लुटारू..???
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
ताई आणि भाऊजी उद्या येणार म्हणून फोन आला होता. मग काय आईला काय करू नी काय नको असं झालेलं. एक तर जावई पहिल्यांदाच घरी येत होते. त्यात त्यांना रजा नसल्यामुळे सकाळी येऊन संध्याकाळी परत जाणार होते. तसेही बाइक वरून एक तासाचा रस्ता होता. त्यामुळे घरातून निघताना ताई फोन करणार होती. म्हणजे आम्ही तयारीत राहणार होतो. स्वागत, पाहुणचार शेजार पाजारी भेट, दुपारचं जेवण त्यानंतर घटकाभर विश्रांती, संध्याकाळी गावदेवीच्या मंदिरात जाऊन दर्शन, अन सहा- साडेसहाला प्रस्थान असा भरगच्च कार्यक्रम आई ने तयार करून ठेवला होता.
ठेवणीतले बेडशीट - कव्हर बाहेर आले होते. इकडे तिकडे पडलेली रद्दी, कचरा साफ करून झाला होता. " आता दोन दिवस अजिबात घरात कचरा करायचा नाही, सांगून ठेवते!!" अशी तंबी सगळ्यांना मिळाली होती.
जावयाच्या जेवणाचा मेनू ठरल्या नंतर काही किरकोळ किराणा सामानाची यादी देऊन आण्णांना (वडील) वाण्याकडे पाठवण्यात आले होते. मला व धाकट्या भावाला तीन चार वेळा शेजारी पाठवून काही वस्तू मागवून आणवल्या होत्या. आम्ही पण ताई आणि भाऊजी घरी येणार म्हणून न कुरकुरता आई सांगेल ते सर्व हौसेने करत होतो.
खेडेगावात राहत असल्यामुळे प्रसंगा नुसार काही वस्तू शेजार पाजारी एक मेकांना विनातक्रार द्यायचे. त्यामुळे एकमेकांच्या कडूनं वस्तू आणणे यात काही कमी पणा वाटायचा नाही.
संध्याकाळी साडे सात वाजता आईने एकवार सगळ्या तयारी वर नजर फिरवली आणि समाधानाने मान डोलवत आत गेली, आणि आम्हाला जेवायला हाक मारली.
आण्णा, मी, भाऊ आणि आई सगळे एकत्रच जेवत होतो. एवड्यात " अग्गं बाई!!" असं म्हणत आई एकदम जेवायची थांबली.
आम्ही पण जेवण थांबवून आई कडे बघू लागलो. " काय झालं आता?" आण्णांनी विचारलं
" बासुंदी आणायची राहिली ना हो?" आई म्हणाली.
" राहिली? तू आठवण तरी केली होतीस का? तूच विसरलीस आता माझ्यावर ढकलू नकोस" आण्णा चिडून बोलले.
" ठीक आहे, मीच विसरले, काय काय म्हणून मी एकटीनं लक्षात ठेवायचं? सकाळपासून बघताय ना माझी धावपळ? आणि मघाशी जेवणाच मेनू ठरवत असताना तुम्हीच सांगितलंत बासुंदी, पुरी, मसाले भात भाजी आमटी असा बेत कर म्हणून. मग बासुंदी कशी विसरलात तुम्ही?"
हे बोलणं ऐकत असताना माझ्या पोटात गोळा उठत होता. का ते थोड्याच वेळात तुम्हालापण कळेल.
" बरं, सकाळी दूध आणून देतो, आटवून घरीच बनव आता." आण्णा बोलले.
" कायतरीच काय बोलताय? ते दोघं आल्यावर त्यांचा पाहुणचार करू का दूध आटवत बसू? चांगले दोन तास लागतात दाट बासुंदी बनवायला"
"आणि करपली बिरपली म्हणजे? नकोच ते, त्यापेक्षा तयारच आणलेली बरी."
आता आमच्या गावात तयार बासुंदी मिळण्याचं एकच ठिकाण आहे, चौगुले डेअरी!! हे सकाळी पाच वाजता उघडतं. त्यानंतर सात वाजेपर्यंत गावचं दूध संकलन करून टेम्पोत भरून कोल्हापुरला पाठवलं जायचं. सात नंतर गोळा झालेलं दूध खवा बनवायला त्यांच्या डेअरीत जायचं. खवा बनत असताना मध्येच बासुंदी बाजूला काढून ठेवली जायची. ती ऑर्डर प्रमाणे ते बाजूला काढून ठेवायचे
ही बासुंदी म्हणजे फक्त आटवलेलं दूध असायचं. त्यात साखर, बदाम, काजू, चारोळी, केवडा इसेन्स..आणि अजून काय काय असे सर्व पदार्थ घालून आई ती मस्त बनवायची.
प्रश्न एकच होता. हि डेअरी, म्हणजे आमच्या गावातली, संध्याकाळी सात वाजता बंद करून ते लोक त्यांच्या घरी म्हणजे आमच्या गावापासून ४ किमी अंतरावरील शेजारच्या गावी, जेथे त्यांचे घर होते, तिकडे जायचे. तिथे खवा वगैरे बनवायच्या भट्ट्या होत्या.
रात्री आठ वाजता या भट्ट्या चालू होत. त्यानंतर सगळं दूध आटवून खवा बनल्या नंतर वजनाप्रमाणे पॅकींग करून पहाटे हा खवा गोवा, मुंबई कडे रवाना व्हायचा.
माझ्या पोटात गोळा उठायचं कारण आता तुमच्या लक्ष्यात आलेच असनार. नाही म्हणता? मग वाचा पुढे..
तर जर खात्रीने बासूंदी मिळवायची असेल तर आत्ता कोणीतरी भट्टीवर जावून घेवून येणं हा एकमेव मार्ग होता.
आणि कोणीतरी म्हणजे मीच असणार हे मला अनुभवातून माहीत झालं होतं.
" पटकन जेवण संपव, आणि जाऊन बासूंदी घेऊन ये" माँ साहेबांचा हुकूम झाला.
" मी नाही जाणार येवढ्या रात्रीचा, आणि दोन दिवसात माझी चाचणी परिक्षा आहे. मला अभ्यास करायचाय." मी काम टाळण्याचा एक प्रयत्न करून बघीतला. त्यावर आईने अशा नजरेनं माझ्या कडे बघितलं, मी खाली मान घालून एकच शब्द बोललो " जातो" आणि जेवण संपवायच्या कामाला लागलो.
जेवण संपल्यावर माझ्या हातात एक पिशवी, ज्यात एक स्टीलचा डबा होता, देत " सावकाश जा, सांभाळून जा, आणि सावकाश सांभाळून परत ये, ही बॅटरी घे बरोबर, आणि सायकल जास्त जोरात नको पळवू." अशा सूचना देत आई माझ्या बरोबर मी सायकल वर टांग टाके पर्यंत येत राहीली.
मला ४ किमी सायकल चालवणं म्हणजे काहीच विशेष वाटायचं नाही. रोज शाळेला जाणं येणं मिळून ५-६ किमी सहजच व्हायचं. त्यात ५-६ मित्र मिळून आठवड्यातून एकदा तरी कुठे ना कुठे भटकायला जायचो. तेव्हा १५-२० किमी सहजच फिरणं व्हायचं.
आता पण एक मस्त लय पकडून पायडेल मारत मनात गाणी गुणगुणत चाललो होतो.गावातून बाहेर पडलो आणि रस्त्यावर थोडा अंधार जाणवायला लागला. जवळ जवळ साडे आठ वाजले असावेत असा मनात अंदाज केला. चांदणे असल्यामुळे बॅटरी पेटवायची गरज भासत नव्हती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पुरुषभर वाढलेल्या उसाची शेती होती. त्यामुळे हवेत गारवा होता. दीड किमी नंतर आजूबाजूला एखाद दुसरे घर असायचे ते पण संपले दोन अडीच किमी नंतर एक ऊस तोडणी करणार्या कामगारांचा तळ लागला. यांना फडकरी म्हणायचो आम्ही. तिथे थोडी जाग होती अजून. त्याच्यांकडे बघत पुढे सरकलो.
आता पुढच्या गावातले एकटे दुकटे घर लागू लागले. काही घरात जाग दिसत होती तर काही निद्रिस्त झाली होती. गाव जवळ येताच खांबावरच्या लायटींचा उजेड बघून सायकल चा स्पीड अजून वाढवला आणि थेट त्या डेअरी वाल्याच्या दारातच ब्रेक मारला.
आत जाऊन बघितलं तर यांच्या भट्ट्या नुकत्याच चालू झालेल्या दिसल्या. मी त्यांच्या मालका कडे डबा आणी पिशवी दिली आणि " दीड किलो बासुंदी" असे सांगितले.
त्यावर "तासभर लागेल, बस तोपर्यंत." असे उत्तर मिळाले.
चरफडत बाहेर येऊन कट्ट्यावर बसलो. कारण आत भयानक उष्णता होती. माझ्या सारखेच अजून दोघे होते. ते पण बासुंदी न्यायलाच आले होते. बहुतेक त्याच गावातले असावेत.
समवयस्क असल्यामुळे एकमेकांची ओळख करून घेतली आणि गप्पा मारत बसलो. तास म्हणत दीड तासांनी बासुंदी पदरात पडली आणि नवीन मित्रांचा निरोप घेऊन सायकल वर टांग टाकली.
आता जवळ जवळ दहा तरी वाजले असतील, भाऊ चादर गुरफटून झोपला असेल. आण्णांच काही सांगता येत नाही पण आई मी येई पर्यंत जागी असणार हे नक्की होतं. मला पण कधी एकदा घरी पोहोचून मस्तपैकी ताणून देतो असं झालेलं. त्यामुळे सायकलचा वेग आपसूकच वाढला होता. दीड किमी अंतर पार झालं असावं. फड्कर्यांचा तळ पार झाला. यावेळी मात्र तळावर सामसूम होती. एक दोन कुत्री भुंकत अंगावर आली. सायकल बरोबर पळू लागली. मी कुत्र्यांना मुळीच घाबरायचो नाही. लहानपणापासून कुत्र्यांच्या पिलांबरोबर खेळायचो. ती पिलं मोठी झाली की आमचा मागे मागे फिरायची. त्यामुळे या कुत्र्यांना पण शीळ घालून खेळवल्या सारखे केल्यावर ती शेपूट हालवत थांबली आणि मी दूर जाई पर्यंत माझ्याकडे बघत परत फिरली.
एक दोन मिनिटं झाली असतील एवढ्यात " ए पोरा.. ए थांब.." अशी हाक लांबून मारलेली ऐकू आली. मी एकदम दचकलो. एवढ्या सामसूम वातावरणात कोण हाक मारत असेल? असा विचार करत असताना नकळत वेग कमी झाला.
" ए थांब, पुढं जाऊ नको, थांब." अशी हाक या वेळी जरा जवळून आल्या सारखी वाटली. स्वर जरा दरडावल्या सारखा वाटला, आणि मी परत सायकल दामटायला सुरू केली. छातीत धडधडायला लागलं हे नक्कीच फडकारी लोकांपैकी कोणीतरी असणार याची खात्री पटली. कारण गावात लोकांना बोलताना ऐकलं होतं की हे लोक रात्री आजूबाजूला चोर्या वगैरे करतात. भाजी पाल्याची शेती असेल तर रात्रीच्या वेळी भाजीपाला वगैरे चोरतात. आत मला एकटा बघून बहुतेक हे लुटायला बघत असणार.
आज जेव्हा हे आठवतंय तेव्हा हसू येतंय कारण लुटायला त्यावेळी माझ्याकडे काय होतं ? दीड किलो बासुंदी आणि एक सायकल?
पण त्यावेळी मात्र जाम घाबरलो आणि सायकल फुल्ल स्पीड ने मारू लागलो. त्याबरोबर मागचा आवाज पण जोर जोरात येऊ लागला. " ए पोरा.. थांब.. ए.."
पाच मिनिटात गावा जवळचे दिवे दिसू लागले तसा अजून हुरूप चढला आणि वेग परत वाढला.
छातीचा भाता लोहाराच्या भात्यासारखा चालत होता, पण त्याची पर्वा न करता फुल्ल स्पीड ने घरच्या दिशेने सायकल दामटत होतो. गावात सगळी कडे सामसूम झाली होती. पण गावात शिरताच थोडा धीर आला आणि वेग कमी करून मागे वळून बघितले. पाठलाग करणारा आता बहुतेक गावत शिरायचं धाडस करणार नाही या विचाराने सायकल जवळ जवळ थांबवल्यागत केली.
तेवड्यात पुन्हा " ए थांब.." अशी हाक अन जोरात सायकल दामटत येणारा एक जन दिसला. पुन्हा जीव खाऊन पायडल वर उभा राहून सायकल पळवायला लागलो.घर नजरेच्या टप्प्यात येताच जोर जोरात सायकलची घंटी वाजवू लागलो.
दरवाज्यातून रस्त्यावर प्रकाश पडलेला दिसला म्हणजे दार उघड होतं आणि आई जागी होती. दारात येताच चित्रपटातल्या प्रमाणे ब्रेक मारला आणि हँडेल ला अडकवलेली पिशवी काढून घेऊन धावत घरात शिरलो.
मला असा धापा टाकत घाबरलेल्या अवस्थेत बघून आई ने विचारलं " अरे काय झालं? असा का धापतोयस? सावकाश ये म्हणून सांगितलं होतं न तुला?"
मी श्वासांवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करत बोललो-" ते.. ते.. चोर.. लुटारू.. लुटारू.."
" काय? चोर? लुटारू? कुठायत?" असं म्हणत आई दरवाज्यातून बाहेर वाकून बघू लागली. तोवर बाहेर आवाज आला..
" ते बासुंदी घेऊन आलेलं पोरगं हितच आलंय काय?"
" होय, का हो? काय झालं?" आईनं विचारलं. म्हणजे तो लुटारू नव्हता? मग तो माझ्या का मागे लागला आहे? मी काय केलंय? मी आठवून पण काय समजत नव्हतं.
" कुठाय ते?" त्या माणसाचा पुन्हा आवाज आला.
" हा काय, आत आहे, पण काय झालं? काय केलं यानं?" आई विचारत होती. एवढ्यात आवाज ऐकून आण्णा पण बाहेर आले. ते पण झोपले नव्हते अजून. ते बाहेर गेले आणि त्या माणसाला विचारू लागले "काय झालं? काय भानगड केली यानं?"
" जरा आत येऊ काय? सांगतो सगळं." म्हणत तो माणूस सरळ आत आला. मला बघताच " काय रे पोरा? कवा पासून हाका मारतोय, थांबला का नाहीस?" असा धापत बोलला.
त्याला बघताच मी ओळखलं हा तर त्या भट्टी वरचा माणूस! हा का माझ्या मागे लागलाय? मी पुन्हा आठवायला लागलो, काय चुकलंय आपलं? पण छे, तसं काहीच आठवेना.
" अहो, तो तुम्हाला लुटारू समजत होता म्हणून नाही थांबला" आईने सांगताच तो माणूस "लुटारू?" असं म्हणत जोरजोरात हसू लागला.
" अरे इकडे कुठले आलेत लुटारू?" आण्णा मला म्हणाले. " पण काय रे काय केलं यानं?" असं त्याला विचारलं.
" सांगतो थांबा," असं म्हणत तो उठला अन बाहेर गेला. मी आता जरा स्थिर स्थावर झालो होतो. मी बाहेर वाकून बघितलं तर तो सायकलच्या हँडेल ला अडकवलेली किटली काढून घेऊन आत आला.
मी आणलेल्या बासुंदीच डबा बाजूला ठेवलेला दिसताच पटकन तो उचलला आणि आई कडे देत बोलला.." वैनी ही बासुंदी फेकून द्या, आणि ही मी आणलेली दुसरी बासुंदी घ्या."
" का? हिला काय झालंय?" आईने विचारले
" अहो, ह्यो तुमचा पोरगा बासुंदी घेऊन बाहेर पडला, आणि पाचाच मिनटात आमाला त्या भांड्यात पाल पडलेली दिसली. पाल विषारी असती हो. म्हणलं लई लांब नसल गेला पोरगा, गाठू सायकलीने वाटेत. आणी पोरग्याला अंधाराचं परत याव लागू नये म्हणून दुसरी चांगली बासुंदी बरोबर घेतली. याला गाठून ही बासुंदी ओतून माझ्याकडची किटली ह्याला द्यावी आणि परत फिरावं, किटली सकाळी डेरीत आणून देतील म्हणून जोरात सायकल हाणत जवळ जवळ ह्याला गाठलाच होता. दिसल्या बरोबर हाक मारली, तर ह्यो तराट सुटला. यवड्या जोरानं सायकल हाणली ह्यानं, मला दिसायचाच बंद झाला. मग काय करणार? आलो हितपर्यंत सायकल मारत. गावात शिरताना जरा दिसला होता,पण मला बघून परत पळत सुटला. आता तुमचं हे एकच घर उघडं दिसलं म्हणून तुमाला विचारलं."
आम्ही तिघे तो सांगत असलेली कहाणी ऐकून नि:शब्द झालो होतो.
"बरं, ती किटली द्या आता खाली करून, जायला पायजे परत. भट्टी विझवून आलोय. अजून दोन जन गावातले पण बासुंदी घीउन गेलेत. त्यांच्या कड पण एकाला पाठवलाय."
" बरं एवढ्या लांब आलाय, जरा चहा घेता का?" आईने विचारलं.
" अं.. करताय? बरं करा अर्धा कप, बाहेर थंडी लईच हाय," आई आत गेली दोन्ही बासुंदीची भांडी घेऊन. मी काहीही न बोलता त्याला बघत बसलो होतो.
दहा मिनटांनी चहा पिऊन अन रिकामी किटली घेऊन तो सायकल घेऊन निघून गेला. मी तो दिसेनास होई पर्यंत त्याच्याकडे बघत दारात उभा होतो.
प्रतिक्रिया
मस्तच...
मस्त किस्सा
छान लिहिलंय!
ओ पाटील हो
वा!! भारीच लिहीलय. आवडलं!!
वा. मस्तच लिहलयं.
मस्त!
मस्त...
आवडल..
आवडली कथा.
छान लिहिलंय
ख्या ख्या ख्या..... येक लम्बर
ख्या ख्या ख्या..... येक लम्बर
पाटलांनू, एका शब्दाचं नाव
खानानु, तुमी सुचवा एखाद नाव,
मस्त कथा !
मस्तच ल्हिवलाय किस्सा
कथा आवडली
मस्त!
मुळात अनुभव चांगला आहे.
मस्तं! छान रंगवली आहे गोष्ट.
स्पीड ब्रेकर...
एक नंबर !!
थोडी त्रिज्या वाढवा....
छान लिहिलेय.
छान लिहिले.
कथाकथनाची शैली आवडली.
+१
छान कथा ..
__/\__
माझाही एक प्रयत्न:
बरोब्बर..
हा..हा..
ह्यो जोक हुता न्हवं? का खरुखर
पारेवाडी
झकास !!!
छान कथा.
झक्कास
एकच लंबर बगा. छान लिवलायसा
छान लिहिलय !!
कथा आवडली