अंधार क्षण भाग ४ - अलेक्सांद्र मिखाइलोव्हस्की (लेख १५)

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
1 Dec 2014 - 12:28 am

अंधार क्षण - अलेक्सांद्र मिखाइलोव्हस्की

इतिहासाच्या कोणत्याही अभ्यासकाला हे माहीत असतं की आपली भूतकाळाकडे बघण्याची दृष्टी ही सतत बदलत असते. घटनांचे नवीन अर्थ लावले जातात, त्यांच्या जुन्या अर्थांमध्ये सुधारणा केल्या जातात, आक्षेप घेतले जातात. अनेक आदराची स्थानं धुळीला मिळतात, नवीन आदरस्थानं शोधली जातात. कुठलाही इतिहासकार हा भूतकाळाचे दस्तऐवज आणि साक्षीदार यांच्या आधारानेच घटनाक्रमाची निश्चिती करत असतो. जर हे साक्षीदार किंवा दस्तऐवज उपलब्धच झाले नाहीत तर इतिहासलेखनावर साहजिकच मर्यादा येतात. याचं एक बोलकं उदाहरण म्हणजे सोविएत युनियन. १९९१ मध्ये सोविएत युनियन संपुष्टात आलं. त्याआधी बर्लिनची भिंत कोसळली, पूर्व आणि पश्चिम जर्मनी एकत्र झाले, सोविएत रशियाचे अंकित देश एकामागोमाग एक स्वतंत्र झाले. तिथे लोकशाही पद्धतीच्या निवडणुका होऊन बिगर-कम्युनिस्ट पक्ष सत्तेवर आले. या सगळ्या घटनांमुळे सोविएत युनियन आणि पूर्व युरोपातील इतर साम्यवादी राष्ट्रांकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनात फरक पडला. बदल ही एकमेव अशी कायम गोष्ट आहे या नियमाचं इतिहासाने नेहमीच पालन केलेलं आहे.

मी जेव्हा १९९० च्या दशकात बेलारुसमध्ये गेलो तेव्हा हा बदल मला जाणवला. १९२२ पासून म्हणजे अगदी सुरूवातीपासूनच बेलारुस सोविएत युनियनचा भाग होता. पोलंड, रशिया, युक्रेन, लाटव्हिया आणि लिथुआनिया यांनी वेढलेल्या बेलारुसला तेव्हा श्वेत रशिया किंवा बायलोरशिया असं नाव होतं. दुस-या महायुद्धात इथल्या लोकांवर अनेक अत्याचार झाले. नाझी सैन्याने आपला माॅस्कोचा रस्ता बेलारुसमधूनच काढला होता. बेलारुसची राजधानी मिन्स्क हे जर्मनांच्या ताब्यात गेलेलं पहिलं मोठं सोविएत शहर होतं. महायुद्धातल्या मुख्य लढायांबरोबरच जर्मन सैन्य आणि स्टॅलिनचे प्रतिकारक यांच्यातला संघर्षही प्रामुख्याने बेलारुसच्याच भूमीवर होत होता. आपण जर महायुद्धामुळे झालेल्या जीवितहानीच्या टक्केवारीच्या अनुषंगाने विचार केला तर पोलंडचा क्रमांक पहिला लागत होता. ६० लाख पोलिश नागरिक युद्धात मारले गेले - पोलंडच्या युद्धपूर्व लोकसंख्येच्या १८%. बेलारुस त्या वेळी सोविएत युनियनचा भाग असल्यामुळे तिथल्या जीवितहानीचा स्वतंत्रपणे विचार केला गेला नाही. पण आज जर आपण बघितलं तर २२ लाख बेलारशियन्स युद्धात मारले गेले आणि हा आकडा बेलारुसच्या युद्धपूर्व लोकसंख्येच्या तब्बल २५% आहे.

१९९१ मध्ये बेलारुसने स्वतःला स्वतंत्र घोषित केलं आणि ३ वर्षांनी अलेक्सांद्र ल्युकाशेन्को राष्ट्राध्यक्ष झाला. २००६ मध्ये राजकीय निरीक्षकांनी त्याच्या निवडणुकीतले आणि राज्यकारभारातलेही गैरप्रकार उघडकीस आणले. ल्युकाशेन्को हा एक लहरी, हुकूमशाही वृत्तीचा माणूस होता आणि बेलारुस देश ही आपली आणि आपल्या कुटुंबीयांची खाजगी मालमत्ता आहे अशी त्याची समजूत होती. परदेशी पत्रकारांवर तर त्याचा अजिबात विश्वास नव्हता आणि २००६ च्या नंतर अशा पत्रकारांना व्हिसा मिळणं अशक्यच होतं. पण १९९८ मध्ये बेलारुस सरकार आणि पाश्चात्त्य प्रसारमाध्यमं यांचे संबंध बरेच सौहार्दपूर्ण होते. त्यामुळे मला तिथे जाता आलं.

मला बेलारुस देश अतिशय आवडला. अर्थातच हे मी तिथल्या सामान्य लोकांबद्दल आणि निसर्गाबद्दल बोलतोय, राज्यकर्त्यांबद्दल नाही. युरोपमधल्या अत्यंत विरळ लोकसंख्येच्या देशांमध्ये बेलारुसचा समावेश होतो. इथली लोकसंख्या असेल १ कोटी, म्हणजे जवळजवळ पोर्तुगालएवढी पण देशाचं क्षेत्रफळ मात्र पोर्तुगालच्या दुप्पट आहे. असं असल्यामुळे नीरव शांतता हा बेलारुसचा स्थायिभाव आहे. राजधानी मिन्स्क हे रूंद, खुले रस्ते आणि दुतर्फा झाडे असलेल्या गल्ल्यांनी बनलेलं एक देखणं शहर आहे. पण बेलारुसला जाण्याचा माझा मुख्य हेतू हा तिथलं निसर्गसौंदर्य टिपणं नव्हता तर महायुद्धाची भीषणता अनुभवलेल्या लोकांना भेटणं आणि त्यांना बोलतं करुन त्यांचे अनुभव समजून घेणं हा होता.

आणि हे करत असताना दुस-या महायुद्धातल्या एका जाणीवपूर्वक जोपासलेल्या भ्रामक कल्पनेवरचा बुरखा फाडण्याची संधी मला मिळाली. ही कल्पना म्हणजे सोविएत प्रतिकारक आणि त्यांनी दुस-या महायुद्धात बजावलेली भूमिका. युद्धानंतर रेड आर्मीच्या प्रचारकी चित्रपटांमध्ये हे प्रतिकारक म्हणजे अत्यंत आदर्श, उदात्त, देशभक्त असे दाखवले जात आणि त्यांचे आणि सामान्य नागरिकांचे संबंध हे नेहमीच मैत्रीपूर्ण होते असंही दाखवलं जाई. पण सत्य काही वेगळंच होतं आणि ते इतकं शुभ्रधवल तर अजिबातच नव्हतं. मला भेटलेल्या अनेकांनी प्रतिकारक म्हणजे लोकांची जनावरं आणि धान्य यांच्यावर राजरोस डल्ला मारणारे, दारुडे आणि खुनशी असं त्यांचं वर्णन केलं. या लोकांनी असंही सांगितलं की हे प्रतिकारक दिवसा जंगलांमध्ये दडून राहात आणि रात्री खेड्यांमध्ये घुसत आणि जर्मनांशी हातमिळवणी करणा-या गावक-यांना बाजूला काढत. त्यांना कुठलाही पुरावा लागत नसे. केवळ त्यांचा संशय पुरेसा असे. एकदा का असे कोणी लोक त्यांच्या हाती लागले की मग त्यांना हाल हाल करुन मारलं जाई. एका स्त्रीने तर प्रतिकारक नाझींपेक्षाही वाईट होते असं मला सांगितलं होतं. जर तिने असं सोविएत काळात म्हटलं असतं तर त्याबद्दल तिला नक्कीच तुरूंगात जावं लागलं असतं.

बेलारुसमधली माझी सर्वात संस्मरणीय भेट ही मात्र एका जर्मन अत्याचार सहन केलेल्या माणसाची होती. त्याचं नाव होतं अलेक्सांद्र मिखाइलोव्हस्की आणि मॅक्सिमोकी नावाच्या एका छोट्या खेड्यात तो राहात होता. त्याची गोष्ट माझ्या लक्षात राहण्याचं कारण म्हणजे इतकं अचानक त्याच्यावर हे संकट कोसळलं की त्याला विचार करायलाही अवधी मिळाला नाही.

२२ जुलै १९४३ हा तो दिवस होता. आदल्या रात्री झोपताना अलेक्सांद्रला कल्पनाही नव्हती की उद्याच्या दिवशी काय वाढून ठेवलेलं आहे. पहाटे ४ वाजता जर्मन सैनिक त्याच्या घराचं दार तोडून आत घुसले. घरात अलेक्सांद्र आणि त्याचा मूकबधीर भाऊ हेच होते. दोघंही जेमतेम १४-१५ वर्षांचे असतील. त्यांना जर्मन सैनिकांनी उठवलं आणि त्यांच्या गावातून बाहेर जाणा-या रस्त्यावर आणलं. तिथे अजून ५-६ गावक-यांना आणलेलं होतं. सैनिकांनी या दोघांचे हात या इतर गावक-यांच्या हातांना बांधले आणि त्यांना रस्त्यावरून हळूहळू चालत जाण्याचा आदेश दिला. जेव्हा या लोकांनी चालायला सुरूवात केली, तेव्हा जर्मन सैनिक पाठोपाठ सुरक्षित अंतर ठेवून येत होते.

हे सगळं काय चाललं आहे ते अलेक्सांद्रला चांगलं माहीत होतं. तो आणि इतर गावकरी हे मानवी सुरुंगशोधक होते, " प्रतिकारकांनी जागोजागी सुरुंग पेरून ठेवले होते आणि जर्मन सैनिक त्यांना बळी पडले होते. आमच्या गावात अशा अनेक बातम्या आम्ही ऐकल्या होत्या. त्यामुळे जर्मनांनी जिथे सुरुंग आहेत असा त्यांना संशय होता तिथे आम्हाला पाठवलं. " त्याला हेही माहीत होतं की तो आणि इतर गावकरी अशा कात्रीत अडकले होते की त्यांनी काहीही केलं असतं तरी त्यांचा मृत्यू अटळ होता, " जर आम्ही एखादा सुरुंग टाळला पण पाठीमागून येणा-या जर्मन सैनिकांपैकी कोणी जर त्यामुळे मरण पावला तर आम्हाला बाकीच्यांनी गोळ्या घातल्या असत्या. त्यामुळे कोणतीही अपेक्षा न ठेवता आम्ही चालत होतो. "

जिथे सुरुंग असण्याची शक्यता होती असे भाग टाळायचा प्रयत्न करत ते चालत होते," घोडे किंवा इतर प्राण्यांच्या पाऊलखुणा असलेल्या वाटांवरुन आम्ही चालत होतो. एखाद्या ठिकाणी काही खोदकाम केलेलं असलं किंवा तिथे सुरुंग असण्याचा आम्हाला संशय आला तर तो भाग टाळून आम्ही पुढे जात होतो. " त्यांचं तर्कशास्त्र एकदम सरळ होतं - जर ते सुरुंग टाळू शकले तर त्यांच्यामागून येणारे जर्मन पण टाळू शकतील आणि जर एखादा जर्मन सुरुंगाच्या स्फोटामुळे मरण पावला तर आपल्याला गोळ्या घातल्या जातील. स्फोटात मरण्यापेक्षा गोळ्यांनी मरणं परवडलं.

जेव्हा मी त्याला त्यावेळी त्याच्या मनात आलेल्या विचारांबद्दल विचारलं तेव्हा तो एकदम गप्प झाला. आपल्या मनातले विचार शब्दांकित करणं त्याला खूप कठीण गेलं, " माझं तोंड भीतीने कोरडं पडलं होतं. डोळ्यांमधून अश्रू वाहात होते. त्यामुळे रस्ता नीट दिसत नव्हता. प्रत्येक पाऊल पुढे टाकताना नव्याने भीती वाटत होती. कुठे चाललोय, कसे चाललोय, का चाललोय हे काहीही कळत नव्हतं. जिवंतपणी मेल्यासारखं वाटलं त्या वेळी. "

सुदैवाने त्यांना कोणताही सुरुंग सापडला नाही. त्या पूर्ण मार्गावर त्या दिवशी एकही सुरुंग नव्हता. पण हे केवळ त्यांचं नशीब. जर्मन सैन्याने पूर्व बेलारुसमध्ये प्रतिकारकांविरुद्ध ' आॅपरेशन काॅटबस ' नावाची मोहीम सुरु केली होती. या संपूर्ण मोहिमेत मानवी सुरुंगशोधक मोठ्या प्रमाणावर वापरले गेले. एस्.एस्. च्या दस्तऐवजांनुसार जवळजवळ २ ते ३ हजार बेलारशियन लोक या सुरुंगांमुळे मारले गेले.

अलेक्सांद्र आणि त्याच्या गावातल्या लोकांना जरी एकही सुरुंग सापडला नसला तरी त्यांच्या जिवावरचा धोका अजून दूर झाला नव्हता. बाजूच्या खेड्यात पोचल्यावर जर्मन सैनिकांनी ८ गावक-यांमधून ४ जणांना बाजूला काढलं. त्यांच्यात अलेक्सांद्र आणि त्याचा भाऊ हे दोघंही होते. त्यांना बाजूला काढण्याचं कारण म्हणजे जर्मनांनी हे गृहीत धरलं होतं की तरूण आणि धडधाकट माणसं प्रतिकारक दलाचा भाग असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे अशा लोकांना जर्मन सैन्य ताबडतोब ठार करत असे. १९४३ च्या उन्हाळ्यात जर्मन सैन्याने जवळपास सगळा बेलारुस गमावला होता आणि प्रतिकारक दलांचा दरारा तिथे प्रस्थापित झाला होता. त्यामुळे दहशतीचा वापर करुन सामान्य नागरिकांना आपल्या ताब्यात ठेवण्याचे डावपेच जर्मन सैन्य आणि एस्.एस्. वापरत होते. या बाजूला काढलेल्या चौघांवर आता या डावपेचांचं प्रात्यक्षिक होणार होतं, " जर्मनांनी आम्हाला बटाटे साठवण्यासाठी वापरतात तशा एका खड्ड्यात फेकलं आणि तीन मशीनगन्स तीन बाजूंना ठेवल्या. आणि मग दवंडी पिटली की ' आम्ही दरोडेखोरांना कसं मारतोय ते बघायला या! ' प्रतिकारकांसाठी हाच शब्द जर्मन्स वापरत असत.

पण अलेक्सांद्रच्या नशिबाने त्याच्या गावातले काही लोक तेव्हा तिथे होते आणि हा सगळा प्रकार पाहिल्यावर त्यांच्यातले तिघे या युनिटचा प्रमुख असलेल्या जर्मन अधिका-याशी बोलायला गेले. इथेही अलेक्सांद्रच्या नशिबाने तो अधिकारी बेलारशियनांप्रमाणेच पोलिश भाषा बोलू शकत होता. त्यामुळे ते सरळ त्याच्याशीच बोलले, " आम्ही या दोघांना ओळखतो. ही अनाथ मुलं आहेत, दरोडेखोर किंवा प्रतिकारक नाहीत. त्यांच्यातल्या एकाला तर बोलता किंवा ऐकताही येत नाही. ते साधेसुधे शेतकरी आहेत. "

अलेक्सांद्र आणि बाकीचे तिघे त्या खड्ड्यात उभे होते आणि आळीपाळीने त्या मशीनगन्सकडे आणि त्या अधिका-याकडे पाहात होते. त्यांच्या आयुष्याचा निर्णय पूर्णपणे त्या अनोळखी जर्मन अधिका-याच्या हातात होता. त्याने एक क्षणभर विचार केला आणि मग सैनिकांना चौघांनाही खड्ड्यातून बाहेर काढायला सांगितलं. त्याने आपला विचार का बदलला असेल? कदाचित अलेक्सांद्रच्या अपंग भावामुळे त्याचं मन द्रवलं असेल. कदाचित अपंग माणसाला ठार मारायला तो धजावला नसेल. नाझींनी अपंग लोकांना ज्यूंप्रमाणेच गॅस चेंबर्समध्ये ठार मारलं, कारण त्यांच्यावर देशाची बहुमूल्य संसाधनं फुकट घालवणं हा राष्ट्रीय गुन्हा आहे असं त्यांचं मत होतं. पण कदाचित हा अधिकारी त्याला अपवाद असेल. आपल्याला ते कारण कधीच कळणार नाही.

त्या चौघांची सुटका मात्र झाली नाही. त्यांना गावातल्याच एका गोदामात रात्रभर बंद करून ठेवण्यात आलं आणि नंतर मिन्स्कला नेण्यात आलं. तिथून मग त्यांना जर्मनीमध्ये वेठबिगार म्हणून पाठवण्यात आलं. युद्ध संपल्यावर अलेक्सांद्र आणि त्याचा भाऊ, दोघेही आपल्या गावी परत आले आणि परत शेती करायला त्यांनी सुरुवात केली.

आमची मुलाखत संपल्यावर आम्ही अलेक्सांद्रला त्याच्या घरी सोडलं आणि मग आजूबाजूच्या निसर्गाचं चित्रीकरण करायला सुरुवात केली. सगळीकडे अतिशय शांत शांत होतं. पक्ष्यांच्या किलबिलाटाचाच काय तो थोडाफार आवाज येत होता. त्या क्षणी त्याने आम्हाला सांगितलेल्या गोष्टीचा खरा अर्थ माझ्या लक्षात आला.

एक चमत्कारिक अशी भावना मला स्पर्शून गेली. ट्रेब्लिंका किंवा ऑशविट्झ यासारख्या मृत्युछावणीमध्ये चित्रीकरण करतानाही असं कधी वाटलं नव्हतं. निसर्ग - जो माझ्या आजूबाजूला होता - त्याला अलेक्सांद्र मिखाइलोव्हस्कीला सहन करायला लागलेल्या यातनांमुळे काहीही फरक पडत नव्हता. त्याला जर्मनांनी मारला असता किंवा नसता तरी निसर्गाचं चक्र चालूच राहिलं असतं.

त्या क्षणी मला त्या प्रच्छन्न वंशवादी अॅडॉल्फ हिटलरचे शब्द आठवले - ' माणसाने वाघाला मारलं काय किंवा वाघाने माणसाला खाल्लं काय, पृथ्वी तरीही गोलच फिरणार आहे! '

क्रमशः

इतिहासभाषांतर

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

1 Dec 2014 - 2:23 am | मुक्त विहारि

निशब्द....

शांतपणे रुतत जाणारी कट्यार... जाणवली.!

संचित's picture

2 Dec 2014 - 6:59 pm | संचित

मन सुन्न झाले वाचून.

हे लेख वाचले की विचित्र खिन्नता येते.पुभाप्र.

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Oct 2021 - 12:22 am | अमरेंद्र बाहुबली

भयानक.

वाघाला माणसाने मारले काय आणि आणि माणसाने मारले काय पृथ्वी गोल च फिरणार.
ह्या विशाल ब्रह्मांड मध्ये माणसाची किंमत शून्य पेक्षा किती तरी कमी आहे.
पृथ्वी वर माणूस जगाला काय आणि संपला काय कोणाला काहीच फरक पडणार नाही.
हिशोबत पण नाही कोणाच्या.
भीती नी माणूस अन्याय सहन करतो पण आज वाचलो तरी काही वर्ष नी मारणार च आहे हे सत्य जेव्हा माणूस स्वीकारेल तेव्हा त्याच्या वर जगातील कोणताच अती ताकत असणारा राज्य करता,गुंड हुकूमत गाजवू शकणार नहीं.