माझी बँक माझे अनुभव
आज बँक ही गोष्ट खरं तर या देशात सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी बनलेली आहे. अगदी करोडपती पासून रोडपतीपर्यंत प्रत्येकाचे बँकेत खाते असतेच. बँकेतले व्यवहार टाळण्याकडे कल असणारा आणि रोखीचा आग्रह धरणाराही पूर्णपणे बँक व्यवस्थेपासून अलिप्त राहू शकत नाही. उलट आमचे कोणत्याही बँकेत खाते नाही असे म्हणणार्या मनुष्याचा सत्कार करावा इतकी ती विशेष बाब आहे.
असो.
तर ही झाली प्रस्तावना. मुख्य विषय तो नाही.
प्रत्येक जण एक सामान्य ग्राहक म्हणून बॅकेचे निरनिराळे अनुभव घेत असतो.
बँक १ - आमच्या एका राष्ट्रीयीकृत असलेल्या बँकेने ग्राहकांना एसएमएस सुविधा दिली. खात्यात काही व्यवहार झाला की त्याचा एसएमएस आपल्या मोबाईलवर येतो. त्या पुढचे पाऊल म्हणजे आपल्या नंबरवरून बँकेने दिलेल्या नंबरवर मिस्ड कॉल दिला की आपल्या खात्याची शिल्लक व मिनी स्टेटमेंट एसएमएस च्या स्वरुपात पाहता येते. उत्तम सुविधा. कुठलेही नेट कनेक्शन नको. अगदी साध्या सुध्या मोबाईलवरही आपल्या खात्याची माहिती आपल्याला कळते. पण या बँकेत आमची दोन खाती होती. एका नंबरला एकच खाते जोडले जात होते. दुसर्या खात्यासाठी काय करावे लागेल. असे विचारले असता बँकेने भन्नाट उत्तर दिले. दुसर्या खात्यासाठी दुसरा मोबाईल नंबर रजिस्टर करा. म्हणजे नालेसाठी घोडा. दोन्ही खात्यांची माहीती एकाच नंबरवर मिळवण्यासाठी काय करावे लागेल याबाबत बँक कर्मचारी अनभिज्ञ होते.
एके दिवशी या बँकेत गेलो तर बँक २/३ कापली जात होती. धक्का बसला. म्हणून विचारले की तुमच्या बँकेची एवढी मोठी जागा.
कर्मचार्यांना आत बसायला आणि ग्राहकांना रांगा लावायला सुद्धा काही अडचण येत नाही. लॉकरपासून सगळ्या सुविधा उत्तम रितीने तुम्ही दिलेल्या आहेत. मोठी जागा हे तुमचे वैभव आहे. मग ही दुर्बुद्धी का सुचली. तर म्हणाले, वरून निर्णय झालाय. आम्ही आता एटीएम ची सुविधा देणार आहोत त्यामुळे पैसे काढणार्यांची गर्दी बँकेत नसेल. नेटबँकींगही देणार आहोत त्यामुळे ग्राहकाला बँकेमधे यायची फारशी गरजच उरणार नाही. आम्ही स्मार्ट बँकींगकडे जात आहोत. त्यामुळे छोट्या जागेतही आमचे भागेल. उरलेली जागा विकून आम्ही पैसे कमावणार.
पूर्वीची एवढी मोठी जागा जाऊन हे कर्मचारी आता १/३ जागेत बसतात. ग्राहकाला आत शिरताना अंग चोरून जावे लागते. ग्राहकांची गर्दी अजिबात कमी झाली नाही. अतिशय कोंदट आणि दाटीवाटीच्या जागेत गेल्याने कर्मचार्यांची मनःशांती हरवली. पूर्वी हसतमुखाने स्वागत करणारे कर्मचारी आता ग्राहकांशी वाद घालतात.
हातात असलेली जागा कापून दुसर्याला विकण्याचा निर्णय ज्याने घेतला त्या अधिकार्याने या व्यवहारात नेमके काय कमावले याचे संशोधन झाले पाहीजे.
बरं एटीएम येणार म्हणून या बँकेने सगळ्यांना आग्रह करून एटीएम कार्डस घ्यायला लावली. “तुम्ही नुसतं घ्यायचंय, वापरले नाही तरी चालेल. लाइफटाइम फ्री आहे” अशी मधाळ भाषा वापरण्यात आली. कुठलेही डेबिट कार्ड तयार करायला, एटीएम मशीन निर्माण करायला, ते मेंटेन करायला, पेमेंट गेटवेला काही खर्च येतो. यातली एकही गोष्ट बँकेची स्वतःची नाही. बँक कुठल्या आधारावर फुकटचा वायदा करत होती कुणास ठाऊक.
आत्तापर्यंत एटीएम कार्डचा आग्रह धरणारी बँक आता सक्ती करू लागली. ज्यांनी कार्ड घेतले नाही त्यांना पासबुक छापून देणेही बंद केले. नाक दाबले की तोंड उघडते असा विचार असावा.
वास्तविक बँकेमधे ग्राहक आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी येतो. चेक, विथड्रॉल स्लीप, नेट बँकींग, कार्ड हे खात्यातून पैसे बाहेर काढण्याचे मार्ग आहेत. हे मार्ग जेवढे कमी तेवढे खाते सुरक्षित. त्यामुळे कार्ड हा काही जणांसाठी प्लस पॉइंट तर काही जणांसाठी तो मायनस पॉइंट होता. ज्या खात्याला कार्ड जोडलेले नाही तिथेच जास्तीत जास्त पैसे ठेवण्याकडेही लोकांचा कल असतो. त्यात सुरक्षितता असते. ज्या खात्याला कार्ड जोडलेले आहे तिथे अगदी कमी रक्कम ठेवावी असाही विचार असतो.
आणि वस्तुस्थितीही तशीच होती. अशा कुठल्याही सुविधा नसतानासुद्धा या बँकेत अनेक कंपन्यांनी, फर्मनी, व्यापार्यांनी आपले खाते उघडलेले होते. ग्राहकांची कमतरता नव्हतीच. कार्ड, नेट बँकींग ही कुणाचीच मागणी नव्हती.
पण तरीही आपल्या एटीएमला ग्राहक मिळावा म्हणून बँकेने कार्ड घेण्याचा आग्रह सुरुच ठेवला. म्हणून शेवटी त्याच्या कॉलसेंटरला फोन लावला. त्यांनी सांगितले. ग्राहकाने कार्ड घ्यावे ही अपेक्षा आहे पण तशी सक्ती नाही. यावर बँक कर्मचार्यांचे उत्तरही लक्षात ठेवण्यासारखे होते. आम्हाला एटीएम कार्डसाठी टारगेट देतात आणि ग्राहकाला मात्र अशी उत्तरे देतात.
पुढे नोटाबंदीच्या काळात तर एटीएम ही नुसतीच शोभेची वस्तू बनली. ग्राहकांची गर्दी वाढतच राहीली. बॅक कापण्याचे कोणत्याही प्रकारे फायदे दिसेनात..
बँक २ - महान बँकेची तर गोष्टच वेगळी. तिथे प्रत्येक खिडकीवर भली मोठी रांग. खिडकीपाशी पोचल्यावर सांगतात. तुम्हाला पाहीजे असलेली खिडकी ही नाही. खूपदा ग्राहकावर वस्सकन ओरडण्याचा अनुभव येतो. ग्राहक खर्या अर्थाने येथे कष्ट मर होतो. या बँकेत खरंच कुणी सौजन्याने बोलत असेल तर तो बंदूकधारी सिक्यूरिटी.
तो सांगतो, कुठल्या रांगेत उभे रहायचे आणि कोणता फॉर्म भरायचा ते.
महान बँकेत स्वतः कर्मचारी कितीही गोंधळ घालोत. त्यांना सर्व गुन्हे माफ आहेत. पैसे भरले तरी त्याची नोंद पासबुकात होत नाही. एखाद्यावेळी गेलेल्या माणसाचे, तो मनुष्य गेल्यावर काही वर्षांनी नवीन खाते उघडले जाते आणि बँक नवे पासबुक आपल्या हातात ठेवते. तो धक्काही पचवावा लागतो. पण अशा महान कृत्यांमुळेच ही बँक महान बँक असे आपले नाव सार्थ करते.
शेवटी नेहमीचा गोंधळ नको आणि पैशाची असुरक्षितता नको म्हणून तक्रार करायला जावे तर हे लोक प्रचंड टोलवाटोलवी करतात. चुकीची जबाबदारी कुणीच घेत नाही. वेळप्रसंगी कस्टमरसमोर एकमेकांशी कचाकचा भांडतात. "साहेब यापुढे मला काम सांगत जाऊ नका, मी घरी निघून जाईन" असेही साहेबाला सुनावतात. बँकेतल्या कर्मचार्याला काम सांगणे हा यांच्या लेखी गुन्हा असावा.
यामुळे महान बँकेचे दोन खातेदार जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा तूझी ब्रांच जास्त नाठाळ की माझी अशी चर्चा त्यांच्यामधे रंगते आणि आपलीच ब्रांच अधिक नाठाळ आहे यावर दोघेही ठाम असतात.
कोर्टाची पायरी चढू नये तसे आता महान बँकेची पायरी चढू नये असे म्हटले जाते.
एखाद्या बँकेच्या एखाद्या ब्रांचची वर्षानुवर्षे एकच तक्रार असते. प्रिंटर नादुरुस्त, पासबुक प्रिंटींग बंद. प्रिंटर नादुरुस्त असला तरी स्टेटमेंट प्रिंट करून मिळेल असे हे लोक सांगतात. कधी मधी चुकून पासबुक प्रिंट झालेच तर एका पानावर एकच ओळ प्रिंट होते. असे करत करत अनेक पाने वाया घालवली जातात. कधी कधी प्रिंटरच्या शाईने पासबुकाचे पूर्ण पान काळे करून मिळते.
काहीच दिसत नाही. जरा बरे प्रिंट होते तेव्हा फाँट इतका मोठा असतो की शंभर रुपयेही लाखाएवढे भासावेत.
बँक ३ - स्वतःचा तोरा न मिरवणार्या काही सहकारी बँका मात्र उत्तम सर्विस देतात. पासबुक काळे न करता आणि पाने वाया न घालवता प्रिंट करून देतात.
बँक ४ - काही बँका फारच तोर्यात असतात. कस्टमर सर्वात दुर्लक्षिण्याजोगी गोष्ट. आपण त्यांच्याकडे फिक्सड डिपॉझिट ठेवण्याकरता गेलो की ते सांगतात. आमच्याकडे खाते असेल तरच आम्ही FD स्वीकारू. अर्थात रीझर्व बँकेने हा नियम केलेला नाही. पण ब्रांच स्वतःच्या अधिकारात असे निर्णय घेते. बॅकवाले सांगतात. तुमच्या FDचे व्याज जमा करण्यासाठी इथे खाते लागेल. FD जर क्यूम्यूलेटिव्ह असेल तर अधून मधून तिचे व्याज भरण्याचा प्रश्नच येत नाही. मुदत संपल्यावर सव्याज मिळणारी रक्कम पेमेंट ऑर्डर(चेक)ने ग्राहकाला देता येते त्यामुळे FD साठी बचत खाते काढणे म्हणजे नालेसाठी घोडा. दुसरी गोष्ट क्यूम्यूलेटिव्ह FD कडे मधे मधे पहावे लागत नाही पण बचत खात्यात मात्र दर सहा महिन्यांनी व्यवहार करावे लागतात. पण लक्षात कोण घेतो.
बँक ५ - काही बँका मात्र अशा प्रकारे बचत खाते नसतानाही FD स्वीकारतात. FD पूर्वी KYC घेतात. पण आज FD केल्यावर अगदी दुसर्या दिवशीही एखाद्या व्यवहारासाठी बँकेत गेलो तर पुन्हा नव्याने KYC ची मागणी करतात. माणूस एकच तर त्याचे दोन दोन KYC घेण्याने काय साध्य होते हे अनाकलनीय आहे.
कुणीही माणूस जेव्हा प्रथमच बँकेत प्रवेशतो. तेव्हा त्याला बँकेने KYC कागदपत्रे मागावीत. त्याला आपला ग्राहक बनवावे. एक कस्टमर आयडी द्यावा. त्यानंतर हवा तो व्यवहार तो बँकेत करेल. बचत खाते, चालू खाते उघडेल. ठेव ठेवेल नाही तर लोन काढेल.
कस्टमर आयडी एकच राहील. त्यामुळे KYC पण एकच राहील. हे बँकेच्या सॉफ्टवेयरला समजते आणि त्यांच्या डेटाबेसलाही मान्य असते पण बँकेतल्या ५०+ वयाच्या कर्मचार्यांना मात्र हे समजत नाही.
बँक ६ - आणखी एक बँक आहे. अतिशय स्मार्ट बँक. जिने इतरांच्या खूप आधी एटीएम कार्ड आणि नेट बँकींग सुविधा द्यायला सुरुवात केली. एकूणच तिथले वातावरण एकदम कॉर्पोरेट. काही तक्रार करायला ब्रांचमधे जावे तर मशीनवर एक टोकन वगैरे दिले जाते. मग आपला नंबर आला की त्या त्या काऊंटरवर जायचे. बर्याचदा ब्रांचमधे जावेच लागत नाही. कारण सगळी कामे नेटवरून होवू शकतात. पण एक गोष्ट खटकते. ही बँक पासबुक देत नाही. तिचा पेपरलेसचा आग्रह. ती दर तीन महीन्यांनी स्टेटमेंट पाठवते. म्हणजे पेपर आलाच आणि ते पाठवण्यासाठी पोस्टेजचा खर्चही आला. त्यांना पासबुकची विचारणा केली असता ते म्हणतात. तर मग आम्ही तुम्हाला स्टेटमेंट देणे बंद करू आणि पासबुक म्हणून सगळी स्टेटमेंट एकत्र स्टेपल करून देऊ. वास्तविक स्टेटमेंटचे चिठोरे सांभाळण्यापेक्षा पासबुक सांभाळणे कितीतरी सोपे.
एरवी स्मार्टपणा दाखवणारी ही चकाचक बँक पासबुकबाबतीत स्मार्टपणा का दाखवत नाही अनाकलनीय आहे.
पूर्वीच्या काळी डेबिट कार्ड ही एक सुविधा होती आजही असते पण त्यात एक अडचण होती. एटीएम मधून पैसे काढताना पिन विचारला जात असे पण इतर खरेदी करताना कार्ड स्वाईप केल्यावर पिन विचारलाच जात नसे. केवळ यूजर फ्रेंडलीनेस नव्हे तर आपल्या पैशाची सुरक्षितता ही सुद्धा महत्त्वाची आहे हे बँका का लक्षात घेत नसत. त्यामुळे त्याकाळी आपले कार्ड चोरीला गेले तर आपल्या अनुपस्थितीतही व्यवहार करता येणे शक्य असे.
एक घटना. वाकडला सॉफ्टवेयर कंपनीमधला एक कर्मचारी मुंबईला जाण्यासाठी उभा होता. एका प्रायवेट गाडीने त्याला लिफ्ट दिली.
वाटेत त्याच्याकडून कार्ड हिसकावून घेण्यात आले. त्याचा खून करण्यात आला. नंतर त्याच्या कार्डवरून पावणे तीन लाखाचे व्यवहार करण्यात आले. पिन नंबर आवश्यक असता तर पिनसाठी तरी त्याला जिवंत ठेवले असते.
यावर बँकांचे उत्तर ठरलेले असते. असे काही व्यवहार तुमच्या कार्डवरून झाले तर तुम्ही एका तासाच्या आत आम्हाला कळवा. आम्ही त्याची काळजी घेऊ. पण पैसे परत मिळाले तरी जीवाला मुकलेला खातेदार परत कसा येइल आणि मरण पावलेला खातेदार तक्रारीसाठी फोन कसा करेल. म्हणून असे व्यवहार खातेदाराच्या जिवंतपणीच होवू नयेत यासाठी दक्षता घेतली जावी. अर्थात हे आमचे म्हणणे त्या काळात आम्ही अनेक बँकांकडे मांडले. आज हे व्यवहार पिन प्रोटेक्टेड झाले आहेत असे दिसते.
यापुढे पोस्ट ऑफीसकडेही बँकींगचे व्यवहार देणार आहेत. त्यावेळी तर काय काय अनुभव घ्यावे लागतील हे सांगणे कल्पनेच्या पलिकडचे आहे.
अर्थात हे सगळे असले तरी काही गोष्टी विसरून चालणार नाहीत.
कामाच्या दिवशी बँकेच्या वेळेत बँकेमधे जाणे शक्य नसते. अशा वेळी तिथला कर्मचारी सांगतो. बँक ४ ला बंद होते पण आम्ही अर्धे शटर ओढून ७ वाजेपर्यंत आतमधे काम करत असतो. तुम्ही ७ वाजता या. तुमचे काम होवून जाईल.
किंवा
आर्थिक वर्षाचा शेवट आलेला असताना एखादी बँक आवर्जून फोन करते आणि सांगते की तुम्ही पीपीएफ मधे भरलेला चेक क्लीयर व्हायला ३ दिवस लागतील कारण मधे सुट्टी आली आहे. चेकऐवजी येऊन कॅश भरलीत तर या आर्थिक वर्षात त्याची नोंद होइल आणि तुम्हालाच त्याचा फायदा होइल. त्यावेळी हे लोक कुणी परके नसून आपला जिव्हाळ्याने विचार करणारे आपले नातेवाईक आहेत अशी भावना मनात आल्याशिवाय रहात नाही.
तर असे हे माझे बँकानुभव. आपलेही काही अनुभव असतील तर अवश्य शेयर करा.
-
ashutoshjog@yahoo.com
प्रतिक्रिया
पुढे काय झालं? तुमचं समाधान
In reply to पुन्हा एकदा तीच बँक आणि तीच by अनिकेत वैद्य
वेळेची किम्मत
मला माझ्या युको ने 500 रु
. . .
...