गुंडा

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
28 Mar 2013 - 5:58 pm

क्रिकेट = सचिन / सौरव / कपिल / गावसकर
गायन = लता / आशा / किशोर / रफी
संगीत = रह्मान / पंचमदा / मदनमोहन
अभिनय = अमिताभ / आमीर / शाहरुख / मीनाकुमारी
सौंदर्य = मधुबाला / ऐश्वर्या / कत्रिना आणि इतर ढीगभर
लेखक = पु ल / व पु / सावंत
कवी = कुसुमाग्रज / करंदीकर / बापट / पाडगावकर / खरे
पर्यटनस्थळ = हिमाचल / लेह - लडाख / काश्मीर / केरळ
ऐतिहासिक वास्तु = ताज / कुतुबमिनार / चार मिनार / रायगड / लाल किल्ला / चित्तौडगड

gunda

थोडक्यात सांगायचे की कुठलेही क्षेत्र किंवा विषय घ्या या देशाने महानतम व्यक्तींची फौज उभी केली आहे. महानतेत थोडेफार अधिक उणे आहे. नाही असे नाही. पण कुठल्याही क्षेत्रावर / विषयावर एकापेक्षा जास्त व्यक्ती, वस्तु किंवा स्थळ यांनी आपले महानपण सिद्ध केले आहे. थोडक्यात महानतेला काँपिटिशन आहे.

अगदी चित्रपटात सुद्ध शोले की मुगले आझम की मदर इंडिया की पथेर पांचाली अशी चर्चा चालु शकते. पण एका क्षेत्रांत काही स्पर्धा नाही काही वाद विवाद नाहित काही दुमत नाही. जानी दुष्मन, क्लर्क, सावरिया, गायब हे कितीही उत्तम स्पर्धक असले तरी ते अजरामर गुंडा च्या पासंगालाही पुरत नाहित. गुंडा इज अ डिफरंट क्लास. त्याला काही स्पर्धा नाही. आणि गुंडा म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काहीच उभे राहत नसेल तर हाय कंबख्त तुने हिंदी पिक्चर्स देख्याच नही. वैष्णोदेवी म्हटल्यावर देवीची मुर्ती, अमरनाथ म्हटल्यावर शंकराची पिंड, तबला म्हटल्यावर झाकीर हुसैन आणि शोले म्हटल्यावर गब्बर आठवत नसेल तर मी एकवेळ समजु शकतो. पण गुंडा म्हटल्यावर मिथुन आठवत नसेल तर तुम्ही तुमचा जन्म, शिक्षण, अनुभव इत्यादी इत्यादी सर्व अक्ष्ररशः मातीमोल केले आहेत असे ठाम विधान करायला हरकत नाही.

गुंडा हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. उद्या युनिव्हर्सिटीत जर त्याच्यावर १०० मार्कांचा पेपर आला तर त्याच्यावर आपल्या शाळेतल्या पेपरसारखे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपल्याला कसे शाळेत संदर्भासहित स्पष्टीकरण द्या किंवा कोण कोणास म्हणाले सरखे प्रश्न असायचे तसेच प्रश्न गुंडाच्या पेपरमध्ये असतील, थोड्या फरकाने. म्हणजे कोण कोणास म्हणाले ऐवजी कोणी कोणाचा रेप केला किंवा कोणी कुणाचा खून केला असे. अजुन अवघड प्रश्न विचारायचा असेल तर "---------" ला मारण्याआधी "========" त्यला ------------- म्हणतो. संदर्भासहित स्पष्टीकरण द्या. स्पष्टीकरण कांती शाह आणी मिथुन पण देऊ शकायचे नाहित. संदर्भ तर मूळातच नाही. मरा लेको १० पैकी ० गुण घेउन. परीक्षार्थ्याला अजुन पिडायचे असेल तर मिथुन ने किंवा मुकेष ऋषीने चित्रपटात कत्तल केलेल्या लोकांची संख्या विचारा. त्याला अजुन ताप द्यायचा असेल तर त्या सगळ्यांची नावे विचारा. ती ब्रह्मदेवालादेखील माहिती असणे शक्य नाही.

आणि गुंडामधले एक एक हिरे डायलॉग शोधायचे झाल्यास तो एक स्वतंत्र पी एच डी चा विषय होउ शकतो. " मेरे पास मा है" किंवा " चिनॉयसेठ जिनके घर शिशेके होते है वो दूसरो पे पत्थर नही फेका करते" किंवा "आपके पाव बहुत खूबसुरत है, इन्हे जमीं पर मत रखियेगा, मैले हो जायेंगे" किंवा "ठाकूर ने हिजडो की फौज बनायी है" किंवा गेलाबाजार "जली को आग कहते है बूझी को राख कहते है, जिसके आग से बारुद निकलता है उसे विश्वनाथ कहते है" असे डायलॉग्स त्या त्या कलाकाराला अभावाने मिळाले. एका पिक्चर मध्ये फार तर एक आणी असे अनेको पिक्चर केल्यावर एक अजरामर. पण गुंडातले सगळेच ड्वायलाक डोळ्यात पाणी आणतात. अनुषंगाने येतीलच पुढे.

तर आता गुंडाची ष्टोरी. म्या पामर फारसे काही सांगु शकणार नाही. पण दुष्टाविरुद्ध सुष्ट असा एकुण गाभा आहे. दुष्ट कोण आणी सुष्ट कोण हे ज्याचे त्याने ठरवावे. तर होते असे की २ नामचीन गुंड असतात "लंबु आट्टा" आणि "बुल्ला ". त्यातला बुल्ला म्हणजे आपला मुख्य खलनायक मुकेश ऋषी. एक राजकारणी लंबु आट्टाला दुसर्‍या एका राजकारण्याला मारण्याची सुपारी देतो कारण त्या दुसर्‍याने बुल्लाला पहिल्या राजकारण्याला (तो गृहमंत्री असतो बरे) मारण्याची सुपारी दिलेली असते. इथे लंबु एकावर एक फ्री या योजनेअंतर्गत राजकारण्याबरोबर बुल्लाला पण उडवण्याचे ठरवतो (पुराने दुष्मनी हो अजुन काय.) "साले को मैने दूध पिला पिलाकर पाला. आज वो मेरी छाती चबाना चाहता है असे आपला लंबु आट्टा म्हणतो. इथे "तुने मेरा दूध पिया है, तु बिलकुल मेरे जैसा है" वगैरे गाणे टाळल्याबद्दल दस्तुरखुद्द देवानेच लंबु आट्टाला "दूध पिलाने" काबिल बनवले असावे. तर असो. यानंतर एक रक्तरंजित मारामारी सुरु होते. लगेच लंबु बुल्लाच्या एका माणसाला मारतो. तो माणूस लांबच लांब तलवार पोटात खुपसलेली असताना तलवार धरुन बुल्ला बुल्ला करत येतो आणी मगच प्राण सोडतो. इथेच "मेरा नाम है बुल्ला. रखता हू खुल्ला" आणि "मेरा नाम है चुतिया, करता हू मे अच्छो अच्छो की खडी खटिया" (म्हणजे शक्ती कपूर. बुल्लाचा "काही करु न शकणारा" भाऊ) आणि "मेरा नाम है पोते जो अपने बाप के भी नही होते" मोहन जोशीची आणि "मेरा नाम है इबु हटेला, मा मेरी चुडैल की बेटी, बाप मेरा शैतान का चेला, खायेगा क्या केला" हरीश पटेलची एणट्री होते. आणी मग "लाशे इस तरह से टपकती है जैसे नन्हे मुन्हे बच्चे की नुन्नी से पेशाब टपकता है" ( हे सगळे पिक्चर मधले डायलॉग आहेत. माझी चूक नाही). इथे बुल्ला आणि चुतिया ही जोडी जमवुन कांती शाहने प्रतिभेचा जो अलौकिक अविष्कार दाखवला आहे त्यासाठी स्टीव्ह्न स्पीलबर्गनेही मान खाली घालावी (आपण घालतोच)

यानंतर बुल्ला लंबु आट्टाच्या भावाला मारतो. लंबु आट्टा "छत्री होती है खोलने के लिये, चादर होती है ओढने के लिये और लडकी होती है छेडने के लिये" असे म्हणत बुल्लाच्या बहिणीवर भर रस्त्यात बोलु नये ते करुन तिला मारतो. बुल्ला आपल्या बहिणीच्या शवापाशी उभा राहुन "लंबु ने तो तुझे लंबा कर दिया, माचिस की तिली को खंबा कर दिया. तु तो कटेला पुर्जा मतलब मुर्दा हो गयी" असे म्हणुन आपण ज्या सहजपणे कोपर्‍यावरच्या वाण्याकडे जातो तसे लंबु आट्टाच्या अड्ड्यावर जातो. लंबु आट्टा बुल्लाला " मे तेरे को एड्स से बचाने के लिये कॉडम बन जाऊंगा. पर मेरे को मत मार" असे भावनिक आवाहन करतो. तरी बुल्ला त्याला खपवतोच.

यानंतर भर शहरात, संसद भवनाबाहेर १०-१२ पोलिसांसमोर, फक्त एका सुर्‍याचा त्यांना धाक दाखवुन बुल्लाचा एक गुंड (आपला स्पॉट नाना) गृहमंत्र्याचा खून करतो. आणि पळत पळत तिथुन थेट विमानतळावर जातो. तिथे "मै हू जुर्म से नफरत करनेवाला, शरीफो के लिये ज्योती गुंडो के लिये ज्वाला" असे म्हणणारा इथुन तिथुन मिथुन स्पॉट नानाला पकडवुन देतो. इथे पहिला प्रचंड मोठा धक्का. मिथुन विमानतळावर कूली असतो. हे राम. आता दूसरा धक्का. पुढच्याच शॉटला मिथुन शिपयार्ड मध्ये कूलीगिरी करत असतो. तो नक्की कुठे कूली म्हणून काम करतो की राजाबाबू मधल्या गोंद्याप्रमाणे नुसताच कूलीचा गणवेष घालुन फिरतो हे शेवटपर्यंत गौडबंगाल राहते.

त्यानंतर मिथुन बुल्लाच्या एका गुंडाला फ्रीष्टाइल कुस्तीच्या एका आखाड्यात साधारण साडेनऊ सेकंद हात पिरगाळुन आणि एक ठोसा मारुन लोळवतो. त्यानंतर बुल्लाच्या गुंडांची गाठ मिथुन च्या हवालदार बापाशी पडते. पण तो पडला म्हातारा, मार खातो. ऐनवेळेस येउन मिथुन त्या गुंडांनाही लोळवतो. त्याचा बदला म्हणुन बुल्लाचा गुंड मिथुनच्या बहिणीला पळवुन नेतो आणि तिच्यावर बलात्कार करायचा प्रयत्न करतो. पण ऐनवेळेस येउन गुलशन नावाचा एक सज्जन माणुस तिला वाचवतो. मग ते दोघे प्रथेनुसार गाणे गातात. मिथुनचा पिक्चर असल्याने ऊटीच्या बॉटेनिकल गार्ड्नमध्ये गातात. आणि मग लगेच अजून एका बिदाईच्या गाण्यामध्ये लग्नही करतात. लग्नानंतर असे कळते की मूळात तो गुलशन बुल्लाचाच माणूस असतो. तो लग्नानंतर मिथुन च्या बहिणीला शक्ती कपूर च्या हवाली करतो. नपुंसक असला तरी तो मूळात आद्य बलात्कारी शक्ती कपूर असल्याने व्हिटामिन सेक्स (म्हणजे काय मला माहिती नाही. कांती शहाला विचारा. आपली मजल च्यायला व्हिटामिन बी च्या पुढे जात नाही) खाउन तिच्यावर बलात्कार करतो. त्यात ती मरते. मग तो स्वतःच तिला कुठेतरी घेउन जातो. दरम्यान मिथुन सारख्या दिसणार्‍या (आणि त्यामुळेच बराच वेळ तो मिथुनचा भाऊच आहे असे आपण समजत असलेल्या) मिथुनच्या पाळीव माकडाकडुन मिथुनला त्याची (आणी माकडाची. मिथुनची बहिण मिथुन बरोबर माकडालाही राखी बांधत असते. बरोबरच आहे म्हणा. नक्की कोणाला राखी बांधावी असा गोंधळ होत असावा) बहिण मेलअसावा)कळते. माकडच त्याला क्राइम सीन पाशी घेउन जाते. तिथे शक्ती कपूर कथेची गरज म्हणुन मिथुनची वाट बघत बसलेला असतो. मिथुन त्याच्यामागे धावतो आणि मग तिथे बुल्ला, इबु हटेला, पोते, चुतिया, मंत्री दीपक शिर्के त्यांना सामील असलेला पोलिस इंस्पेक्टर असे सगळे त्याला एकाच ठिकाणी भेटतात. उगा सगळ्यांना वेगवेगळा भेटत राहिला तर पिक्चर पुर्ण व्हायला ४ भाग लागायचे. त्यानंतर काही काळाने बुल्लाला सामील असलेला इस्न्पेक्टर मिथुनच्या हवालदार बापालाही टपकवतो.

बापाच्या खूनाने खवळलेला मिथुन थेट बुल्लाच्या घरी जाउन त्याला संपवण्याची धमकी देतो. डेटही फिक्स करतो. "आज पहिली तारीख है. द, चार, छे, आठ, दस. बस" म्हणजे हा एक एक करत सम तारखांना खलनायकांना संपवणार. मग एका गाण्यात तो बापाला अग्नी देतो. हे बरे असते. बहिणीला पण असेच एका गाण्यात चितेवर चढवलेले असते. नशीब प्रत्येक खलनायकापाठी एक गाणे नाही आहे. नाहितर संगीत चित्रपट झाला असता तो. याच गाण्यात मिथुन एका बेवारस मुलीला गोद घेतो. मध्येच ही मुलगी कुठुन आली या रहस्याचा भेद शेवटी होतो. मिथुन त्याच्या प्रेयसीला (अर्रे हो. गंगा नावाची एक प्रेयसीही आहे. गरज पडेल तेव्हा जमेल तेवढे कपडे काढुन मिथुनबरोबर नाचायचे हेच तिचे मुख्य काम) "तुम इसे मा, और मै इसे बाप बनके पालेंगे" असे सांगतो. त्याबरोबर कुठलेही आढेवेढे न घेता ती माऊली "देखो ना भगवान भी कितना दयालु है. हमने तो अभी शादी भी नही की और भगवान ने हमारे गोद भी भर दी" असे ऐकवते.

त्यानंतर मिथुनच्या बहिणीला फसवलेला गुलशन अजुन एका मुलीला फसवतो. तिला वाचवण्यासाठी मिथुन गुलशनाला शोधुन काढुन त्याला मारतो. मग त्याच्याकडुन इबु हटेलाचा पत्ता मिळवुन त्या मुलीला वाचवतो आणि डोक्यावर एक बुक्की मारुन इबु हटेलाला गळ्यापर्यंत मातीत डकवतो. तो बुक्की मारतो तसा ज्या खड्यात हटेला ग़ळ्यापर्यंत बुडतो तो आपोआप बंद होतो. मग त्याचे डोके उडवुन मिथुन त्याला खपवतो. त्यानंतर मिथुन दीपक शिर्के च्या मागे लागतो. तो मंत्री असल्याने त्याच्यामागे साधारण १०० पोलिसांचा ताफा असतो. मिथुन बरोब्बर त्याच्या गाडीच्या खिडकीच्या काचेला एक गोळी मारुन त्याची आख्खी गाडी उलटवतो. मग मंत्री गाडीतुन बाहेर पडुन त्याचे १०० अंगरक्षक पोलिस जिथे उभे असतात त्याच्या बरोब्बर उलट्या दिशेला पळतो. मिथुन त्याच्यामागे. पोलिस त्याच्यामागे. मग बीचवर ते दोघे थोडावेळ लपंडाव खेळतात. पण मिथुन त्याला बरोबर शोधुन काढतो. तो मंत्र्याला गोळी घालणार हे दिसत असुनही पोलिस नुसतेच पळत पळत येतात. दरम्यान बुल्लाचा हस्तक मंत्र्याला उडवतो. पण पोलिस मात्र न केलेल्या खुनासाठी मिथुनलाच पकडतात. मिथुन बिचारा भंजाळतो की च्यायला मी नाही मारला तर कोणी मारला.

दरम्यान त्याच दुपारी अटक, आरोप निश्चिती, खटला, सुनावणी असे सगळे होउन मिथुनला उम्रकैद देखील होते. त्यावेळेस इतर २० एक पोलिसांसमोर बुल्लाचा इंस्पेक्टर मित्र त्यानेच मिथुनच्या बापाला मरले असल्याचे सांगतो. मग मिथुनही "भिगी हुई सिगरेट कभी जलेगी नही और ये तय है की तेरे मौत की तारीख कभी टलेगी नही" असा सज्जड दम देतो. त्याच रात्री मिथुन लॉकअप मधुन पळुनही जातो. मग हा येड इंस्पेक्टर त्याला कुठल्याश्या पठारावर बोलवतो आणि २०-२५ स्वयंचलित गाड्या घेउन त्याच्या समाचाराला जातो (स्वयंचलितच असणार. कारण एवढ्या गाड्यातुन मिळुन अवघे ६ जण बाहेर पडतात). नॉट टु मेंशन, एका फटक्यासरशी एकाला मारुन मिथुन त्या इंस्पेक्टरलाही खपवतो.

मग बुल्ला मिथुनला मारायला त्याचे खास गुंड पाठवतो. हे सगळे रामायणासारखे वाटते माहिती आहे का. प्रहस्त मेला, अतिकायला पाठवला, तो ही मेला मग कुंभकर्ण गेला, मग इंद्रजीत आणि मग सग्ळ्यात शेवटी रावण. तर हे बुल्लाचे गुंड रिंगण करुन मिथुनला बडवतात. एक गुंड अ‍ॅक्शन रिप्ले मध्ये त्याला थोबाडावर ६ किक्स मारतो. मग कावळ कावळा खेळल्याप्रमाणे मिथुन आळीपाळीने सगळ्यांकडे जाउन मार खातो. आणि मग कंटाळा आल्यावर चिडुन एक एक करत सगळ्यांना खपवतो.

त्यानंतर सिनेमाचा हायलाइट येतो. आख्खा पिक्चर चुकवला तरी चालेल पण हा भाग चुकवु नका. मिथुनला कळते की त्याला सापडलेली मुलगी लक्की चिकना नावाच्या बुल्लाच्या कुंटणखान्याच्या दलाल / मॅनेजर ने टाकलेली असते. मिथुन तिथे पोचतो. लक्की चिकना त्याचा कुंटणखाना झोपाळावजा हलत्या खाटांवर चालवत असतो. (त्यांना नंबरही असतात). इथे मिथुनची लक्की चिकनाच्या गुंडांबरोबर तरंगत्या खाटांवर मारामारी होते. खाटा इतस्तत: उडत असतात आणि दरम्यान कुंटणखान्यातल्या वेश्या त्या खाटांवर निवांत झोपलेल्या किंवा झोका घेत असतात. मरण्यापुर्वी चिकना मिथुनला सांगतो की ती मुलगी बुल्लाची नाजायज औलाद आहे.

लक्की चिकनापाठापाठ मिथुन पोते ला संपवतो. मग बुल्ला आणी चुतिया मिथुनच्या प्रेयसीचा विनयभंग करुन तिला मारतात. मग मिथुन लंडनहुन आणलेल्या व्हिटामिन सेक्स च्या गोळ्या खाउन मर्द बनलेल्या चुतियाला परत नामर्द बनवुन मारतो. त्यावर भावाच्या कलेवरावर अश्रु ढाळणार बुल्ला चुतियाच्या शवाला उद्देशुन म्हणतओ "अर्रे अभी तो तेरे ट्युब मे लाइट आया था और शंकर ने तेरा फ्युज उडा दिया"

मग बुल्ला साधारण शे सव्वाशे रिक्शा घेउन मिथुनला मारायला जातो. मिथुनही "कसम खा के आ गया है इंतकाम का ये अंगारा. बजाऊंगा आज तेरी मौत का नगारा" अशी आरोळी ठोकतो. मग यमकात अजुन थोड्या डायलॉग्स ची देवाणघेवाण होते आण मग सगळ्या रिक्षा मिथुनवर तुटुन पडतात. त्याआधी मस्शिनगन्स चालवल्या जातात. येड्यांना कळतच नाही त्याचा मिथुनवर काय परिणाम होणार. मिथुनही तयारच असतो. तो रॉ़केट प्रोपेलर्स काढतो आणि २०-३० रॉकेट्स रिक्षावर सोडतो. एकाही रिक्षाचे चाकही पंक्चर होत नाही. एक दोन रिक्शा उडेपर्यंत मिथुनचे रॉकेट्स संपतात. मग तो रॉकेट प्रोपेलर उलटे करुन गुंडांना मारतो. भात्यातले बाण संपल्यावर धनुष्याच्या प्रत्यंचेने अभीरांना मारणार अर्जुन आठवल्याशिवाय राहवत नाही. मग घमासान लढाई होते. मग अचानक बुल्ला कुठनतरी मिथुनने सांभाळलेली त्याची मुलगी पैदा करतो. ती त्याचीच मुलगी आहे हे मिथुनने सांगुनही तो तिला मारण्यासाठी हवेत उडवतो. मिथुन जाँटी र्‍होडसला लाजवेल अश्या सफाईने तिला झेलतो, मात्र ती हातात असल्याने बुल्लाचा मार खात राहतो. तेवढ्यात कुठुनतरी मिथुनचा जुळा भाऊ असल्याचा भास निर्माण करणारे मिथुनचे माकड तिथे येतो, मिथुन मुलीला माकडाकडे उडवतो आणी ते माकडही मिथुनला लाजवेल अश्या सफाईने मुलीला झेलते.

मग काय निर्धास्त होउन मिथुन बुल्लाला धू धू धुतो, मग अचानक विमानातुन स्पॉट नाना येतो. (खरे सांगा. खरे सांगा. हा अजुन जिवंत आहे हे तुम्ही विसरला होता ना. कांती शाहही विसरला होता बहुधा त्यामुळे तो असा अचानक येतो). मग मिथून त्याची मान मोडुन आणि बुल्लाला हेलिकॉप्टरच्या खिळ्यामध्ये खुपसुन मारतो. एक मात्र मानले पाहिजे की मिथुनने सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मारले. इबु हटेलाचे शीर तलवारीने धडावेगळे करुन, लक्की चिकनाची मान सुरीने कापुन, चुतियाला नामर्द बनवुन, पोतेला गोळी घालुन, इंस्पेक्टरला बायोनेट खुपसुन आणि या दोघांना हे असे.

अखेर चित्रपट संपतो. पाचा उत्तराची कहाणी सफळ संपुर्ण होते. तर मी तुम्हाल आज मिथुन व्रत सांगतो. पडदे बंद करायचे, पंखा फुल्ल स्पीड, चखणा जमवायचा मस्त, वेफर्स, चणे शेंगदाणे वगैरे, टीव्हीला हार घालायचा, स्प्राईटची ( आपापल्या कुवतीप्रमाणे प्रत्येकाने योग्य ते पेय निवडावे) बाटली उघडायची आणि चवीचवीने व्हिडोवर गुंडा बघायचा. उतु नका मातु नका घेतला वसा टाकु नका. एकदा गुंडा पुर्ण पाहिलात की तुम्ही जगातला कुठलाही चित्रपट पाहु शकता.

इति गुंडापुराणम संपुर्णम.

संस्कृतीकलाविनोदऔषधोपचारमौजमजाचित्रपटसद्भावनाशुभेच्छाआस्वादसमीक्षालेखअनुभवमतशिफारससल्लामाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

5 Dec 2017 - 8:16 pm | धर्मराजमुटके
मृत्युन्जय's picture

5 Sep 2016 - 12:36 am | मृत्युन्जय

गुंडांच्या वाढदिवसानिमित्त धागा वरती आणतो आहे

सर्वोत्तमतेचा ध्यास घेतल्याशिवाय सर्वाकालिक महान बनता येत नाही. सर्वश्रेष्ठ बनता येत नाही. कैलास लेणं स्वतःच्या नावावर टाकता येत नाही. पण त्यासाठी आलेलं फायनल आउटपुट पाहून सगळे जरी अचंबित होत असले, तरी सततच्या परिश्रमांकडे लक्ष देणारे लोक फार फार कमी.
एखादी मोठ्ठी अचिव्हमेण्ट आपल्याला दिसते, तेव्हा त्यामागे वर्षानुवर्षे सर्वोत्तमतेचा घेतलेला ध्यास असतो. विश्व विजेत्याच्या त्या सुवर्णक्षणांची ... विश्वविजयाची झलक निव्वळ त्यापूर्वीच्या सराव सामन्यातही दिसते. तेंडुलकरनं "बच्चा" म्हटलं जात असताना , मिसरुड फुटायचं त्याचं वय असताना एका प्र्याक्टिस म्याच मध्ये पाकिस्तानच्या अब्दुल कादिर ह्या नावाजलेल्या बोलरची लैच धुलाइ केल्ती. ती पाहूनच इम्रान, वकार, अक्रम ह्यांना उद्याच्या चॅम्पियनची झलक दिसली होती.
.
.
त्याचप्रमाणे "गुंडा" हे एव्हरेस्ट शिखर सर करण्यापूर्वी ह्याच टीमने काय काय पराक्रम केलेत सिनेसृष्टित, ते पाहिलं, की त्यांच्या सामर्थ्याची चुणूक दिसते. "गुंडा" बनवण्यास जर कुणी लायक असतील तर हिच्च ती जिनियस ,ग्रेट्ट मंडळी; ह्याची खात्री पटल्याशिवाय रहात नाही.
"गुंडा"चेच सगळे निर्माते , अभिनेते वगैरेंनी एकत्र येउन, 'गुंडा'च्या एखाद वर्ष आधी "लोहा" बनवला होता. ( रंगीत तालिम!)
तो आख्खा सिनेमा https://www.youtube.com/watch?v=tRUKNJFYHF8 इथे उपलब्ध आहे.

"गुंडा"प्रेमींनी निदान ८ मिनिट २४ सेकंद पासून ते ११ मिनिट १० सेकंदा पर्यंतचा भाग चुकवू नये; आवर्जून पहावा ; अशी विनम्र सुचवणी.
(खुनाचा प्रसंग आहे. 'इबू हटेला' वधप्रसंगाची प्रेरणा! )
.
.
१तास, ३५ मिनिट , ३२ सेकंदापासून पुढे ---
देश सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नातला छोटा व्हिलन. देश सोडण्यासाठी तो दोक्यावर सुटकेस घेउन एअरपोर्टवर (धावपट्टीवर) पळत सुटतोय विमान पकडायला.
कळकळीची विनंती-- आवर्जून पहा हा सीन.

सानझरी's picture

6 Sep 2016 - 5:47 pm | सानझरी

THE BEST MOVIE IN THE WORLD - Gunda Review

दर्द का हदसे गुजर जाना है दवा हो जाना .. गालिब
ह्या ओळींचा अर्थ समजायचा असेल तर गुंडा हि कलाकृती पहिलीच पाहिजे.
-----

"चालवणे" ह्या शब्दाचा अर्थ "सायकल चालवणे" असाही असतो आणि "चळवळ चालवणे" असाही असतो. त्या प्रमाणे गुंडा चित्रपटाचे कौतुक ही "मुघल ए आझम चे कौतुक" ह्या सदरात मोडत नाही तर संपूर्ण जैविक उत्क्रांती कडे पाहून निसर्गनियमा विषयी कौतुक वाटते त्या प्रकारचे कौतुक आहे. भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासांत शोले किंवा लगान हे मैलाचे दगड असतील पण संपूर्ण प्रवासांत असलेला एकमेव रेस्ट एरिया म्हणजे `गुंडा` होय.

लिजण्डरी सिद्धहस्त लेखणी जर लिलावांत काढायची असेल तर ती ह्या चित्रपटाचे महान लेखक बाबर खान ह्यांचा घरी भेटेल. गद्य आणि पद्य ह्यांतील जी फार बारीक ओळ असते तिचे चक्क वाटोळे (शब्दशः) करून बाबर खान नी आपल्या मनगटाला बांधले असेल.

गुंडा चित्रपटाचे कौतुक IIT/IIM मध्ये प्रचंड होतेंच. आधी मला त्याचे महत्व कळले नाही. पण "प्यासा हैवान" हा चित्रपट गर्ल्स हॉस्टेल मध्ये थोडा प्रसिद्ध झाला आणि त्या निमित्ताने बाबर खान ह्या लेखकाची ओळख झाली म्हणून गुंडा पहिला. "आज म्या ब्रम्ह पहिले" असेच आधी मला वाटले. एका एका संवांदांत दीर्घतमस ऋषींच्या ऋचांची डेप्थ होती.

PS : प्यासा हैवान हा चित्रपट जरूर पहा. विश्वरूपम वगैरेंत कमल हसन ने अनेक रोल केले असतील पण ह्या चित्रपटांत हैवान, त्याची शिकार, हिरो, हैवानाचा भाऊ असे अनेक रोल एकाच माणसाने केले आहेत.

माम्लेदारचा पन्खा's picture

28 Sep 2016 - 7:38 pm | माम्लेदारचा पन्खा

गरीबांचा अमिताभ आहे तो.....

धर्मराजमुटके's picture

28 Sep 2016 - 10:54 pm | धर्मराजमुटके

तुम्ही सगळे दुष्ट आहात. गुंडाच्या तोडीचे अजुनही काही पिच्चर असतीलच की. फक्त त्याचेच कौतुक का ? हा अन्न्याय आहे.

टवाळ कार्टा's picture

29 Sep 2016 - 12:04 am | टवाळ कार्टा

नाही, यासम हाच

`लोहा` ने रचिला पाया `गुंडा` झालासे कळस ....

हुप्प्या's picture

29 Sep 2016 - 2:45 am | हुप्प्या

सुरवातीच्या सीनमधे जेव्हा बुल्ला, चुटिया वगैरे सन्माननीय खलसदस्य पहिल्यांदा प्रविष्ट होतात तेव्हा ते सगळे एकमेकांना ओळखत असतात. तरीही प्रत्येक जण तपशीलात जाऊन आपली ओळख का करुन देतो?

बुल्ल्याची बहिण मृत होते तेव्हा आपली काव्यबुद्धी जागृत ठेवून तो काही यमकासहीत सगळे हिशेब जुळणार्या काव्यपंक्ती म्हणतो त्यात "लंबू ने तुझे लंबा कर दिया? एक माचिस की तीली को खंबा कर दिया?" ह्या महान कवनाचा अर्थ काय? कुणाच्या मरणाला माचिस तिलीला खंबा असे म्हणतात का?

ज्या प्रकारे कबीर, तुकाराम वगैरे "कहत कबीर सुन ....", "तुका म्हणे" प्रमाणे कवने करत असत त्याचे चित्रपट रूपांतरण "में हू बुल्ल्ला .. रखता हू खुल्ला" हे आहे. ह्यांतून सदर खलमानव आपला जीवनविषयक दृष्टिकोन स्पष्ट करतात. "में हू पोटे, जो अपने बाप के भी नाही होते" ह्यातून पोतेची भांडवलशाही मानसिकता स्पष्ट केली आहे.

"लंबू ने तुझे लंबा कर दिया? एक माचिस की तीली को खंबा कर दिया?" अर्थ अगदी स्पष्ट आहे. बहिणीचा बलात्कार करून तिला मारले आहे !

समीरसूर's picture

30 Sep 2016 - 4:41 pm | समीरसूर

परीक्षण जबराच आहे! :-) हसून हसून पाणी आलं डोळ्यातून. :-)

पोस्टरवर मिथुन, मुकेश ऋषी, इशरत आली, मोहन जोशी, शक्ती कपूर, रामी रेडडी, राणा जंग बहादूर, दीपक शिर्के, रजाक खान, आणि हरीश पटेल आहेत. राणा जंग बहादूरच्या डाव्या बाजूला कोण आहे ते माहीत नाही. सगळे एक से एक नमुने गोळा केलेत.

मृत्युन्जय's picture

30 Sep 2016 - 7:27 pm | मृत्युन्जय

गुंडाने सेंच्युरी मारली. धाग्याचे सार्थक झाले. तसे ते पंचविसाव्या प्रतिसादालाच झाले असे मी मानतो पण गुंडा इज अ डिफरंट क्लास. उसके लिये सेंच्युरी तो बनता है :)

मुक्त विहारि's picture

13 Dec 2021 - 7:24 pm | मुक्त विहारि

जबरदस्त परिक्षण

रंगीला रतन's picture

13 Dec 2021 - 11:10 pm | रंगीला रतन

ह ह पु वा. मुवि साहेब या खत्रनाक धाग्याच्या लिंके साठी मंडळ आभारी आहे :=)

मृत्युन्जय's picture

5 Sep 2023 - 4:54 pm | मृत्युन्जय

या अजरामर कलाकृतीला काल २५ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल धागा वर काढत आहे. अभी तो गुंडा जवान हुआ है ;)