर्गापासून ते गडचिरोलीपर्यंत फिरले. माझ्या कामाची व्याप्ती ही नुसती ऑडिटपुरती नसून वेळप्रसंगी भामरागड, गडचिरोली या अत्यंत दुर्गम आणि नक्षलग्रस्त अशा भागातल्या शाखेला कनेक्टिव्हिटी देण्यासाठी आवश्यक ती लाइन टाकून घेणं, तिथल्या जंगलातून ती शाखेपर्यंत आल्यानंतर चाचणी करणं आणि मग ऑडिट करणं हेही करावं लागलं. ग्रामीण भागात आजही याबाबतीत फारशी सजगता नाही. त्यामुळे त्या त्या बँकेत गेल्यानंतर आधी तिथे एक व्यवस्था निर्माण करणं, त्या लोकांना मूलभूत प्रशिक्षण देणं, हे केल्यानंतरच माझं ऑडिटचं काम सुरू होऊ शकायचं. त्यानंतर शेवटच्या बैठकीत संचालक मंडळ किंवा अध्यक्ष यांना तोवर केलेलं काम समजावून द्यायचं, असा क्रम असायचा.
प्र. सहकारी बँकिंग हे क्षेत्र महाराष्ट्रात बरंच विस्तृत, तरीही काहीसं विस्कळित आहे. या बाबतीत काय सांगाल?
उ. पंतप्रधानांची जनधन योजना ही आज चर्चेत आहे. पण गेली अनेक दशकं अगदी अर्थव्यवस्थेच्या तळाशी असणाऱ्या अशिक्षित/अल्पशिक्षित ग्रामीण सामान्य माणसाला भांडवल पुरवण्याचं, आर्थिक बळ द्यायचं काम सहकारी बँक करतेच आहे आणि अधिक जिव्हाळ्याने करते आहे. या बँका कधीच्याच तळागाळापर्यंत पोचलेल्या आहेत. इथे उणीव असलीच तर ती आहे ब्रँडिंगची आणि कॉर्पोरेट क्षेत्रातल्या विचारांची. मी स्वतः कॉर्पोरेट ते कोऑपरेटिव्ह हा जो प्रवास केला, त्यात मी त्या क्षेत्रामध्ये शिकलेल्या गोष्टी जर इथे आणून शकले, तर हादेखील एक सुदृढ उद्योग म्हणून उभा राहू शकतो.
याचबरोबर सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या बँकांच्या काही उणीवाही आहेत, पारंपरिक पद्धतीने चालणारं बँकिंग, बदलांसाठी अजूनही दिसणारी अनिच्छा, इथे असलेल्या अपप्रवृत्ती, शिवाय स्थानिक राजकारण्यांचा असलेला फार मोठा दबाव आणि आर्थिक प्रभावही, विलफुल डिफॉल्टर्सची मोठी संख्या, या सगळ्यामुळे या क्षेत्रामध्ये सुधारणा आणणं फार कठीण होतं. यांची काम करण्याची पद्धत शहरात दिसून येते तशी नाही. याचं एक कारण हेही आहे, की इथे काम करणारा वर्ग हाच मुळी तुलनेने कमी शिकलेला आणि ग्रामीण जीवनशैलीतला आहे. त्याच्यासाठी त्याचं गाव, त्याची शेती, घर, कुटुंब यानंतर नोकरीचा क्रम लागतो. तो फार हुशार नाही, ही सत्य परिस्थिती आहे, तसं नसतं तर तो एखाद्या राष्ट्रीयीकृत किंवा खाजगी बँकेतच नोकरीला गेला असता! हे सगळं समजून त्यांच्याबरोबर व्यवहार करता येणं गरजेचं आहे.
या क्षेत्रातल्या अज्ञानाचा फायदा करून घेत दरम्यानच्या काळात अनेक बड्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी संचालकमंडळीना हाताशी धरून आपापली सॉफ्टवेअर्स या बँकांना विकली. मात्र त्यांचा उपयोग करण्याचं नीटसं प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिलं गेलं नाही. त्यामुळे केवळ करोडो रुपयांचा खर्च झाला, कागदावरचे व्यवहार संगणकात गेले, मात्र त्याचा व्यवसायाच्या वाढीसाठी कोणताही उपयोग झाला नाही. या आयटी कंपन्यांचा हा नफेखोरीचा विळखा सोडवण्यासाठीही असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही खूप काही केलं, जागृती घडवून आणायचा प्रयत्न केला.त्यासाठी या कंपन्यांकडून आलेलं सर्व प्रकारचं दडपण, धमक्या यांना तोंडही दिलं. मात्र हार न मानता आम्ही पाठपुरावा करत राहिलो, आणि सभासद बँकांसाठी माहिती तंत्रज्ञान मंच स्थापन केला. या क्षेत्राची समजून घेऊन त्याप्रमाणे त्यांना सॉफ्टवेअरच्या निवडीचं मार्गदर्शन करणं, त्याचे परवाने मिळवण्यासाठी इंग्रजीतून कागदपत्रं तयार करायला मदत करणं, नवनवी माहिती त्यांच्यापर्यंत पोचवत राहणं, त्यांच्यासाठी या विषयावरची चर्चासत्रं आयोजित करणं हे सगळं या मंचाच्या माध्यमातून आम्हाला करता आलं.
प्र. म्हणजे एव्हाना निव्वळ "माहिती तंत्रज्ञान लेखा परीक्षक" म्हणून स्वतःचा सहभाग मर्यादित न ठेवता तुम्ही सहकारी बँकिंगच्या इतरही बाजूंच्या विकासाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली होती.
उ. होय. याचं श्रेय बऱ्याच अंशी मी संघटनेला आणि विशेषतः डॉ तराळेंना देईन.
या सगळ्या काळात सहकारी बँकिंगची क्षमता लक्षात आल्यावर मग सरांनी आणि मी पुढचा निर्णय घेतला. आम्ही हळूहळू आधुनिकता, तंत्रज्ञान, आणि संशोधन या गोष्टींवर भर द्यायला सुरुवात केली. डॉक्टर तराळेंची बँकिंग विषयातली डॉक्टरेट आणि माझं माहिती तंत्रज्ञान विषयातलं प्रावीण्य यांची सांगड घालत आज संघटनेलाच नव्हे, तर सहकारी बँकिंगलाही आम्ही एका नव्या टप्प्यावर घेऊन चाललो आहोत. बीएसआयकडून गुणवत्ता व्यवस्थापनाचंही एक प्रमाणपत्र दिलं जातं, आम्ही ते आमच्या सहकारी बँकांसाठी करायचं ठरवलं. त्यासाठी पुन्हा मी अभ्यास करून ते सर्टिफिकेटही मिळवलं. आता बीएसआयसाठीही मी ऑनररी लीड असेसर म्हणून काम करतेय. त्यांच्यासाठी एचपी, ऍक्सेंच्युअर, कॅपजेमिनीपासून अनेक ऑडिट्स केली आहेत. परिणामी, सहकारी बँकेचा अगदी बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास, आणि त्याचवेळी अत्यंत प्रतिष्ठित अशा या कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव या दोन्ही गोष्टी मी एकाच वेळी साध्य करू शकले. या अनुभवाचा वापर मी अर्थातच माझ्या क्षेत्रातही करत गेले.
मला मिळालेली माणसं ही माझ्यासाठी फार मोठी जमेची बाजू आहे. मग ते माझे सर असोत, माझ्या कुटुंबातली माणसं असोत, की गावोगावी माझ्यासोबत काम करणारे माझे सहकारी असोत. सरांकडून पूर्ण विश्वासाने दिल्या गेलेल्या संधी, घरच्यांचं, माझ्या नवऱ्याचं प्रोत्साहन आणि माझ्या बँक कर्मचाऱ्यांचं सहकार्य या तीनही गोष्टींनी एवढी प्रगती साधणं शक्य करून दिलं आहे.
प्र. तुमचं कार्यक्षेत्र हे १००% पुरुषांचंच आहे, असं तुम्ही म्हणालात. विशेषतः ग्रामीण भागातल्या पुरुष कर्मचाऱ्यांसोबत काम करताना एक स्त्री म्हणून तुम्हाला आलेले अनुभव कसे आहेत?
उ. ऑडिटला जाताना माझी टीम ही पूर्णपणे तीन चार तिथले स्थानिक कर्मचारी आणि मी अशी असते. एक स्त्री म्हणून मी खात्रीपूर्वक सांगेन की जेव्हा तुम्ही तुमचं बाईपण दाखवायला लागता, तेव्हा समोरचाही तुमच्याकडे त्याच नजरेने बघायला लागतो. तुमची कामाशी असलेली बांधिलकी, तुमचा कणखर आत्मविश्वास आणि तुमची देहबोली या तीन गोष्टींवर तुमची प्रतिमा निश्चित होत असते. यातूनच आपोआप तुमच्याभोवती तुम्ही एक चौकट निर्माण करत असता. मग ती चौकट ओलांडण्याचं धाडस समोरचा पुरुष करू बघत नाही, या मॅडमशी किती सलगी करावी हे त्यांचं त्यांना समजत जातं. आणि त्यातूनच निव्वळ स्त्रीपुरुष म्हणून संबंध न उरता गावोगावच्या सगळ्या मंडळींशी माझे अतिशय सुदृढ असे सहकर्मचाऱ्यांचे, मैत्रीचे संबंध तयार होत गेले.
स्त्री असण्याचाच अजून एक भाग आहे, तो म्हणजे प्रकृतिस्वास्थ्य. गेल्या दहा वर्षांत झालेल्या एकूण प्रवासाचा अर्थातच माझ्या प्रकृतीवर परिणाम झालाच. गावोगावी फिरत असताना बँकेत स्त्री कर्मचारीच नसल्याने, किंवा बँकच चक्क गोठ्यात किंवा अशा अडनिड्या जागी असल्याने स्त्रियांसाठी शौचालयाची सोय नसणं हाही फार मोठा त्रासाचा विषय होता. मग अशा वेळी दिवसभर पाणीच प्यायचं नाही, असं करावं लागायचं. पण हळूहळू विचार केला, की हे आपल्यासाठी चांगलं नाही. मग मी सोबतच्या बँकेच्या माणसाला किंवा ड्रायव्हरला आधीच सांगून ठेवायला सुरुवात केली. गरज पडली की त्यांच्या घरी जावं लागायचं. पाठदुखी, स्पाँडॅलिसिस, बीपी याचाही त्रास मला झाला. त्यासाठी मी गेल्या काही वर्षांपासून योगासनं करायला सुरुवात केली, त्यांचा मला खूप उपयोग होतोय. संपूर्ण शाकाहार, आणि मिताहार यानेही मला खूपच उपयोग होतो.
प्र. या फारशा माहीतही नसलेल्या पुरुषप्रधान क्षेत्रात, अनेक मूलभूत अडचणींना सामोरं जाऊन प्रचंड मोठा प्रवास करून, गेली दहा वर्षं तुम्ही यशस्वीपणे हे काम करत आहात. हे कशामुळे साध्य झालं असं तुम्हाला वाटतं?
उ. समोर येईल त्या परिस्थितीत काम पूर्ण करायचं, त्यासाठी आवश्यक ते निर्णय तिथल्या तिथे घ्यायचे, अडचण आली तरी हातपाय गाळून न बसता, रडत न राहता स्वतः मार्ग काढायचा, हीच माझी काम करण्याची पद्धत आहे. आणि माझ्या या स्वभावाचं श्रेय माझ्या वडिलांना आहे. नोकरीच्या निमित्ताने वडिलांना अनेक वर्षं महाराष्ट्राबाहेर काढावी लागली. त्यांची व्यवस्था पाहण्यासाठी, कधी त्यांना आजारपण आलं म्हणून आईला अनेकदा त्यांच्या नोकरीच्या गावी जावं लागत असे. धाकटी भावंडं माझ्यापेक्षा सात आठ वर्षांनी लहान, त्यामुळे कायमच मोठेपणाचा अधिकार हा माझ्यात सुरुवातीपासून होताच. आईवडीलांनीही मला सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊ दिले, म्हणजे अगदी सातवी-आठवी पासूनच बँकेत पैसे भरणं, काढणं, बिलं भरणं, आई इथे नसताना दोघा भावंडांना सांभाळणं हे सगळं मी करत होते. त्या वयातला एक प्रसंग मला आठवतो. आठवीत असताना माझ्या गळ्यापाशी एक गाठ आली होती, आणि ती शस्त्रक्रिया करून काढून टाकायची होती. मला आदल्या दिवशी रुग्णालयात दाखल केलं. रात्रभर आई माझ्यासोबत राहिली, आणि घरचं आवरून येण्यासाठी सकाळी परत गेली. ती येईपर्यंत माझ्याजवळ थांबण्यासाठी वडील घरून निघाले होते. ते पोचण्याआधीच सर्जन राउंडवर आले, आणि त्यांनी मला विचारलं, आई बाबा कुठे गेलेत? मला आत्ता वेळ आहे, मी तुझं ऑपरेशन करू का? नाहीतर नंतर दुपारी तीन वाजता तुझा नंबर येईल. तेव्हा मी उत्तर दिलं, चालेल, तीन वाजेपर्यंत थांबण्यापेक्षा तुम्हाला आता वेळ आहे, तर तुम्ही माझं ऑपरेशन करा आत्ताच! थोड्या वेळाने वडील पोचले, त्यांनी विचारलं, इथे माझी मुलगी होती ती कुठे आहे? तेव्हा स्टाफने सांगितलं, तिला ऑपरेशन साठी नेलंसुद्धा.. डॉक्टर आणि वडील दोघंही थक्क झाले होते.. पण माझ्या मनात किंचितही भीती नव्हती, की माझ्यासोबत कोणी नाही, मग मी काय करू?
माझ्या या स्वभावाला वडिलांनीही नेहमी प्रोत्साहनच दिलं. मुलगी असल्यामुळे कधीच कोणतीही बंधनं आम्हा बहिणींवर त्यांनी घातली नाहीत. किंबहुना आम्हा भावंडांमध्ये वाचन, भटकंती, चांगले कार्यक्रम पाहणं अशा आयुष्यभर सोबत करणाऱ्या उत्तम आवडी निर्माण केल्या. चांगलं आणि वाईट यामधला फरक फार समर्पकपणे आम्हाला नेहमीच दाखवून दिला. या सगळ्यामुळे मी आज अनेक गोष्टींचा मी आस्वाद घेऊ शकले. आपल्या सभोवती घडणाऱ्या गोष्टींशी स्वतःला जोडून घेत राहिले. सुरुवातीला मी म्हटलं तसं मला माझी स्वतःची ओळख होण्यासाठी वयाची पस्तिशी यावी लागली. मात्र तोवर मी सतत नवनव्या गोष्टी करून बघत राहिले, शिकत राहिले. यासाठी तुम्ही फार बुद्धिवान असण्याची गरज नसते, तर अल्पसंतुष्ट न राहता स्वतःला नवनव्या संधी मिळवून देण्याची गरज असते. अजूनही मी चाकोऱ्या निर्माण न करता शिकते आहेच.
प्र. थोडक्यात ज्यावेळी असलेल्या नोकरीत जम बसवून निवांत आयुष्य जगण्याचे बेत केले जातात त्या वयात तुमची ही सेकंड इनिंग सुरू झाली. इतकंच नाही, तर कुटुंब आणि करियर यांचं उत्तम संतुलन तुम्ही जमवलं आहे, हे कशामुळे शक्य झालं?
उ. मला आवर्जून असं सांगावंसं वाटतं, की या क्षेत्रात वावरताना, किंबहुना कुठेही वावरताना स्त्री म्हणून कोणत्याही खास सवलती मागणं किंवा मर्यादा घालणं हे दोन्ही करू नये. स्त्रीकडे मुळातच व्यवस्थापन ही कला जन्मतःच असते. ही कला घरच्या दैनंदिन जीवनापासून ते ऑफिसच्या कामापर्यंत सगळीकडे आवश्यक आणि उपयोगी ठरते. माझं कामाचं स्वरूप हे इतकं वेळ मागणारं आणि कष्टाचं असलं तरी मलाही घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतातच. भाजी आणणं, चटण्या-कोशिंबिरींपासून घरचं जेवण करावं लागणं, माझी मुलगी, जी आज वीस वर्षांची आहे, तिचं, माझ्या नवऱ्याचं खाणंपिणं सांभाळणं, हे सगळं मला करावं लागतंच. एवढ्या सगळ्या गोष्टी कोणताही गोंधळ न होऊ देता पार पाडायच्या तर पूर्वनियोजन ही त्याची फार मोठी किल्ली आहे.
उदाहरणच द्यायचं तर माझ्या घरी दर वर्षाआड गौरी-गणपती असतात, त्या दिवशी अनेक प्रकारचे पदार्थ करायचे असतात. या सगळ्यांचं माझं प्लॅनिंग आठ दिवस आधीपासून झालेलं असतं. मग त्यात त्या दिवशीचा मेन्यु, त्याला लागणारं सामान, त्या त्या पदार्थासाठी लागणारा वेळ, कोणत्या क्रमाने पदार्थ करावेत, त्यासाठी मी सकाळी किती वाजता उठायला हवं, या सगळ्याचा येणार असलेला खर्च हे सगळं मी चक्क लिहून काढते. या प्रकारे काम केल्याने मला कसलाच ताण येत नाही, आणि पंधरा वीस जणांचं जेवणही मी सहज करू शकते. आता हीच पद्धत मी माझ्या ऑफिसमध्येही वापरते. ऑफिस हे माझ्यासाठी माझ्या घराचं एक्स्टेंशनच आहे. त्यामुळे इथल्या सगळ्या गोष्टींमध्येही इतक्याच मनापासून स्वतःला गुंतवून घेते, त्याची जबाबदारी घेऊन त्या त्या गोष्टी पार पाडते.
आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी कराव्याश्या वाटतात तर त्यांची, आपल्या निर्णयांचीही जबाबदारी हवी. ती घ्यायला बऱ्याचशा स्त्रिया घाबरतात. त्यातल्या अपयशाच्या शक्यतेला, किंवा त्रासांना घाबरून त्या गोष्टी न करण्यासाठी कारणं शोधतात. मुलं मोठी झाल्यानंतर गृहिणीला येणारं रिकामपण, निराशा हे तर खूपदा दिसून येतं. मात्र जिच्या मनात खरोखरच इच्छा असेल, तिला तिचे मार्ग सापडतातच, त्यासाठी लागणारं वेळेचं व्यवस्थापन कोणतीही कारणं न देता आपलं आपण करायचं असतं. आपला मार्ग आपण शोधायचा. आपल्या घराशी आपली जेवढी बांधिलकी असते, तेवढीच आपल्या कामाशीही असायला हवी, स्वतःच्या विकासाशीही असायला हवी. माझ्या मागे काय राहील? तर माझ्या कामाचा ठसा राहील. त्यामुळे तो वादातीत राहील, हे मी बघायलाच हवं.
माझ्या आयुष्यात आम्ही खूप खडतर काळ पाहिला, नवऱ्याचा व्यवसाय नवीन असताना आर्थिक आघाडीवरही खूप संघर्ष केला. पण या संपूर्ण काळात मी जे काही केलं ते ते पूर्णपणे झोकून देऊनच केलं, मनापासून, आनंदाने केलं. संबंध जपले, माणसं जोडली. त्यामुळेच माझ्या घरच्यांना, माझ्या सासूसासऱ्यांना आज माझ्याबद्दल अभिमान वाटतो, जिव्हाळा वाटतो. एरवीही घरची स्त्री घरगुती जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये कमी पडत नसेल, तर एका मर्यादेपलीकडे घरच्यांचाही विरोध राहत नाही. घरातलं वातावरण आणि कामाच्या ठिकाणचं माझं यश या गोष्टी परस्परांवर अवलंबून आहेत, आणि त्या दोन्हीला योग्य ते महत्त्व देणं हे स्त्री म्हणून मी करायलाच पाहिजे. हेच तर स्त्रीत्व आहे, नाही का?
प्र. यापुढचा तुमचा प्रवास कसा असेल?
उ. माझ्यासाठी हे सोशोइकॉनॉमिक महत्त्व असलेलं क्षेत्र आहे. ज्यांचा शिक्षणाशी, तांत्रिक प्रगतीशी काहीही संबंध नाही, अशा लोकांनाही बँकेच्या सर्व्हिसेसचा लाभ मिळवून देणं, मग ते बायोमेट्रिक एटिएम मशीन असो, फक्त आठवडी बाजाराच्या दिवशी गावात जाणारं पोर्टेबल एटिएम मशीन असो, किंवा बँकेच्या सगळ्या शाखा जोडून घेतल्याने प्रत्येकाला कामाचा संपूर्ण मोबदला स्वतःच्या खात्यात कोणत्याही मध्यस्थाविना मिळणं असो, हे मला या कामातून साधता येतंय. आता यातला आणखी तपशील सांगायचा तर तेंदुपत्ता तोडणाऱ्या किंवा जंगलावरच उपजीविका करणाऱ्या आदिवासी माणसासाठी एटिएम कार्ड, पिन नंबर, त्यावरचे आकडे हे सगळं कदापिही उपयोगाचं नाही. अशा ठिकाणी आम्ही बायोमेट्रिक एटिएम मशीन तयार करून दिली. मग त्यासाठी त्यांचे दहाही बोटांचे ठसे घेणं, ते नियमितपणे घेऊन डेटा अद्ययावत करत राहणं हे सगळंच त्यात आलं. महिला बचत गटांनाही जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून आम्ही मार्गदर्शन करू शकलो. अशा अनेक गोष्टी आहेत.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सहकारी बँकेच्या खातेदाराच्या गरजा या शहरी माणसापेक्षा संपूर्णपणे वेगळ्या आहेत. पण तसं असलं, तरी या तंत्रज्ञानावर, त्यातल्या सुविधांवर त्यांचाही तितकाच अधिकार नाही का? हे लक्षात घेऊन तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेत कमीत कमी खर्चात अत्याधुनिक बँकिंग सर्व्हिसेस देऊ शकेल, असं सहकारक्षेत्र विकसित करणं, आणि यासाठी ज्यांना या क्षेत्राची यथातथ्य माहिती आहे असे याच क्षेत्रातले लोक मी तयार करेन. हेच माझं यापुढच्या काळातलं ध्येय असेल.

इनिगोय

प्रतिक्रिया

सविता००१'s picture

8 Mar 2015 - 2:00 pm | सविता००१

आणि त्या जे म्हणाल्यात की एक स्त्री म्हणून मी खात्रीपूर्वक सांगेन की जेव्हा तुम्ही तुमचं बाईपण दाखवायला लागता, तेव्हा समोरचाही तुमच्याकडे त्याच नजरेने बघायला लागतो. तुमची कामाशी असलेली बांधिलकी, तुमचा कणखर आत्मविश्वास आणि तुमची देहबोली या तीन गोष्टींवर तुमची प्रतिमा निश्चित होत असते. यातूनच आपोआप तुमच्याभोवती तुम्ही एक चौकट निर्माण करत असता. मग ती चौकट ओलांडण्याचं धाडस समोरचा पुरुष करू बघत नाही, या मॅडमशी किती सलगी करावी हे त्यांचं त्यांना समजत जातं. आणि त्यातूनच निव्वळ स्त्रीपुरुष म्हणून संबंध न उरता गावोगावच्या सगळ्या मंडळींशी माझे अतिशय सुदृढ असे सहकर्मचाऱ्यांचे, मैत्रीचे संबंध तयार होत गेले.

हे तर अत्यंत खरं आहे.
सुंदर मुलाखत.

पिलीयन रायडर's picture

19 Mar 2015 - 2:21 pm | पिलीयन रायडर

अगदी ह्याच ओळी कॉपी पेस्ट केल्या कोट करण्यासाठी!!!

सुंदर मुलाखत!

आयुर्हित's picture

8 Mar 2015 - 5:07 pm | आयुर्हित

मला वाटते ही मिपावरची पहिलीच मुलाखत असणार!
त्यातही एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व समोर आणल्याबद्दल धन्यवाद.

स्पंदना's picture

9 Mar 2015 - 4:44 am | स्पंदना

माझ्यासाठी हे सोशोइकॉनॉमिक महत्त्व असलेलं क्षेत्र आहे. ज्यांचा शिक्षणाशी, तांत्रिक प्रगतीशी काहीही संबंध नाही, अशा लोकांनाही बँकेच्या सर्व्हिसेसचा लाभ मिळवून देणं, मग ते बायोमेट्रिक एटिएम मशीन असो, फक्त आठवडी बाजाराच्या दिवशी गावात जाणारं पोर्टेबल एटिएम मशीन असो, किंवा बँकेच्या सगळ्या शाखा जोडून घेतल्याने प्रत्येकाला कामाचा संपूर्ण मोबदला स्वतःच्या खात्यात कोणत्याही मध्यस्थाविना मिळणं असो, हे मला या कामातून साधता येतंय. आता यातला आणखी तपशील सांगायचा तर तेंदुपत्ता तोडणाऱ्या किंवा जंगलावरच उपजीविका करणाऱ्या आदिवासी माणसासाठी एटिएम कार्ड, पिन नंबर, त्यावरचे आकडे हे सगळं कदापिही उपयोगाचं नाही. अशा ठिकाणी आम्ही बायोमेट्रिक एटिएम मशीन तयार करून दिली. मग त्यासाठी त्यांचे दहाही बोटांचे ठसे घेणं, ते नियमितपणे घेऊन डेटा अद्ययावत करत राहणं हे सगळंच त्यात आलं. महिला बचत गटांनाही जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून आम्ही मार्गदर्शन करू शकलो. अशा अनेक गोष्टी आहेत.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सहकारी बँकेच्या खातेदाराच्या गरजा या शहरी माणसापेक्षा संपूर्णपणे वेगळ्या आहेत. पण तसं असलं, तरी या तंत्रज्ञानावर, त्यातल्या सुविधांवर त्यांचाही तितकाच अधिकार नाही का? हे लक्षात घेऊन तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेत कमीत कमी खर्चात अत्याधुनिक बँकिंग सर्व्हिसेस देऊ शकेल, असं सहकारक्षेत्र विकसित करणं, आणि यासाठी ज्यांना या क्षेत्राची यथातथ्य माहिती आहे असे याच क्षेत्रातले लोक मी तयार करेन. हेच माझं यापुढच्या काळातलं ध्येय असेल.

बापरे!! इतका पुढे जाऊन विचार? आज ना उद्या हॅकिंगला पर्याय म्हणुन हाच एक मार्ग उरणार आहे!! अन याची सुरवात आपल्या भारतात व्हावी यासारखा दुसरा अभिमान नाही!! निरक्षरांना सुद्धा बँकिंग उपलब्ध करुन देण्याचा निर्धार आवडला.

इनिगोय अतिशय सुरेख व्यक्तीची ओळख झाली या निमीत्ताने!!

जुइ's picture

9 Mar 2015 - 7:07 am | जुइ

एका वेगळ्या क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तिची मुलाखत आवडली!!

अजया's picture

9 Mar 2015 - 7:58 am | अजया

एका अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्वाच्या अनाहितेची तेवढ्याच ताकदीची मुलाखत आहे ही.निव्वळ अप्रतिम ओळख.इनि,व्यावसायिक मुलाखतकारासारखी मुलाखत वाटते आहे ही.जीयो!किप इट अप!!

पहिल्यांदा वाचल्यावर अगदी हेच वाटले ...फारच अप्रतिम मुलाखत झालीये हि ...आणि अतिशय वेगळ्या क्षेत्रात केलेली त्यांची कामगिरी फार आवडली .

मधुरा देशपांडे's picture

9 Mar 2015 - 6:10 pm | मधुरा देशपांडे

मुलाखत आवडली.

इनि.. मुलाखत आवडली गं..
अगदी वेगळेच क्षेत्र आहे हे.

भावना कल्लोळ's picture

10 Mar 2015 - 2:23 pm | भावना कल्लोळ

इनि, मस्तच झाली मुलाखत … एकदम छान लेख.

स्वाती दिनेश's picture

10 Mar 2015 - 2:50 pm | स्वाती दिनेश

झकास मुलाखत !
स्वाती

गिरकी's picture

11 Mar 2015 - 4:28 pm | गिरकी

खूप छान मुलाखत !

सानिकास्वप्निल's picture

11 Mar 2015 - 9:32 pm | सानिकास्वप्निल

छान मुलाखत !
एका अनोख्या व्यक्तिमत्वाची ओळख / माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

सस्नेह's picture

12 Mar 2015 - 11:18 am | सस्नेह

अत्यंत प्रेरणादायी सुंदर मुलाखत. धन्स इनि.

कवितानागेश's picture

13 Mar 2015 - 12:49 pm | कवितानागेश

परत परत वाचावी अशी मुलाखत. :)

विशाखा पाटील's picture

15 Mar 2015 - 10:34 am | विशाखा पाटील

असंच म्हणते. मुलाखत छान मुद्देसूद झाली आहे.

कोणत्याही नव्या क्षेत्रात पाय रोवायला जे जे गुण लागतात त्यांची ओळख या मुलाखतीच्या निमित्ताने झाली.
धन्यवाद इनि !

प्रीत-मोहर's picture

13 Mar 2015 - 10:05 pm | प्रीत-मोहर

अगदी प्रोफेशनल मुलाखत आहे इनि. आवडली हे वे.सां.न.ल.

भिंगरी's picture

14 Mar 2015 - 3:10 pm | भिंगरी

१००% खर आहे.

अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व! किती सुस्पष्ट आणि ध्येयवादी विचार!
त्यांनी सांगितलेला स्त्रीत्वाचा अर्थ पुरेपूर पटला.
इतक्या उत्तम पद्धतीने त्यांची ओळख करून दिल्याबद्दल... धन्यवाद इनि

माहीतही नसलेल्या क्षेत्रात पाय रोवून स्वतःचा ठसा उमटवणा-या स्वातीताईंना भेटणं हा माझ्यासाठीही एक वस्तुपाठच होता.

मुलाखतीला जे काही लागेल त्याचा आधीच विचार करून त्या पूर्णपणे तयार होत्या. इंग्रजी आणि मराठीत त्यांच्याबद्दल छोटंसं टिपण, सोबत फोटो, एक मोकळी खोली, डाॅक्टर तराळेंची उपस्थिती, हे सगळं वेळेआधीच तयार असल्याने मुलाखत अगदी नीटसपणे पार पडली, आणि त्याचं श्रेय ब-याच अंशी त्यांनाच.

मीता's picture

18 Mar 2015 - 5:25 pm | मीता

खूप छान मुलाखत ..

कविता१९७८'s picture

19 Mar 2015 - 1:59 pm | कविता१९७८

खूप छान मुलाखत

अंतरा आनंद's picture

20 Mar 2015 - 2:28 pm | अंतरा आनंद

सुंदर मुलाखत आहे. एका चाकोरीबाहेरच्या व्यक्तीमत्वाची , त्यांच्या कामाची ओळख करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद.

पैसा's picture

21 Mar 2015 - 1:42 pm | पैसा

'सबल' 'सशक्त' व्यक्तिमत्त्वाची सुरेख ओळख!

पिशी अबोली's picture

25 Mar 2015 - 1:28 pm | पिशी अबोली

एक वेगळं क्षेत्र आणि त्यात काम करणार्‍या एका अफाट व्यक्तिमत्वाची अप्रतिम ओळख करून दिलीत इनिताई..

स्वातीताईंच्या कार्यकर्तृत्वाला सादर प्रणाम. खूपच प्रेरणादायी व्यक्तिमत्व.
त्यांच्या करियरचा प्रवास परिणामकारकपणे मांडला गेलाय. मिपावर मी वाचलेली ही पहिलीच मुलाखत आहे.

या उपक्रमासाठी इनिगोय यांचे अभिनंदन व आभार.

चौथा कोनाडा's picture

8 Mar 2020 - 11:39 am | चौथा कोनाडा

अतिशय आगळी वेगळी अन सुंदर मुलाखत !
प्रवास थक्क करणारा आहे !

सर्वांना महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा !