परत दिवाळी येणार...

दादा कोंडके's picture
दादा कोंडके in विशेष
26 Oct 2011 - 12:04 am
दिवाळी २०११

परत दिवाळी येणार. लोकं "महागाई किती वाढली आहे!" म्हणणार आणि लक्ष्मीरोडवर खरेदीसाठी झुंबड उडवणार.

परत "हॅप्पी डिवाली" वगैरेचे मेसेजेस मिळणार, मी मग ह्याचे त्याला, त्याचे ह्याला असं करून ते परत करणार.

आयटी मधलं पब्लिक चितळे मधुन तयार फराळ आणणार आणि चॅटींग करताना किल्ला, घरकुल, न-उडलेल्या फटाक्यातली दारु काढुन उडवण्याचा आठवणींबद्द्ल भरभरुन बोलणार. "बाहेर" असलेले जास्तच नॉस्टॅल्जीक होणार.
मी पण, ह्यावेळी घरापासुन लांब आहोत पण 'आकाशदिवा तरी घरीच करुन लावायचा' असं ठरवणार पण परत न-करायला काहितरी निमित्त सापडणार.

मागच्या वर्षीपेक्षा एक्-दोन ऑनलाईन दिवाळीअंक जास्त निघणार. पण बहुतेक कागदी दिवाळीअंकावर बायकांचीच गुळगुळीत चित्रं असणार.

नटनट्या प्रेक्षकांना कोलगेट्छाप हसुन, "भरभराटीची, सुख-सम्रुद्धीची-सुरक्षीत" वगैरे विशेषणं लाउन, लांबलचक दिवाळीच्या शुभेच्छा देणार.

मारवाड्यांची मिठाईची दुकानं ओसंडुन वहात असणार आणि कुठेतरी, गुजरात मधुन आलेला कितीतरी शे-किलो भेसळयुक्त खवा-मावा जप्त होणार.

टिव्हीमधल्या कार्यक्रमात, बायका, ताटातुन आणुन घरभर तेलाच्याच पणत्या लावणार आणि षटकोनी बांबुच्या काड्यांनी केलेलाच आकाशदिवा लावणार.
पण लोकं मात्र तेलाच्या, मेणाच्या किंवा इलेक्ट्रीक पणत्या लावणार आणि पंनास रुपयांचा चायनिज आकाशदिवा घेणार.

दिवाळीच्या तोंडावर, "भारनियमन बंद करा" म्हणुन विरोधीपक्ष मागणी करणार आणि खेड्यात दोन-चार तास जास्त लोडशेडींग होणार.

बॅंकाही ग्राहकसेवेसाठी सज्ज झालेल्या असणार आणि पिशवी घेउन पेंशनसाठी रांगेत उभे असलेल्या अजोबांना एखादंतरी सोन्याचं नाणं घेण्याचा आग्रह होणार.

फटाकेमुक्त दिवाळीसाठी आवाहनं होणार, पण हजार-हजाराच्या माळा २-३ मिनिटात हजारो रुपयांचा धुर करत कानाचा पडदा फुटोस्तोवर वाजतच राहणार.

खास दिवाळीसाठी रांका नवीन दागिने लाँच करणार.
'त्याचा' बोनस बायकोच्या पाडव्यात आणि बहिणीच्या भाउबिजेत कधीच संपलेला असणार, पण तरीही गुरखा "शाब दिवाली कुशी" म्हणत लाचार चेहर्‍यानी दारात उभा असणार.

गायक-गायिका ऐन दिवाळीत, घरचं अभ्यंग-स्नान वगैरे सोडुन मायबाप रसिक-श्रोत्यांसाठी महागडी तिकीटं असलेले "पहाटगाणी" वगैरे कार्यक्रम करणार.

मुख्यमंत्री, पंतप्रधान, 'श्रीमंत लोकांच्या गरीब देशाला' दिवाळीच्या शुभेच्छा देणार.
दुसर्‍या दिवशी पेपरमध्ये मात्र, दिवाळीच्या संध्याकाळी फुटपाथवर झोपलेल्या भिकार्‍याचा "समाजिक विषमता" दाखवणारा फोटो येणार.

...दिवाळी परत येणार.

प्रतिक्रिया

पैसा's picture

26 Oct 2011 - 12:16 am | पैसा

तुम्हाला आधी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

दसरा झाला की दिवाळी नेमेचि येणार. तुम्ही आम्ही असेच दिवाळी 'साजरी' करणार. नाहीतर रोजचं दिवाळं आहेच ते!!

कागदी दिवाळीअंकावर बायकांचीच गुळगुळीत चित्रं
ठराविक छापाची चित्रच असतात त्यावर. एरवी वीतभर स्कर्ट घालणारी मॉडेल इथे भरजरी कपड्यात हातात पणती घेऊन किंवा आकाशकंदिलाकडे तिरक्या नजरेनं बघत असते. मागल्यावर्षी पाचसात दिवाळी अंक हातात आले आणि त्यात ठराविक सुगरणी ज्या लेखिका आहेत त्यांच्या त्याच त्या पाककृत्या होत्या.
बाकी लेखनात वास्तव असलं तरी यानिमित्ताने का होईना आपण सण साजरे करतोय. नाहीतर "आमच्याकडे अस्लं काह्ही करत नाही." याचेच गोडवे असतात.

पैसातैशी सहमत

प्रत्येक गोष्टीत निगेटवपणा शोधला तर मुश्किल होईल

हँप्पी दिवाली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Oct 2011 - 10:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. :)

च्यायला, सर्व गोष्टी पटणार्‍या आहेत. वीज भारनियमनामुळे सालं मला दिवाळीचा सण आला आहे असे वाटतच नाही. काल मला एकाने सर, आपला हिंदुंचा सण आला की अस्संच होतं. असं भरवायला सुरुवात केली. मी म्हटलं बंद कर यार ही भणभण.

-दिलीप बिरुटे

चेतन सुभाष गुगळे's picture

26 Oct 2011 - 11:14 am | चेतन सुभाष गुगळे

तुम्ही गंगाधर गाडगीळांची किडलेली माणसे ही गोष्ट वाचलीय का हो? त्यातही एक पात्र काहीसं विदारक सत्य बोलून जातं त्यावर गाडगीळांनी एक मस्त विधान केलंय.

त्यांचे बोलणे सर्वांनाच पटले होते आणि म्हणूनच कुणालाच आवडले नव्हते.

असो. पण या कटू वास्तवाचीही कुणीतरी आठवण करून द्यायला हवीच होती, ती अवघड जबाबदारी तुम्ही स्वत:हून उचलल्याबद्दल तुमचे अभिनंदन.

परत तेच आणि तेच घडणार यावर इतकं सगळं लिहीलंय तेव्हा तुम्ही तुमचा उत्सव काहीशा निराळ्या व सकारात्मक पद्धतीने साजरा कराल अशी आशा बाळगतो आणि त्याकरिता तुम्हाला शुभेच्छा देऊन इथेच थांबतो.

एन्जॉय द ऑकेजन विथ डिफरन्स!

धमाल मुलगा's picture

26 Oct 2011 - 11:29 am | धमाल मुलगा

नाव दादा कोंडके, अन लिहिलंय मात्र एकदम नाना पाटेकर ष्टाईलीत! _/\_

पण, ह्याला काही पर्याय आहे का? बरं, हे सगळं झालं ते 'एसी हापिस, गुबगुबीत खुर्च्या' वगैरेंबद्दल!

पण दिवाळीच्या निमित्तानं, राजकीय गणितांसाठी का होईना म्हणून, नगरसेवक, विरोधक गरीब पोरांना कपडे वाटणार, गरीबांना फराळाचे पदार्थ वाटणार..रोजचं शिळंपाकं खाणार्‍या तोंडात एखाद-दुसरा दिवस तरी दोन बरे जिन्नस पडणार.

वेगळ्या पध्दतीनं दिवाळी साजरी करु म्हणणारे जीव, अनाथाश्रमांकडे धावणार, तिथल्या मुलांसोबत कंदील करणार, रांगोळ्यांची स्टेन्सिल्स रेखणार, फटाक्यांच्या टोपल्या पोराटोरांमध्ये वाटणार, त्यांच्यासोबतच लाडू करंज्यांनी तोंड गोड करणार, तिथून परत जाता जाता तिथल्या मुलांच्या 'टाटा' सोबत "दादा, परत या लवकर!" हे ऐकताना त्या पोरांच्या नजरेत चमकणारा आनंद लाखभर पणत्यांपेक्षा मोठा लखलखाट करणार..

असेच कुणी वृध्दाश्रमांकडं वळणार, वाकल्या पाठींवरती शाली पांघरणार, वाकून नमस्कार करताना पाठीवरती आशिर्वादाचे थरथरते हात जाणवून डोळे ओलावणार, तिथल्या आजोबांशी गप्पागोष्टी करताना पुन्हा बालपणात शिरणार, जुन्या-जाणत्या आजींकडून गप्पांमधून अनुभवी सल्ले मिळणार, आपण घरापासून दूर आहोत ह्याचा येणार्‍यांना, अन आश्रमातल्या आजीआजोबांना पळभर का होईना विसर पडणार...

एक ना दोन...एखाद्या नजरेतली क्षणभराची आनंदाची चमक सारी दिवाळी लखलखीत करुन टाकू शकते, समाधानाची नवी जाणिव जागी करु शकते... बाकी उभं वर्षं आहेच की हो दादा आपल्याला रडारड करायला!

मिळतायत तर चार दिवस आनंदानं जगूया! :)

गणपा's picture

26 Oct 2011 - 1:07 pm | गणपा

वाईटातल चांगल शोधायला ही नजर लागते.

स्मिता.'s picture

26 Oct 2011 - 5:55 pm | स्मिता.

धम्या, हा प्रतिसाद खूप आवडला रे!

दादा कोंडके's picture

30 Oct 2011 - 2:57 pm | दादा कोंडके

प्रतिसाद आवडला.

इंटरनेटस्नेही's picture

30 Oct 2011 - 5:14 pm | इंटरनेटस्नेही

हेच म्हणतो. साला आमचा धमु म्हणजे एखादा प्रतिथयश लेखक देखील लाजुन जाईल इतके चांगले लिहितो कधीकधी!