भाषेची विभक्ति

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 8:12 am

खरं तर, मराठी, तिची अस्मिता, अभिमान वगैरे यांचा विचार तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांनी करणं, म्हणजे अगदी क्षुल्लक आहे. तो करण्याची जबाबदारी ठराविक लोकांकडे सोपवलेली आहे. ते लोक वेळ बघून, सोयीस्करपणे तो करतही असतात. पण क्षुल्लक गोष्टींवर वेळ घालवतोच आपण. असाच मीही घालवत होतो.

पेपर वाचत होतो. एक बातमी अगदी ठळक छापलेली दिसली. श्रीनगरच्या पुरात इतके इतके मराठी लोक अडकले. बातमी वाचून राग आला. राग याचा की श्रीनगरचा पूर हे राष्ट्रीय संकट आहे. असं असताना त्यात इतके मराठी अडकले, इतके बंगाली अडकले, इतके तामिळ अडकले... अशा बातम्या जर प्रत्येक प्रादेशिक भाषेतल्या वर्तमानपत्रात 'हायलाईट' झाल्या तर हे अतिशय चुकीचं आहे. म्हणजे पुन्हा ये रे माझ्या मागल्या म्हणून आपण भाषा-भाषांमध्ये, प्रांता-प्रांतामधे भेद दाखवून देत आहोत. तो नष्ट झाला नव्हताच कधी. तो आहेच. कैक वर्षापासून आहे आणि राहील अशी रास्त भीती वाटते. उद्या समजा गोदावरीला पूर आला, तर मुंबईतील वृत्तपत्र छापतील, की इतके मुंबईकर बुडाले. कोकणात बातमी असेल, 'इतके कोकणचे रहिवासी अडकले'. हे पूर्णत: चूक नसलं तरी बरोबर नक्कीच नाही.

हा विचार करत असताना जपानचं एक उदाहरण ऐकलेलं आठवलं. जपानमध्ये जेंव्हा सुनामी आली होती, हाहाकार माजला होता, तेंव्हा तिथल्या वाहिन्यांना आदेश देण्यात आले होते (आणि ते टीआरपी ची पर्वा न करता प्रामाणिकपणे पाळले गेले होते)] की कुठलीही जातीय, प्रांतीय, वंशीय उल्लेख करणारी बातमी दाखवली जाऊ नये. तसेच, कुठलीही नकारात्मक बातमी दाखवली जाऊ नये. ('हम देख रहे हे यहां, एक घर उजड गया है.. जी, यहां तबाही का आलम है, आप को इस वक्त क्या लग रहा है?..... वगैरे). उद्देश सरळ साधा होता, राष्ट्रीय एकात्मता आणि लोकांमधील धैर्य, विश्वास यांना जराही धक्का लागता कामा नये. आज या गोष्टीला फार वेळ झाला नाहीये, पण जपान पूर्णपणे सावरला आहे, किंबहुना त्या गोष्टीला मागे सारून फार पुढे आला आहे. असं आपल्याकडे होणं..... जरा कठीणच आहे.

असो. असं म्हणत पुढचा पेपर वाचत होतो, आणि आणखी एक बातमी नजरेस पडली. मुंबई विद्यापीठात म्हणे हिंदी दालन, आणि उर्दू दालन उघडतायत आणि त्यामुळे कसं चांगलं होणार आहे वगैरे मजकूर होता. तीही बातमी आवडली नाही. राग आला. असं मराठी दालन उघडत असतील का इतर राज्यात? असा प्रश्न पडला. मोबाईल कंपनीच्या हेल्पलाईन ला फोन केल्यावर मराठी पर्याय निवडूनही समोरचा सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव मराठी येत नाही म्हणाल्यावर त्याला घातलेल्या शिव्या आठवल्या. मराठी पाट्यांवरून मुंबईत झालेलं आंदोलन आठवलं. मुंबईला मुंबई नाही; जाणून बुजून पुन्हा पुन्हा बॉम्बे म्हणणारे ऑफिसमधले कर्मचारी आठवले, थंडपणे तरीही तो-यात 'नो हिंदी नो इंग्लिश' म्हणणारे बँगलोर चे रिक्षावाले आठवले, ऑफिसमधलाच एक 'इंदी नई आता' हे हिंदीतच सांगणारा तमिळ कर्मचारी आठवला, 'साला गवर्नमेंट फॉर्मस सब मराठी मे होता है यार, क्या फालतुगिरी है' असं ट्रेनमधे ऐकलेलं वाक्य आठवलं, तरीही ट्रेनमधे ही 'फालतुगिरी' गप्प करायला माझ्यासकट एकही तोंड उचकटू शकलं नाही' याचा आलेला राग आठवला, छत्रपती शिवाजी महाराज आठवले, पेशवे आठवले, टिळक आठवले, सगळं सगळं आठवलं आणि म्हटलं हाड ! अश्शाच बातम्या छापा. का नाही छापायच्या या बातम्या? आहे आपल्याला काळजी आपले मराठी बंधूभगिनी अडकल्याची. काय चूक आहे? प्रत्येक भाषिक आपापल्या भाषाबांधवांची काळजी करतोच आहे ना? करतंय का कुणी एकात्मतेचा विचार? घंटा ! मग आपणच का?

तो विचार तर फक्त जवानांनी करायचाय; नाही का? त्यांनी अडकलेल्या प्रत्येकाला वाचवायचंय; त्याची भाषा, त्याची जात, त्याचा प्रांत विचारायचा नाहीये; आपली भाषा, आपली जात, आपला प्रांत आठवायचा नाहीये. देश बिश या त्यांच्या लेव्हलच्या गोष्टी आहेत ना!. आपल्याला काय!

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

सगळंच "भडक मकर"पद्धतीने दाखवायचं आणि ट्यार्पी खेचायचा.... जिथं पाणी ओतायचं तिथेच तेल टाकतात !

पैसा's picture

22 Oct 2014 - 10:12 pm | पैसा

अस्मिता कुठे असावी याचं तारतम्य आपल्याकडे एकूण कमीच प्रमाणात दिसतं हे खरं आहे!

खटपट्या's picture

23 Oct 2014 - 3:33 am | खटपट्या

सम्पुर्ण लेखाला अनुमोदने !!

प्रभाकर पेठकर's picture

27 Oct 2014 - 1:42 am | प्रभाकर पेठकर

असा संताप ठायी ठायी उफाळून येतो....... आणि थंड होतो.